चालू घडामोडी - ०३ जुलै २०१८

Date : 3 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मदनलाल यांचा पराभव करत रजत शर्मा डीडीसीएचे नवे अध्यक्ष :
  • नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा हे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बहुमताने निवडून आले आहेत. रजत शर्मा यांनी माजी क्रिकेटपटू मदनलाल यांना पराभूत करुन आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली.

  • शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. रजत शर्मा यांच्या पॅनेलने बारापैकी बारा जागा जिंकल्या. त्यापैकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रजत शर्मा यांनी भारताचे माजी कसोटीपटू मदनलाल यांचा 527 मतांनी पराभव केला. शर्मा यांना 1531, मदनलाल यांना 1004 आणि विकास सिंह यांना 232 मतं मिळाली.

  • शर्मा आणि त्यांच्या पॅनेलचा निर्विवाद विजय हा बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सीके खन्ना आणि त्यांच्या गटाला धक्का मानला जात आहे. कारण उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राकेश बंसल यांनी सीके खन्ना यांच्या पत्नी शशी यांचा 278 मतांनी पराभव केला. राकेश बंसल यांना 1364 मतं मिळाली तर शशी खन्ना यांना 1086 मतं मिळवता आली.

  • राकेश बंसल हे डीडीसीएचे माजी अध्यक्ष स्नेह बंसल यांचे धाकटे बंधू आहेत. या पराभवासोबत डीडीसीएमध्ये सीके खन्ना यांचा मार्ग बंद झाला आहे. सुमारे तीन दशकांपासून त्यांचं डीडीसीएवर वर्चस्व होतं.

बाबासाहेबांचे लंडनमधील स्मारक युवकांचे प्रेरणास्थान - विजय दर्डा, देशमुख, भन्साळी यांची आदरांजली :
  • लंडन : ‘मला आज परमपूज्य बाबासाहेबांच्या लंडनमधील निवासस्थानाचे दर्शन घेता आले, हे मी माझे सौभाग्य समजतो. बाबासाहेबांविना हा देश, हा समाज कसा असता? विचार करा!’ अशा भावना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी लंडनच्या १०, किंग्ज हेन्री रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट दिल्यानंतर तेथील अभ्यागत पुस्तिकेत व्यक्त केल्या.

  • ‘बाबासाहेब भारतात जन्मले, हे या देशाचे भाग्य आहे. १२० कोटी जनतेचा सच्चा प्रतिनिधी असल्याचा धर्म पाळल्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो. हे स्मारक अनंत-अनंत युवकांचे प्रेरणास्थान बनेल. महान राष्टÑनिर्मितीच्या दिशेने उचललेले ते एक पाऊल ठरेल,’ असे विजय दर्डा यांनी या अभिप्राय पुस्तिकेत नमूद केले.

  • या भेटीदरम्यान माजी मंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख आणि मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष किरीट भन्साळी हेही विजय दर्डा यांच्यासोबत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२१-२२ मध्ये याच निवासस्थानी राहून ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’मधून उच्च शिक्षण घेतले होते, हे येथे उल्लेखनीय आहे.

  • ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६) सामाजिक न्यायाचा योद्धा, येथे १९२१-२२ या काळात वास्तव्याला होते,’ असा मजकूर या स्मारकाच्या बाहेर एका निळ्या पाटीवर लिहिलेला आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत भेटीवर :
  • सेऊल- दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए इन 8 ते 11 जून असे चार दिवस भारताच्या भेटीवर येत आहेत.भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामधील आर्थिक सहकार्यासंदर्भात विविध विषयांवर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानुसार ते भारतामध्ये येत आहेत. भारतामध्ये मून जाए- इन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतील. मून जाए इन यांची ही पहिलीच भारतभेट आहे.

  • दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचे कामकाज पाहाणाऱ्या ब्लू हाऊसने दिलेल्या माहितीमध्ये, भारत हा केवळ दक्षिण कोरियाचा आर्थिक बाबतीत भागीदार नसून तो कोरियन व्दीपकल्पावर शांतता आणि समृद्धी येण्याच्या कार्यातही महत्त्वाचा सहकारी आहे असे नमूद करण्यात आले आहे.

  • दक्षिण कोरिया आणि भारत या दोन्ही देशांमध्ये 1973 साली अधिकृत संबंधांची स्थापना झाली. भारत भेटीनंतर मून जाए इन 11 ते 13 जूलै सिंगापूरमध्ये असतील. गेल्याच महिन्यामध्ये सिंगापूरमध्ये उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. कोरियन द्वीपकल्पावरील अणूकार्यक्रमाचे उच्चाटन करण्यासाठी त्या दोघांमध्ये एकमत झाले. तत्पुर्वी किम जोंग उन आणि मून जाए इन यांची दक्षिण कोरियाच्या हद्दीमध्ये ऐतिहासिक भेट होऊन चर्चा झाली होती.

एका डावात १० विकेट्स, श्रीकांत वाघचा पराक्रम :
  • मुंबई : विदर्भाचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज श्रीकांत वाघने इंग्लिश क्रिकेट लीगमधल्या सामन्यात एकाच डावात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. इंग्लिश क्रिकेट लीगमध्ये वाघ स्टोकस्ली क्रिकेट क्लबकडून खेळतो.

  • श्रीकांतने मिडल्सब्रोविरुद्धच्या सामन्यात एकाच डावात दहाही फलंदाजांना माघारी धाडलं. यंदाच्या मोसमात इंग्लिश क्रिकेट लीगमध्ये वाघच्या खात्यात 33 विकेट्स जमा झाल्या आहेत.

