चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ जून २०१९

Date : 3 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पीएम योजनेच्या नावावर ठगबाजी; सरकारचे कारवाईचे निर्देश :
  • नवी दिल्ली : बनावट वेबसाईटमार्फत ठगबाजी करणाऱ्यांनी पंतप्रधान आवास, मेक इन इंडिया किंवा अन्य योजनेला सोडले नाही. या योजनांच्या नावावर लोकांची दिशाभूल करून देशभरात ठगबाजी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने कारवाईचे निर्देश जारी केले आहेत.

  • सोशल मीडियावर झळकलेल्या एका संदेशात म्हटले होते की, नरेंद्र मोदी देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानिमित्त ‘मेक इन इंडिया’ योजनेतहत दोन कोटी युवकांना मोफत लॅपटॉप दिला जाईल. आतापर्यंत यासाठी ३० लाख युवकांना अर्ज केले आहेत. आता तुम्हीही या जाळ्यात अडकू शकता? एका संदेशात मोफत सोलार पॅनलचे आमिष दाखवून ठकविण्यात आले आहे. 

  • योजनांचा लाभ घेण्यासाठी फक्त एक अर्ज करावा लागेल. यासाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जून २०१९ आहे, असे या संदेशात म्हटले आहे. (सोबत एचटीटीपी :// सोलार-पॅनल डॉट सरकारी योजना डॉट इन/हॅशटॅग अशी लिंक देण्यात आली आहे.) तथापि, सरकारी योजनांच्या नावावर फसवणूक करण्यांविरुद्ध सरकारने कठोर पावले उचलली आहेत.

  • यावर्षी जानेवारीत पंतप्रधान आवास योजनेच्या नावावर फसवणूक करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने या ठगबाजांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून २४ ते ४८ तासांच्या आत अटक करण्याचे आदेश दिले.बनावट वेबसाईट चालविणार ठगबाज लोकांचा डाटा चोरी करतात आणि हा डाटा विकून कमाई करतात. यामुळे वैयक्तिक माहितीही हस्तगत केली जाऊ शकते. पोलिसांनी अलीकडेच बनावट वेबसाईट चालविणाºया राकेश जांगिड (नागौर, राजस्थान) याला अटक केली. केले. आयआयटी कानपूरचा पदव्युत्तर असलेला राकेश चुलत भावासोबत जाहिरातींच्या माध्यमातून ही वेबसाईट चालवीत होता. पोलिसांनी ३० मे रोजी त्याच्याविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यातहत गुन्हा दाखल केला असून त्याचे कॉम्प्युटरही जप्त केले आहे.

दोन हजार जेट कर्मचाऱ्यांना स्पाइसजेट देणार नोकरी :
  • सेऊल : जेट एअरवेजच्या दोन हजार कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची स्पाइसजेटची योजना आहे. स्पाइसजेट सेवा संचालनालयाचा विस्तार करीत आहे. जेट एअरवेजची २२ विमाने स्पाइसजेटने आपल्या ताफ्यात सामील केली आहेत. सध्या स्पाइसजेटचे १४ हजार कर्मचारी असून, ताफ्यात १०० विमाने आहेत. आर्थिक अडचणीमुळे जेट एअरवेज कंपनी तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

  • स्पाइसजेटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी सांगितले की, आम्ही लक्षणीय संख्येने जेट एअरवेजच्या लोकांना सोबत घेतले आहे. ते पात्र आणि व्यावसायिक आहेत. पुढेही आम्ही जेट एअरवेजच्या कर्मचाºयांना नोकरी देऊ. जेट एअरवेजच्या ११०० कर्मचाºयांना सेवेत घेतले असून, हा आकडा २०००च्या वर जाईल. यात वैमानिक, चालक पथकाचे सदस्य, विमानतळ सेवा, सुरक्षेचे कर्मचारी आहेत.

