चालू घडामोडी - ०२ जानेवारी २०१८

Date : 2 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विजय गोखले होणार भारताचे नवे परराष्ट्र सचिव :
  • नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र सचिवपदाची धुरा विजय केशव गोखले यांच्या खांद्यावर सोपवली जाणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोखले यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली.

  • चीनमध्ये राजदूत म्हणून काम केलेल्या विजय गोखले या मराठी अधिकाऱ्याकडे देशाच्या परराष्ट्र धोरणाची सर्वोच्च प्रशासकीय सूत्रे सोपवली जाणार आहेत.

  • सध्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या जागी विजय गोखले यांची नियुक्ती होणार आहे. जयशंकर यांची 29 जानेवारी 2015 रोजी परराष्ट्र सचिवपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांना गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2017 मध्ये एका वर्षाची वाढही देण्यात आली होती.

डेबिट कार्डने दोन हजार रुपयांपर्यंतची खरेदी स्वस्त :
  • नवी दिल्ली : डेबिट कार्डने दोन हजार रुपयांपर्यंतची खरेदी करणं आता स्वस्त झालं आहे. केंद्र सरकारने केवळ डेबिट कार्डच नाही, तर भीम आणि यूपीआय आधारित व्यवहारांवर दोन हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीवर मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे एमडीआरसाठी सबसिडी देण्याचा जो घेतला होता, तो आजपासून (1 जानेवारी) लागू झाला आहे.

  • एमडीआरला ट्रान्झॅक्शन फी असंही म्हटलं जातं. ही रक्कम कार्ड जारी करणारी संस्था वसूल करते. मोठे मॉल, दुकान आणि हॉटेल हा चार्ज स्वतः भरतात. तर छोटे दुकानदार हा पैसा ग्राहकांकडून वसूल करतात. एमडीआरमध्ये बँक किंवा वित्तीय संस्था मिळालेल्या रकमेपैकी काही पैसा छोट्या दुकानदारांना देतात. त्यामुळे याला मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे व्यवसायिकांना देण्यात येणाऱ्या रकमेतील कपात असं म्हटलं जातं.

  • केंद्रीय कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, एक जानेवारीपासून सबसिडी देण्याची व्यवस्था लागू झाली. पुढील दोन वर्षांपर्यंत ती सुरु असेल. बँक किंवा पेमेंट करणाऱ्या संस्थेला ही सबसिडी दिली जाईल. यामुळे ग्राहक आणि दुकानदारांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक ताण पडणार नाही.

  • शिवाय डिजिटल व्यवहारांना चालना मिळेल. एमडीआरवर सबसिडी दिल्याने 1050 कोटी रुपये 2018-19 मध्ये आणि 2019-20 मध्ये 1642 कोटी रुपये खर्च केले जातील, असा अंदाज आहे.

एसबीआयने केली व्याजदरात कपात :
  • मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) आधार दर आणि प्रधान कर्ज दर (बीपीएलआर) ३0 आधार अंकांनी कमी केला आहे. या निर्णयाचा बँकेच्या ८0 लाख ग्राहकांना फायदा होणार आहे, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

  • एसबीआयने आधार दर ८.९५ टक्क्यांवरून ८.६५ टक्के केला आहे. बीपीएलआरही १३.७0 टक्क्यांवरून १३.४0 टक्के केला. बँकेने मार्जिनल कॉस्ट आॅफ फंड बेस्ड लेंडिग रेट (एमसीएलआर) अपरिवर्तित ठेवला. एमसीएलआरमधील बदलाचा सर्व प्रकारच्या कर्जदारांवर परिणाम होतो.

  • सध्या बँकेचा एकवर्षीय एमसीएलआर ७.९५ टक्के आहे, तो कायम राहणार आहे. बदललेले व्याजदर तत्काळ प्रभावाने सोमवारपासूनच लागू होणार आहेत. बँका आपल्या एमसीएलआरचा आढावा दर महिन्याला घेतात. आधार दराचा आढावा मात्र तीन महिन्यांतून एकदा घेतला जातो.

  • गुप्ता यांनी सांगितले की, एमसीएलआर आणि आधार दरातील दरी वाढल्यामुळे या आधी बँकेने एमसीएलआरमध्ये कपात केली होती. गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्काची माफी बँकेने यंदाच्या मार्चअखेरपर्यंत वाढविलेली आहे. नवीन गृहकर्ज घेणारे, तसेच सध्याचे गृहकर्ज एसबीआयडे हस्तांतरित करू इच्छिणारे, यांना याचा लाभ मिळेल.

राज्यसभेत आज सादर होणार ट्रिपल तलाक विधेयक, काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष :
  • नवी दिल्ली -  ट्रिपल तलाकचे विधेयक आज राज्यसभेत सादर केले जाणार आहे. मात्र  राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यानं भाजपाची आज अग्निपरीक्षा असणार आहे.

