चालू घडामोडी - ०२ मे २०१८

Date : 2 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वर्षातून दोनदा होणार जेईई, नीट, नेट आणि सीटेटच्या परीक्षा :
  • नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) डिसेंबर २०१८मध्ये पहिली परीक्षा घेतली जाणार आहे. याची स्थापना केंद्र सरकारच्या वतीने जेईई मेन्स, नीट, नेट आणि सीटेट परीक्षांसाठी करण्यात आली आहे. यामुळे सीबीएसईवरील बोर्ड परीक्षांशिवाय अन्य परीक्षांचा ताण कमी होणार आहे. तसेच उच्चशिक्षण संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील नोकऱ्यांत पात्रता मापदंडाची परीक्षा आयोजित करण्यासाठी एक वेगळी एजन्सी मिळणार आहे.

  • मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, एनटीएच्या माध्यमातून केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयात शिक्षक भरती परीक्षांचे आयोजनही होईल. यापूर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून सांगण्यात येत होते की, एनटीए २०१९मध्ये पहिल्या परीक्षेचे आयोजन करील. एनटीएचे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आयएएस विनीत जोशी यांनी पदभार स्वीकारताच मंत्रालय याबाबत गतीने काम करण्यासाठी सक्रिय झाले आहे.

  • विनीत जोशी हे यापूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचे (सीबीएसई) अध्यक्ष राहिलेले आहेत. बोर्डातून ते प्रतिनियुक्तीवर मणिपूरला गेले होते. सीबीएसईमधील बोर्ड परीक्षांच्या प्रश्नपत्रिका लीक प्रकरणानंतर बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाºया अन्य परीक्षांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. अशावेळी सरकारचा असा प्रयत्न आहे की, लवकरात लवकर एनटीएच्या माध्यमातून परीक्षांचे आयोजन केले जावे.

  • यामुळे बोर्डाचे काम केवळ शाळांना संलग्नता देणे, बोर्डाची परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करण्यांपर्यंतच मर्यादित राहणार आहे. तसेच, यामुळे परीक्षांची गुणवत्ताही सुधारणार आहे.

पुढील ४ वर्षात 'या' क्षेत्रात निर्माण होणार ४० लाख रोजगार :
  • नवी दिल्ली: केंद्र सरकारने मंगळवारी दूरसंचार धोरणाचा नवा मसुदा जाहीर केला आहे. राष्ट्रीय डिजिटल संवाद धोरण २०१८ या मसुद्यात २०२२ पर्यंतचं लक्ष्य स्पष्ट करण्यात आले आहे. या चार वर्षांमध्ये दूरसंचार क्षेत्रात ४० लाख रोजगार तसंच प्रत्येक नागरिकाला ५० एमबीपीएसपर्यंत ब्राँडबँड देण्यासाठी या क्षेत्रात १०० अब्ज डाँलर्सची गुंतवणूक आणण्याचं धोरण यामध्ये निश्चित करण्यात आलंय.

  • भारतीय दूरसंचार क्षेत्र कर्जाच्या ओझ्याखाली आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी काही उपायही या मसुद्यात सुचवले आहेत. लायसन्स फी मध्ये बदल, स्पेक्ट्रम वापराच्या फीमध्ये बदल तसेच युनिव्हर्सल सर्विस ऑब्लिगेशन फंड लेव्ही असे उपाय त्यात देण्यात आले आहेत. यामुळे कर्जातून बाहेर येऊन या क्षेत्रात नवे रोजगार उपलब्ध होतील, असा सरकारला विश्वास आहे.

  • २०१७ मध्ये जीडीपीमध्ये दूरसंचाप क्षेत्राचा वाटा ७% इतका होता. तो ८% इतका करण्यासाठी ४० लाख रोजगारांची निर्मिती, सर्वांसाठी ब्राँडबँड या योजना आणण्यात येणार आहेत. प्रत्येक व्यक्तीला ५० एमबीपीएस गतीचे ब्राँडबँड व प्रत्येक ग्रामपंचायतीला २०२० पर्यंत १ जीबीपीएस गतीचे ब्राँडबँड मिळेल. २०२२ पर्यंत ते १ वरुन १० जीबीपीएस करण्याचा मनोदय या धोरणात आहे.

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबई चौथ्या स्थानी, दिल्ली अव्वल :
  • मुंबई : मुंबई ही जगाच्या नकाशावर चौथं सर्वात प्रदूषित शहर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं केलेल्या हवा प्रदूषणाच्या चाचणीत मुंबईत सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचं निष्पन्न झालं आहे.

  • गेल्या वर्षी मुंबई पाचव्या क्रमांकावर होती. पण आता शहरातील हवा प्रदूषणात आणखी वाढ झाली आहे. तर, याच चाचणीत दिल्ली क्रमांक एक म्हणजे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचं म्हटलं आहे.

  • दिल्लीपाठोपाठ, कैरो, ढाका आणि त्यानंतर मुंबई अशी पहिल्या 4 प्रदूषित शहरांची नावं आहेत. त्यामुळे, जगातील दर 10 माणसांपैकी 9 लोक प्रदूषित हवेनं श्वासोच्छवास करत असल्याचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे.

  • यामुळे दरवर्षी वायू प्रदूषणामुळे जगभरात 70 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची माहितीही या अहवालातून समोर आली आहे. तसंच वायू प्रदूषणामुळे हृदयासंबंधीच्या समस्या, श्वसन रोग यासरख्या समस्यांमध्येही वाढ होत असल्याचं समोर आलं आहे.