  • स्पाइसजेटच्या ताफ्यात बोइंग ७३७, बॉम्बर्डियर क्यू ४०० आणि बी-७३७ मालवाहक विमान आहे. सध्या लक्ष्य छोट्या विमानांवर केंद्रित आहे, असे सिंह यांनी सांगितले. जेट एअरवेज मोठ्या विमानांचे संचालन करते. स्पाइसजेटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांची आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघाच्या (आयएटीए) संचालक मंडळावर निवड करण्यात आली आहे. लुफ्थांसा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्स्टन स्फोर यांची आयएटीएच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ एक वर्ष असेल. 

अमेरिकेचे व्हिसा धोरण कडक :
  • अमेरिकेच्या ‘व्हिसा’साठी अर्ज करताना आता सर्वानाच समाजमाध्यमांच्या वापराची माहिती द्यावी लागेल. अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने खातरजमा करण्याबरोबरच दहशतवादी आणि समाज विघातक व्यक्तींना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखणे असा उद्देश त्यामागे आहे.

  • अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने शनिवारी नवे धोरण जाहीर केले. त्यानुसार जवळजवळ सर्वच परदेशी अर्जदारांना त्यांच्या समाजमाध्यम वापराची माहिती द्यावी लागणार आहे. अमेरिकेला तात्पुरती भेट देणाऱ्यांनाही ही माहिती देणे बंधनकारक आहे. सध्या तरी अर्जदारांना प्रमुख समाजमाध्यमांच्या संकेतस्थळांचा उल्लेख अर्जावर दिसेल, पण नंतर सर्वच समाजमाध्यमांच्या संकेतस्थळांचे पर्याय दिले जातील. व्हिसा अर्जदार समाजमाध्यमांचा वापर करीत नसेल, तर तसा उल्लेख त्याला अर्जावरील पर्यायात करावा लागेल. पण एखाद्याने खोटी माहिती दिली तर त्याचे गंभीर परिणाम त्याला भोगावे लागतील, असे परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

  • अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांची पाश्र्वभूमी कोणत्या स्वरूपाची आहे, याची कसून तपासणी करून संभाव्य दहशतवादी कारवाया आणि समाजविघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याचा उद्देश या नव्या नियमामागे असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

  • गेल्या काही वर्षांत जगात समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. दहशतवादी कारवायांसाठीही त्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग होऊ शकेल. अशा लोकांना अमेरिकेत पायच ठेवता येणार नाही, अशी व्यवस्था करता येईल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • अमेरिकेच्या स्थलांतर धोरणात मार्च २०१७ मध्ये वटहुकमाद्वारे अनेक बदल करण्यात आले आहेत. अमेरिकेत येणाऱ्यांची कसून तपासणी करण्याचा उद्देश त्यामागे आहे. मार्च २०१८ पासून हे धोरण लागू करण्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सूचित केले होते.

आता एसटीचा प्रवास होणार कॅशलेस :
  • एसटीचा प्रवास आता कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे. एसटीच्या ७१ व्या वर्धापन दिनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईतील लोकल रेल्वेच्या एटीव्हीएम या कॅशलेस प्रणालीच्या धर्तीवर एसटीचे हे स्मार्ट कार्ड असेल.

  • स्मार्ट कार्डची किंमत ५० रुपये असणार असून सुरुवातीला ३०० रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर १०० रुपयांच्या पटीत ५ हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल. हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणीही व्यक्ती किंवा मित्र एसटीमधून हे कार्ड स्वाईप करुन प्रवास करु शकतील. एसटी प्रवासाशिवाय शॉपींगसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे.

