चालू घडामोडी - ०३ एप्रिल २०१८

Date : 3 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नासा मंगळावर पाठविणार यांत्रिक माश्या :
  • वॉशिंग्टन - मंगळ म्हटले की दिसतो तांबड्या रंगाचा ग्रहगोल. त्यावर जीवसृष्टी किंवा पाण्याचे अस्तित्व आहे का, त्याच्या भूगर्भात काय दडलेले असेल अशा अनेक गूढ प्रश्नांची उकल करण्याची आस खगोलशास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून लागलेली आहे. आता याचा शोध घेण्यासाठी नासा मंगळावर यांत्रिक माश्या पाठविणार आहे, पण नेमके कधी हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

  • मंगळासंदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधन करण्यासाठी नासाकडे २३० प्रस्ताव आले होते. त्यातील एक प्रस्ताव यांत्रिक माश्या पाठविण्याबाबतचा होता. अशा माश्या बनविण्यासाठी नासाने संशोधकांना निधी दिला आहे.

  • या यांत्रिक माश्यांना ‘रोबोटिक बीज’ असे नाव देण्यात आले आहे. मंगळावरील वातावरण पृथ्वीपेक्षा विरळ आहे. त्यामुळे या ग्रहावर उड्डाणासाठी या माश्यांचे पंख मोठ्या आकाराचे असतील. अमेरिकी व जपानी शास्त्रज्ञांनी संयुक्त संशोधनातून यांत्रिक माश्या बनविल्या आहेत. त्यांच्या शरीरात सेन्सर, वायरलेस संपर्क आदी उपकरणे बसविण्यात आली आहेत.

  • मंगळावर भूप्रदेशाची मापे घेणे, खडक, माती आदींचे नमुने गोळा करणे, जीवसृष्टीचे अस्तित्व आढळल्यास त्याचे पुरावे गोळा करणे ही कामे या यांत्रिक माश्या करणार आहेत. मंगळ ग्रहावरील एकूण वातावरणाबाबत नासाने रोव्हर्सच्या माध्यमातून आधीपासून संशोधन सुरू असले, तरी ते धिम्या गतीने पुढे सरकते आहे. नासाने २०१२ साली क्युरिआॅसिटी रोव्हर मंगळावर उतरविला आहे. हा आजवर फक्त ११.२ मैलच अंतर कापू शकला आहे. रोव्हर प्रमाणेच यांत्रिक माश्यांचेही मोबाइल बेसद्वारे रिचार्जिंग होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना ट्विटरची मानवंदना, 'जाणता राजा' ट्रेंडिंगमध्ये :
  • मुंबई: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मंगळवारी ट्विटर इंडियाच्या टॉप ट्रेंडलिस्टमध्ये झळकत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने अनेक लोकांकडून मोठ्याप्रमाणावर ट्विट केली जात आहेत.

  • त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये आहे. सध्या छत्रपति शिवाजी महाराज हा हॅशटॅग तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, अनेक राजकीय नेत्यांनीही ट्विटच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे. 

परराष्ट्र सचिव दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर, डोकलाम पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा :
  • नवी दिल्ली- भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यामध्ये विविध महत्त्वाच्या विषायंवर चर्चा केली आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये डोकलामच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण झालेल्या परिस्थितीत गोखले यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गोखले यांची ही दुसरी भेट आहे. विजय गोखले यांनी भूतानचे परराष्ट्र सचिव डाशो सोनम त्शोंगो यांच्याबरोबर भूतानचे पंतप्रधान ल्योछेन त्शेरिंग तोबग्ये आणि राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांची काल भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

  • परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यामधून दोन्ही देशातील मैत्री आणि सहकार्याचे संबंध अधिक दृढ होणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परराष्ट्र सचिव, लष्करप्रमुख बिपिन रावत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी भूतानला भेट दिली होती. या भेटींमध्ये या नेत्यांनी डोकलामसह विविध विषयांवर भूतानी नेत्यांशी चर्चा केली आहे.

