चालू घडामोडी - ०१ सप्टेंबर २०१८

Updated On : Sep 01, 2018 | Category : Current Affairsकाश्मिरी कन्या बनली पायलट, काश्मीर खोऱ्यातील पहिली महिला वैमानिक :
 • नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात जन्मलेली आणि तिथेच वाढलेली इरम हबीब ही ३0 वर्षांची तरुणी आता वैमानिक झाली आहे. वैमानिक होणारी ती काश्मीर खोऱ्यातील पहिली मुस्लीम तरुणी आहे. तिथे वैमानिकाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, ती पुढील महिन्यात एका खासगी कंपनीत रुजू होईल.

 • इरमने लहानपणीच वैमानिक व्हायचे ठरवले होते. पण घरच्या मंडळींची त्यास तयारी नव्हती. घरच्यांना समजावण्यात माझी ६ वर्षे गेली. त्यानंतर मला आई-वडिलांनी परवानगी दिली, असे ती सांगते. तिचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण डेहराडूनमध्ये झाले आहे. घरचे लोक रुढी, परंपरा जपणारे असले तरी आर्थिक स्थिती चांगली असल्याने तिला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सारी मदत केली.

 • व्यावसायिक उड्डाणाचा परवाना मिळवण्यासाठी तिने दिल्लीत प्रशिक्षण घेतले. त्याआधी अमेरिकेतील मियामीमध्येही तिथे विमान उड्डाणाचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले होते. इरम हबीबचे वडील काश्मीरमधील आरोग्यविषयक सामग्री पुरवठा करणारे कंत्राटदार आहेत.

 • वैद्यकीय सामग्रीचे पुरवठादार आहेत. दिल्लीतच नव्हे, तर मियामीमध्येही काश्मीरमधील मुस्लीम तरुणी विमान उड्डाण करते, हे पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली होती, पण आता माझे लहानपणीचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे इरम हबीब सांगते. 

व्होडाफोन-आयडिया ठरणार देशातील सर्वांत मोठी कंपनी :
 • नवी दिल्ली : आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया या कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विलीनीकरणानंतर तयार झालेली नवी कंपनी भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे. दोन्ही कंपन्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून विलीनीकरणाची माहिती दिली. व्होडाफोन-आयडिया लि. असे नव्या कंपनीचे नाव असून, कंपनीचे ४0८ दशलक्ष ग्राहक आहेत.

 • नव्या कंपनीसाठी १२ सदस्यांचे संचालक मंडळ स्थापन केले आहे. त्यात ६ स्वतंत्र संचालक आहेत. कुमारमंगलम बिर्ला हे नव्या कंपनीचे चेअरमन आहेत. संचालक मंडळाने लगेचच कारभार सुरू केला असून, बालेश शर्मा यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 • निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही कंपन्या एकत्र करण्यात आल्या असल्या तरी व्होडाफोन आणि आयडिया हे ब्रँड कायम राहतील. दोघांचा मिळून ३२.२ टक्के बाजार हिस्सा कंपनीकडे असेल. देशातील नऊ दूरसंचार मंडळांत कंपनी सर्वोच्च स्थानी राहील. सध्या भारती एअरटेल ही कंपनी पहिल्या स्थानी होती, तिच्या स्थानाला आता धक्का लागणार आहे.

 • ३0 जून २0१८ रोजीच्या स्थितीनुसार, कंपनीचे कर्ज १,0९,२00 कोटी रुपये आहे. विलीनीकरण शुल्कापोटी कंपनीने दूरसंचार विभागास ३,९00 कोटी रुपये दिले असून, त्यानंतर कंपनीकडे १९,३00 कोटी रुपयांची रोख शिल्लक आहे.

व्हिसा धोरणात बदल न करण्याचे अमेरिकेचे संकेत :
 • भारत व अमेरिका यांच्या दरम्यान टू प्लस टू संवाद सप्टेंबरमध्ये होणार असला तरी त्या पाश्र्वभूमीवर  सध्याच्या कडक एच १ बी व्हिसा धोरणात कुठलेही बदल करण्यात येणार नाहीत. त्यात देशी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिका कायम राहील, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

 • भारतीय माहिती तंत्रज्ञांना अमेरिकेत मोठी मागणी असून ते एच १ बी व्हिसावर तेथे जात असतात, त्यामुळे सप्टेंबरमधील संवादात भारत हा मुद्दा चर्चेत उपस्थित करण्याची शक्यता आहे. एच १ बी व्हिसा  धोरणाचा फेरविचार करून त्यात अमेरिकी कामगारांचे हित जोपासण्यात आले आहे.

