चालू घडामोडी - ०२ जुलै २०१८

Date : 2 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राहुल द्रविडचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश, पाचवा भारतीय खेळाडू :
  • नवी दिल्ली : क्रिकेटच्या जगतात 'द वॉल' म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. क्रिकेट जगतातील या प्रतिष्ठांच्या मांदियाळीत सामील होणारा राहुल द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू आहे. याआधी  बिशन सिंह बेदी, सुनिल गावस्कर, कपिल देव आणि अनिल कुंबळे यांचा समावेश आहे.

  • रविवारी रात्री आयसीसीने डब्लिन येथील आयोजित कार्यक्रमात भारताचा माजी क्रिकेटपटू आणि अंडर-19 संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या नावाची घोषणा केली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि इंग्लडची माजी महिला क्रिकेटपटू क्लेयर टेलर यांच्या सुद्धा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. 

  • दरम्यान, या आयोजित कार्यक्रमात राहुल द्रविड अनुपस्थित होता. मात्र, त्याने या सन्मानाबद्दल व्हिडीओच्यामाध्यमातून आयसीसीचे आभार मानले.

  • राहुल द्रविडने (1996-2012) आपल्या टेस्ट करिअरमध्ये 13,288 धावा केल्या आहेत. तर, 344 वनडे सामन्यांमध्ये नाबाद राहत 71.25 च्या स्ट्राईक रेटने 10889 धावा केल्या आहेत. आश्चर्यजनक बाब म्हणजे राहुल द्रविड वनडे सामन्यांमध्ये 57 वेळा आणि टेस्टमध्ये 52 वेळा बोल्ड झाला होता. 

निवडणूक बंद, आता सर्वसहमतीने साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणार :
  • नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक घेतली जाणार नाही. आता सर्वसहमतीने संमेलनाध्यक्षांची निवड केली जाईल. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या नागपुरात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न घेण्याबाबत घटना दुरुस्ती केली. या घटना दुरुस्तीला घटक संस्थांची मान्यता मिळाल्यानंतर निर्णायाची  अंमलबजावणी केली जाईल.

  • तसेच, आगामी म्हणजेच 92 व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी वर्धा आणि यवतमाळ या स्थळांची निवड करण्यात आली आहे. म्हणजेच 92 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन या दोन पैकी एका ठिकाणी होईल.

  • गेल्या काही वर्षांमध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि वाद असे समीकरण बनले होते. संमेलन म्हटलं की वाद, असेच चित्र डोळ्यांसमोर येत असे. मात्र आजच्या निर्णयामुळे हे समीकरण दूर होण्यास मदत होईल.

  • मराठी साहित्य वर्तुळात अ. भा. साहित्य संमेलनाला मोठं महत्त्व आहे. अनेक दशकांची परंपरा या संमेलनाला आहे. मराठीतील दिग्गज साहित्यिकांनी संमेलनाध्यक्षपदाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाचा डेन्मार्कवर सनसनाटी विजय :
  • मोस्को ( रशिया ) : फिफा विश्वचषकाच्या क्रोएशियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कवर सनसनाटी विजय मिळवला आहे. क्रोएशियानं पेनल्टी शूटआऊटमध्ये डेन्मार्कवर 3-2 ने मात करत, उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाचा सामना यजमान रशियाशी होणार आहे.

  • क्रोएशिया आणि डेन्मार्कने चांगला खेळ करत सामना बरोबरीत राखला. त्यानंतर जादा वेळेतही कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. अखेर पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेतला.

  • पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाचा गोलरक्षक सुबासिच आणि डेन्मार्कचा गोलरक्षक श्मायकल यांच्या पोलादी बचावातली चुरस पाहायला मिळाली. क्रोएशियाचा गोलरक्षक सुबासिचने डेन्मार्कच्या एरिकसन, डेली आणि यॉर्गनसन यांच्या पेनल्टी थोपवून विजयावर शिक्कामोर्तब केले. तर डेन्मार्कचा गोलरक्षक श्मायकलला क्रोएशियाच्या बेडल आणि पिवारिच यांच्या दोनच पेनल्टी थोपवता आल्या.

  • पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाकडून क्रॅमरिच, मॉडरिच आणि रॅकिटिचनं प्रत्येकी एका गोलची नोंद केली, तर डेन्मार्कच्या सिमॉन केअर आणि शोना यांनी एकेक गोल केला.

