चालू घडामोडी - ०३ ऑगस्ट २०१८

Date : 3 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आयफोन बनवणारी ‘अॅपल’ कंपनी बनली जगातील १७७ देशांपेक्षाही श्रीमंत :
  • प्रसिद्ध मोबाईल ब्रॅन्ड आयफोन बनवणारी अॅपल कंपनी ही १ ट्रिलिअन डॉलर उलाढाल असलेली पहिली अमेरिकन लिस्टेड कंपनी बनली आहे. या एकट्या कंपनीचे उत्पन्न हे जगभरातील १७७ देशांच्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे.

  • भारतीय रुपयांमध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे ६८,६२० अब्ज रुपये इतकी आहे. यावरुन हे स्पष्ट हेते की, अॅपल कंपनीची उलाढाल भारतीय अर्थव्यवस्थेच्या ३८ टक्के हिश्याऐवढी आहे. कारण, नुकताच भारताचा जीडीपी २.६ ट्रिलिअन डॉलर इतका नोंदवला गेला आहे.

  • अॅपल कंपनी सध्या इतकी ताकदवान बनली आहे की, ती ३ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानसारख्या देशालाही सहज खरेदी करु शकते. त्याचबरोबर भारतातील दोन सर्वाधिक उत्पन्न असलेल्या कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रिज आणि टीसीएस या कंपन्यांपेक्षाही अॅपल १० पट मोठी कंपनी ठरली आहे. वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, जगातील १९३ देशांपैकी केवळ १६ देशच असे आहेत ज्यांचा जीडीपी हा अॅपलच्या बाजारमुल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच १७७ देशांपेक्षा श्रीमंत अॅपल कंपनी आहे. सध्या अॅपलची बाजार मुल्य हे इंडोनेशियाच्या जीडीपीबरोबर आहे.

  • या आर्थिक उलाढालीमुळे अॅपल कंपनीचा शेअर बाजारातील निर्देशांक २.८ टक्क्यांनी वढारला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या शेअर निर्देशांकात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • अॅपल कंपनीने मंगळवारीच आपल्या उत्पन्नाची घोषणा केली होती. त्यानंतर बुधवारी कंपनीच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. त्यानंतर यात गुरुवारी थोडी घट झाली मात्र, काही वेळातच पुन्हा यात वाढ झाली होती.

आंबेडकरांनंतर आता महात्मा गांधींच्या पुतळ्याचं ‘भगवाकरण’ :
  • पुतळ्यांना भगवा रंग लावायचा आणि ते ज्यांचे आहेत त्यांना हिंदुत्ववादी दाखवायचं हा प्रकार पुन्हा घडला असून यावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याला भगवा रंग लावण्याचा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळी हा भगवाकरणचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. याआधी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भगवा रंग लावण्याचा प्रकार उत्तर प्रदेशात घडला होता. भारतातल्या थोर व्यक्तिंचं बे भगवाकरण भाजपा करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

  • शहाजहानपूर जिल्ह्यातल्या घनश्यामपूर य़ेथील बांदा पोलिस ठाण्यात या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आली आहे. मेल टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार आज सकाळी ही घटना उघडकीस आली. हा अत्यंत हास्यास्पद प्रकार असल्याची प्रतिक्रिया सर्वेश कुमार नावाच्या ग्रामस्थानं व्यक्त केली आहे.

  • विशेष म्हणजे महात्मा गांधींचा हा पुतळा २० वर्ष जुना आहे. गांधींचा चश्मा व काठी काळ्या रंगात रंगवलेली होती तर बाकी सगळा पुतळा पांढऱ्या रंगाचा होता. परंतु, आता चश्मा सोडला तर आख्खा पुतळा भगवा करण्यात आला आहे असं कुमार यांनी सांगितलं.

  • दरम्यान, काँग्रेसने हे भाजपाचं कृत्य असल्याचं सांगत या प्रकाराला विरोध करणार असल्याचं म्हटलं आहे. हा प्रकार आज सकाळीच निदर्शनास आला असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

लोकसभा निवडणुका मतदानपत्रिकाद्वारे घ्या, १७ पक्षांची मागणी :
  • नवी दिल्ली : 2019 मधील लोकसभा निवडणुका मतदान पत्रिकांद्वारे घ्या, अशी मागणी देशातील 17 राजकीय पक्षांनी केली आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनमधील (ईव्हीएम) बिघाड आणि छेडछाडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली जात आहे.

  • मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या पक्षांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. मतपत्रिका म्हणजेच बॅलेट पेपरच्या वापराची मागणी करणाऱ्या पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचाही समावेश आहे.