 • एच १ बी व्हिसा हा अस्थलांतरित व्हिसा असून त्यामुळे अमेरिकी कंपन्या परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू शकतात, पण ते सैद्धांतिक व तांत्रिक विषयात तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. दरवर्षी भारत व चीन या देशांचे अनेक कर्मचारी अमेरिकेत नोकरीसाठी जात असतात. ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे,की  एच १ बी व्हिसा व्यवस्थेत सुधारणा करण्यात आल्या असून अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान कंपन्या अमेरिकी लोकांना नोक ऱ्या नाकारून या व्यवस्थेचा गैरवापर करतात.

 • परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले, की अमेरिकी काँग्रेस सदस्य व व्हाइट हाऊसकडे एच १ बी व्हिसाच्या कडक नियमांचा मुद्दा टू प्लस टू संवादात ६ सप्टेंबरला नवी दिल्ली येथे होणाऱ्या चर्चेत नम्रपणे उपस्थित केला जाईल. अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले,की भारत हा मुद्दा उपस्थित  करणार हे आम्हाला माहिती आहे, पण हे धोरण आता बदलण्यात येणार नसून त्यात कडक बदल करण्यात येत आहेत.

लग्नासाठी स्त्री-पुरुष दोघांसाठी किमान वय समान ठेवा - कायदा आयोग :
 • नवी दिल्ली : लग्नासाठी तरुण आणि तरुणीचं किमान वय समान ठेवा, अशी सूचना कायदा आयोगाने केली आहे. पुरुषांसाठी लग्नाचं वय 21 वर्ष आणि महिलांसाठी 18 वर्ष हे चुकीचं असल्याचं कायदा आयोगाने म्हटलं आहे. लग्नासाठी पुरुषाचं वय स्त्रीपेक्षा जास्त असावं, असा समज आहे.

 • पंरतु कायदेशीररित्या प्रौढ होण्याची वयोमर्यात 18 वर्ष आहे. त्यामुळे विवाहासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी ठेवणं हे योग्य नाही, असं आयोगाने म्हटलं आहे.

 • कायदा आगोयाने समान नागरिक हक्क आणि पर्सनल लॉमध्ये सुधारणा करण्याची सूचना केली आहे. अनेक लोकांशी चर्चा करुन कायदा आणि सामाजिक परिस्थितीच्या पुनरावलोकनच्या आधारावर कायदा आयोगाने म्हटलं आहे की,

 • सध्या देशात समान नागरी कायद्याची गरज नाही.  सध्याच्या पर्सनल लॉमध्ये सुधारणा गरजेची आहे. मूलभूत अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्यामध्ये संतुलन हवं. कौटुंबिक मुद्द्यांशी संबंधित पर्सनल लॉमध्ये क्रमवार संग्रह करण्यावर विचार करावा.

राज्यात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्याची घोषणा :

 

 • नवी दिल्ली : 'पासपोर्ट आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्या अंतर्गत महाराष्ट्रात 11 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला ही माहिती दिली. या नवीन केंद्रांसह राज्यात पासपोर्ट सेवा केंद्रांची एकूण संख्या 36 होणार आहे.

 • राज्यात भंडारा, गडचिरोली, रामटेक, बुलडाणा, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी या ठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा क्रेंद्र उभारण्यात येणार आहेत.

 • नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने 'पासपोर्ट आपल्या दारी' या कार्यक्रमा अंतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी 2017 मध्ये देशभरात 289 पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. टप्याटप्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असून देशभरात आतापर्यंत 218 पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत.

 • या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार देशभरात 87 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 11 नवीन केंद्र उभारण्यात येणार असल्याचं डॉ. मुळे यांनी सांगितलं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

 • १९०६: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.

 • १९११: पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.

 • १९३९: जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली.

 • १९५१: अर्नेस्ट हेमिंग्वेयांची द ओल्ड मॅन अॅन्ड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.

 • १९५६: भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.

 • १९७२: अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.

 • १९७९: पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.

 • १९८५: संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.

जन्म

 • १८९५: मानव-सक्षम विमानांचे निर्मिते एंगलबर्ट जशचा यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून १९५५)

 • १८९६: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७७)

 • १९३०: भारतीय आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून २०१५)

 • १९३१: भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)

 • १९४६: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह मू-ह्युन यांचा जन्म.

 • १९४९: लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांचा जन्म.

 • १९७०: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक पद्मा लक्ष्मी यांचा जन्म.

मृत्यू

 • १५८१: शिखांचे चौथे गुरू गुरू राम दास यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)

 • १७१५: फ्रान्सचा राजा  लुई (१४वा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १६३८)

 • १८९३: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८५०)

 • २००८: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)

 • २०१४: स्पॅनडेक्स चे   निर्माते योसेफ शेव्हर्स यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९३०)

टिप्पणी करा (Comment Below)