अग्नी ५ लवकरच सैन्याच्या ताफ्यात; संपूर्ण चीन आता भारताच्या टप्प्यात :
  • नवी दिल्ली : लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यात सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्राचा समावेश आहे. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 सुरक्षा दलांच्या ताफ्यात येताच भारताचं सामर्थ्य कित्येक पटींनी वाढेल. अग्नी 5 ची मारक क्षमता तब्बल 5 हजार किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे संपूर्ण चीन भारताच्या टप्प्यात येईल. चीनच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करण्याची क्षमता अग्नी 5 मध्ये आहे. 

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 हजार किलोमीटरची मारक क्षमता असलेली अग्नी 5 ही क्षेपणास्त्र प्रणाली अण्वस्त्रदेखील वाहून नेऊ शकते. लवकरच अग्नी 5 स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सुपूर्द करण्यात येईल. देशातील अत्यंत आधुनिक क्षेपणास्त्र स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवली जातात. मात्र याआधी अग्नी 5 च्या विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. सुरक्षा क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार, पेइचिंग, शांघाय, गुआंगझाऊ या शहरांसह चीनमधील कोणत्याही भागाला अग्नी 5 च्या माध्यमातून लक्ष्य केलं जाऊ शकतं.

  • गेल्या महिन्यात ओडिशाच्या किनारपट्टीवरुन अग्नी 5 ची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. अग्नी 5 स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवण्याआधी अशा आणखी काही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये या चाचणी घेतल्या जातील.

  • अग्नी 5 मुळे देशाच्या युद्धसज्जता कित्येक पटीनं वाढेल, असा विश्वास एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं व्यक्त केला. 'अग्नी 5 मधील नेव्हिगेशन यंत्रणा अतिशय अत्याधुनिक आहे. याशिवाय याची क्षमतादेखील इतर क्षेपणास्त्र प्रणालींपेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे,' अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली.

धावांच्या फरकाने भारताचा सर्वात मोठा विजय :
  • भारताने आयर्लंडवर १४३ धावांच्या फरकाने विजय मिळवला. भारताने आतापर्यंत कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाविरोधात टी २० क्रिकेट सामन्यात धावांच्या फरकाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. मात्र या विक्रमाच्या यादीत भारत संयुक्त दुसºया स्थानावर आहे. या यादीत अव्वल स्थानावर आहे श्रीलंकेचा संघ. श्रीलंकेने १४ सप्टेंबर २००७ रोजी केनियावर १७२ धावांनी विजय मिळवला होता.

  • लंकेने या सामन्यात २६१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने याच वर्षी १ एप्रिलला विश्वविजेत्या वेस्टइंडिजला १४३ धावांच्या फरकानेच पराभूत केले होते. आतापर्यंत एकुण १३ वेळेस शतकी धावसंख्येच्या फरकाने संघांनी पराभव पत्करले आहेत. मात्र एकदाही भारताचा पराभव एवढ्या मोठ्या फरकाने झालेला नाही.

  • भारताने १० वेळा प्रतिस्पर्धी संघावर ५० किंवा त्या पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवला आहे. या आधीचा भारताचा विक्रम ९३ धावांच्या फरकाने विजय मिळवण्याचा होता. कटकमध्ये झालेल्या टी २० सामन्यात ९३ धावांनी विजय मिळवला होता.

  • डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या या सामन्यातही भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता तो युझवेंद्र चहल. आयर्लंडविरोधात तीन बळी घेणाºया चहलने लंकेविरोधात चार बळी घेतले होते. आणि योगायोग म्हणजे आयर्लंडविरोधात अर्धशतक झळकावणाºया के.एल. राहूल याने लंकेविरोधातही अर्धशतकच झळकावले होते.

सोळा अंकी क्रमांकाने ई-केवायसी; आधार क्रमांक द्यायची गरज नाही :
  • नवी दिल्ली : दूरसंचार कंपन्या तसेच अन्य सेवांकरिता इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना आधार क्रमांक द्यायची इच्छा नसलेल्या ग्राहकाला युनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून (यूआयडीएआय) मिळणारा सोळा आकडी व्हर्च्युअल क्रमांक देता येईल. ही सुविधा रविवारपासून सुरू झाली.

  • कोणाही व्यक्तीच्या वैैयक्तिक माहितीचे संरक्षण व्हावे या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने सोळा आकडी व्हर्चुअल ओळख क्रमांकाची (व्हीआयडी) निर्मिती हे उचललेले पहिले पाऊल आहे. बँका व अन्य सेवांसाठी ही सुविधा ३१ आॅगस्टपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. एखाद्या सेवेसाठी ग्राहकाने आपला व्हर्च्युअल ओळख क्रमांक दिल्यानंतर तसे टोकन सेवा पुरविणाऱ्या कंपनीला प्राप्त होईल.

