चालू घडामोडी - ०२ फेब्रुवारी २०१९

Date : 2 February, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी सरकारच्या बजेटनंतर 8 बँकांमध्ये बंपर नोकरभरती, १० टक्के आरक्षणाचा मिळणार लाभ :
  • नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारनं अंतरिम अर्थसंकल्प मांडला. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांमुळे आता मोठी नोकरभरती होण्याचे संकेत मिळत आहेत. मोदी सरकारनं रोजगार वाढवण्यासाठी आणखी आठ बँकांना पीसीएतून बाहेर काढण्याचे सूतोवाच केले आहेत. 

  • मोदी सरकारच्या या निर्णयामुळे या बँका स्वतःच्या शाखा वाढवू शकणार आहेत. बँकांनी शाखा वाढवल्यास बंपर नोकरभरती करण्यात येणार असून, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. अर्थमंत्री पीयूष गोयल म्हणाले, आरबीआयनं बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सला पीसीए (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन)मधून बाहेर ठेवलं आहे. आता आणखी काही बँकांना आम्ही पीसीएतून बाहेर काढणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं होतं. या सरकारी बँकांना आरबीआयनं पीसीए(प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन)मध्ये ठेवलं होतं.

  • पीएसीएमध्ये सहभागी असलेल्या बँकांची परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत या बँका कोणतंही मोठं कर्ज देऊ शकत नाहीत. या बँकांना पीसीएतून बाहेर काढल्यानं ग्राहकांवर कोणताही सरळ परिणाम होणार नाही. परंतु या बँकांना स्वतःच्या शाखा वाढवण्यास मदत मिळणार आहे. 

  • तसेच या बँका नव्या निर्माण करण्यात येणाऱ्या शाखेतील कर्मचाऱ्यांसाठी नव्या भरती करतील. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कोणत्याही बँकेला पीसीएमध्ये ठेवल्यास त्याची ग्राहकांना चिंता करण्याची आवश्यकता नसते. कारण आरबीआयनं काही मानकांच्या आधारावर बँकांच्या वित्तीच्या स्थितीत सुधार होण्यासाठी पीसीए हा फ्रेमवर्क तयार केला आहे. जेणेकरून बँक आपल्या निधीचा योग्य वापर करून संभाव्य धोक्यातून बाहेर पडू शकेल.  

अ. भा. आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत शायन हिने जिंकले कास्य :
  • औरंगाबाद : उदयपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत शायन पठाण हिने ऐतिहासिक कामगिरी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाला कास्यपदक जिंकून दिले.

  • शायन पठाण हिने ही कामगिरी महिलांच्या ८१ पेक्षा जास्त किलो वजन गटात केली. शायन पठाण हिला एनआयएस बॉक्सिंग प्रशिक्षक अजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

  • या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे, प्र. कुलगुरू प्रो. अशोक तेजनकर, कुलसचिव साधना पांडे, क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव व सिनेट सदस्य पंकज भारसाखळे, संदीप जगताप, रवींद्र माळी, लक्ष्मण कोळी आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

१ लाख कोटी रुपये खर्चून सवलतींचा ५५ कोटी लोकांना लाभ :
  • नवी दिल्ली : अंतरिम अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लखलखीत मुद्रा उमटली आहे. अंतरिम असूनही तो संपूर्ण अर्थसंकल्पाच्या स्वरूपात सादर करण्याचे धाडस या आधी कोणत्याही सरकारने केले नव्हते, ते मोदींनी केले. भाजपापासून दूर गेलेल्या शहरी मतदाराला जवळ आणण्यासाठी प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढविण्याची पंतप्रधानाची सूचना पीयूष गोयल यांनी तंतोतंत पाळली.

  • त्यामुळे तिजोरीवर १८,५०० कोटी व अन्य सवलतींमुळे आणखी ४,७०० कोटी रुपयांचा भार पडेल. मात्र, या निर्णयाद्वारे मोदींनी विरोधकांना चीतपट केले. या सवलतींमुळे तीन कोटी करदाते भाजपावर खूश आहेत. विविध सवलतींसाठी मोदी सरकार १ लाख कोटी रुपये खर्च करणार असून, त्याचा लाभ ५५ कोटी लोकांना होईल.

  • पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या आधी दरवर्षाला १० हजार रुपये देण्याचा विचार होता. मात्र, १ लाख कोटी रुपयांत हा खेळ करण्यासाठी शेतकºयांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याचे ठरले. त्यामुळे १२ कोटी शेतकºयांच्या खात्यांत ७५ हजार कोटी रुपयांचे अनुदान जमा होईल. असंघटित क्षेत्रासाठी लागू होणाºया पेन्शन योजनेचा लाभ ४० कोटी कामगारांना मिळेल. त्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च होतील. या योजनेत कामगाराला दरमहा ५५ रुपये जमा करावे लागतील व तेवढीच रक्कम केंद्र सरकारही देईल, पण त्यासाठी सरकारने २,२०० कोटी रुपयांची तरतूद केलेली नाही.

  • जिंकली अनेकांची मने - दुष्काळ व अन्य संकटांनी त्रस्त शेतकरी, मध्यमवर्ग व असंघटित कामगारांना खूश करण्यावर मोदींचा भर आहे. शेतकºयाला मदतीचा दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता मार्चआधीच जमा होईल. प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविल्याचा फायदा ३ ते ६ कोटी लोकांना होईल. मात्र, अंतरिम भरघोस सवलती देऊन मोदींनी निवडणुकांआधीच अनेकांची मने जिंकली आहेत.

अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी २१४ कोटींची वाढ :
  • क्रीडा क्षेत्रात ‘खेलो इंडिया’सारखे नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या केंद्र सरकारने २०१९-२०२० सालासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी २१४.२० कोटींची वाढ केली. त्याचबरोबर भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साइ)देण्यात येणारा निधी आणि खेळाडूंना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे.

  • अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात (२०१९-२०२०) क्रीडा क्षेत्रासाठी २२१६.९२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या (२०१८-१९) अर्थसंकल्पात ही तरतूद २००२.७२ कोटी रुपये इतकी होती.

  • अंतरिम अर्थसंकल्पाचा सर्वात मोठा फायदा हा भारतीय क्रीडा प्राधिकरणाला होणार आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (एनएसडीएफ) आणि अन्य निधींमध्ये भरघोस वाढ करण्यात आल्यामुळे आता खेळाडूंनाही मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यात वाढ होणार आहे. ‘साइ’ला मिळणाऱ्या निधीत ५५ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असून ती ३९५ कोटींवरून ४५० कोटी इतकी करण्यात आली आहे. ‘साइ’ ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असून राष्ट्रीय शिबिरांचे आयोजन, खेळाडूंना उपकरणे पुरवणे तसेच अन्य प्रमुख बाबी या ‘साइ’मार्फत केल्या जातात.

  • एनएसडीएफसाठीचा निधी २ कोटी रुपयांनी वाढवण्यात आला असून तो ७० कोटी रुपये इतका करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यातही वाढ केली असून हा निधी ६३ कोटी रुपयांवरून ८९ कोटी रुपये इतका वाढवण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीडा संघटनांना (एनएसएफ) देण्यात येणाऱ्या निधीत किंचितशी कपात करण्यात आली असून हा निधी २४५ कोटी इतका करण्यात आला आहे.

मिताली राजचं वन डेत 'द्विशतक' :
  • हॅमिल्टन : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं न्यूझीलंडविरुद्धच्या हॅमिल्टन वन डेत कारकीर्दीतल्या सामन्यांचं द्विशतक साजरं केलं. दोनशे वन डे खेळणारी मिताली ही जगातली पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे.

  • मात्र कारकीर्दीतल्या 200 व्या वन डेत मिताली नऊ धावांवर बाद झाली. या सामन्यात भारतीय महिलांना पराभवही स्वीकारावा लागला. मितालीनं 1999 साली भारतीय संघात पदार्पण केलं होतं. भारतानं आजवर खेळलेल्या 263 वन डेपैकी 200 वन डे सामन्यातत मितालीनं प्रतिनिधित्व केलं आहे.

  • मितालीने वन डे सामन्यांच्या कारकिर्दित आजवर सात शतकांसह 51.33 च्या सरासरीने सर्वाधिक 6622 धावा ठोकल्या आहेत. तर मितालीने 10 कसोटी आणि 85 टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या महिला संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

अर्थसंकल्प २०१९ - ६० वर्षांवरील कामगारांना पेन्शन मिळणार :
  • नवी दिल्ली  : केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज केंद्राचा 2019 चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक महत्वपूर्ण घोषणांचा पाऊसच पाडला गेला. शेतकऱ्यांसह कामगारांसाठी मोदी सरकारने 'बोनसच' दिला आहे.

  • असंघटित कामगारांसाठी पियुष गोयल यांनी पेन्शन योजना आणली असून 21 हजारांपेक्षा अधिक पगार असणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रतिमहिना तीन हजार रूपये पेन्शन देण्यात येणार आहे. यासाठी कामगारांना प्रतिममहिना 100 रूपये भरावे लागणार आहे. वयाच्या 60 वर्षानंतर तीन हजार पेन्शन दिली जाणार आहे. याचा लाभ देशभरातील 10 कोटी कामगारांना मिळणार आहे.

  • या योजनेचे नाव 'प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन' असे असणार आहे. वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरच लागू करण्यात येणार आहेत. 21 हजार वेतन असलेल्या मजुरांना सात हजारांचा बोनस देण्यात येणार आहे. सोबतच ग्रॅच्युईटची मर्यादा दहा लाखांवरुन 30 लाखांवर करण्यात आली आहे. ईपीएफओच्या माध्यमातून हा 7 हजार बोनस मिळणार असल्याचंही गोयल यांनी जाहीर केलं आहे.

  • 15 हजारापेक्षा कमी वेतन असलेल्या मजुरांनाही पेन्शनची घोषणा केली आहे. 60 वर्षावरील मजुरांना तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. नोकरीदरम्यान मृत्यु झाल्यास आर्थिक मदत अडीच लाखांवरुन सहा लाख करण्यात आली आहे.

दिनविशेष :
  • जागतिक पाणथळ भूमी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८४८: कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

  • १९४३: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.

  • १९५७: गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.

  • १९७१: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.

  • १९७१: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.

जन्म 

  • १७५४:  फ्रान्सचे पंतप्रधान चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८३८)

  • १८५६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)

  • १८८४: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९३७ – पुणे)

  • १८९७: हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १९७२)

  • १९२२: भारतीय फील्ड हॉकीपटू कुंवर दिग्विजय सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७८)

  • १९२३: केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९७५ – समस्तीपूर, बिहार)

मृत्यू 

  • १९०७: रशियन रसायनशास्त्रज दिमित्री मेंदेलिएव्ह याचं निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)

  • १९१७: लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देहत्याग केला. (जन्म: ४ मे १८४७)

  • १९३०: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १८७१)

  • १९७०: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल याचं निधन. (जन्म: १८ मे १८७२)

  • १९८७: स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन याचं निधन. (जन्म: २१ एप्रिल १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.