माझा इम्पॅक्ट : नांदेड पोलीस भरतीची फेरपरीक्षा होणार : 
  • नांदेड : नांदेड जिल्ह्यात पोलीस भरती घोटाळा उघड झाल्यानंतर आता नांदेड जिल्ह्यात फेर लेखी परीक्षा होणार आहे. एबीपी माझाने सातत्याने या घोटाळ्याचा पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आलं आहे.

  • नांदेड पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी ही लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्याच जाहीर केलं. एकूण 1198 उमेदवारांनी ही लेखी परीक्षा दिली होती. एकूण 71 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु आहे.

  • आज (बुधवार) संध्याकाळपर्यंत या लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून रोख रक्कम घेऊन काही मार्क वाढविल्याचा आरोप आहे.

  • घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदाराने एसआरपीएफच्या उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये जमा केले, अशीही माहिती पोलीस तपासात उघड झाली. त्यानंतर आता परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आहे.

  • प्रवीण भटकरच्या एसएसजी या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम होतं. याचाच गैरफायदा घेत या कंपनीने उमेदवारांकडून पैसे उकळले आणि हा घोटाळा केल्याचं तपासात समोर आलं आहे.

राजकीय ब्रह्मास्त्र : ‘ओबीसी’ना आरक्षण देण्यासाठी करणार ‘ही’ युक्ती :
  • उत्तर प्रदेशमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीचा फटका भाजपला बसला होता. त्यापासून धडा घेत योगी सरकारने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी ‘मास्टरस्ट्रोक’ मारण्याची तयारी केली आहे.

  • कोणत्याही परिस्थितीत जातीय समीकरणाचा फायदा सप-बसप युतीला होऊ द्यायचा नाही यासाठी योगी सरकारने कंबर कसल्याचे दिसून येते. ओबीसी प्रवर्गातील ८२ जातींना तीन वेगवेगळ्या विभागात विभागण्याचा प्रस्ताव सरकारने आखला आहे.

  • ओबीसी प्रवर्गातील जातींना ३ उपविभागात विभागल्यास मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार सर्व जातींना २७ टक्के आरक्षण मिळेल, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारमधील वरिष्ठ कॅबिनेट मंत्री ओ पी राजभर यांनी दिली. राजभर हे सुखदेव भारतीय समाज पार्टीचे (एसबीएसपी) सदस्य आहेत. या पक्षाची भाजपाबरोबर युती आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सप-बसप युती नेस्तनाबूत होईल, असा विश्वास राजभर यांना आहे.

  • राजभर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक अहवाल सुपूर्द केला. यामध्ये २७ टक्के ओबीसी कोट्याचे ३ उपविभाग बनवण्याचा प्रस्ताव आहे. राजभर म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ११ एप्रिलला झालेल्या बैठकीत असे करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे भाजपाला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देणाऱ्या गैर यादव ओबीसी जातींना फायदा मिळण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ विचारवंत अशोक मित्रा यांचे निधन :
  • ज्येष्ठ विचारवंत आणि मार्क्‍सवादी अर्थतज्ज्ञ अशोक मित्रा यांचे मंगळवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. अशोक मित्रा हे पश्चिम बंगालचे अर्थमंत्री होते, त्याचप्रमाणे ते भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागारही होते.

  • मित्रा यांचा जन्म बांगलादेशात झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लखनऊ विद्यापीठात अध्यापन केले. नेदरलॅण्ड्समधून त्यांनी डॉक्टरेटही मिळविली होती. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि आयआयएम कोलकाता येथेही त्यांनी अध्यापन केले होते. जागतिक बँकेसाठीही त्यांनी काम केले होते. मित्रा यांच्या निधनाबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे.

  • मित्रा १९७७ ते १९८७ या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. तर १९९० च्या दशकात ते राज्यसभा सदस्य होते आणि संसदेच्या उद्योग आणि वाणिज्य स्थायी समितीचे अध्यक्ष होते. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मित्रा १९७० ते १९७२ या कालावधीत भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते.

  • मित्रा यांनी अनेक वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून विविधांगी लिखाण केले होते. त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झाली. इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली या नियतकालिकाशी त्यांचा जवळचा संबंध होता. सध्याच्या अर्थकारण आणि सामाजिक स्थितीवर ते कडाडून टीका करत. मित्रा यांनी १९७५ मध्ये म्हटले होते की, या देशात फॅसिस्टवाद चालणार नाही. येथील सर्व उजवे राजकारणीही फॅसिस्टवादाच्या विरोधात आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

  • १९१८: जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.

  • १९२१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली.

  • १९९४: बँक ऑफ कराड  चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.

  • १९९७: टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.

  • १९९७: राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले.

  • १९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.

  • १९९९: मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.

  • २००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.

  • २०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.

जन्म

  • १८९९: मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९९४)

  • १९२०: शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९८३)

  • १९२१: ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रेयांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९२)

  • १९२९: भूतानचे राजे जिग्मे दोरजी वांगचुकयांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९७२)

  • १९६९: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्म.

  • १९७२: स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते अहटी हेनला यांचा जन्म.

मृत्यु

  • १५१९: इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो दा विंची यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४५२)

  • १६८३:शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित यांचे निधन.

  • १९६३: महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८२)

  • १९७३: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१०)

  • १९७५: चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार शांताराम आठवले यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१०)

  • १९९८: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन. (जन्म: १८ मे १९१३)

  • १९९९: जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक पं. सुधाकरबुवा डिग्रजकर यांचे निधन.

  • २०११: अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन अमेरिकन सैन्याने ठार मारले. (जन्म: १० मार्च १९५७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.