चालू घडामोडी - ०२ मार्च २०१९

Date : 2 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इस्लामिक देशांच्या मंचावरून सुषमा स्वराज यांचे पाकिस्तानला खडेबोल :
  • अबू धाबी - भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज 57 मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन (OIC) ला संबोधित केले. यावेळी भारताकडून दहशतवादाविरोधात उघडलेल्या मोहिमेवर बोलताना सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा साधला.

  • दहशतवादाविरोधातील लढाई ही कुठल्याही एका धर्माविरोधात नसल्याचेही स्वराज यांनी स्पष्ट केले. इस्लामिक देशांच्या महत्त्वाच्या परिषदेत गेस्ट ऑफ ऑनर म्हणून निमंत्रण मिळाल्याने सुषमा स्वराज यांनी आभार मानले. दुसरीकडे या बैठकीत भारताला निमंत्रण मिळाल्याने जळफळाट झालेल्या पाकिस्तानने या संमेलनावर बहिष्कार टाकला आहे. 

  • ओआयसीचे निमंत्रण आणि गेस्ट ऑफ ऑनरचा मान मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला घेरले. ''भारत दहशतवादाशी झुंजत आहे. दिवसेंदिवस जगभरात दहशतवाद फोफावत आहे. दक्षिण-पूर्व आशियामध्ये तर दहशतवाद आणि उग्रवाद चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे, असे सुषमा स्वराज म्हणाल्या. 

  • दहशतवादाविरोधातील लढाई ही कुठल्याही धर्माविरोधातील लढाई नाही. अल्लाचा अर्थ शांती असा होतो. मात्र दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, आसरा देणाऱ्या देशांविरोधात कारवाई झाली पाहिजे. दहशतवादी संघटनांना होणारी फंडिंग थांबली पाहिजे, असे आवाहनही सुषमा स्वराज यांनी यावेळी केले. 

दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला ४७१४.२८ कोटींची मदत :
  • मुंबई : महाराष्ट्रात 2018 मधील खरीप हंगामात दुष्काळ जाहीर झालेल्या 151 तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्राने चार हजार 714 कोटी 28 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारला त्यासंबंधीचा आदेश प्राप्त झाला असून लवकरच हा निधी राज्याला मिळेल.

  • 2018 च्या खरीप हंगामात राज्यात 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला होता. या दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानाची मदत देण्यासाठी तसेच पाणीपुरवठा आणि चाऱ्यासाठी केंद्र शासनाकडे मदत मागितली होती.

  • केंद्र सरकारचं पथक 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2018 या कालावधीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी आलं होतं.

  • केंद्राच्या उच्चस्तरीय समितीने दुष्काळ निवारणासाठी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून राज्यासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 4,714.28 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

  • केंद्राकडून मदत निधी प्रत्यक्ष मंजूर होण्यापूर्वीच राज्य सरकारने 4,909.51 कोटी रुपयांचा निधी बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी वितरित केला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अंदाजे 2200 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली.

अभिनंदन मायदेशी परतण्यामागे नरेंद्र मोदींचा पराक्रम - स्मृती इराणी :
  • केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे. नरेंद्र मोदींच्या पराक्रमामुळेच दोन दिवसांत अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान यांची सुटका केली. पंजाबातील वाघा सीमेवर त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री ९ वाजून २० मिनिटांनी अभिनंदन यांनी मायभुमीत प्रवेश केला.

  • ‘आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खूप अभिमान असेल की आपल्या स्वयंसेवकाच्या पराक्रमामुळे भारताचा सुपुत्र फक्त ४८ तासांत मायदेशी परतत आहे’, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं. त्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे होता. नरेंद्र मोदी भाजपात येण्यापूर्वी आरएसएस प्रचारक होते. भाजपा नेते सुधांशू मित्तल यांच्या आरएसएसरवर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या.