  • समाजवादी पक्षाने यापूर्वी अनेक वेळा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली आहे. देशभरात गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकांदरम्यान इव्हीएममध्ये छेडछेड होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर बसप आणि सप या पक्षांनी ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला होता. पंजाबमधील निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही ईव्हीएममधील फेरफेराचा मुद्दा उपस्थित केला होता.

भारतीय वंशाच्या प्राध्यापकाचा 'गणिताच्या नोबेल'ने गौरव :
  • नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतलेले पण मूळचे भारतीय वंशाचे अक्षय व्यंकटेश यांचा गणिताचे नोबेल अशी ख्याती असणाऱ्या फिल्डस मेडलने गौरव करण्यात आला आहे. यावेळेस जगातील चार गणितींचा या पदकाने सन्मान केला गेला असून त्यामध्ये अक्षय यांचा समावेश आहे. हे पदक स्वीकारणाऱ्या अक्षय व्यंकटेश यांचे वय केवळ 36 वर्षे आहे. फिल्ड पदक मिळवणारे ते दुसरे ऑस्ट्रेलियन आहेत

  • अक्षय व्यंकटेश यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये झाला असून ते डायनामिक्स थिअरीमधील योगदानाबद्दल प्रसिद्ध आहेत. अक्षय दोन वर्षांचे असताना त्यांचे आई-वडिल पर्थमध्ये स्थायिक झाले. अगदी लहानपणापासून त्यांची विज्ञानक्षेत्रातील प्रगती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अगदी अल्पकाळामध्ये ते गणितातील संशोधक म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले.

  • वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापिठात वयाच्या 13 व्या वर्षीच प्रवेश मिळवणारे ते सर्वात लहान विद्यार्थी म्हणून ओळखले गेले. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी गणितामध्ये उत्तम गुणांसह पदवी संपादन केली. असे करणारे ते सर्वात कमी वयाचे विद्यार्थी होते. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी पी.एचडी पदवी संपादित केलीय त्यानंतर त्यांनी मॅसॅच्युसेटस इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजीमध्ये प्रवेश घेतला. तेथे संशोधनकार्य केल्यानंतर ते आता स्टॅनफर्ड विद्यापिठात प्राध्यापक आहेत. 

मीडियाच्या माध्यमातून भारतातल्या निवडणुकीत रशिया हस्तक्षेप करण्याची शक्यता- ऑक्सफर्ड तज्ज्ञ :
  • वॉशिंग्टन- भारतात होऊ घातलेल्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत रशिया हस्तक्षेप करण्याची शक्यता ऑक्सफर्ड तज्ज्ञांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे ऑक्सफर्ड तज्ज्ञांनी रशिया हस्तक्षेप करणार असल्याचा दावा अमेरिकी खासदारांसमोर केला आहे. भारत आणि ब्राझीलसारख्या देशांत येत्या काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत. मीडियाच्या माध्यमातून रशिया या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू शकते, असं ऑक्सफर्ड तज्ज्ञांचं मत आहे.

  • गेल्या काही दिवसांपूर्वी रशियानं अमेरिकेतल्या निवडणुकांमध्येही हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु त्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार खंडन केलं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक फिलीप एन. होवर्ड यांनी ''सोशल मीडियावर विदेशी प्रभाव'' या मुद्द्यावर सिनेटच्या एका गुप्त बैठकीत हा खुलासा केला आहे.

  • परंतु होवर्ड यांनी विस्तृत माहिती दिलेली नाही. निवडणुकीच्या काळात भारत आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये परिस्थिती गंभीर होऊ शकते. तिथे मीडिया हा अमेरिकेएवढा प्रभावी नाही. सिनेटर सुसान कोलिंस यांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल होवर्ड यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यावेळी त्यांनी भारत आणि ब्राझीलमध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मीडियाच्या माध्यमातून रशिया हस्तक्षेप करू शकतो.

  • जगभरात सर्वाधिक व्यावसायिक हा अमेरिकेचा मीडिया आहे. आमच्यासारख्या लोकशाही मानणा-या मित्र देशांमध्ये अनेक चिंता असू शकतात. रशियानं आम्हाला निशाणा बनवल्यानंतर आता ब्राझील आणि भारतासारख्या लोकशाही देशांना तो टार्गेट करत आहे. जिथे येत्या काही दिवसांत निवडणुका होणार आहेत. सिनेट कमिटीनं 2016मध्ये रशियानं अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये केलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला आहे. एफबीआयनंही रशियानं अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचं स्पष्ट केलं होतं.

