चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ एप्रिल २०१९

Date : 3 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आयसीसीच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार मनू साहनी यांनी स्वीकारला :
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी म्हणून माध्यम व्यावसायिक मनू साहनी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. विद्यमान कार्यकारी डेव्ह रिचर्डसन हे त्यांच्यासमवेत जुलैतील विश्वचषकाच्या समारोपापर्यंत कार्यरत राहणार असून त्यानंतर ते निवृत्ती स्वीकारणार आहेत.

  • ईएसपीएन स्टार स्पोर्ट्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कामकाज केलेले साहनी हे या कालावधीच्या अंतिम सहा आठवडय़ांमध्ये रिचर्डसन यांच्यासमवेत कामकाज करून हस्तांतरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याबाबत दक्षता घेणार आहेत.

  • साहनी यांची नियुक्ती जानेवारी महिन्यातच करण्यात आली होती. मात्र त्याच वेळी रिचर्डसन जुलैपर्यंत कार्यरत राहणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले होते. आयसीसीच्या वतीने शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने साहनी यांची निवड केली होती.

काँग्रेसची १० वी यादी जाहीर ; अमित शाहंच्या विरोधात उमेदवाराची घोषणा :

  • लोकसभा निवडणुकांसाठी  काँग्रेस पक्षातर्फे २० उमेदवारांची १०वी यादी जाहीर केली आहे. दहाव्या यादीमध्ये गांधीनगर येथून अमित शाहंच्या विरोधात माजी आमदार डॉ. सी.जे चावडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • मंगळवारी रात्री ही यादी उशिरा जाहीर केली . जाहीर केलेल्या यादीत गुजरात, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, दादरा आणि नगर हवेली आणि पंजाबमधील उमेदवारांचा समावेश आहे. लोकसभेच्या उमेदवारांसोबतच ओडिशातील ९ विधानसभा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 

गिरीश बापट यांच्याकडे पाच कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्ता :
  • पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी एकूण पाच कोटी ७९ लाख रुपये एवढी मालमत्ता आहे. सन २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बापट यांची मालमत्ता तीन कोटी ४८ लाख एवढी होती. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या मालमत्तेमध्ये दोन कोटी ३१ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

  • बापट यांच्याकडे रोख रक्कम ७५ हजार एवढी आहे. तर, पत्नीकडे २८ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. बापट यांच्या पत्नीकडे १४ बँकांमध्ये १५ लाख २१ हजार रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. सहा बचत खात्यांमध्ये १६ लाख रुपये आहेत. याशिवाय ३५ हजार ७०० रुपयांचे समभाग असून, आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आणि टपाल खात्यामध्ये पाच लाख ७० हजार ९०० रुपयांच्या ठेवी आहेत.

  • बापट यांच्या विविध १५ बँकांमध्ये मुदत ठेवी असून या मुदत ठेवींची रक्कम ५२ लाख २७ हजार ९३४ रुपये आहे. विविध बचत खात्यांमध्ये त्यांच्या नावावर ३२ लाख २१ हजार १८७ रुपये आहेत. त्यांनी समभागामध्ये १८ हजार ३२० रुपयांची गुंतवणूक केली आहे. टपाल खात्यामध्ये त्यांच्या नावावर १३ लाख ६८ हजार ६१८ रुपयांची रक्कम आहे. बापट यांच्या नावावर चारचाकी चार वाहने असून त्यांच्याकडे एक बजाज स्कूटरही आहे. बापट यांच्याकडे एक लाख ३३ हजार रुपयांचे सोने आहे.

  • बापट यांच्याकडे अमरावतीला चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर येथे वारसाहक्काने मिळालेली जमीन आहे. या गावामध्ये त्यांनी एक हेक्टर १९ गुंठे जागा २०१४ मध्ये खरेदी केली आहे. मावळमधील तळेगाव दाभाडे येथे त्यांच्या नावावर जागा असून त्या जागेची बाजारमूल्यानुसार किंमत १६ लाख १३ हजार रुपये आहे. या ठिकाणी २००३ मध्ये १५ गुंठे जागा त्यांनी खरेदी केली असून त्याची किंमत ३५ लाख ४० हजार रुपये आहे.