  • महिलांच्या दृष्टीने अन्यायकारक अशी मुस्लीम समाजातील ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यानंतर असा तलाक देणे हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तुरुंगात पाठविण्याची तरतूद असलेले विधेयक केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी (28 डिसेंबर 2017)बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले.

  • काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा विरोध व दुरुस्त्या नाकारून मंजुरी मिळाली असली तरी सत्ताधा-यांचे बहुमत नसलेल्या राज्यसभेत ते मंजूर करून घेण्यात सरकारचा कस लागणार आहे. 

आसाममध्ये १.९ कोटी लोक ‘भारतीय’, एनसीआरची पहिली यादी :
  • गुवाहाटी: बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) पहिली यादी प्रकाशित करण्यात आली असून,आसाममधील ३ कोटी २९ लाख अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना भारताचे कायदेशीर नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित लोकांची नावे शहानिशा प्रक्रियेच्या विविध टप्प्यांत आहेत, भारताचे महानिबंधक शैलेश यांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हा मसुदा प्रकाशित करताना स्पष्ट केले.

  • हा मसुद्याचा एक भाग आहे. यात १.९ कोटी लोकांच्या नावांचा समावेश आहे. उर्वरित लोकांबाबत विविध पातळीवर शहानिशा केली जात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दुसरा मसुदा प्रकाशित केला जाईल, अशी माहिती शैलेश यांनी रविवारी मध्यरात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

  • राष्टÑीय नागरिक नोंदणी विभागाचे राज्याचे समन्वयक प्रतीक हजेला यांनी सांगितले की, पहिल्या यादीत ज्यांची नावे नाहीत, अशांनी काळजी करण्याचे कारण नाही. शहानिशा करण्याची प्रक्रिया लांबलचक असल्याने पहिल्या यादीतून अनेकांची नावे समाविष्ट होऊ शकणार नाहीत. तथापि, त्यांनी काळजी करू नये. त्याच्यांशी संबंधित दस्तावेजांची शहानिशा केली जात आहे.

  • दुसरी यादी कधी जारी करणार? असे विचारले असता हजेल यांनी सांगितले की, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात एप्रिलमध्ये होणाºया पुढल्या सुनावणीच्यावेळी केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच या दस्तावेजांची शहानिशा केली जात आहे.

‘लोकमत’चे माने यांना पत्रकार संघाचा पुरस्कार, शनिवारी वितरण :
  • डोंबिवली : कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाचे २०१७ चे पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. श्रीकांत टोळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’चे प्रशांत माने यांना, तर रत्नाकर चासकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार विशाल वैद्य यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्वप्नील शेजवळ यांना जाहीर झाला आहे.

  • पूर्वेतील बालभवन येथे शनिवार, ६ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान होणाºया पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील. या कार्यक्र मास राज्यमंत्री व स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, ‘लोकमत’चे सहायक संपादक संदीप प्रधान, राजेंद्र हुंजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय राऊत व डोंबिवली विभागीय अध्यक्ष अनिकेत घमंडी यांनी दिली.

  • पत्रकारिता करताना विविध संकटांवर मात करून पुन्हा त्याच जिद्दीने, उमेदीने पत्रकारितेत दमदार पुनरागमन करणाºया पत्रकारांना झुंजार पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहे.

  • त्यासाठी केतन बेटावदकर यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्र मात कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रेय कांबळे आणि पत्रकार रवींद्र घोडविंदे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या पुरस्कार स्पर्धेचे परीक्षक म्हणून तुषार राजे आणि मनोज पांडे यांनी काम पाहिले.

दिनविशेष

महत्वाच्या घटना

  • १७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

  • १८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.

  • १८८५: पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.

  • १९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले.

  • १९५१: रशियाने ल्युना-१ हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.

  • १९५४: राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.

  • १९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.

  • १९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली.

  • १९९९: अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये१४ इंच टर शिकोगामध्ये १९ इंच हिम पडला. शिकागोचे तापमान -‌‍१३°F इतके कमी झाले.

  • २०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

  • २०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.

जन्म

  • १९२०: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९९२)

  • १९३२: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)

  • १९५९: भारीतय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म.

  • १९६०: भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)

मृत्य

  • १३१६: दिल्लीचे सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांचे निधन.

  • १९३५: स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १८८६)

  • १९४३: हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.

  • १९४४: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८७३)

  • १९५२: व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.

  • १९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन.  (जन्म: १२ एप्रिल १९५४)

  • १९९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन.

  • २००२: पर्यावरणवादी अनिल अग्रवाल यांचे निधन.

  • २०१५: भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.