जगात ३० कोटी नागरिक हिपॅटायटीसच्या विळख्यात :
  • मुंबई : विषाणूजन्य हिपॅटायटीस नकळतपणे झालेल्या जगातील ३० कोटी नागरिकांचा शोध लावून त्यांच्यावर उपचार करण्याचे उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यंदा ठरविले आहे. त्यासाठी डब्ल्यूएचओतर्फे आॅनलाइन स्वरूपात ‘हिपॅटायटीस’बद्दल माहिती देणारी जागतिक यंत्रणा सादर करण्यात येत आहे. डब्ल्यूएचओचे सदस्य देशांनी या यंत्रणेत माहिती भरल्यानंतर त्याचा वापर करून विषाणूजन्य हिपॅटायटीसविरोधात लढण्याचा निर्धार संघटनेने केला आहे.

  • २०३०पर्यंत जगातून ‘विषाणूजन्य हिपॅटायटीस’चे समूळ उच्चाटन करण्याचे डब्ल्यूएचओचे ध्येय आहे. तसेच देशभरातील ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांकडून विषाणूजन्य हिपॅटायटीसबद्दलची माहिती संकलित करण्याची यंत्रणाही डब्ल्यूएचओ विकसित करणार आहे. विषाणूजन्य हिपॅटायटीस हा जागतिक आरोग्याला असलेला मोठा धोका आहे. दरवर्षी या रोगामुळे १३ लाख ४० हजार नागरिकांचा मृत्यू होतो.

  • यकृत प्रत्यारोपण शल्य-चिकित्सक आणि हिपॅटायटीसमधील तज्ज्ञ डॉ. विक्रम राऊत यांनी सांगितले, हिपॅटायटीस बी व सी यांचे विषाणू शरीरात घेऊन फिरणाऱ्या ३० कोटी व्यक्ती शोधून काढणे गरजेचे आहे. या व्यक्तींना स्वत:लाही यकृताचे जीवघेणे आजार वा कर्करोग होण्याची शक्यता असते. तसेच काही वेळा त्यांच्या नकळत झालेल्या संसर्गामुळे इतर व्यक्तीही या आजारांना बळी पडू शकतात. सुरुवातीच्या काळात निदान झाले, तर हिपॅटायटीस बी व सी या दोन्ही आजारांवर उपचार होऊ शकतात. हिपॅटायटीस बी वर लस उपलब्ध असल्याने संबंधित व्यक्तीचा शोध घेत बरे करून या आजाराचे उच्चाटन करणे हे महत्त्वाचे आहे.

  • हिपॅटायटीसचे पाच प्रमुख प्रकार हिपॅटायटीसमध्ये यकृताला सूज येते व तेथे जळजळ होते. विषाणूजन्य हिपॅटायटीस हा प्रामुख्याने ए, बी, सी, डी आणि इ या पाच प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. यातील हिपॅटायटीस बी आणि सी यांमध्ये यकृताला गंभीर इजा होते व कर्करोगाने मनुष्य मृत्युमुखी पडतो. हिपॅटायटीस बी आणि सी यांच्यामुळे मनुष्य हळूहळू मृत्यूच्या दारात जातो, त्यामुळे त्यांना ‘सायलेंट किलर्स’ असेही म्हणतात.

  • याचे कारण, हिपॅटायटीस बी झालेले ९० टक्के रुग्ण व हिपॅटायटीस सी झालेले ८० टक्के रुग्ण यांना त्यांच्या शरीरात हे विषाणू असल्याचे समजतही नाही. माणसाच्या शरीरातील यकृत हे ८० टक्के निकामी झाले असले, तरी त्याचे कार्य चालूच राहते. त्याच्यातील २५ टक्के चांगल्या पेशी उरल्या असल्या, तरी ते पुनर्जन्म झाल्यासारखे पुन्हा नव्याने निर्माण होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९००: द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.

  • १९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.

  • १९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.

  • १९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.

  • १९६०: नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९९४: संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

  • १९९४: सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.

  • २०००: मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.

  • २००४: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

जन्म

  • १८८६: हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)

  • १८९८: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६)

  • १९००: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)

  • १९१६: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९७० – मुंबई)

  • १९२४: अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २००३)

  •  

मृत्यू

  • १९२९: फोनोग्राफ चे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५१)

  • १९३०: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८५४)

  • १९५७: पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०० – दरबान, दक्षिण अफ्रिका)

  • १९९३: अध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ मे १९१६)

  • २००७: लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन. (जन्म: १५ जून १९३३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.