चालू घडामोडी - ०२ ऑक्टोबर २०१८

Date : 2 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशभरात गांधी जयंतीचा उत्साह :
  • नवी दिल्ली: देशभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 149व्या जयंतीचा उत्साह आहे. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर  इथं 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. सत्य आणि अहिंसेच्या वाटेवर त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली. अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांची सत्ता उलथवून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश  सर्वात मोठ्या अहिंसेच्या पुजाऱ्याला विनम्र आदरांजली वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर मोदींनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपित्याला वंदन केलं.

  • गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात सुरु असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलन’ समाप्त होत आहे.  या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनिया गुतारेससह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहण्याची शक्यता आहे.

  • वर्ध्यात काँग्रेसची बैठक - गांधी जयंतीच्या निमित्ताने आज वर्ध्यात काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांच्यासह काँग्रेस वर्किंग कमिटीचे 53 सदस्य उपस्थितत राहणार आहेत.

  • गांधीजींनी 1942 मध्ये वर्ध्यातून इंग्रजांना भारत छोडो आंदोलनाचा नारा दिला होता. त्याचाच आधार घेत काँग्रेस आज भाजप मुक्त भारतचा निर्धार करणार आहे. दुपारी 12.30 वा ही बैठक सुरु होणार आहे. त्यापूर्वी राहुल गांधी 11.15 वा. राहुल गांधी सेवाग्राम गांधी आश्रमात पार्थना सभेत भाग घेतील. त्यानंतर इथे वृक्षारोपण होईल.

भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी :
  • नवी दिल्ली: भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टिन लगार्डी यांनी गोपीनाथ यांची नियुक्ती केली आहे. सध्या मोरी ऑब्स्टफेल्ड यांच्याकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची जबाबदारी आहे. ते डिसेंबरमध्ये निवृत्त होतील. त्यानंतर या पदाची धुरा गीता गोपीनाथ यांच्याकडे असेल. 

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती झालेल्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत. याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली होती. राजन 1 सप्टेंबर 2003 ते 1 जानेवारी 2007 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी होते.

  • मोरी ऑब्स्टफेल्ड सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधाचे मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम पाहतात. ते डिसेंबरमध्ये निवृत्त होतील. त्यानंतर गीता गोपीनाथ यांच्याकडे या पदाची जबाबदारी असेल. त्या सध्या हॉवर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. 

  • गोपीनाथ अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूच्या सहसंपादक आहेत. याशिवाय त्या राष्ट्रीय आर्थिक संशोधन संस्थेच्या सहसंचालिकादेखील आहेत. त्यांच्याकडे अमेरिकचं नागरिकत्व असून 2001 मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे. गीता गोपीनाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए केलं आहे. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि वॉशिंग्टन विद्यापीठातून त्यांनी एमए केलं आहे. 

पाकिस्तानमध्ये हाफीज सईद आणि इम्रान खानचे मंत्री एकाच मंचावर :
  • इस्लामाबाद - पाकिस्तानचा दहशतवादाला आश्रय देणारा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कुख्यात दहशतवादी हाफीज सईद आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री एकाच मंचावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.  

  • इस्लामाबादमध्ये दिफा-ए-पाकिस्तान कौन्सिलने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी हाफीज सईद याला मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले नूर उल हक कादरी हे हाफीज सईदच्या अगदी शेजारी बसलेले दिसून आले.  कादरी हे इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात धार्मिक बाबींचे मंत्री आहेत. 

  • कार्यक्रमाची आयोजक असलेली दिफा ए पाकिस्तान कौन्सिल ही पाकिस्तानमधील 40 राजकीय पक्षांचा समूह आहे. या कार्यक्रमात हाफीज सईदने भाषणसुद्धा केले होते. तसेच येथे काश्मीर संदर्भात चर्चाही झाली. त्यादरम्यान काश्मीरप्रश्न हा देशासमोर असलेल्या आव्हानाच्या रूपात मांडण्यात आला. 

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या 'अंडर-19' संघात निवड; विनू मंकड स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व :
  • मुंबई : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनचा मुंबईच्या 19 वर्षांखालील संघात समावेश करण्यात आला आहे. विनू मंकड स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेला 6 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अर्जुनचा भारताच्या 19 वर्षांखालील संघात समावेश करण्यात आला होता. चार डावांत त्याला केवळ तीन विकेट घेता आल्या होत्या. 