  • बापट यांच्या नावावर शनिवार पेठेत तीन सदनिका आहेत. तर, बिबवेवाडी येथे एक सदनिका असून सदनिकेची किंमत ७६ लाख २३ हजार रुपये आहे. मुंबईतील अंधेरी भागात राजयोग सोसायटीमध्ये एक सदनिका असून त्या सदनिकेची किंमत एक कोटी २८ लाख ६३ हजार रुपये आहे.

भारताच्या  मिशन शक्तीमुळे अंतराळात पसरले ४०० तुकडे, नासाने वर्तवली भीती :
  • वॉशिंग्टन - भारताने केलेल्या मिशन शक्ती या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र परीक्षणामुळे अंतराळात 400 तुकडे पसरल्याचे नासाने म्हटले आहे. तसेच या तुकड्यांमुळे  आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहत असलेल्या अंतराळवीरांनी धोक्याचा सामना करावा लागू, शकतो, अशी भीती नासाने वर्तवली आहे. 

  • गेल्या आठवड्यात केलेल्या मिशन शक्ती चाचणीमुळे भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर अंतराळात उपग्रह उद्ध्वस्त करण्याची क्षमता बाळगणारा जगातील चौथा देश बनला होता. दरम्यान, भारताने केलेल्या मिशन शक्तीबाबत नासाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांना संबोधित करताना  नासाचे प्रमुख जिम ब्रिडेंस्टाइन यांनी भारताने घेतलेल्या या चाचणीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

  • ''भारताच्या क्षेपणास्त्राने उद्ध्वस्त केलेल्या उपग्रहाचे सगळे तुकडे ट्रॅक करण्याइतपत मोठे नव्हते. सध्या आम्ही ज्या तुकड्यांचा मागोवा घेत आहोत. ते ट्रॅकिंगसाठी पुरेसे आहेत. आम्ही 10 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या तुकड्यांबाबत बोलत आहोत. असे सुमारे 60 तुकडे ट्रॅक करण्यात आले आहेत.भारताने आपला 300 किमी उंचीवरील उपग्रह क्षेपणास्राचा मारा करून उद्ध्वस्त केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आणि अन्य महत्त्वाचे उपग्रह ते 300 किमीहून अधिक उंचीवर स्थित आहेत. असे जिम ब्रिडेंस्टाइन यांनी सांगितले. 

  • ''या स्फोटात विखुरलेले 24 तुकडे असे आहेत जे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या एपोजीपासून वर जात आहेत. अवशेष एपोजीपासून वर जात असल्याने ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. अशा कृतींमुळे भविष्यात मानवाच्या अंतराळ स्वारीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ही कृती स्वीकार्य नाही.'' असा इशाराही ब्रिडेंस्टाइन यांनी दिला. 

राम मंदिराचा मुद्दा प्रचारात नाही, पक्षाच्या अजेंडय़ावर कायम - उमा भारती :
  • नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राम मंदिर हा मुद्दा असणार नाही, मात्र भाजपच्या अजेंडय़ावर कायम असेल, असे  भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी येथे सांगितले.

  • रजवाडा पॅलेसमध्ये आयोजित लोधी समाजाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला भाजप नेते दयाशंकर तिवारी, शिवसेनेचे नेते किशोर कुमेरिया उपस्थित होते. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेश प्रचार करत आहे मात्र, अजूनही राम मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले नाही. त्यामुळे या मुद्यावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही.

  • देशात विकास झाला नाही अशी ओरड एकीकडे  काँग्रेस करीत असली तरी प्रियंका गांधी यांनी गंगेचे पाणी पिऊन गंगा शुद्ध झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.  सोनिया गांधी, राहुल गांधी यांना केवळ सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्तेत यायचे आहे, अशी टीका त्यांनी केली.