  • भारतीय हवाई हद्दीत घुसलेल्या एका पाकिस्तानी विमानाचा वेध घेत असताना अभिनंदन यांचे मिग विमान अपघातग्रस्त होऊन २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. त्यावेळी पॅराशूटद्वारे उतरत असलेल्या अभिनंदनला पाकिस्तानने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या दोन चित्रफितीही पाकिस्तानने जारी केल्या होत्या. त्यात त्यांना मारहाण झाल्याच्या खुणाही जाणवत होत्या. भारताने या चित्रफितींना जोरदार आक्षेप घेत, जीनिव्हा करारानुसार अभिनंदन यांना भारताच्या हवाली करावे, अशी मागणी केली होती. अमेरिका, सौदी अरेबिया आणि चीननेही पाकिस्तानवर दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या सुटकेची घोषणा केली होती.

‘जैश’वरील हल्ल्याची कारणे आंतरराष्ट्रीय समुदायाला द्या :
  • नवी दिल्ली : पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या अड्डय़ांवर भारताने हवाई हल्ले का केले त्यामागील कारणांची तपशीलवार माहिती आंतरराष्ट्रीय समुदायाला द्यावी, अशी सूचना संसदीय समितीने शुक्रवारी सरकारला केली.

  • परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी परराष्ट्र मंत्रालय संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताज्या घडामोडींची माहिती दिली त्या वेळी समितीने वरील सूचना केली.

  • पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण अड्डय़ांवर भारताने केलेला हवाई हल्ला आणि पाकिस्तानने त्याला प्रत्युत्तर देण्याचा केलेला प्रयत्न, याबाबत गोखले आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी समितीच्या सदस्यांना माहिती दिली, असे सूत्रांनी सांगितले.

  • पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय लष्करी ठाण्यांवर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला, त्यामध्ये एका विमान पडले, असेही गोखले यांनी समितीला सांगितले. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या अड्डय़ांवर भारताने हवाई हल्ला का केला त्यामागील कारणांची तपशीलवार माहिती सरकारने जगाला सांगावी, असे समितीमधील सदस्यांनी परराष्ट्र सचिवांना सांगितले.

  • काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे या समितीचे सदस्य आहेत, मात्र ते शुक्रवारी बैठकीला हजर नव्हते.

विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याचा देशाला अभिमान-राष्ट्रपती :
  • विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याचा आणि धैर्याचा देशाला अभिमान आहे त्यांनी त्यांचे कर्तव्य ज्या भावनेतून पार पाडले त्या देशभक्तीच्या भावनेचा सगळ्यांनाच आदर आहे. त्यांच्या शौर्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचे स्वागत केले आहे. तसेच वायुदलात तुम्ही खूप मोठे यश संपादन करा अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.

  • अभिनंदन वर्थमान हे तब्बल साठ तासांनी अटारी वाघा सीमेवरून पाकिस्तानातून मायदेशी परतले. पाकिस्तानी रेंजर्स आणि सीमा सुरक्षा दल यांच्यातली कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर अभिनंदन यांनी भारतीय सीमेत प्रवेश केला. अभिनंदन आता विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत.

  • बुधवारी भारतीय हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान अपघातग्रस्त झाले. ज्यानंतर पॅराशूटच्या मदतीने अभिनंदन यांनी उडी घेतली मात्र ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहचले जिथे त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. त्यानंतर कोणतीही चर्चा न करता अभिनंदन यांची सुटका करा अशी मागणी भारताने केली होती. जी मान्य करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा गुरुवारी केली. त्यानंतर शुक्रवारी अभिनंदन मायदेशी परतले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनंदन वर्थमान यांचे कौतुक केले आहे. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही विंग कमांडर अभिनंदन यांचा देशाला गर्व आहे असं म्हणत त्यांचं स्वागत केलं आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८५५: अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.

  • १८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.

  • १९०३: जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.

  • १९४९: न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.

  • १९५२: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.

  • १९६९: जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.

  • १९७८: स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.

  • १९९२: आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.

जन्म 

  • १७४२: नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)

  • १९३१: सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.

  • १९३१: मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५६८: मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई यांचे निधन.

  • १७००: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)

  • १८३०: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार डी. एच. लॉरेन्स यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८८५)

  • १९४९: प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन.

  • १९९४: धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.