चालू घडामोडी - ०२ सप्टेंबर २०१८

Updated On : Sep 02, 2018 | Category : Current Affairsराज्यात चर्मकार आयोग स्थापन करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा :
 • मुंबई : राज्यातील चर्मकार समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी लवकरच राज्यात चर्मकार आयोग स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.

 • रोहिदास समाज पंचायत समाज संघाच्या वतीने परळ येथे उभारण्यात येणाऱ्या संत रोहिदास भवनचे भूमिपूजन मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, आ. भाई गिरकर, आ. अजय चौधरी, मंगेश कुडाळकर, माजी महापौर महादेव देवळे, स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.

 • राज्य सरकारने या भवनासाठी ११ कोटी रुपये दिले असले, तरी त्यानंतरही काही कमी पडल्यास सरकार मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले, चर्मकार समाजाच्या अडचणी या आयोगाच्या माध्यमातून सोडविल्या जातील. संत रोहिदास यांचा समताधिष्ठित राज्याचा विचार होता. त्याच विचारावर सरकार चालत आहे.

 • मंत्री राजकुमार बडोले यांनी परळ येथे उभे राहत असलेल्या या भवनात, वसतिगृह, वाचनालय, आदी अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. राज्यातील प्रत्येक विभागात अशाच प्रकारे संत रोहिदास भवन उभे करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

न्या. रंजन गोगोई बनणार भारताचे नवे सरन्यायाधीश :
 • नवी दिल्ली : न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सरन्यायाधीश पदासाठी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारच्या विधी मंत्रालयाकडे केली आहे.

 • सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या शिफारशीला केंद्र सरकार अंतिम मंजूर देईल. न्यायमूर्ती गोगोई 3 ऑक्टोबरला सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील अशी माहितीही सूत्रांकडून दिली जात आहे.

 • ज्येष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्याची परंपरा आहे. मात्र औपचारीकरित्या नाव पाठवण्याचा अधिकार सरन्यायाधीशांना असतो. त्यामुळे विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी ही पंरपरा कायम ठेवली आहे.

 • न्यायमूर्ती रंजन गोगोई फेब्रुवारी 2001मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतले होते. फेब्रुवारी 2011मध्ये त्यांची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यानंतर एप्रिल 2012 पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.

मोदींच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेचा शुभारंभ :
 • नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ झाला आहे. सामान्य लोकांसाठी बँकेची सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

 • इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवा भारतीय पोस्ट विभागाच्या अखत्यारीत असेल. दुसऱ्या बँकांसारखीच याची सेवा ग्राहकांना मिळणार आहे. मात्र याद्वारे क्रेडिट कार्ड आणि अॅडव्हान्स लोनची सुविधा उपलब्ध नसेल.

 • एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ग्राहक यात जमा करु शकतात. याद्वारे एटीएमची सुविधाही दिली जाणार आहे. आजपासून देशभरातील 650 शाखा आणि 3 हजार 250 सुविधा केंद्रात याचं काम सुरु होईल.

 • इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भारत सरकारची 100 टक्के भागिदारी असणार आहे. आपल्या खातेधारकांना एटीएम, करंट अकाउंट, मनी ट्रान्सफर, डायरेक्ट मनी ट्रान्सफर, बिल पेमेंट यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. या सेवेमुळे पोस्ट विभाकाचं नेटवर्क आणि तीन लाखांहून अधिक पोस्टमन आणि ग्रामीण पोस्ट सेवकांना लाभ मिळणार आहे.

पाकला तगडा दणका, नाराज अमेरिकेने २१००० कोटींची मदत रोखली :
 • पाकिस्तानला तगडा दणका देताना अमेरिकेने 300 दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास 2100 कोटी रुपयांची आर्थिक मदत रोखली आहे. दहशतवाद्यांविरोधात कोणतीही ठोस कारवाई न केल्याबद्दल अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.

 • एकप्रकारे जोपर्यंत दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत तुमची आर्थिक नाकेबंदी केली जाईल असा इशारा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखी डागाळली आहे.

 • दहशतवादाविरोधात कारवाई करण्यास पाकिस्तान अयशस्वी ठरलंय, वारंवार सूचना करुन देखील दहशतवादाविरोधात कारवाई न केल्यामुळे आम्ही 300 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत रोखण्याचा निर्णय घेतल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. या पैशाचा वापर इतर कामांसाठी केला जाईल असं, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल कोनी फॉकनर यांनी सांगितलं. यावर्षीच्या सुरूवातीलाही अमेरिकेने पाकिस्तानची 50 कोटी डॉलरची आर्थिक मदत रोखली होती.

 • एक दिवसापूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या एकतर्फी मागण्या पाकिस्तान मान्य करणार नाही असे म्हटले होते. पाकिस्तानला अमेरिकेशी सन्मानपूर्वक संबंध ठेवायचे आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

 • १९१६: पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.

 • १९२०: म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.

 • १९४५: व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.

 • १९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

 • १९६०: केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.

 • १९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.

जन्म

 • १८३८:  भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुन १९१४)

 • १८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेल्म ऑस्टवाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६)

 • १८७७: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फेडरिक सॉडी यांचा जन्म.

 • १८८६: साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव माटे तथा श्री. म. माटे यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९५७)

 • १९५२: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिमी कॉनर्स यांचा जन्म.

 • १९५३: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २००१)

 • १९६५: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म.

मृत्यू

 • १९३७:  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती चे स्थापक पियरे डी कौर्तिन  यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८६३)

 • १९६०: वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन.

 • १९७६: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९८)

 • १९९०: मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक न. शे. पोहनेरकर यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०७)

 • १९९९: चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९११ – पाचल, राजापूर, रत्‍नागिरी)

 • २००९: आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी याचं विमान अपघातात निधन. (जन्म: ८ जुलै१९४९)

टिप्पणी करा (Comment Below)