  • एसटीसाठी सध्या इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे नजिकच्या काळात एसटीच्या सर्व गाड्या एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) वर चालविण्यात येणार असल्याची घोषणा दिवाकर रावते यांनी यावेळी केली. तसेच यामुळे एसटीची सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत होणार असून प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

  • एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीच वेतनवाढ जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांसाठीही त्यांना यापूर्वी अंतरिम वाढ दिल्याच्या दिनांकापासून सातव्या वेतन आयोगातील २.६७ च्या गुणकाप्रमाणे वेतवाढ लागू करण्यात येत असल्याचे रावते यांनी आज जाहीर केले. याशिवाय अधिकाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्यात येत असल्याचे तसेच ग्रॅज्युटी मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

०५ जूननंतर अमेरिका भारताला व्यापारात कोणतीही सूट देणार नाही, ट्रम्प सरकारचा नवा निर्णय :
  • वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेकडून भारताला व्यापारासाठी दिलेली प्रोत्साहन योजना 5 जूनपासून बंद करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारताला जीएसपी (जनरलाईज सिस्टिम ऑफ प्रेफरन्स) दर्जा दिला होता. हा दर्जा आता हटवण्यात येणार आहे.

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत म्हटले आहे की, भारताने अमेरिकी उत्पादनांना भारतीय बाजारपेठांमध्ये समान संधी देण्याचे आश्वासन दिलेले नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी मार्चमध्ये टर्की आणि भारताचा जीएसपी दर्जा काढून टाकणार असल्याचे सांगितले होते. त्याची आता अंमलबजावणी केली जाणार आहे.

  • अमेरिकेचे म्हणणे आहे की, भारतातील विविध प्रतिबंधांमुळे त्यांचे व्यावसायिक नुकसान होत आहे. आमच्या वस्तूंना समान दर्जा दिला जात नसल्यामुळे व्यापारावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. तसेच भारत जीएसपीचे मापदंड पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला आहे.

  • भारतीय वाणिज्य सचिव अनूप वधावन यांनी याबाबत म्हटले आहे की, अमेरिकेच्या या निर्णयानंतर भारताच्या अमेरिकेमधील 5.6 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नाही.

  • दरम्यान अमेरिकी काँग्रेसच्या 24 सदस्यीय समितीने प्रशासनाला 3 मे रोजी एक पत्र पाठवले होते, ज्यामध्ये भारताचा जीएसपी दर्जा काढून घेण्याची विनंती करण्यात आली होती.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८१८: मराठेशाहीचा अस्त – शेवटचा पेशवा बाजीराव हा मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाला आणि त्याने मराठी राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला.

  • १८८९: ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.

  • १९१६: महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.

  • १९४०: डंकर्कची लढाई – जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.

  • १९४७: हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.

  • १९५०: मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्‍नपूर्णा या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.

  • १९७९: मेक्सिकोच्याअखातात इहटॉक या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.

  • १९८४: ऑपरेशन ब्ल्यू स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.

  • १९८९: थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लष्कर पाठवले.

  • १९९८: जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ‍या त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.

जन्म 

  • १८९०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक बाबूराव पेंटर यांचा जन्म (मूत्यू: १६ जानेवारी१९५४)

  • १८६५: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९३६)

  • १८९० : चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार बाबूराव पेंटर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९५४)

  • १८९०: खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९८८)

  • १८९२: लेखिका तसेच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८६)

  • १८९५: चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत के.एम. पण्णीक्कर यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६३)

  • १९२४: तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा जन्म.

  • १९३०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म.

  • १९६६: पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज वासिम अक्रम यांचा जन्म.

मृत्यू

  • १६५७: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १५७८)

  • १९३२: उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८५९)

  • १९५६: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८८१)

  • १९८९: इराणी धर्मगुरू आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९०२)

  • १९९०: इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक रॉबर्ट नोयिस यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९२७)

  • १९९७: चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)

  • १९७७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ आर्चिबाल्ड विवियन हिल यांचे निधन.

  • २०१०: मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक अजय सरपोतदार यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९५९)

  • २०१३: जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार अतुल चिटणीस यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)

  • २०१४: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर१९४९)

  • २०१६: अमेरिकन बॉक्सर मुहम्मद अली यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९४२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.