  • 19 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याला वन डे मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्याचबरोबर तो 2020च्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतही खेळू शकणार नाही. वयाच्याच कारणामुळे त्याला युवा आशिया चषक स्पर्धेत संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे विनू मंकड स्पर्धेत चांगली कामगिरी करून मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

  • मुंबईचा पहिला सामना 6 ऑक्टोबरला गुजरातविरुद्ध होणार आहे. त्यानंतर बंगाल ( 7 ऑक्टोबर), मध्य प्रदेश ( 9 ऑक्टोबर), कर्नाटक ( 12 ऑक्टोबर), आसाम ( 16 ऑक्टोबर), महाराष्ट्र ( 18 ऑक्टोबर), झारखंड ( 20 ऑक्टोबर) आणि उत्तर प्रदेश (22 ऑक्टोबर) यांच्याबरोबर सामने होतील.

गांधी जयंतीनिमित्त राज्यातील १०० कैद्यांची सुटका होणार :
  • मुंबई : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील 100 कैद्यांना सुटका करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून सर्वाधिक कैद्यांची सुटका केली जाणार आहे.

  • येत्या 5 ऑक्टोबरला या सर्व कैद्यांची सुटका केली जाणार आहे. राज्यातील एकूण नऊ मध्यवर्ती कारागृह तसेच वर्धा आणि धुळे कारागृह अशा एकूण 11 कारागृहांतून 100 कैदांची सुटका केली जाणार आहे.

  • तळोजा कारागृहातून 37 कैदी, येरवडा कारागृहामधून 24 कैदी, नाशिक कारागृहामधून 10 आणि इतर कारागृहातील प्रत्येकी एक-दोन कैद्यांना सुटकेमुळे दिलासा मिळणार आहे.

आता एसबीआयच्या एटीएममधून 'इतकेच' पैसे काढता येणार :
  • मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याची कमाल मर्यादा निम्म्याने कमी केली आहे. आता एसबीआयच्या एटीएममधून दिवसाला फक्त 20 हजार रुपये काढता येतील. अगोदर ही मर्यादा 40 हजार रुपये प्रति दिन एवढी होती. ही मर्यादा एसबीआय डेबिट कार्डच्या क्लासिक आणि मेस्ट्रो कार्डधारकांसाठी असेल.

  • एटीएमच्या वाढत्या फसवणुकीच्या घटना आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं एसबीआयचं म्हणणं आहे. आगामी महिने सण-उत्सवांचे आहेत. त्यामुळे एटीएमचा जास्तीत जास्त वापर केला जाईल, अशात फसवणुकीच्या घटना वाढू नयेत, हा या निर्णयामागचा हेतू असल्याचं एसबीआयने स्पष्ट केलं आहे.

  • एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा निम्म्याने कमी केल्यामुळे ग्राहकांना अडचण येणार नाही का, असा प्रश्न एसबीआयला विचारण्यात आला. एसबीआयने एक सर्वेक्षण केलं होतं, ज्यात आढळून आलं, की जास्तीत जास्त ग्राहक एटीएममधून कमी प्रमाणात पैसे काढतात, त्यामुळेच 20 हजार रुपयांची मर्यादाही कमी नाही, असं उत्तर या प्रश्नावर एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी दिलं.

  • सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत असलं तरी देशात कॅशची मागणी वाढत आहे. ज्या ग्राहकांना जास्त पैशांची गरज असेल, त्यांनी जास्त मर्यादा असलेले डेबिट कार्ड घ्यावेत, असा सल्ला पी. के. गुप्ता यांनी दिला आहे. खात्यात जास्तीत जास्त किमान रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांना अधिक मर्यादेचं डेबिट कार्ड दिलं जातं.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन / स्वछता दिन / बालसुरक्षा दिन 

महत्वाच्या घटना 

  • १९०९: रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.

  • १९२५: जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.

  • १९६७: थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.

  • १९६९: महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.

  • २००६: निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.

जन्म 

  • १८४७: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९३४)

  • १८६९: मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.

  • १८९१: पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १९६७)

  • १९०४: भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)

  • १९०८: विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण सरदार तथा गं. बा. सरदार यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९८८)

  • १९२७: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी २०१०)

  • १९७१: संगीतकार व गायक कौशल इनामदार यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९०६: चित्रकार राजा रविवर्मा याचं निधन. (जन्म: २९ एप्रिल १८४८)

  • १९२७: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्‍हेनिअस याचं निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १८५९)

  • १९७५: स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. कामराज याचं निधन. (जन्म: १५ जुलै १९०३)

  • १९८५: अमेरिकन अभिनेते रॉक हडसन याचं निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९२५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.