चालू घडामोडी - ०२ नोव्हेंबर २०१७

Updated On : Nov 02, 2017 | Category : Current Affairsजपानच्या पंतप्रधानपदी शिंझो अबेंची फेरनिवड, जास्त काळ राहणारे पंतप्रधान बनणार :
 • टोक्यो : जपानच्या संसदेने बुधवारी शिंझो अबे यांची पंतप्रधानपदी औपचारिकरीत्या फेरनिवड केली. अबे यांच्या लिबरल डेमोक्रॅटीक पक्षाने २२ आॅक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत दोन तृतीयांश (सुपर मेजॉरिटी) विजय मिळवल्यामुळे अबे हे देशाचे सर्वात जास्त काळ राहणारे पंतप्रधान बनणार आहेत.

 • अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाकडून मिळत असलेल्या धमक्या आणि घटता जन्मदर या दोन मोठ्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज असल्याचे अबे यांनी प्रचारात सांगितले होते.

 • ४६५ सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात अबे यांच्या पक्षाने ३१२ जागा जिंकल्या होत्या तर २४२ सदस्यांच्या वरिष्ठ सभागृहात अबे यांच्या पक्षाने १५१ मते जिंकून बहुमत प्राप्त केले.

शासकीय विश्रामगृहात योगी आदित्यनाथ! यूपी भवनमध्ये राहणारे पहिलेच मुख्यमंत्री :
 • मुंबई : नवी मुंबईतील यूपी भवन या शासकीय विश्रामगृहामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारची संपूर्ण रात्र काढल्याचे उघडकीस आले आहे. यूपी भवनमध्ये रात्र काढणारे योगी आदित्यनाथ पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.

 • मॉरीशस येथील एका कार्यक्रमासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करण्यासाठी योगी आदित्यनाथ मंगळवारी रात्री १० वाजता मुंबईत आले होते.

 • मात्र विमानाची वेळ सकाळची असल्याने भाजपाच्या काही मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत त्यांनी रातोरात नवी मुंबईतील यूपी भवन गाठले. पहाटे ४ वाजेपर्यंत आराम केल्यानंतर ५ वाजता ते पुन्हा विमानतळावर पोहचले.

 • विमानतळानजीक असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबवण्याऐवजी योगी आदित्यनाथ यांनी शासकिय विश्रामगृहाचा पर्याय निवडल्याने सर्वच कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या.

 • साधे राहणीमान आणि उच्च विचारांना मानणारे योगी आदित्यनाथ कुठेही गेले, तरी योगी धर्माचे पालन करतात, अशी माहिती मुंबई भाजपाचे महामंत्री अमरजीत मिश्र यांनी दिली.

अपयशी देशांच्या यादीत पाकिस्तान टॉप 20 मध्ये :
 • नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक अपयशी देशांच्या यादी समोर आली असून यामध्ये पाकिस्तानाचा समावेश टॉप 20 मध्ये झाला आहे. फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सतर्फे प्रसिद्ध झालेल्या अहवालात पाकिस्तानला अपयशी देश म्हणून संबोधलं आहे.

 • पाकिस्तानचा या यादीत 18 वा क्रमांक असून, त्यामुळे पाकिस्तानचं खरं रुप पुन्हा जगासमोर आलं आहे. पाकिस्तानला सातत्यानं पाठिशी घालणाऱ्या चीनमधील ब्रिक्स देशांच्या बैठकीतही एक संयुक्त घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आलं.

 • यात पाकिस्तानाने किती दहशतवादी संघटनांना आश्रय दिला याची आकडेवारीसह नावं प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यातच आता फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत पाकिस्तानचा टॉप 20 देशांच्या यादीत समावेश झाला आहे.

 • अमेरिकेने पाकिस्तानाला दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं बंद करण्याचा वारंवार समज देऊनही, पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची ओळख संपूर्ण जगात दहशतवाद्यांचा आश्रित देश म्हणून झाली आहे.

गोवा महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित, महाराष्ट्र नवव्या स्थानावर; प्लान इंडियाचा अहवाल :
 • नवी दिल्ली - महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यं महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित आहेत.

 • ‘प्लान इंडिया’द्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. महिला सुरक्षेच्याबाबतीत महाराष्ट्र नवव्या स्थानावर आहे. देशातील राज्यांच्या कामगिरीची सरासरी काढल्यास महाराष्ट्राची कामगिरी थोडीफार चांगली आहे.

 • महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा सर्वाधिक सुरक्षित असून बिहार सर्वाधिक असुरक्षित राज्य असल्याचं प्लान इंडियाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

 • बिहारसोबतच झारखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्लीसुद्धा महिलांसाठी असुरक्षित असल्याचं आकडेवारीनुसार स्पष्ट झालं आहे. तर गोव्यानंतर महिला सुरक्षेच्या बाबतीत केरळ, मिझोरम, सिक्कीम, मणीपूर या राज्यांचा नंबर लागतो.  

हरीश साळवेंना सिंगापूर कोर्टाचा मान; वरिष्ठ न्यायालय ‘कोर्ट आॅफ अपील्स’ने दिली युक्तिवादाची परवानगी :
 • नवी दिल्ली : विदर्भाचे सुपुत्र आणि भारतातील सर्वात महागडे, अग्रगण्य निष्णात वकील म्हणून ख्याती असलेले हरीश साळवे यांना सिंगापूरच्या ‘कोर्ट आॅफ अपील्स’ या ज्येष्ठ न्यायालयाने एका पक्षकाराचे वकील म्हणून युक्तिवाद करण्याची मुभा देऊन एक मान दिला.

 • सिंगापूरच्या न्यायालयांमध्ये फक्त स्थानिकांना व इंग्लंडमधील बॅरिस्टर असणाºया ‘क्वीन्स कौन्सेल’नाच वकिली करू दिली जाते. विशेष प्राविण्य असलेल्या परदेशी वकिलाने बाजू मांडणे गरजेचे आहे, हे पक्षकाराने पटवून दिले तरच विरळा प्रकरणांत सिंगापूरबाहेरच्या वकिलास परवानगी दिली जाते.

 • स्वत: बॅरिस्टर असलेले साळवे असा मान मिळालेले पहिले भारतीय वकील आहेत. रनबक्शी या मुळच्या औषधनिर्मिती कंपनीचे संस्थापक प्रवर्तक मलविंदर आणि शिविंदर सिंग यांच्यावतीने साळवे ‘कोर्ट आॅफ अपील्स’मध्ये उभे राहतील.

नेहराला शानदार निरोप, भारताची न्यूझीलंडवर 53 धावांनी मात :
 • नवी दिल्ली : विराट कोहलीच्या टीम इंडियानं दिल्लीच्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा ५३ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघानं डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहराला शानदार निरोप दिला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

 • या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी २०३ धावांचं आव्हान दिलं होतं.  न्यूझीलंडला त्या आव्हानाचा पाठलाग करणं झेपलं नाही.

 • भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला २० षटकांत आठ बाद १४९ धावांत रोखलं. टीम इंडियाचा टी-20 सामन्यांच्या इतिहासात न्यूझीलंडवरचा हा पहिलाच विजय ठरला.

 • या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मानं दिलेल्या १५८ धावांच्या विक्रमी सलामीच्या जोरावर भारतानं ५० षटकांत तीन बाद २०२ धावांची मजल मारली.

दिनविशेष :

जागतिक दिवस

 • भारतीय आगमन दिन

महत्त्वाच्या घटना

 • १९१४: रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.

 • १९३६: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.

 • १९३६: कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.

 • १९४०: दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.

 • १९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.

 • १९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.

जन्म दिवस

 • १४७०: इंग्लंडचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (पाचवा)

 • १७५५: फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १७९३)

 • १८३३: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९०४ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

 • १८८२: महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ.के.बी.लेले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९६३)

 • १८८६: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९७१)

 • १८९७: दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते,  सोहराब मेहेरबानजी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९८४)

 • १९२९: बोस कॉर्पोरेशन चे संस्थापक अमर बोस यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१३)

 • १९४१: केन्द्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांचा जन्म.

 • १९६५: अभिनेता व निर्माता शाहरुख खान यांचा जन्म.

मृत्य दिन

 • १८८५: मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, नट, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे गुर्लहोसूर यांचे निधन.

 • १९५०: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८५६)

 • १९५४: ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे यांचे निधन.

 • १९८४: मराठी साहित्यिक शरद्चंद्र मुक्तिबोध यांचे निधन.

 • १९९०: गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९०३)

 • २०१२: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)

टिप्पणी करा (Comment Below)