  • सेवा पुरविणाºया कंपन्यांना ग्राहकाने आपली मर्यादित स्वरुपात माहिती पुरवावी असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. बँका व प्राप्तीकर खात्याला एखाद्या व्यक्तीची सर्व माहिती मिळविण्याची मुभा आहे. मात्र अन्य सेवा देणाºया कंपन्यांना आधारमधील नाव, पत्ता व छायाचित्र इतकीच माहिती मिळेल.

  • फेशियन रेकग्निशन तंत्रही वापरणार आधारमधील माहिती सार्वत्रिक होऊ नये यासाठी आता संबंधित व्यक्तिची चेहºयावरुन ओळख पटविण्याचे तंत्रही यूआयडीएआयने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा देशात सर्वत्र येत्या आॅगस्टपासून उपलब्ध होईल. त्या

  • मुळे ग्राहक देणार असलेल्या व्हर्चुअल ओळख क्रमांकाचा आपल्या यंत्रणेत वापर होण्यासाठी तांत्रिक सिद्धता करण्याकरिता बँका व अन्य सेवा कंपन्यांनाही पुरेसा वेळ मिळणार आहे. सेवा कंपन्यांनी व्हीआयडीचा वापर ३१ जुलैपासूनच सुरु केला तर त्यांना प्रत्येक व्यवहारासाठी आकारण्यात येणारा २० पैैसे दंड भरावा लागणार नाही.

थेट परदेशी गुंतवणुकीचा पाच वर्षांतील नीचांक :
  • नवी दिल्ली : भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढीचा  गेल्या पाच वर्षांतील नीचांक झाला असून परकीय गुंतवणुकीच्या वाढीचा दर २०१७-१८ मध्ये ३ टक्के नोंदला गेला असून केवळ ४४.८५ अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी गुंतवणूक झाली आहे.

  • औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्या आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये थेट परकीय गुंतवणूक केवळ ३ टक्के वाढली असून ४४.८५ अब्ज डॉलर्स एवढीच गुंतवणूक झाली आहे. परदेशी निधीचा देशातील ओघ २०१६-१७ मध्ये ८.६७ टक्क्य़ांनी वाढला तर २०१५-१६ मध्ये हे प्रमाण २७ टक्के तर २०१३-१४ मध्ये ८ टक्के होते. २०१२-१३ मध्ये थेट परदेशी गुंतवणूक ऋण ३५ टक्के होती.

  • तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत गुंतवणूक वाढवणे आता गरजेचे असून परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण केले पाहिजे. डेलॉइट इंडियाचे अनिल तलरेजा यांनी सांगितले की, ग्राहक व किरकोळ क्षेत्रात परदेशी गुंतवणूक कमी झाली आहे कारण भारताच्या थेट परदेशी गुंतवणूक धोरणात अनिश्चितता व गुंतागुंत आहे.

  • उद्योगस्नेही मानांकनात भारताची कामगिरी चांगली असली तरी परदेशी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण करण्यात अपयश आले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक बिस्वजित  धर यांनी सांगितले की, थेट परदेशी गुंतवणूक ही देशाच्या अर्थव्यवस्थेची व्यापकता दाखवत असते.

दिनविशेष :
  • जागतिक युएफओ (UFO) दिन

महत्वाच्या घटना 

  • १६९८: थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिनचे पेटंट मिळवले.

  • १८५०: शास्त्रज्ञ बेंजामिन लेन यांना गॅस मास्कचे पेटंट मिळाले.

  • १८६५: साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.

  • १९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.

  • १९७२: पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

  • १९९४: चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.

  • २००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा बौध्द स्तूप सापडला.

  • २००२: स्टीव फॉसेट हे उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारे सर्वप्रथम व्यक्ती ठरले.

जन्म

  • १८७७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेसे यांचा जन्म.

  • १८८०: श्रेष्ठ गायक, नट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)

  • १९०४: पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ते यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९९६)

  • १९०६: नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.

  • १९२३: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म.

  • १९२५: काँगो देशाचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमूंबा यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)

  • १९३०: अर्जेंटिनाचे ५०वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७७८: फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन. (जन्म: २८ जून १७१२)

  • १८४३: होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान याचं निधन. (जन्म: १० एप्रिल १७५५)

  • १९५०: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)

  • १९६१: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखकअर्नेस्ट हेमिंग्वे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८९९)

  • २०११: कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२५)

  • २०१३: कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.