चालू घडामोडी - ०३ डिसेंबर २०१८

Date : 3 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जी-२० परिषदेचे २०२२ मध्ये यजमानपद भारताकडे :
  • जी-२० देशांची परिषद २०२२ मध्ये भारतात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अर्जेटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्स येथे तेराव्या जी २० शिखर बैठकीवेळी ही घोषणा केली. त्यांनी भारताला यजमानपद दिल्याबद्दल इटलीचे अभिनंदन केले आहे. २०२२ मधील जी २० परिषदेचे यजमानपद इटली भूषवणार होता, पण भारताच्या विनंतीनुसार त्यांनी या परिषदेचे यजमानपद भारताला देऊ केले.

  • १४ वी जी २० परिषद जपानमध्ये तर पंधरावी सौदी अरेबियात होणार आहे. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असून हे वर्ष विशेष आहे, त्यामुळे सर्वानी वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे म्हणजे भारतात यावे. भारताचा संपन्न इतिहास, विविधता यांचा अनुभव घ्यावा, भारताचे आदरातिथ्यही बघावे असा संदेश समाजमाध्यमांद्वारे मोदी यांनी पाठवला होता.

  • जी २० देशांमध्ये अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपीय समुदाय, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्कस्थान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश होता.

  • जी २० देशांच्या अर्थव्यवस्थेत जगाचे ९० टक्के उत्पन्न सामावलेले असून, जागतिक व्यापाराचा ८० टक्के भाग या देशात आहे. जगाची दोनतृतीयांश लोकसंख्या या देशात राहते व जगातील निम्मा भूभाग या देशात आहे.

क्रिकेटपटूंचे गुरुकुल, प्रशिक्षकांचेही विद्यापीठ :
  • सचिन तेंडुलकर, प्रवीण अमरे, विनोद कांबळी, अमोल मुझुमदार यांच्यासारखे एकापेक्षा एक क्रिकेटपटू घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर सरांचे गुरुकुल सर्वश्रुत आहे. परंतु निष्णात प्रशिक्षकांचे विद्यापीठ म्हणूनसुद्धा त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठे योगदान आहे. मुंबईतील यशस्वी प्रशिक्षकांमध्ये आचरेकर यांच्या शिष्यांची गणना केली जाते.

  • सोमवारी वयाची ८६ वर्षे पूर्ण करणाऱ्या आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडणारे बलविंदर संधू, लालचंद रजपूत, चंद्रकांत पंडित, प्रवीण अमरे, सुलक्षण कुलकर्णी, पारस म्हांब्रे, समीर दिघे आणि विनायक सामंत यांनी मुंबईचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. यापैकी अनेकांनी मुंबईला रणजी विजेतेपदसुद्धा जिंकून दिले आहे. रजपूत सध्या झिम्बाब्वेचे प्रशिक्षक आहेत.

  • माजी क्रिकेटपटू पंडित यांनी गतवर्षी विदर्भाला प्रथमच रणजी जेतेपदाचा मान मिळवून देण्याची किमया साधली होती. अमरे यांनी आयपीएलमधील प्रशिक्षकपदासह अजिंक्य रहाणे, सुरेश रैना यांच्यासारख्या अनेक क्रिकेटपटूंना वैयक्तिक मार्गदर्शन केले आहे.

  • देशात आदर्श क्रीडापटू घडवण्याच्या उद्देशाने सचिन तेंडुलकरने तेंडुलकर-मिडलसेक्स ग्लोबल अकादमी सुरू केली. या उपक्रमात त्याच्यासोबत विनोद कांबळीसुद्धा मुलांना मार्गदर्शन करतो. मुझुमदार आगामी आयपीएल हंगामासाठी राजस्थान रॉयल्सचा फलंदाजीचा प्रशिक्षक असणार आहे. रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, सिद्धेश लाड यांना घडवणाऱ्या दिनेश लाड यांच्यासह भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक रमेश पोवार हेसुद्धा आचरेकर यांचे शिष्य आहेत.

किम जोंग उन यांच्यासमवेत पुढील वर्षांच्या सुरुवातीला बैठक :
  • उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी दुसरी शिखर बैठक २०१९च्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीत घेतली जाईल, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. वॉशिंग्टनला परत जाताना त्यांनी एअर फोर्स वन विमानात वार्ताहरांना सांगितले, की या शिखर बैठकीसाठी तीन ठिकाणे विचाराधीन आहेत.

  • जूनमध्ये सिंगापूर येथे किम व ट्रम्प यांच्यात झालेली शिखर बैठक अपयशी ठरली होती. आता पुढील बैठकीबाबत विचारले असता ते म्हणाले, की जानेवारी किंवा फेब्रुवारीत अशी बैठक होईल.

