चालू घडामोडी - ०३ फेब्रुवारी २०१९

Date : 3 February, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऋषी कुमार शुक्ला सीबीआयचे नवे संचालक :
  • नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऋषी शुक्ला 1983 बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. दोन वर्षांसाठी त्यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • ऋषी शुक्ला यांनी मध्ये प्रदेशच्या पोलीस महासंचालकपदाचा कारभारही पाहिला आहे. शुक्रवारी सीबीआय संचालक निवड समितीची बैठक पार पडली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली. मात्र अखेर ऋषी शुक्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

  • आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोन अधिकाऱ्यांमधील वादानंतर सीबीआयच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थिती सीबीआयची विश्वासार्हता पुन्हा निर्माण करण्याचं आव्हान शुक्ला यांच्यासमोर असणार आहे.

  • सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्यावर राकेश अस्थाना यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांना संचालक पदावरुन हटवून त्यांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली होती. त्यामुळे गेले काही दिवस सीबीआयचं संचालक पद रिक्त होतं.

सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी, सातव्या वेतन आयोगासह महागाई भत्ता :
  • मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना काढल्यानंतर त्यावर 9 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

  • अधिसूचनेनुसार फेब्रुवारीच्या वेतनापासून सुधारित वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर जानेवारीच्या वेतनातील थकबाकीही दिली जाणार आहे. आता केंद्राप्रमाणे वाहतूक भत्त्याच्या निर्णयाची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्याबाबतचा आदेशही लवकरच निघण्याची शक्यता आहे.

  • राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याचा आणि 1 जानेवारी 2019 पासून त्याचा प्रत्यक्ष लाक्ष देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु त्यासंबंधीची अधिसूचना निघायला उशीर झाल्याने जानेवारीच्या वेतनापासून सातव्या आयोगाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळू शकला नाही. मात्र 30 जानेवारीला वित्त विभागाने अधिसूचना काढली. त्यानुसार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अधिकृतपणे लागू झाला आहे.

  • अधिसूचना उशिरा निघाल्यामुळे जुन्या पद्धतीनेच म्हणजे सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच जानेवारीचे वेतन दिले गेले.  फेब्रुवारीच्या महिन्यांपासून सर्वच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन मिळेल, तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनाही सुधारित निवृत्तीवेतन मिळेल.

‘सिमी’वरील बंदीला पाच वर्षे मुदतवाढ :
  • देशामध्ये छुप्या पद्धतीने घातपाती कारवाया केल्याबद्दल स्टुडण्ट इस्लामिक मूव्हमेण्ट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेवरील बंदीची मुदत आणखी पाच वर्षांनी वाढविण्यात आली आहे.

  • सिमीकडून देशाला धोका असल्याने बंदीचा कालावधी वाढविण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी २०१४ मध्येही सिमीवरील बंदीचा कालावधी वाढविण्यात आला होता. सदर संघटना देशासाठी भविष्यातही घातक ठरू शकते, संघटनेमुळे देशाच्या समता आणि एकात्मतेला बाधा निर्माण होऊ शकते, त्यामुळे बंदी वाढविण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

  • सिमीविरोधात देशामध्ये ५८ नवे गुन्हे दाखल झाल्याची दखल घेत बंदी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदीचा कालावधी ३१ जानेवारी २०१९ रोजी संपला, बंदी उठवावी की कालावधी वाढवावा यासाठी केंद्राने सर्व राज्यांकडून मते मागविली होती. त्यानंतर १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सिमीवर बंदी घालण्याचे मत नोंदविले.

  • मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, तेलंगण आणि केरळ पोलिसांनी सिमीचा नेता सफदर नागोरी, अबू फैजल आणि अन्य दोषींविरोधातील तपशीलही केंद्राकडे सोपविला. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून सिमीवर २०११ मध्ये बंदी घालण्यात आली होती, असे सांगण्यात आले.

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचे अध्यक्ष ट्रम्प यांचे संकेत :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेत अवैधरीत्या घुसणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी देशाच्या दक्षिण मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याच्या जवळ पोहोचलो आहोत, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

  • राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर काँग्रेसच्या मंजुरीशिवाय भिंत उभारण्याच्या दिशेने ट्रम्प पावले उचलू शकतील. आपत्कालीन निधी दक्षिण मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी खर्च करण्याचे अधिकार त्यांना मिळतील.

  • ट्रम्प यांनी सांगितले की, सीमा सुरक्षेवर विरोधक डेमोक्रॅटिकसोबत चर्चा म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. अमेरिकी प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नैंसी पेलोसी यांच्यावर त्यांनी आडमुठी भूमिका घेतल्याचा आरोपही केला. 

पर्यावरण अभ्यासक निलिशा देसाई यांचे कोल्हापुरात निधन :
  • कोल्हापूर :  पर्यावरण अभ्यासक डॉ. निलिशा प्रकाश देसाई (वय ३२)यांचे रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता आणि समावेशक केंद्र येथे सहायक संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या', पर्यावरण शास्त्र विषयातील संशोधक म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या पार्थिवावर सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  • स्टडी ऑन काँझर्वेशन ऑफ आर्रबन विल्डरनेस :कोल्हापूर सिटी असा संशोधन प्रबंध त्यांनी आपल्या पीएचडीसाठी लिहिला होता.

  • कोल्हापूर महानगरपालिकेच्या जैव विविधता समितीच्या त्या सदस्य होत्या. नदी-तलावांचे प्रदूषण,वायू प्रदूषण, पश्चिम घाट अश्या विषयात त्या प्रबोधन आणि संशोधन कामात सक्रिय होत्या.

  • पर्यावरण सद्यस्थिती अहवाल,कृष्णा नदीच्या प्रदूषण रोखण्यासाठी तयार केलेल्या केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवाल निर्मितीमध्ये त्याचा सहभाग होता. वनस्पती व पक्षी निरीक्षण आणि पर्यावरण अभ्यासात त्या सतत कार्यरत  व पर्यावरण विषयक अनेक प्रश्नांशी संबधित मित्र,इन्व्हायरो लीगल फोरम यासह अन्य सामाजिक संस्थाच्या कामात त्याचा  सक्रिय सहभाग होता.अनेक वृत्तपत्र लेख, शोधनिबंध, वृत्तपत्र लेख, शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करून त्यानी पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे काम केले होते.

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबादचे ७ खेळाडू महाराष्ट्राच्या संघात :
  • औरंगाबाद : आसाम येथे आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील सात खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

  • त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार, अभय शिंदे, तुषार आहेर, सय्यद इर्शाद, हर्षदा वडते, कशीस भराड, वैदेही लोहिया यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू उद्या, रविवारी प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करणार आहेत.

  • या संघासोबत मार्गदर्शक म्हणून शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त स्वप्नील तांगडे गेले आहेत. या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष एस.पी. जवळकर, सचिव दिनेश वंजारे, मंजू खंडेलवाल, अजय त्रिभुवन, सागर मगरे, संजय भूमकर, राकेश खैरनार, मच्छिंद्र राठोड आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

  • १८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.

  • १९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.

  • १९२८: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.

  • १९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.

जन्म 

  • १८२१: वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल  यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९१०)

  • १८३०: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९०३)

  • १८८७: स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रिन यांचा जन्म.

  • १९००: रसायनशास्त्रज्ञ तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५)

  • १९६३: भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १४६८: जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन.

  • १८३२: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (जन्म: ७ सप्टेंबर १७९१)

  • १९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८५६)

  • १९६९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०९).

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.