चालू घडामोडी - ०३ जानेवारी २०१९

Date : 3 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लोकसभा अध्यक्षांची कठोर कारवाई, २६ खासदारांचं निलंबन :
  • नवी दिल्ली : लोकसभेत मोकळ्या जागेत गोंधळ घालणाऱ्या 26 खासदारांवर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बुधवारी कठोर कारवाई केली. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण केल्याप्रकरणी सुमित्रा महाजन यांनी एआयएडीएमकेच्या 26 खासदारांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं आहे.

  • कावेरी पाणी वाटपावरुन एआयएडीएमकेचे खासदार गोंधळ करत होते. लोकसभेत बुधवारी राफेल विमान कराराच्या मुद्द्यावर चर्चा सुरु होती. यादरम्यान अन्नाद्रमुक पक्षाचा एक खासदार सभागृहाच्या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या खुर्चीवर उभं राहून घोषणाबाजी करत होता. तर पक्षाचे इतर सदस्य कागदाची फाडून फेकत होते. यानंतर सभागृहाचं कामकाज सुमारे 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

  • पाच वाजता कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी वारंवार खासदरांना शांततेचं आवाहन केलं आणि कारवाईचा इशाराही दिला. मात्र त्यांचा गोंधळ सुरुच असल्याने 174 (अ) या नियमाअंतर्गत 26 खासदारांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

  • आता निवडणुका जवळ येत आहेत. भाजपाला कर्नाटकात काही जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी मेकेदातू धरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. विरोध करणं हा आमचा लोकशाही अधिकार आहे, सरकारकडून आमच्या प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीत, असं एआयएडीएमकेचे खासदार एम. थंबीदुराई म्हणाले.

विजया, देना आणि बँक ऑफ बडोदाचं विलिनीकरण होणार :
  • नवी दिल्ली : विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकांच्या विलिनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. देशातील बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन बँकांचं मर्जर होणार आहे. एक एप्रिलपासून हे विलिनीकरण लागू होणार आहे.

  • मर्जरनंतर बँकेची उलाढाल 14.82 लाख कोटींच्या घरात जाईल. नव्याने विलीन झालेली ही बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (एसबीआय) नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून अस्तित्वात येईल.

  • या विलिनीकरणाचा प्रभाव कर्मचाऱ्यांवर होणार नाही. मात्र तिन्ही बँकांच्या बॅलन्स शीटवर याचा प्रभाव पडणार आहेच, शिवाय तुमचं खातं या तीनपैकी एखाद्या बँकेत असेल, तर तुम्हीसुद्धा प्रभावित होणार आहात.

  • ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तुम्हाला नवीन खाते क्रमांक (अकाऊण्ट नंबर) आणि कस्टमर आयडी मिळण्याची शक्यता आहे. तुमचा ईमेल आयडी आणि फोन नंबर अपडेटेड असल्यास, कोणत्याही बदलाची सूचना तुम्हाला तात्काळ मिळेल.

  • समजा तुमचं खातं देना आणि विजया या दोन्ही बँकांमध्ये असेल, तर तुमचे खाते क्रमांक वेगवेगळे असतील, मात्र एकच कस्टमर आयडी मिळेल. ज्यांना नवीन कस्टमर आयडी किंवा IFSC कोड मिळतील, त्यांना इन्कम टॅक्स, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, एनपीएस यासारख्या थर्ड पार्टीसोबत ते अपडेट करावे लागतील.

  • देना, विजया आणि बँक ऑफ बडोदाच्या काही स्थानिक शाखा बंद होऊ शकतात. त्यानंतर तुमचं खातं दुसऱ्या जवळच्या शाखेत वर्गीकृत करण्यात येईल.

सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन :
  • मुंबई : क्रिकेटचे भीष्माचार्य आणि सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं. ह्रदयविकाराच्या धक्क्याने आचरेकर सरांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • रमाकांत आचरेकरांना आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास राहत्या घरातच ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

  • रमाकांत आचरेकरांना पद्मश्री, द्रोणाचार्य यासारख्या पुरस्कारांनी केंद्र सरकारने सन्मानित केलं होतं. रमाकांत आचरेकर हे विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांचे गुरु होते. शिवाजी पार्क ही त्यांची कर्मभूमी होती.

‘आधार’ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर :
  • कोणावरही आधार क्रमांकासाठी सक्ती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत आधारविषयक सुधारणा विधेयक सादर केले. या विधेयकानुसार टेलिफोन कंपनी वा बँकांना ग्राहकांना स्वत:हून आधारचे प्रमाणीकरण करता येईल.

  • केंद्रीय रविशंकर प्रसाद यांनी विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देताना स्पषट केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी सुसंगत सुधारणा विधेयकात केल्या असल्यामुळे नागरिकांच्या खासगी हक्कांवर गदा येणार नाही. आधारच्या प्रमाणीकरणाची सक्ती कोणावरही केली जाणार नाही. शिवाय, आधारमधील माहिती उघड केली जात नाही. माहितीच्या गोपनीयतेची काळजी घेतली जात असल्याचे न्यायालयानेही मान्य केले आहे.

