चालू घडामोडी - ०३ मार्च २०१९

Updated On : Mar 03, 2019 | Category : Current Affairsजगातले सर्वात लहान जिवंत बाळ, वजन केवळ २६८ ग्रॅम :
 • जपानच्या टोकियोमध्ये जगातल्या सर्वात लहान बाळाचा जन्म झाला. या बाळाजी स्थिती इतकी खालावलेली होती की, त्याला २४ आठवडे आई-वडिलांकडे सोपविले नव्हते. या बाळाचे जन्माच्या वेळचे वजन हे केवळ २६८ ग्रॅम इतके होते. २४ आठवड्यांपूर्वी आईच्या गर्भाशयात बाळाचा विकास होणे थांबले होते. त्यानंतर, सर्जरी करून बाळाला जन्म देण्यात आला. आता २४ आठवड्यांनी या बाळाला चांगल्या तब्येतीसोबत आई-वडिलांकडे सोपविण्यात आले आहे.

 • आता इतके आहे वजन जेव्हा बाळाचा जन्म झाला, तेव्हा त्याचे वजन फारच कमी होते. त्यामुळे डॉक्टरांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यानंतर, डॉक्टरांनी त्याच्यावर वेगवेगळे उपचार केले. आता या बाळाचे वजन ३१७५.१५ ग्रॅम इतके आहे. ही घटना टोकियोच्या कीओ युनिव्हर्सिटी रुग्णालयातील आहे.

 • या बाळाच्या आईने सांगितले की, ‘मला फक्त इतकंच सांगायचेय की, मी फार आनंदी आहे. खरे तर मला अजिबात वाटले नव्हते की, माझे बाळ जिवंत राहील, पण देवाच्या कृपेने तो जिवंत आणि सुदृढ आहे.’

 • या बाळावर उपचार करणारे डॉक्टर ताकेशी अरिमित्सु म्हणाले की, जन्म झाला, तेव्हा ते बाळ फारच लहान आणि कमजोर होते. किओ युनिव्हर्सिटी रुग्णालयाच्या नावावर आता जगातल्या सर्वात लहान बाळाची डिलिव्हरी करण्याचे आणि त्याला सुदृढ ठेवण्याचे रेकॉर्ड नोंदविले गेले आहे. या आधी जगातले सर्वात लहान बाळ जन्माला येण्याचे रेकॉर्ड जर्मनीत होते. २००९ मध्ये इथे एका मुलाचा जन्म झाला होता, त्याचे वजन केवळ २७४ ग्रॅम इतकेच होते, तर सर्वात छोट्या मुलीचे रेकॉर्डही जर्मनीतच झाले होते. २०१५ मध्ये इथे २५२ ग्रॅम वजनाची मुलगी जन्माला आली होती.

के व्हिसा म्हणजे नक्की काय :
 • प्रश्न- मी माझ्या मित्राकडून के व्हिसाबद्दल ऐकलं. तो नेमका कोणता व्हिसा असतो आणि मी त्याच्यासाठी अर्ज करू शकतो का?

 • उत्तर- के व्हिसामुळे अमेरिकेच्या नागरिकाशी साखरपुडा झालेल्या व्यक्तीला अमेरिकेत प्रवेश मिळतो. मात्र अशी व्यक्ती अमेरिकेत आल्यावर 90 दिवसांमध्ये तिला लग्न करावं लागतं. अमेरिकन नागरिकाशी लग्न केल्यानंतर परदेशी व्यक्ती अमेरिकेच्या कायदेशीर कायमस्वरुपी नागरिकत्वासाठी (एलपीआर) सिटिझन अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडे (यूएससीआयएस) अर्ज करू शकते. के-1 व्हिसा तांत्रिकदृष्ट्या नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. के व्हिसा धारकानं 90 दिवसांत अमेरिकन नागरिकाशी विवाह न केल्यास त्या व्यक्तीला देश सोडावा लागतो. या व्हिसामुळे संबंधित व्यक्तीला अमेरिकेत वास्तव्य करण्याची परवानगी मिळते. मात्र त्यासाठी तिनं इमिग्रंट व्हिसासाठी आवश्यक निकष पूर्ण केलेले हवेत. के-1 व्हिसा धारक व्यक्ती आपल्या अल्पवयीन अपत्यासाठी के-2 व्हिसासाठी अर्ज करू शकते. 

 • के-1 व्हिसासाठी किमान आवश्यक बाबी- जी व्यक्ती अमेरिकेत येत आहे, तिच्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती अमेरिकन असावी. या दोन्ही व्यक्तींच्या अमेरिकेत होणाऱ्या लग्नात कोणतीही कायदेशीर अडचण नसावी. या दोन्ही व्यक्ती गेल्या दोन वर्षात एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेल्या असाव्यात. याशिवाय साखरपुडा झालेल्या व्यक्तीनं पोलीस रेकॉर्ड आणि वैद्यकीय चाचण्या याबद्दलची कागदपत्रं देणं गरजेचं आहे. अर्जदार आणि साखरपुडा झालेल्या व्यक्तीनं काऊन्सिलर ऑफिसरसमोर मुलाखतीसाठी येऊन त्या दोघांना अमेरिकेत राहण्याची इच्छा आहे हे सांगणं अतिशय आवश्यक आहे. 

गेल्या काही दिवसांत देशाला राफेलची कमतरता जाणवली - नरेंद्र मोदी :
 • नवी दिल्ली : वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक राफेलवरुन देशात खूप राजकारण करत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशाला राफेलची कमतरता जाणवली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात मोदी बोलत होते.