  • श्रीकांत वाघच्या गुडघ्यावर गेल्या मोसमात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे रणजी मोसमाच्या कालावधीत त्याला आठ महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती.

  • आयपीएलमध्ये 'पुणे वॉरियर्स' संघाकडून श्रीकांत खेळला होता. इंग्लिश क्रिकेट लीगमधल्या कामगिरीनं वाघच्या कारकीर्दीला नवी उभारी मिळाली आहे.

गेल्या वर्षभरात ७० लाख लोकांना रोजगार दिला, मोदींचा दावा :
  • मुंबई : मागील एक वर्षात केंद्र सरकारने 70 लाख नोकऱ्या दिल्या आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विरोधकांनी जनतेसमोर चुकीचं चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही मोदींनी केला आहे.

  • स्वराज पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी देशातील रोजगाराच्या मुद्यावरुन विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर दिले. मोदी म्हणाले की, “रोजगाराच्या मुद्यावरुन विरोधक आमच्यावर करत असलेल्या टीकेबद्दल आम्ही त्यांना दोष देत नाही. पण त्यांच्याकडे रोजगाराबाबत चुकीचे आकडे आहेत. नव्या अर्थव्यवस्थेत तयार होत असलेल्या नोकऱ्या मोजण्यासाठी आपण वापरत असलेली जुनी पद्धत चुकीची आहे.”

  • नरेंद्र मोदींना रोजगार मोजण्याच्या अचूक पद्धतीबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले की, “आज देशभरात 15 हजारांपेक्षा अधिक स्टार्ट-अप सुरु आहेत, ज्यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळत आहेत. या स्टार्ट-अप योजनांना सरकारकडून विविध प्रकारे मदत केली जात आहे.”

  • “देशभरात गेल्या वर्षभरात एक कोटी नवीन घरांची निर्मिती करण्यात आली. तसंच रस्ते निर्मितीही प्रतिमहिना दुप्पट वेगाने होत आहे. या सगळ्यातून लोकांना निश्चितच रोजगार मिळाला आहे,” असा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे.

देशात दर तीन सेकंदांना एक आत्महत्या; मानसिक आरोग्य कायद्याची अंमलबजावणी शनिवारपासून :
  • नवी दिल्ली : देशामध्ये दर तीन सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करतो. १५ ते २९ वयोगटातील युवकांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण देशात खूप मोठे आहे. २०२० सालापर्यंत एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के जनता ही कोणत्या ना कोणत्या मानसिक विकारांनी ग्रस्त असेल. या परिस्थितीत मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकाला प्राथमिक उपचार मिळण्याची सोय सरकारने करणे आवश्यक आहे.

  • मानसिक आरोग्य कायदा २०१७ची अमलबजावणी शनिवारी, ७ जुलैपासून होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ज्ञांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

  • देशात १० कोटीहून अधिक मानसिक रुग्ण - जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनूसार भारतातील १३५ कोटी लोकसंख्येपैकी ७.५ टक्के लोक हे मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत. त्यातील काहींच्या विकाराचे स्वरुप सामान्य तसेच अतिशय गंभीरही आहे.

  • जगातील १९५ देशांपैकी भारतासह असे फक्त १३ देश आहेत ज्यामध्ये मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांची संख्या प्रत्येकी १० कोटींच्या वर आहे. भारतामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने अशा प्रकारचे रुग्ण असूनही त्यांच्यावर उपचार करण्याकरिता फक्त ३८०० मानसोपचार तज्ज्ञ, ८९८ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ८५० सायक्रिअ‍ॅटिक सोशल वर्कर, १५०० सायक्रिअ‍ॅटिक नर्सेस, ४३ मनोरुग्ण रुग्णालये इतकीच संसाधने उपलब्ध आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८५०: ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.

  • १८५२: महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.

  • १८५५: भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.

  • १८८४: डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.

  • १८८६: जर्मनीच्या कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.

  • १८९०: ओहायो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.

  • १९३८: मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी २०२ किमी वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

  • १९९८: कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  • २०००: विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.

  • २००६: एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.

जन्म 

  • १८८६: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ रामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून१९५७)

  • १९०९: कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च२००४)

  • १९१२: मराठी गायक व नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७७)

  • १९१४: इतिहासकार, नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)

  • १९१८: भारतीय अभिनेते, निर्माते व्ही. रंगारा राव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९७४)

  • १९२४: सिंगापूरचे ६वे राष्ट्राध्यक्ष सेल्लप्पन रामनाथन यांचा जन्म.

  • १९२६: लेखिका सुनीता देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)

  • १९५२: भारतीय गायक अमित कुमार यांचा जन्म.

  • १९५२: भारतीय कॅनेडियन लेखक रोहिनटन मिस्त्री यांचा जन्म.

  • १९७१: विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांचा जन्म.

  • १९८७: सामाजिक कार्यकर्ते, युवानेते प्रितेश ठाकूर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १३५०: संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ ऑक्टोबर १२७०)

  • १९३३: अर्जेंटिनाचे १९वे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचे निधन. (जम: १२ जुलै १८५२)

  • १९३५: सिट्रोएन कंपनीचे संस्थापक आंद्रे सीट्रोएन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८७८)

  • १९६९: द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक ब्रायन जोन्स यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)

  • १९९६: हिंदी अभिनेते कुलभूषण पंडित तथा राज कुमार यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.