  • लोधी समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाईल असेही त्या म्हणाल्या. लोकसभा निवडणूक लढणार नाही मात्र राजकारणात सक्रिय राहू आणि पुढची लोकसभा निवडणूक पक्ष सांगेल त्या मतदारसंघातून लढणार असल्याचे त्या म्हणाल्या.

काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोह्य़ांना खुश करणारा :
  • नागपूर : काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोह्य़ांना खुश करणारा आहे, अशी टीका केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी येथे केली.

  • जगनाडे चौकातील रजिंटा हॉटेलमध्ये आयोजित  भाजपच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, महापौर नंदा जिचकार, माजी महापौर अर्चना डेहनकर आदी यावेळी उपस्थित होत्या.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला ‘सर्जिकल’ व ‘एअर स्ट्राईक’ने उत्तर देत असताना दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष देशद्रोहाला अपराध मानण्यास नकार देतात. यासंदर्भातील  कायदा नाहीसा करण्याची भाषा करतात. एकीकडे काँग्रेस देशप्रेम दाखवते आणि दुसरीकडे त्यांच्या फायद्याचे बोलते. चौकीदार आणि राजपुत्रात हाच फरक आहे,  असे त्या म्हणाल्या.

  • निर्णयक्षमता काय असते हे उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर दिसून आले. यापूर्वी मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला फक्त पत्र पाठवण्यात आले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

माहिती आयुक्तांविरोधातील तक्रारींच्या चौकशीसाठी कॅबिनेट सचिवांची समिती :
  • मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त यांच्याविरोधातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वाखाली समित्या नेमण्याचा प्रस्ताव केंद्राने मांडला असून त्यामुळे या माहिती आयुक्तांना पारदर्शक पद्धतीने काम करणे अवघड होणार आहे.

  • केंद्रीय माहिती आयोगाकडे हा प्रस्ताव कार्मिक व  प्रशिक्षण मंत्रालयाने पाठवला असून त्यावर आयोगाच्या २७ मार्चच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्या वेळी मुख्य माहिती आयुक्तांसह सात आयुक्त उपस्थित होते.

  • या बैठकीत माहिती आयुक्तांनी अशा समित्या नेमण्यास विरोध केला असून मुख्य माहिती आयुक्त सुधीर भार्गव यांनी सरकारला ठोस उत्तर द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सुधीर भार्गव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की माहिती आयोगाच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या मतांच्या आधारे एक अभिप्राय सरकारला पाठवला जाणार आहे. या बैठकीत काय चर्चा झाली व केंद्राच्या प्रस्तावावर नेमकी काय मते मांडली गेली, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

  • सरकारने मांडलेल्या प्रस्तावानुसार मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करण्याकरिता कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात यावी, माहिती आयुक्तांविरोधात जर तक्रारी असतील, तर त्याची दखल घेण्यासाठी कुठली यंत्रणा अस्तित्वात आहे, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली होती, त्याचा फायदा घेऊन सरकारने हा प्रस्ताव मांडला आहे. माहिती आयुक्तांविरोधातील तक्रारींची दखल घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा कुठलाही आदेश सर्वोच्च न्यायालयाने जारी केला नव्हता.

भारताच्या मिशन शक्तीमुळे अंतराळ स्थानकाला धोका :
  • वॉशिंग्टन : भारताने त्याच्या उपग्रहांपैकी एक पाडून टाकल्यामुळे त्याचे ४०० तुकडे निर्माण झाले व आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (आयएसएस) धोक्यात आणले, ही एक भयंकर बाब आहे, असे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने मंगळवारी म्हटले.

  • गेल्या आठवड्यात भारताने मिशन शक्तीद्वारे लो अर्थ आॅर्बिट उपग्रह यशस्वीपणे लक्ष्य करून पाडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांचे हे अभूतपूर्व यश असल्याचे व त्यामुळे भारत अंतराळात शक्तिमान देश बनल्याचे म्हटले होते.

  • भारताने गेल्या आठवड्यात उपग्रहविरोधी शस्त्रांच्या केलेल्या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले असल्याचे ब्रिडेन्स्टीन म्हणाले. सगळ्याच तुकड्यांचा शोध घेता येईल एवढे काही ते सर्व मोठे नाहीत. नासा सध्या १० सेंटिमीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या तुकड्यांचा शोध घेत आहे, असेही ते म्हणाले.