 • मोदींनी सांगितले की, लोक मला विचारत आहेत की, जर आत्ता आपल्याकडे राफेल असतं तर काय झालं असतं? आपल्याकडे आत्ता राफेल असायला हवं होतं. ज्या लोकांना मोदीचा विरोध करायचा असेल त्यांनी खुशाल करावा, परंतु मोदीचा विरोध करत असताना देशाच्या हिताचा विरोध करु नका, असे आवाहन मोदींनी विरोधकांना केले आहे.

 • मोदी म्हणाले की, देशासमोर आज खूप मोठी आव्हाने आहेत. दहशतवाद हे त्यापैकी मोठे आव्हान आहे. दहशतवाद्यांना सहाय्य करणारे खूप लोक आहेत. परंतु त्याचबरोबर आपल्याच देशातील काही लोक देशासमोर मोठं आव्हान निर्माण करत आहेत. देशाला त्यांच्याकडून मोठा विरोध होत आहे.

 • जवानांबाबत मोदी म्हणाले की, सध्या देश आपल्या जवानांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. परंतु काही लोक हे भारतीय लष्करावरच संशय व्यक्त करतात. परंतु सर्व देशवासियांनी असेच आपल्या जवानांच्या पाठिशी उभं रहायला हवं.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर राज्याची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकिलाची नियुक्ती :
 • मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकील नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी सीमा प्रश्नासंबंधीच्या कायदेशीर मुद्यांवर चर्चा झाली.

 • सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू खंबीरपणे मांडण्यात येत आहे. मराठा आरक्षणाप्रमाणेच सीमा प्रश्नांवर सुद्धा पूर्ण ताकदीने व प्रभावीपणे न्यायालयात बाजू मांडण्यात यावी. त्यासाठी ॲड. हरिश साळवे यांच्याबरोबरच आणखी एक ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

 • या ज्येष्ठ वकिलाची नव्याने नियुक्ती झाल्यानंतर त्यांना माहिती देऊन पुढील व्यूहरचना ठरविण्यासाठी दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात यावी. त्या बैठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित रहावे, असे या बैठकीत ठरविण्यात आले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या प्रत्येक तारखेच्या वेळीही राज्याचे प्रतिनिधी म्हणून मंत्री  पाटील आणि देसाई हे स्वतः तसेच सामान्य प्रशासन विभागाचे सचिव उपस्थित राहतील, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

 • मराठा आंदोलनानंतर मराठा समाजाला दिलेल्या शैक्षणिक व आर्थिक सवलती या सीमा भागातील मराठी भागातील नागरिकांना देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

भारतीय वैमानिकाच्या सुटकेचे संयुक्त राष्ट्रांकडून स्वागत :
 • भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान  यांना सुखरूपपणे सोडून देण्याच्या पाकिस्तानच्या सदिच्छा कृतीचे संयुक्त राष्ट्रांनी स्वागत केले असून दोन्ही देशांनी हीच सकारात्मकता पुढे चालू ठेवून रचनात्मक संवाद साधावा, असे आवाहनही केले आहे.

 • भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानातून शुक्रवारी भारतात परतले असून सुमारे साठ तास ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांचे मिग २१ विमान पाकिस्तानने पाडले होते. वर्धमान यांना सोडून दिल्याची आलेली वार्ता आनंददायी व स्वागतार्ह आहे, असे संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफनी डय़ुजारिक यांनी सांगितले.

 • सरचिटणीसांनी दोन्ही देशांना सकारात्मक संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. वर्धमान यांची सुटका होईपर्यंत सर्वाचे श्वास रोखले गेले होते. अखेर वाघा सीमेमार्गे त्यांना भारताच्या अटारी येथील सीमेवर सोडण्यात आले. पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाला पाठिंबा दिल्याने युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानने वैमानिकाची सुटका करण्याची दाखवलेली  सदिच्छा ही महत्त्वाची आहे.

 • जैश ए महंमद या संघटनेने पुलवामा येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान  ठार झाले होते. त्यानंतर भारताने २६ फेब्रुवारी रोजी जैश ए महंमदच्या बालाकोट येथील छावणीवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतात हल्ले करून एफ १६ विमानांचा वापर करून लष्करी आस्थापनांना लक्ष्य केले. वर्धमान हे पाकिस्तानी विमानांचा पाठलाग करण्यासाठी गेलेल्या आठ मिग २१ विमानांपैकी एका विमानाचे चालक होते, त्या वेळी त्यांचे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते.

समझौता एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार :
 • नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतपाकिस्तानदरम्यान धावणारी रद्द करण्यात आलेली समझौता एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार आहे. 

 • भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेनंतर समझौता एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील रेल्वे विभागाने समझौता एक्सप्रेसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे दर रविवारी आणि बुधवारी दिल्लीतून पाकिस्तानला रवाना होणारी समझौता एक्सप्रेस आज रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी अटारीला जाणार आहे. त्यानंतर लाहोरला जाणार आहे. तसेच, समझौता एक्स्प्रेस दर सोमवारी आणि गुरुवारी पाकिस्तानमधून भारतात रवाना होणार आहे.

 • 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

 • या कारावाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी (27 फेब्रुवारीला) सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले असता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र, ते पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यावेळी अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानच्या लष्कराने ताब्यात घेतले. अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केले आहे.

दिनविशेष :
 • जागतिक वन्यजीव दिन, जागतिक श्रवणशक्ती दिन

महत्वाच्या घटना 

 • १८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.

 • १८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.

 • १९२३: टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.

 • १९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.

 • १९३९: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.

 • १९४३: दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार.

 • १९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.

 • १९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.

 • २००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या शरच्‍चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.

 • २००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

जन्म 

 • १८३९: टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)

 • १९२०: किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.

 • १९३९: भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९९९)

 • १९७७: भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९१९: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८६४)

 • १९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.

 • १९६७: माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.

 • १९८२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)

टिप्पणी करा (Comment Below)