चालू घडामोडी - ०२ जून २०१८

Date : 2 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धा : सुनील छेत्रीची नेत्रदीपक हॅट्ट्रिक :
  • कारकिर्दीतील ९९वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारताने चायनीज तैपईवर ५-० असा दणदणीत विजय मिळवून आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेच्या अभियानाला धडाक्यात सुरुवात केली.

  • अंधेरी क्रीडा संकुलात रंगलेल्या या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांनी चायनीज तैपईच्या गोलजाळ्यावर सतत हल्ले करताना बचावपटूंवर दडपण आणले. भारतीय आक्रमकांना रोखण्याच्या प्रयत्नातच चूक झाल्यामुळे तैपईच्या चेन टिंग यांगला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. १४व्या मिनिटाला जेजे लालपेखलुआने केलेल्या सुरेख पासच्या जोरावर छेत्रीने गोल नोंदवून भारताला आघाडी मिळवून दिली.

  • ३४व्या मिनिटाला जेजे आणि छेत्रीच्या जोडीने पुन्हा एकदा आपली कमाल दाखवली व छेत्रीने गोलजाळ्याच्या अगदी डाव्या कोपऱ्यात चेंडू धाडून आपला दुसरा गोल केला. मध्यंतराला काही अवधी शिल्लक असताना तैपईच्या संघाने गोल करण्याचे अथक प्रयत्न केले मात्र भारतीय गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.

  • मध्यंतरानंतर उदांत सिंगने (४८ मि.) भारतासाठी तिसरा गोल नोंदवला. ६२व्या मिनिटाला २० वर्षीय अनिरुद्ध थापाने केलेल्या सुरेख पासचे गोलमध्ये रूपांतर करून छेत्रीने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. प्रणॉय हाल्डेरने (७८ मि.) पाचवा गोल धडकवत भारताच्या विजयावर शिकामोर्तब केले.

  • भरपाई वेळेत (९२व्या मिनिटाला) छेत्रीला बदली करून एलन देवरीला खेळण्यासाठी पाठवण्यात आले. छेत्री परतत असताना संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला व त्यानेसुद्धा सर्वाच्या अभिवादनाचा स्वीकार केला. भारताची पुढील लढत ४ जून रोजी केनियाशी होणार असून, तो छेत्रीचा १००वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवूड म्हटल्याने अपमान - विजयवर्गीय :
  • नवी दिल्ली : हिंदी चित्रपटसृष्टीला 'बॉलिवूड' असं संबोधणं अवमानकारक आहे, त्याऐवजी नवीन पर्यायी शब्द तयार करावा, असं आवाहन भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांच्याकडे विजयवर्गीय ही मागणी करणार आहेत.

  • 'काही दिवसांपूर्वी मी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांना भेटलो होतो. बॉलिवूड हा शब्द परदेशी मीडियाने भारतीय चित्रपटसृष्टीला हिणवण्यासाठी वापरला, असं बोलता बोलता घई म्हणाले. त्यामुळे आपण हा शब्द वापरण्यास परावृत्त करायला हवं. आपण हॉलिवूडची भ्रष्ट कॉपी आहोत, असं वाटतं. खरं तर आपल्याकडे दादासाहेब फाळके, सत्यजीत रे यांच्यासारखे दिग्गज होऊन गेले. त्यामुळे बॉलिवूड म्हणून हिणवलं जाणं स्वाभिमानाला धक्का पोहचवणारं आहे.' असं कैलाश विजयवर्गीय म्हणाले.

  • 'बॉलिवूड.. त्याचप्रमाणे कॉलिवूड, मॉलिवूड अशी त्याची प्रादेशिक नावं वापरणं बंद व्हावं. याऐवजी त्या-त्या भाषेच्या नावाचा वापर व्हावा,  यासाठी राठोड यांनी पावलं उचलावीत, अशी मागणी करणारं पत्र मी लिहिणार आहे.' असंही विजयवर्गीयांनी सांगितलं.