  • आधारची माहिती अत्यंत सुरक्षित असल्याचा दावा प्रसाद यांनी केला. आधारमुळे थेट रोख रक्कम लाभार्थीना देणे शक्य झाले असून त्यामुळे सरकारचे ९६ हजार कोटी रुपये वाचले आहेत. आधार योजना जागतिक बँक तसेच आंतरराष्ट्रीय नाणनिधीनेही वाखाणली आहे. ज्या नागरिकांना आधार क्रमांक उघड करायचा नसेल त्यांना पर्यायी क्रमांक देण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे खासगी हक्क अबाधित राहू शकेल. शिवाय, या प्रक्रियेवर सरकारचे नियंत्रण राहणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले. आधारची माहिती सुरक्षित राहावी या दृष्टीने माहिती सुरक्षा विधेयकही लवकरात लवकर संसदेत मांडले जाणार असल्याची माहितीही प्रसाद यांनी दिली.

  • सुधारित विधेयकावर तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, काँग्रेसचे शशी थरूर आणि प्रेमचंद्रन यांनी आक्षेप घेतला. या विधेयकात नागरिकांच्या खासगी हक्कांचे संरक्षण होत नाही. खासगी कंपनी लोकांची माहिती गोळा करू शकते आणि परस्पर आर्थिक गैरव्यवहारही होण्याचा धोका आहे, असे रॉय म्हणाले.

रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्काराचे उद्या वितरण :
  • तामिळनाडूतील समुद्र किनाऱ्यावरील वाळूउपशाचा प्रश्न, पंजाबमधील महिला क्रिकेटपटूंच्या मनात रुजत असलेली महत्त्वाकांक्षेची बीजे, आपल्या शहरांच्या स्वच्छतेचा वसा घेतलेल्या कामगारांचं जिणं आणि त्यांच्या जीवनाची अखेर.. या आणि अशाच काही  मुद्दय़ांना निर्भीड स्पर्श करणाऱ्या बातम्या आणि छायाचित्रं यांचा १३व्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ या पत्रकारितेतील प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने नवी दिल्लीत शुक्रवारी, ४ जानेवारीला गौरव केला जाणार आहे.

  • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्याहस्ते देशभरातील वर्तमानपत्रे, नियतकालिके, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांतील १८ विविध गटांत २०१७मध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या २९ पत्रकारांचा गौरव केला जाईल.

  • यावर्षी ‘मी टू’ ही लैंगिक शोषणाविरोधातील चळवळ भारतीय माध्यमांतील बातम्या आणि लेखांच्या केंद्रस्थानी आली होती. वृत्तसृष्टीतील महिलांनीही प्रथमच व्यक्त होत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली होती आणि त्यामुळे एका केंद्रीय मंत्र्यावर पदत्यागाची वेळ आली. त्यामुळे ही चळवळ समजून घेण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी संपादकांची काय जबाबदारी आहे, याबाबत दिशादर्शन करण्यासाठी या समारंभात पुरस्कार वितरणानंतर खास परिसंवाद होणार आहे. ‘मीटू इन द न्यूजरूम : व्हॉट एडिटर्स कॅन अ‍ॅण्ड शुड डू’ या शीर्षकाच्या या परिसंवादात चार महिला संपादकांचा सहभाग लक्षणीय ठरणारा आहे.

  • त्यात ‘द न्यूज मिनट’ या डिजिटल ब्लॉगच्या सहसंस्थापक आणि मुख्य संपादिका धन्या राजेंद्रन, मुंबई मिरर वृत्तपत्राच्या संपादिका मिनल बाघेल, ‘द क्विन्ट’च्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितू कपूर आणि ‘बीबीसी वर्ल्ड सव्‍‌र्हिस’च्या भारतीय भाषक आवृत्तीच्या प्रमुख रुपा झा यांचा समावेश आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या सहायक संपादिका सीमा चिश्ती सूत्रसंचालन करतील. परिसंवादाच्या अखेरीस प्रश्नोत्तराचाही कार्यक्रम होईल.

नववर्षदिनी जगभरात ३ लाख ९५ हजार बालकांचा जन्म :
  • नववर्षांच्या पहिल्याच दिवशी जगात ३९५००० बालके जन्माला आली असून भारतात सर्वात जास्त म्हणजे सत्तर हजार बालकांचा जन्म झाला आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधी संस्थेने म्हटले आहे.

