चालू घडामोडी - ०२ जानेवारी २०१९

Updated On : Jan 02, 2019 | Category : Current Affairsचांद्रयान-२ चे प्रक्षेपण लांबणीवर; पुढील तारीख अनिश्चित :
 • बंगळुरू : चंद्राच्या पृष्ठभागापैकी ज्या भागाचा अद्याप अभ्यास झालेला नाही त्याचे निरीक्षण करण्याकरिता चीनने प्रक्षेपित केलेले चांग ४ हे अवकाशयान तीन जानेवारी रोजी चंद्रावर उतरणार आहे. नेमके याच तारखेला चांद्रयान-२ या अवकाशयानाचे प्रक्षेपण करण्याचे इस्रोने ठरविले होते; पण आता ते पुन्हा लांबणीवर पडले असून, या मोहिमेसाठी पुढची तारीख अजून निश्चित झालेली नाही.

 • इस्रोचे अध्यक्ष शिवन के. यांनी म्हटले आहे की, २०१८ च्या उत्तरार्धात इस्रोने अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण केले. त्यात व्यग्र असल्याने चांद्रयान-२ मोहिमेच्या पूर्वतयारीवर परिणाम झाला.

 • चांद्रयान-२ हे अवकाशयान आता कधी प्रक्षेपित करायचे याबाबत येत्या १० ते १२ दिवसांत निर्णय घेतला जाईल. पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला चंद्राची जी झाकोळलेली बाजू असते तेथील पृष्ठभागावर चांग-४ उतरणार आहे. चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरून चांद्रयान-२ तेथील परिस्थितीचा अभ्यास करणार होते.

 • चांग ४ या अवकाशयानाने अपेक्षित कक्षेत प्रवेश केला असल्याचे चीनच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मात्र, ते चंद्रावर कधी उतरणार, याची माहिती दिलेली नाही. चांद्रयान-२ चे प्रक्षेपण करण्यासाठी २०१७ व गेल्या वर्षी इस्रोने जोरदार पूर्वतयारी केली होती. मात्र, काही अडचणींमुळे ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. (वृत्तसंस्था)

 • चंद्रावरील पाण्याचे नमुने आणणार नव्या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांतही या उपग्रहाचे प्रक्षेपण होण्याची शक्यता नाही, असेही सूत्रांनी सांगितले. याआधी चांद्रयान-१ ने चंद्रावरील पाण्याचा अंश शोधला होता.

 • २००८ साली या अवकाशयानाचे प्रक्षेपण झाले होते; परंतु त्याच वर्षी २२ आॅक्टोबर रोजी त्याचा संपर्क तुटला. त्यानंतर चांद्रयान-१ चंद्राभोवती प्रदक्षिणा करताना नासाला आढळून आले होते. चंद्रावरील पाण्याचे नमुने आणण्यासाठी चांद्रयान-२ तेथील पृष्ठभागावर खोदकाम करणार आहे.

विमानांमध्ये ‘गगन’ बसवण्याचा निर्णय दीड वर्षे लांबणीवर :
 • नवी दिल्ली : आयात करण्यात येणारी सर्व विमाने स्वदेशी बनावटीच्या जिओ आॅगमेन्टेड नेव्हिगेशन (गगन) सिस्टिमकडून देण्यात येणारे सिग्नल स्वीकारण्यास सक्षम करणे बंधनकारक करणाऱ्या आपल्या आदेशाला केंद्र सरकारने दीड वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ जानेवारी २०१९ पासून या आदेशाची अंमलबजावणी होणार होती, आता ३० जून २०२० पासून त्याची अंमलबजावणी होईल.

 • गगन सक्षम विमानांचा आदेश लांबणीवर टाकण्याचा निर्णय ट्रेनर जेट आणि छोटी बिझनेस जेट विमाने चालविणाºया कंपन्यांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. गगन नेव्हिगेशन यंत्रणा लावण्यासाठी प्रत्येक विमानावर कंपन्यांना सुमारे ३ लाख डॉलर खर्च करावे लागणार आहेत. ही यंत्रणा छोट्या विमानात बसविण्याचा खर्च विमानाच्या किमतीपेक्षाही अधिक आहे. सध्याच्या स्थितीत तो कंपन्यांना पेलवणे अशक्यच होते, असे विमान वाहतूक क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.

 • भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र आधीच संकटात आहे. खर्चाच्या दबावामुळे अनेक कंपन्या तोट्यात आहेत. मानक संस्था इक्राने अलीकडेच याबाबत इशारा दिला होता.

 • विमान कंपन्यांनी सरकारकडे केली होती मागणी ही सिस्टम ‘जीपीएस’वर काम करते. राष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक धोरणात गगन सिस्टमसाठी सक्षम विमानांची सक्ती हवाई वाहतूक कंपन्यांना केली आहे. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने जुलै २०१५ मध्ये गगन यंत्रणा सुरू केली आहे.

'मी, माझं, मला' म्हणणाऱ्या मोदींनी 'या' १० प्रश्नांची उत्तर द्यावी - काँग्रेस :
 • नवी दिल्ली : खूप मोठ्या कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीवरुन काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे. मोदींच्या मुलाखतीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधानांची मुलाखत 'मी, मला, माझे' या तीन मुद्द्यांभोवती फिरत होती. मोदींनी इतकी मोठी मुलाखत देण्यापेक्षा आमच्या 10 प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आवाहनही सुरजेवाला यांनी मोदींना केले आहे.

 • राफेल प्रकरण, देशाची सुरक्षा आणि देशातल्या वाढत्या महागाईवरुन काँग्रेस सातत्याने मोदींना लक्ष्य करत आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जे आरोप केले त्या आरोपांबाबत मोदींनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा, अशी मागणीदेखील काँग्रेसने केली. त्यानंतर आज पंतप्रधानांनी जाहीर मुलाखत देऊन विरोधकांना उत्तर दिले.

 • परंतु मोदींनी दिलेल्या 95 मिनिटांच्या मुलाखतीवर काँग्रेस समाधानी नाही. त्यामधल्या कोणत्याही उत्तरावर समाधानी नसलेल्या काँग्रेसने मोदींना 10 प्रश्न विचारले आहेत. मोदींनी या 10 प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन काँग्रेसने केले आहे.

काँग्रेसचे १० प्रश्न

 1. नागरिकांच्या खात्यावर 15 लाख रुपये केव्हा जमा होणार?

 2. 100 दिवसांमध्ये देशात येणारे 80 लाख कोटी रुपये कधी येणार?

 3. 9 कोटी रोजगार कधी येणार?

 4. नोटबंदी आणि जीएसटीमुळे व्यापार उध्वस्त का केले?

 5. शेतमालावर 50 टक्के नफा मिळणार होता, परंतु सध्या खर्च केलेले पैसेदेखील का मिळत नाहीत?

 6. जीएसटीमुळे लहान व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान का केले?

 7. राष्ट्रीय सुरक्षेचे काय झाले? (काश्मीरमध्ये 428 आणि नक्षलवादी हल्ल्यात 248 जवान शहीद झाले)

 8. देशातील भ्रष्टाचाराबाबत मोदी काय बोलणार?

 9. राफेलबाबत मोदी उत्तरं कधी देणार?

 10. गंगा नदी अजून साफ का झाली नाही? देशात 100 स्मार्ट शहरं का तयार झाली नाहीत?
नव्या वर्षात तुमच्या आयुष्यात 'हे' ११ बदल :

मुंबई : नवीन वर्ष म्हटलं की सर्वांच्या अंगात नवा उत्साह संचारतो. नवे संकल्प ठरतात आणि त्या संकल्पांच्या पूर्तीसाठी आपण नव्या उमेदीने कामाला लागतो. 2019 या वर्षात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही बदल घडतील, तसेच देशभरातही अनेक बदल घडत आहेत. नव्या वर्षात कोणकोणते बदल झाले, याचा घेतलेला आढावा
नवे वर्ष, नवे बदल 

 • 1. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी :  एक जानेवारीपासून राज्यात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होत आहे. जानेवारी महिन्याचं वेतन सरकारी कर्मचाऱ्यांना 1 फेब्रुवारी रोजी मिळेल. राज्यातील एकूण 20 लाख 50 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 

 • 2. मनोरंजन स्वस्त : जीएसटीमध्ये बदल झाल्यामुळे टीव्ही, सिनेमाचं तिकीट यासारखे मनोरंजनाचे पर्याय स्वस्त झाले आहेत.

