चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ एप्रिल २०१९

Date : 2 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्यात सर्वाधिक मतदान केंद्रे पुण्यात :
  • पुणे : पुणे जिल्ह्य़ातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर अशा चारही लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांची संख्या ७५ लाख १६ हजार ८८० झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वाधिक मतदान केंद्रे पुण्यात आहेत.

  • शहरासह जिल्ह्य़ातील एकूण मतदान केंद्रांची संख्या सात हजार ६६६ एवढी झाली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पुरवणी यादी जाहीर होणार आहे. पुरवणी यादीत नाव असलेल्या मतदारांना लोकसभा निवडणुकीकरिता मतदान करता येणार आहे.

  • १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर निवडणूक शाखेकडून सातत्याने खास मतदार नोंदणी मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या. तसेच शहरासह जिल्ह्य़ातील सर्व महाविद्यालयांमध्ये नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी खास मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नव्या मतदारांची नोंदणी करणे, मतदारांचे नाव, पत्ता यांची दुरुस्ती करणे, दुबार नावे वगळणे आदी कामे करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत तब्बल एक लाख ४७ हजार ७३९ अर्ज निवडणूक शाखेकडे दाखल झाले आहेत.

  • या सर्व मतदारांची नावे पुरवणी मतदार यादीत समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. सर्वसाधारणपणे लोकसंख्येच्या घनतेनुसार शहरी भागात चौदाशे मतदारांसाठी एक, तर ग्रामीण भागात बाराशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र असणे अपेक्षित आहे. शहरात हडपसरमध्ये ३५, चिंचवडमध्ये ३१ मतदान केंद्रे वाढण्याची शक्यता आहे.

  • पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्य़ातील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील वाढीव मतदान केंद्रांच्या मंजुरीचे प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवले जाणार आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक मतदान केंद्रे असून त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये सात हजार २९७ मतदान केंद्रे आहेत. त्याखालोखाल ठाण्यात सहा हजार ४८८ मतदान केंद्रे आहेत.

माहिती आयोगावर अंकुश ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न :
  • सरकारी अधिकारी तसेच प्रशासकीय भ्रष्टाचाराला आळा घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या माहिती आयोगाच्याच नाडय़ा आवळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला गेला आहे. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांविरोधातील तक्रारींची शहानिशा करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचीच समिती स्थापून या आयोगावर अंकुश राखण्याच्या या प्रयत्नांना आयोगाकडून तीव्र विरोध होत आहे.

  • माहिती आयुक्तांच्या चौकशीसाठी अशी समिती नेमण्याचा प्रयत्न हा माहिती अधिकाराच्या कायद्याच्या मूळ हेतूलाच छेद देणारा आहे, अशी टीका सुरू आहे. या प्रस्तावाबद्दल गेल्याच महिन्यात सरकारने माहिती आयुक्तांचे मत मागवले होते. आता लोकसभा निवडणुकीमुळे हा प्रस्ताव अंमलात येण्याचा मार्ग रोखला गेला असला तरी सरकारच्या या प्रयत्नांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

  • मुख्य माहिती आयुक्तांविरोधात तक्रारी आल्या तर त्याची चौकशी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षणविषयक सचिव आणि निवृत्त मुख्य माहिती आयुक्त यांची समिती काम करील.

  • निवडणूक आयुक्तांच्या चौकशीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील समन्वय सचिव, केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षणविषयक सचिव आणि निवृत्त माहिती आयुक्त यांची समिती असेल. याचाच अर्थ सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार रोखणाऱ्या माहिती आयोगाचे भवितव्य बहुसंख्य सरकारी अधिकाऱ्यांचाच समावेश असलेल्या समितीकडे राहील आणि हे गैर असल्याचा सूर निघत आहे.

अनिवासी भारतीयांबरोबर भाजपची प्रचारमोहीम :
  • जगभरातील १५ देशांमधील अनिवासी भारतीयांच्या मदतीने ‘एक कॉल, देश के नाम ‘ अशी लोकसभा निवडणूक प्रचार मोहीम भाजपने सोमवारपासून सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेवर यावे, यासाठी ही मोहीम राबविली जाणार असून आठ ते दहा हजार अनिवासी भारतीय देशातही काही दिवस येऊन प्रचारात सहभागी होणार आहेत.

  • या मोहीमेचे काम हाताळणारे भाजप पदाधिकारी संतोष कुमार गुप्ता यांनी या उपक्रमाची माहिती पत्रकारांना दिली. मोदींच्या काळात भारताची कणखर प्रतिमा देशात तयार झाली असून हे सरकार अतिशय चांगले काम करीत आहे.