  • किम यांना अमेरिकेत येऊ देणार का या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की कुठल्यातरी वळणावर ती वेळ येईल. जूनमध्ये ट्रम्प व किम यांच्यात चर्चा झाली होती. त्या वेळी अतिशय ढिसाळ भाषेतील मसुद्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

  • उत्तर कोरियाने अण्वस्त्रे नष्ट करण्याची अमेरिकेची प्रमुख मागणी असून त्यावर कुठले ठोस आश्वासन देण्यात आले नव्हते. उत्तर कोरियाने नंतर अणू व क्षेपणास्त्र कार्यक्रम बंद केल्याचे जाहीर केले होते. पण नंतर ते खोटे असल्याचे निष्पन्न झाले.

दिग्गजांना १२८ वर्षात जमलं नाही, बांगलादेशने करुन दाखवलं :
  • ढाका : क्रिकेटच्या इतिहासात गेल्या 128 वर्षात कोणत्याही संघाला जमला नाही. असा विक्रम बांगलादेशच्या संघाने केला आहे. ढाका येथे सध्या बंगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

  • बांगलादेशचा फलंदाज मोहमदुल्लाह रियादच्या 136 धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने 508 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यावेळी बांगलादेशच्या फिरकीपटुंनी विक्रम रचला.

  • फिरकीपटू मेहदी हसन याने 36 धावा देत विंडिजचे 3 फलंदाज टिपले तर शाकिब अल हसन याने 15 धावा देत दोन फलंदाज टिपले. हसन आणि शाकिबने विंडिजच्या पाचही फलंदाजांचा त्रिफळा उडवला. क्रेग ब्रॅथवेट, केरॉन पॉवेल, सुनिल अँब्रिस, रोस्टन चेस, शाय होप हे पाचही फलंदाज त्रिफळाचित झाले आहेत.

  • संघाच्या पहिल्या पाचही फलंदाजांचा त्रिफळा उडवण्याचा विक्रम बांगलादेशने केला आहे. क्रिकेटमध्ये असा विक्रम आतापर्यंत केवळ तीन वेळा झाला आहे. 1890 साली असा विक्रम झाला होता. त्यावेळी पहिले पाचही फलंदाज त्रिफळाचित झाले होते. त्याच्याही काही वर्षे आधी असा रेकॉर्ड इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेटमध्ये झाला होता. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या 128 असा विक्रम कोणत्याही संघाला करता आला नाही.

नाशिकचा किसन तडवी महामॅरेथॉन विजेता :
  • नाशिक : विंटोजिनो प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉन सहप्रायोजक एकता वर्ल्ड आणि अशोका यांच्या सहकार्याने आयोजित सर्वांत मोठ्या लोकमत हाफमहामॅरेथॉन स्पर्धेत नाशिकचा किसन तडवी विजेता ठरला. एक तास नऊ मिनिटे आणि १२ सेकंदांची वेळ नोंदवत त्याने विजेतेपद पटकाविले, तर महिलांमधील नगरची पूजा राठोड प्रथम आली. दहा किलोमीटरमध्ये पुरुषांमध्ये गणेशगावचा दिनकर लिलके, तर महिलांमध्ये लातूरची पूजा श्रीडोळे विजेती ठरली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिकांसह चषक प्रदान करण्यात आला.

  • गोल्फ क्लब मैदान येथून या महामॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी महापौर रंजना भानसी, लोकमत महामॅरेथॉनच्या संयोजिका रुचिरा दर्डा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, विंटोजिनोचे एमडी प्रकाश उपाध्याय, एकता वर्ल्डचे प्रेसिडेंट (ब्रँड अँड कम्युनिकेशन) एम. विकास, अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारिया, अशोकाचे प्रोजेक्ट डायरेक्टर आणि सीईओ संजय लोंढे, संदीप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन. रामचंद्रन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

  • सकाळी ६.१५ वाजता २१ किलोमीटरच्या हाफमहामॅरेथॉनला मान्यवरांनी झेंडा दाखविला आणि धावपटूंनी २१ किलोमीटरसाठी धाव घेतली. गोल्फ क्लब ते हॉटेल संस्कृतीपर्यंत असलेल्या हाफमहामॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी धावपटूंचे विविध कलापथके आणि शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत केले.

  • अत्यंत उत्साहवर्धक आणि रंगारंग सोहळ्यात धावपटूंनी आंतरराष्टÑीय दर्जाच्या मॅरेथॉनमध्ये धावण्याचा अनुभव घेतला. १० किलोमीटर रनला सकाळी ६.३० वाजता सुरुवात झाली, तर त्यानंतर ६.४५ वाजता ५ व ६.५५ वाजता ३ किलोमीटरसाठी नाशिककरांनी धाव घेतली.

  • व्यावसायिक धावपटू, नियमित सराव करणारे खेळाडू, तसेच आरोग्यविषयक जागरूक असलेले, तसेच ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि असंख्य बालकांनी जल्लोष करीत लोकमत महामॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला.