 • 3. मॅगस्ट्राईप कार्ड : जुनी मॅगस्ट्राईप डेबिट (एटीएम) किंवा क्रेडिट कार्ड तुम्हाला आजपासून वापरता येणार नाहीत. आरबीआयच्या निर्देशानुसार मॅग्नेटिक स्ट्राईप असणारी सर्व कार्ड्स ब्लॉक करण्यात आली आहेत.

 • 4. सीटीएस चेक आवश्यक : एक जानेवारीपासून नॉन-सीटीएस चेक रद्दबातल ठरत आहेत. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, पीएनबी, बँक ऑफ बरोडासारख्या सर्व बँकांमध्ये फक्त सीटीएस चेक वैध ठरतील. सीटीएस म्हणजे चेक ट्रंकेटेड सिस्टम. म्हणजेच चेकची एका बँकेतून दुसरीकडे होणारी प्रत्यक्ष आदानप्रदान बंद होणार असून व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक इमेज तयार करण्यात येईल.

 • 5. अपघाती मृत्यूनंतर कुटुंबाला 15 लाख : एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपये मिळतील. 'IRDAI'ने सर्व विमा कंपन्यांना 15 लाखांचा विमा उतरवण्याचे निर्देश दिले आहेत.

 • 6.  एनपीएस करमुक्त : राष्ट्रीय पेन्शन योजना करमुक्त करण्यात आली आहे. एनपीएसमधून 60 टक्के रक्कम काढता येणार आहे.

 • 7आधारकार्डवरील नाव, पत्ता बदलणं सोपं आधारकार्डावर नाव, पत्ता बदलण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. ऑनलाईन आधार कार्ड सुधार पोर्टल तुमच्या मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठवेल.

 • 8. सर्वच कंपन्यांच्या कारच्या किमती महागणार : टोयोटा, इसुझू, मारुती सुझुकी यासारख्या बहुतांश कंपन्यांच्या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

 • 9. आयटीआर रिटर्न न भरल्यास दुप्पट दंड : इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर परतावा भरण्याची 31 ऑगस्ट 2018 चुकवल्यानंतर  31 डिसेंबरची तारीखही 'मिस' करणाऱ्यांना आता दुप्पट दंड भरावा लागणार आहे. 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2019 या कालावधीत उशिराने भरलेल्या आयकर परताव्यासाठी दुप्पट दंड आकारला जाणार आहे. 31 डिसेंबरपूर्वी पाच हजार रुपयांचा दंड आता दहा हजारांवर जाणार आहे.

 • 10. मस्जिद बंदरवरचा फूट ओव्हर ब्रिज खुला : मुंबईत मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर स्टेशनवर असलेला फूट ओव्हर ब्रिज (पादचारी पूल) आजपासून सर्वांसाठी खुला झाला आहे 

 • 11. विदेशी मद्य 18 ते 20 टक्के महाग : परदेशी मद्य 18 ते 20 टक्क्यांनी महागलं आहे. विदेशी दारुच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे किमती वाढल्या आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

 • १८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.

 • १८८५: पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.

 • १९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

 • १९५४: राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.

 • १९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.

 • १९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली.

 • २०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

जन्म 

 • १९३२: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)

 • १९५९: भारीतय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म.

 • १९६०: भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)

मृत्यू 

 • १३१६: दिल्लीचे सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांचे निधन.

 • १९३५: स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १८८६)

 • १९४३: हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.

 • १९४४: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८७३)

 • १९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन.  (जन्म: १२ एप्रिल १९५४)

 • १९९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन.

 • २०१५: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) चे माजी महासचिव अर्धेन्दु भूषण वर्धन यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२४)

टिप्पणी करा (Comment Below)