  • त्यामुळे ते पुन्हा सत्तेवर यावे, असे अनिवासी भारतीयांनाही वाटत असून ते प्रचार मोहीमेत सहभागी होणार आहेत. आपले मित्र, नातेवाईक व इतरांना व्हिडीओ कॉल करुन ते मोदींचा प्रचार करतील. भाजप उमेदवारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील, असे गुप्ता यांनी सांगितले

कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी :
  • काँग्रेसने पुण्यातून चर्चेत असणाऱ्या नावांऐवजी मोहन जोशी यांना लोकसभेची उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड आणि सुरेखा पुणेकर यांच्या नावाची चर्चा होती. पण काँग्रेसने मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मोहन जोशी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून गेल्या चार दशकापासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत.

  • गिरणी कामगार, पत्रकार ते राजकीय नेता असा मोहन जोशी यांचा प्रवास आहे. मोहन जोशी हे बराचकाळ पुणे शहर काँग्रेसचे प्रमुखही होते. पुण्यात जन्मलेल्या मोहन जोशी यांनी श्री शिवाजी मराठा हायस्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरीवर राहिले. सुरुवातीला त्यांनी गिरणी कामगार म्हणून नोकरी केली. त्यानंतर स्थानिक मराठी वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून रुजू झाले.

  • पत्रकारीता करत असताना त्यांनी पुणे शहराशी संबंधित अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्दे तडीस लावले. आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. पत्रकारीता करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेकडे त्यांचा कल वाढला व १९७२-७३ च्या सुमारास युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.

सॅम करनची हॅट्ट्रिक, पंजाबचा तिसरा विजय :
  • मोहाली :  सॅम करनच्या हॅटट्रिकच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबनं दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. पंजाबचा यंदाच्या मोसमातला हा तिसरा विजय ठरला. या सामन्यात पंजाबनं दिल्लीसमोर विजयासाठी 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पंजाबच्या प्रभावी माऱ्यासमोर दिल्लीचा डाव 152 धावांत आटोपला.

  • पंजाबकडून सॅम करनन अवघ्या 11 धावा देत हॅटट्रिकसह चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याआधी डेव्हिड मिलर आणि सर्फराज खानच्या जबाबदार खेळीमुळे पंजाबनं 20 षटकांत 9 बाद 166 धावांची मजल मारली होती.

  • पंजाबचे 167 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाने सुरुवातीपासून सामन्यावर पकड ठेवली होती. दिल्लीचा संघ एकवेळ 3 बाद 144 अश मजबूत स्थितीत होता. परंतु अंतिम क्षणी पंजाबच्या गोलंदाजांनी सामना फिरवला.

  • दिल्लीकडून ऋषभ पंत (39 )आणि कॉलिन इन्ग्रामने (38) सामना चांगली फलंदाजी केली. तर पंजाकडून सॅम करनने 11 धावात 4 बळी टिपले, त्याला कर्णधार अश्विन (31 धावांत 2 बळी)आणि मोहम्मद शमीने (27 धावांत 2 बळी )चांगली साथ दिली.

नरेंद्र मोदींच्या नमो अॅपशी संबधित कंपनीच्या १५ फेसबुक पेजेसवर कारवाई :
  • नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना फेसबुकने काँग्रेस आणि भाजपला जोरदार झटका दिला आहे. समाजमाध्यमांवर खोट्या बातम्या आणि माहितीचा प्रसार करणाऱ्यांवर फेसबुककडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. फेसबुकने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी संबधित असलेल्या एका आयटी कंपनीची काही फेसबुक पेजेस आणि अकाऊंट्सवर कारवाई केली आहे. फेसबुकने स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

  • नमो अॅपशी संबधित फेसबुक पेजेसवर कारवाई करण्यापूर्वी फेसबुकने काँग्रेसशी संबंधित काही व्यक्तींच्या तब्बल 687 फेसबुक खात्यांवर कारवाईक केली आहे. त्यामध्ये 549 फेसबुक अकाऊंट्स आणि 138 फेसबुक पेजेसचा समावेश आहे. या पेजेसवरुन खोटी माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. त्यामुळे ही पेजेस बंद केल्याचे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकच्या या कारवाईमुळे ऐन निवडणूक काळात काँग्रेस आणि भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

  • सिल्ह्वर टच ही आयटी कंपनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अॅपशी संबधित आहे. या कंपनीने बनवलेली 15 पेजेस फेसबुकने बॅन केली आहेत.

दिनविशेष :
  • जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरुकता दिन

महत्वाच्या घटना 

  • १८७०: गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.

  • १९८२: फॉकलंडचे युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.

  • १८९४: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.

  • १९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. ते ७ दिवस २१ तास ४० मिनिटे अवकाशात होते.

  • १९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.

  • १९९८: कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.

  • २०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने २८ वर्षांनंतर विजय मिळवला.

जन्म 

  • १६१८: इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी यांचा जन्म.

  • १८७५: ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४०)

  • १९२६: कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १९७९)

  • १९७२: भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्म.

  • १९८१: भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८७२: मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १७९१)

  • १९३३: क्रिकेट खेळाडू महाराजा के. एस. रणजितसिंह यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १७९१)

  • २००९: गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.