  • २०१९ हे वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगात ३९५०७२ बालके जन्माला आली. त्यातील निम्मी बालके भारत,चीन, पाकिस्तान, अमेरिका व  बांगलादेशात जन्माला आली आहे. भारत- ६९९४४, नायजेरिया- २५६८५, पाकिस्तान १५११२, इंडोनेशिया १३५२६, अमेरिका ११०८६, काँगो १००५३, बांगलादेश ८४२३ या प्रमाणे बालकांचा जन्म  झाला.  मध्यरात्री बाराच्या ठोक्याला सिडनी- १६८, टोकियो- ३१०, बीजिंग- ६०५, माद्रिद- १६६ व न्यूयॉर्क ३१७ याप्रमाणे बालकांचा जन्म झाला. फिजीत पहिले बाळ जन्माला आले तर नंतर अमेरिकेत शेवटचे बाळ जन्मले. जग नववर्षांत प्रवेश करत असताना नवजात बालकांचे आरोग्य हक्क महत्त्वाचे मानले जात आहेत.

  • युनिसेफच्या उपकार्यकारी संचालिका पेट्री गोर्निटझका यांनी सांगितले की, बालकांच्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे.  युनिसेफच्या मते २०१७ मध्ये १० लाख बालके जन्माच्या दिवशीच मरण पावली तर २५ लाख बालके त्यांच्या आयुष्यातील पहिला महिनाही पूर्ण करू शकली नाहीत. यातील अनेक बालकांचे आजार हे टाळण्यासारख ेहोते. त्यात न्यूमोनियाचे प्रमाण जास्त आहे.

  • स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये गुंतवणूक केली तर बालकांचे प्राण वाचू शकतात. बालहक्कांच्या जाहीरनाम्याचा तिसावा वर्धापन दिनही २०१९ मध्ये साजरा होत आहे. तीन दशकांत जगात  बालकांच्या मृत्यूत घट झाली आहे पण ती फार मंद आहे. पहिल्या महिन्यात मरण पावणाऱ्या बालकांची संख्या ही एकूण पाच वर्षांत मरणाऱ्या मुलात ४७ टक्के आहेत.

माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन :
  • नागपूर : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, व्यासंगी लेख, प्रभावी वक्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे बुधवारी रात्री १ वाजता निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. हृदयविकाराचा धक्का आल्यामुळे त्यांच्यावर एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यापश्चात दोन मुले सत्यरंजन (न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय) व आशुतोष (ज्येष्ठ वकील), एक मुलगी अरुणा पाटील आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे पार्थिव आज सकाळी १० वाजता भोले पेट्रोल पंपाजवळील विनोबा विचार केंद्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, त्यानंतर ४ च्या सुमारास अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

  • न्यायदानाच्या क्षेत्रात असतानाही विधायक राजकारणाविषयी वाटणारी कळकळ, सुधारणावादी असूनही संस्कृती व मूल्ये यांच्याविषयीचा अभिमान, काळाबरोबर बदलण्याची क्षमता असूनही गांधी विचारांवर श्रद्धा, ज्ञानवंतअसूनही सर्वज्ञतेच्या ऐटीपासून दुरावा, कायद्याच्या क्लिष्ट विषयात गढून गेले असतानाही सभा - संमेलने, व्याख्याने, परिचर्चा यासारख्या कार्यक्रमात भाग घेण्याची वृत्ती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबत सामाजिक बांधिलकीचे भान यासारख्या विविध पैलूंनी न्या. धर्माधिकारी यांचे आयुष्य समृद्ध आणि संपन्न होते.

  • न्या. धर्माधिकारी सर्वोदयी कार्यकर्ते होते. लहाणपणीच मनावर झालेले गांधीवादी विचारांचे संस्कार त्यांनी अंतिम श्वासापर्यंत जपले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक सेवेत वाहून घेतले होते. वर्धा येथील नवभारत विद्यालयात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजनागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबी पदवी प्राप्त केली. २५ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांना सनद मिळाली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय केला. 

  • न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत म्हणून २० नोव्हेंबर १९८९ पर्यंत तब्बल १७ वर्षे न्यायदानाचे कार्य केले. दरम्यान, ते काही दिवस प्रभारी मुख्य न्यायमूर्ती होते. त्यांनी महिला, आदिवासी, लहान मुले, मनोरुग्ण, बंदिवान आदींच्या मूलभूत अधिकारांवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले.

दिनविशेष :
  • बालिकादिन / अॅक्युपेशन थेरेपी दिन

महत्वाच्या घटना 

  • १४९६: लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.

  • १९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.

  • १९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.

  • १९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.

  • १९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.

  • १९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.

  • २००४: नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.

जन्म 

  • १८३१ : पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च१८९७)

  • १८८३: इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांचा जन्म. (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)

  • १९३१: मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

मृत्यू 

  • १९७५: भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी ललित नारायण मिश्रा यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९२३)

  • १९९४: मराठी बालकुमार लेखक अमरेंद्र गाडगीळ यांचे निधन.

  • १९९८: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)

  • २०००: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री सुशीला नायर यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)

  • २००२: भारीतय अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.