  • '1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने भारतीय चित्रपटसृष्टीला 'औद्योगिक दर्जा' प्रदान केला. त्यामुळे माफिया आणि अवैध आर्थिक पुरवठ्यापासून सिनेसृष्टीची मुक्तता झाली. चित्रपट निर्मितीसाठी आता संस्थात्मक वित्त पुरवठा होतो.' अशी माहितीही विजयवर्गीयांनी दिली.

नोएडा दौऱ्यामुळे योगींच्या नेतृत्त्वात सतत पराभव :
  • नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र त्यानंतर झालेल्या सर्व पोटनिवडणुकांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात भाजपचा पराभव झाला. यामुळे उत्तर प्रदेशात आता सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे.

  • योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या नोएडा दौऱ्याबाबत या चर्चा आहेत. नोएडाबाबत असलेल्या सर्व अंधश्रद्धांना दूर ठेवत योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मेट्रोच्या उद्घाटनासाठी गेले.

  • योगींचं नोएडाला जाणंच पक्षाला भारी पडलं असल्याचं कैराना लोकसभा पोटनिवडणुकीनंतर म्हटलं जात आहे. भाजपच्या या पराभवाला आता सोशल मीडियाद्वारे नोएडाच्या अंधश्रद्धेबद्दल जोडलं जात आहे.

  • गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नोएडा दौऱ्याहून आल्यापासून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात भाजपला एकही विजय मिळालेला नाही. अगोदर योगींचं होमग्राऊंड असलेल्या गोरखपूर आणि फुलपूरमधील पराभव आणि आता कैराना लोकसभा आणि नुरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला.

अमेरिकेने बदलले पॅसिफिक कमांडचे नाव, भारताचे महत्त्व अधोरेखित :
  • पर्ल हार्बर- अमेरिकेच्या लष्कराने पॅसिफिक कमांडचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय आज घेतला आहे. आता या कमांडचे नाव इंडो-पॅसिफिक कमांड असे करण्यात आले आहे. भारताचे दक्षिण आशियातील वाढते महत्त्व लक्षात घेता हा निर्णय़ घेण्यात आला असे पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • पॅसिफिक कमांड हा विभाग पॅसिफिक महासागराच्या प्रदेशातील सर्व हालचालीं आणि कारवायांची जबाबदारी पाहातो. सुमारे 3 लाख 75 हजार नागरिक आणि सैनिकांची नेमणूक त्यासाठी करण्यात आलेली आहे. या प्रदेशात भारताचाही समावेश होतो.

  • पॅसिफिक समुद्र आणि हिंदी महासागरातील मित्रदेशांशी आमचे संबंध याप्रदेशातील प्रादेशिक स्थैर्य टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत असे अमेरिकेचे संरक्षण सचिव जीम मॅटिस यांनी सांगितले. याप्रदेशात वृद्धिंगत झालेल्या संबंधांमुळेच आम्ही पॅसिफिक कमांडचे नाव इंडो-पॅसिफिक कमांड असे करत आहोत असेही मॅटिस म्हणाले.

  • चेंज ऑफ कमांड या सोहळ्यात ते बोलत होते. या कमांडची जबाबदारी अॅडमिरल हॅरी हॅरिस यांच्याकडून फिलिप डेव्हीडसन यांनी स्वीकारली. हॅरी हॅरीस यांची डोनल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियात अमेरिकेचे राजदूत म्हणून केली आहे. या नामांतरामुळे या प्रदेशासाठी काही विशेष फायदा होणार नसला तरी भारताचे या प्रदेशातील वाढते महत्त्व अधोरेखित होणार आहे.

सीतेला कोणी पळवलं? गुजरात बोर्डाच्या पुस्तकात मोठी चूक :
  • गांधीनगर:  सीतेला कोणी पळवलं? या सोप्या प्रश्नाचं उत्तर लहान मूलही अचूक देईल, असं म्हटलं जातं. मात्र या सोप्या प्रश्नाचं उत्तर गुजरातच्या बारावीच्या संस्कृत पुस्तकात चुकवण्यात आलं आहे.  सीतेला रामाने पळवलं, असं या पुस्तकात छापण्यात आलं आहे.