  • गेल्या वर्षी १६ जूनपासून भारत आणि भूतान या दोन्ही देशांचे सैन्य सलग ७३ दिवस डोकलाममध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते. डोकलाम हा प्रदेश भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमावर्ती प्रदेशात आहे. चीनने तेथे रस्ताबांधणी सुरु केल्यावर भारताने त्यास आक्षेप घेतला. हा सर्व तणाव २८ ऑगस्ट रोजी निवळला. अजूनही दोन्ही देशांच्या दृष्टीने डोकलामचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण असून हा प्रदेश अत्यंत संवेदनशील बनलेला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! १ मेपूर्वी वेतननिश्चिती करार होणार :
  • मुंबई : परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे. 1 मे रोजी एसटी कर्मचारी कामगार दिन साजरा करतील. 1 मेच्या अगोदरच वेतननिश्चितीचा करार केला जाईल, अशी घोषणा दिवाकर रावतेंनी केली.

  • सर्व एसटी कामगार संघटनांच्या बैठकीत यावर तोडगा निघाला. दिवाकर रावतेंच्या या आश्वासनानंतर एसटी कामगार संघटनांनीही समाधान व्यक्त केलं.  गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून वेतननिश्चितीची मागणी केली जात आहे.

  • वेतनवाढ संदर्भात मान्यताप्राप्त संघटना असलेल्या एसटी कामगार संघटनेने ऐन दिवाळीच्या हंगामात चार दिवसांचा संप पुकारून कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आली. इतकंच नाही तर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संघटनांच्या भूमिकांबाबत असलेला असंतोष पाहता, आज झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करता जे पदरात पडेल ते अगोदर पदरात पाडून घेण्याचा सर्वच संघटनांचा प्रयत्न होता.

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचं निधन :
  • पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. पूना हॉस्पिटलमध्ये भाई वैद्य यांनी अखेरचा श्वास घेतला. भाई वैद्य स्वादुपिंडाचा कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

  • भाई वैद्य यांचं पार्थिव रात्री लॉ कॉलेज रोडवरील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी 7 वाजता साने गुरुजी स्मारक येथे ठेवले जाईल. दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा आणि संध्याकाळी 6 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

  • पार्थिव सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सानेगुरुजी स्मारक सिंहगड रोड पुणे येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

  • आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक-राजकीय कारकीर्दीत आयुष्यभर लोकशाही आणि समाजवादी मूल्यांची जोपासना करणारं व्यक्तिमत्त्व भाई वैद्य यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेले. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, आणीबाणीविरोधी आंदोलन इत्यादी अनेक आंदोलनांमध्ये भाई वैद्य यांनी सक्रीयपणे सहभाग घेतला होता.

  • राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील विषयांवर भाई वैद्य हे अभ्यासपूर्ण मांडणी करत असत. तळागाळातील लोकांच्या हक्कांसाठी भाई वैद्य आयुष्यभर झटले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

  • १९७३: मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.

  • १९७५: बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव्ह हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.

  • २०००: आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

  • २०१०: ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.

  • २०१६: पनामा पेपर्स हे कायदेशीर दस्तऐवज प्रसिद्ध होऊन सुमारे २,१४,४८८ कंपन्याची गोपनीय माहिती उगढ झाली.

जन्म

  • १७८१: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८३०)

  • १८८२: सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९२८)

  • १८९८: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लुस यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६७)

  • १९०३: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९८८)

  • १९०४: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर१९९१)

  • १९१४: फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून २००८)

  • १९३०: जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह यांचा जन्म.

  • १९३४: इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांचा जन्म.

  • १९५५: सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचा जन्म.

  • १९६२: चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य जयाप्रदा यांचा जन्म.

  • १९६५: पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)

  • १९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू निलेश कुलकर्णी यांचा जन्म.

मृत्यू

  • १६८०: छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १६३०)

  • १८९१: फ्रेन्च गणिती एडवर्ड लूकास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८४२)

  • १९८१: पॅन अमेरिकन वर्ल्ड एरलाईन्स चे स्थापक जुआन त्रिप्प यांचे निधन.(जन्म: २७ जून १८९९)

  • १९८५: महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १८९३)

  • १९९८: इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९००)

  • १९९८: प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार हरकिसन मेहता यांचे निधन.

  • २०१२: भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचे निधन. (जन्म: ५ मे १९१६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.