  • त्यांनी सांगितले की, आतापर्यंत ६० तुकडे शोधण्यात आले असून, त्यापैकी २४ तुकड्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला धोका निर्माण केलेला आहे. भारताने केलेल्या या एसॅट चाचणीविरुद्ध जाहीरपणे बोलणारे ब्रिडेन्स्टीन हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील पहिले वरिष्ठ अधिकारी आहेत. 

एकमेकांना मुर्ख बनविण्याची एप्रिल फूल प्रथा कधीपासून आली :
  • 1 एप्रिल ही तारीख लहानपणापासून आपल्या डोक्यात फिट बसली आहे. याचं कारणही तसेच आहे, एप्रिल फूल म्हणजे समोरच्याला मुर्ख बनवण्याचा हा दिवस. तसा हा दिवस नेहमीसारखाच. यात काही वेगळे नाही पण थोडीशी गंमत जोडली असते.

  • एरव्ही काही लोक एकमेकांना मूर्ख बनवताच पण हा खास ‘फुल’ म्हणजे मूर्खांचा दिवस म्हणूनच ओळखला जातो. एखाद्याला मुर्ख बनवले की ‘एप्रिल फुल डब्बा गुल’ म्हणत समोरच्याला चिडवले जाते. मात्र हा दिवस आला कुठून याचीही वेगळी गोष्ट आहे.

  • एप्रिल फुलबद्दल आतापर्यंत अनेक तर्कवितर्क लढवले जातात. १५८२ मध्ये पोप तेरावे ग्रेगरी यांनी रोमन कॅलेंडर आणलेमात्र त्याआधी सगळेच जण १ एप्रिलला नववर्ष साजरे करायचे पण पोपच्या नव्या दिनदर्शिकेने सारा घोळच झाला. या नव्या दिनदर्शिकेनुसार आता सगळ्यांनी १ एप्रिल ऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरं करावं असा आदेश काढण्यात आला.

  • रातोरात फर्मान काढून जर कोणी आपले सणच बदलले म्हणून अनेकांना ते रुचलं नाही, त्यामुळे लोकांनी याला कडाडून विरोध केला. काही असेही लोक होते ज्यांनी मात्र १ जानेवारीला नववर्ष साजरं करण्यास ठाम नकार दिला

  • आम्ही १ एप्रिललाच नववर्ष साजरं करू या निर्णयावर ते ठाम राहिले. त्यामुळे या सगळ्यांनाचा मुर्ख ठरवण्यात आले. तेव्हापासून १ एप्रिल हा दिवस मुर्खाचा दिवस म्हणजे ‘एप्रिल फुल’ डे साजरा करण्यात येऊ लागला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

  • १९७३: मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.

  • १९७५: बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव्ह हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.

  • २०००: आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

  • २०१०: ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.

  • २०१६: पनामा पेपर्स हे कायदेशीर दस्तऐवज प्रसिद्ध होऊन सुमारे २,१४,४८८ कंपन्याची गोपनीय माहिती उगढ झाली.

जन्म 

  • १७८१: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८३०)

  • १८८२: सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९२८)

  • १८९८: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लुस यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६७)

  • १९०३: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९८८)

  • १९०४: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९१)

  • १९३०: जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह यांचा जन्म.

  • १९३४: इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांचा जन्म.

  • १९५५: सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचा जन्म.

  • १९६५: पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)

मृत्यू 

  • १६८०: छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १६३०)

  • १८९१: फ्रेन्च गणिती एडवर्ड लूकास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८४२)

  • १९८१: पॅन अमेरिकन वर्ल्ड एरलाईन्स चे स्थापक जुआन त्रिप्प यांचे निधन.(जन्म: २७ जून १८९९)

  • १९८५: महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १८९३)

  • १९९८: इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९००)

  • २०१२: भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचे निधन. (जन्म: ५ मे १९१६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.