  • ज्यावरुन रामायण घडलं, त्यातील मुख्य बाबच गुजरात बोर्डाने चुकवल्याने, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. सीतेला रावणाने पळवलं हे पूर्वापार ऐकत-वाचत आलेलो आहे. मात्र गुजरात बोर्डाच्या बारावीच्या संस्कृतच्या पुस्तकात सीतेला चक्क प्रभू रामाने पळवल्याचं म्हटलं आहे.

  • या पुस्तकातील 106 नंबरच्या पानावर याबाबतचा उल्लेख आहे. “संस्कृत साहित्याची ओळख” यामध्ये अनेक चुका आहेत.

  • “रामाचे विचार कवीने अत्यंत उत्तमरित्या मांडले आहेत. सीतेला जेव्हा रामाने पळवलं, तेव्हा लक्ष्मणाने रामाला दिलेल्या हृदयस्पर्शी संदेशाचं वर्णन केलं आहे” असं या पुस्तकात म्हटलं आहे.

विचारसरणीपेक्षा संवाद वाढणे महत्त्वाचे :
  • आज प्रणव मुखर्जींचं वय आहे ८२. काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश झाला तो १९६९ साली. आयुष्याच्या मावळतीला त्यांना राष्ट्रपतिपद काँग्रेसला द्यावंच लागलं. पीएम इन वेटिंग म्हणून त्यांनी बराच काळ काढला. काँग्रेसमधील अनेक अडचणीच्या काळात संकटमोचक म्हणून जसे ते प्रसिद्ध होते तसंच सर्व पक्षांमध्ये ते स्वीकारार्ह होते.

  • अशा महनीय व्यक्तीला संघाच्या प्रथेनुसार तृतीय वर्ष संघ शिक्षाच्या समारोप समारोहाला प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं आणि ते त्यांनी स्वीकारलंही. या घटनेतच अफलातून नाट्य आहे. कदाचित पुढच्या अनेक वर्षांच्या बदलत्या राजकारणाची बीजं यात रोवली जाणार आहेत, यात काही शंकाच नाही. एकीकडे राहुल बाह्या सरसावत संघावर टीका करताहेत. गांधीहत्येला संघाला जबाबदार धरताहेत.

  • संघविरोध हे काँग्रेसचं कालही प्रमुख हत्यार होतं आणि आजसुद्धा आहे. ब्रिटिशांनी संघावर एकदा बंदी घातली, तर ४८, ९५ आणि ९२ अशा तिन्ही वेळेला काँग्रेस सरकारनंच संघावर बंदी घातली. संघर्षाचे, वैचारिक मतभेदाचे अनेक मुद्दे आहेत. मग गांधी हत्येची जबाबदारी आहे. हिंदू राष्ट्राची आक्रमकता आहे. तिरंग्याऐवजी भगवा, इसिसशी तुलना, हिटलर आणि मुसोलिनी हे संघाचे आदर्श मानले गेले.

  • घटनेपेक्षा संघ मनुस्मृतीला अधिक मानतो. एवढंच काय बाबरी मशीद पाडायलासुद्धा संघालाच जबाबदार धरलं जातं. स्वातंत्र्ययुद्धात संघाचा कोणताही सहभाग नव्हता, असा आरोप त्यांच्यावर केला जातो. दादरी हे संघ मानसिकतेतून घडलं असं म्हणत असतानाच दादरा नगर हवेली आणि गोवा मुक्तीसंग्रामात स्वयंसेवकांचे रक्त सांडले हेदेखील सत्य आहे.

दिनविशेष :
  • इटलीचा प्रजासत्ताक दिन

महत्वाच्या घटना 

  • १८००: कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.

  • १९४९: दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.

  • १९५३: इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.

  • १९७९: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

  • २०००: लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर.

  • २०१४: तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले.

जन्म 

  • १७३१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी मार्था वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १८०२)

  • १९०७: मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म.

  • १९४३: भारतीय संगीतकार इलय्या राजा यांचा जन्म.

  • १९५५: इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्म.

  • १९७४: अमेरिकन बुद्धीबळपटू गाटा काम्स्की यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९९०: ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलीवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९०८)

  • १९९२: मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १९३४)

  • २०१४: भारतीय कार्डिनल दुर्यसामी सायमन लौरडुसामी यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९२४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.