१ जानेवारीपासून नवीन शुल्क नाही; अमेरिका व चीन यांच्यात झाली सहमती :
  • ब्यूनस आयर्स : १ जानेवारीपासून नवे शुल्क आकारण्यात येणार नाहीत, यावर अमेरिका व चीन यांनी सहमती दर्शविली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे समकक्ष शी जिनपिंग यांच्यात ही सहमती झाली आहे.

  • अमेरिका चीनवर २०० अब्ज डॉलरचे नवे शुल्क आकारण्याच्या विचारात असताना ही सहमती झाली आहे. ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार लॅरी कुडलो यांनी ही बैठक सकारात्मक झाल्याचे म्हटले. या नेत्यांमधील सहमतीमुळे उभय देशातील संघर्ष रोखण्यास मदत होणार आहे.

  • अमेरिका १ जानेवारीपासून चीनी वस्तूंवर २५ टक्के शुल्क आकारणार होता. मात्र, नव्या सहमतीमुळे नवे दर अंमलात येणार नाहीत. ट्रम्प म्हणाले की, अमेरिका व चीन दोघांसाठीही अमर्याद संधी यामुळे निर्माण झाल्या आहेत.

पाकिस्तानी विदेशमंत्र्यांच्या वक्तव्याचा सुषमा स्वराज यांच्याकडून समाचार :
  • नवी दिल्ली : भारताच्या विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या गुगलीवाल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. कुरेशींच्या वक्तव्याने पाकिस्तानची पोलखोल झाली आहे, असे ट्वीटद्वारे सुषमा स्वराज म्हणाल्या. भारत करतारपूर कॉरीडोर मुद्द्यावर इमरान खानच्या गुगलीत अडकला आहे, असे वक्तव्य कुरेशी यांनी केले होते.

  • कुरेशींच्या या वक्तव्याचा सुषमा स्वराज यांनी ट्वीटरवरुन खरपूस समाचार घेतला आहे. कुरेशींच्या वक्तव्याने पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. त्यांच्या वक्तव्याने हे स्पष्ट होत आहे की, इमरान खान यांना शिखांच्या भावनेचा आदर नाही, असे ट्वीट स्वराज यांनी केले आहे. तुम्ही फक्त गुगलीच टाका मात्र आम्ही त्यात फसणार नाही. आमचे दोन मंत्री करतारपुरला गेले होते, असेही त्या म्हणाल्या.

  • सुषमा स्वराज यांना करतारपूर कॉरीडोरच्या कोनशीला अनावरण कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र सुषमा स्वराज यांनी आजाराचे आणि व्यस्त कार्यक्रमाचे कारण सांगून कार्यक्रमाला जाण्यास नकार देत हरसिमरत कौर बादल आणि एच. एस. पुरी या दोन मंत्र्यांना पाठवले होते. या कार्यक्रमासाठी कॉंग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिध्दू देखील गेले होते.

  • करतारपूर साहिबचे महत्व - पाकिस्तानच्या नरोवार जिल्ह्यातील करतारपुरमध्ये शिखांचे पवित्र धर्मस्थळ आहे. करतारपुरमध्ये शीख समुदायचे पहिले धर्मगुरू गुरुनानक 18 वर्षे राहिले होते. तसेच या गावातच त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांची समाधीही करतारपुरमध्येच आहे. पहिल्यांदा लंगरला सुरुवातही येथूनच झाली होती. म्हणून करतारपूर साहिब या धर्मास्थळाला विशेष महत्व प्राप्त आहे. शिवाय हे गाव भारताच्या सीमेपासून 4 किमी लांब आहे.

दिनविशेष :
  • जागतिक अपंग दिन

महत्वाच्या घटना 

  • १७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.

  • १८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.

  • १८७०: बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.

  • १९२७: लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.

  • १९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

  • १९९४: जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.

जन्म 

  • १७७६: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर१८११)

  • १८८२: जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १९६६)

  • १८८४: भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३)

  • १८८९: मुझफ्फरनगर बॉम्बस्पोटातील क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८)

  • १८९२: कवी माधव केशव काटदरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ सप्टेंबर १९५८)

  • १८९४: भारतीय वकील आणि राजकारणी दिवा जिवरतीनम यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९७५)

  • १९३७: मैथिली लेखक विनोद बिहारी वर्मा यांचा जन्म.

  • १९४२: एमा मॅगझीनच्या संस्थापीका अॅलिस श्वार्झर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५५२: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १५०६ – झेविअर, स्पेन)

  • १८८८: ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते कार्ल झैस यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८१६)

  • १८९४: इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)

  • १९५१: कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)

  • १९५६: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १९ मे १९०८)

  • १९७९: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९०५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.