चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ मे २०१९

Date : 3 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव :
  • मुंबई : मुंबईमधील वांद्र्याच्या एमआयजी क्रिकेट क्लबमधील पॅव्हेलियनला 'सचिन रमेश तेंडुलकर' असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे याच मैदानावर सचिन आयुष्यात पहिल्यांदा क्रिकेट खेळला होता. हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण असल्याचं सचिनने म्हटलं आहे. सचिनने  एमआयजी क्रिकेट क्लबच्या मैदानावर कॅम्पसाठी आलेल्या लहानग्यांना सचिननं क्रिकेटचे धडे दिले.

  • या नामकरण कार्यक्रमाला स्वत: सचिन तेंडुलकर उपस्थित होता. सचिनचे मोठे बंधू अजित तेंडुलकर आणि माजी क्रिकेटर विनोद कांबळी उपस्थित होते. विशेष म्हणजे एमआयजी क्लबच्या याच मैदानावर सचिनने लहानपणी क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. यावेळी सचिनने त्याच्या लहानपणीच्या क्रिकेटच्या आठवणी जागवल्या.

  •  

  • मी आयुष्यातील पहिलं क्रिकेट एमआयजी क्रिकेट क्लबच्या मैदानात खेळलो. त्यावेळी टेनिस बॉलवर मी क्रिकेट खेळलो. मात्र आज त्याच क्लबच्या मैदानातील पॅव्हेलियनला माझं नाव दिलं गेलं आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्यासाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे. एमआयजी क्लबच्या सर्व कमिटी मेंबर्सचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने दिली आहे.

  • सचिन तेंडुलकरच्या जडणघडणीत एमआयजी क्रिकेट क्लबचा मोलाचा वाटा आहे. सचिननं आपल्या भाषणात त्या नात्याचा आवर्जून उल्लेख केला. सचिन लहानाचा मोठा झाला ती वांद्रे पूर्वची साहित्य सहवास सोसायटी, एमआयजी क्रिकेट क्लबपासून अगदी काही मिनिटांच्या अंरावर आहे. त्यामुळे शिवाजी पार्कनंतर सचिनच्या जडणघडणीत एमआयजीचं महत्त्वाचं स्थान आहे. त्या दोघांमधल्या याच नात्याला आज वेगळं अधिष्ठान मिळालं.

भारत कसोटीत आणि इंग्लंड एकदिवसीय यादीत अव्वल :
  • दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वार्षिक सांघिक क्रमवारीत भारत आणि इंग्लंड या संघांनी अनुक्रमे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट प्रकारातील अव्वल स्थान टिकवले आहे.

  • २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षांतील कामगिरीला या क्रमवारीसाठी ५० टक्के ग्राह्य धरण्यात आले आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला एक महिन्याचा अवधी बाकी असताना प्राप्त झालेले एकदिवसीय क्रिकेटचे अग्रस्थान हे इंग्लंडचा आत्मविश्वास उंचावणारे आहे. भारतीय संघ दोन गुणांच्या फरकाने द्वितीय स्थानावर आहे.

  • कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडने भारतापासूनचे गुणांचे अंतर आठवरून दोनपर्यंत कमी केले आहे. याचप्रमाणे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला मागे टाकून १०५ गुणांसह चौथे स्थान मिळवले आहे. इंग्लंडच्या खात्यावर ९८ गुण जमा आहेत. सातव्या स्थानावरील पाकिस्तान आणि आठव्या स्थानावरील वेस्ट इंडिज यांच्यात आधी ११ गुणांचे अंतर होते, ते आता विंडीजने दोनपर्यंत कमी केले आहे.

  • विश्वचषकाला सामोरे जाण्यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल स्थान टिकवण्यासाठी इंग्लंडने आर्यलडविरुद्धच्या एकमेव सामन्यात आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत ३-२ किंवा त्याहून अधिक फरकाने विजय मिळवण्याची आवश्यकता आहे. जर इंग्लंडने आर्यलडविरुद्धचा सामना गमावल्यास पाकिस्तानविरुद्ध ४-१ असा मालिकाविजय मिळवावा लागणार आहे.

मोदींविरोधातील काँग्रेसच्या तक्रारींचा 6 मेपर्यंत निकाल लावा, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारींचा येत्या 6 मेपर्यंत निकाल लावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत काँग्रेसने नरेंद्र मोदींविरोधात एकूण 11 तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी 3 तक्रारींचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे.

  • मोदींविरोधातील तक्रारींवरील सुनावणी संथगतीने सुरु असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस खासदार सुश्मिता देव यांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. गुरुवारी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी निवडणूक आयोगाला 6 मे पर्यंत तकारींचा निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत.

  • आचारसंहिता भंगप्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात 11 तक्रारी दाखल केल्या आहेत. नुकतेच त्यापैकी तीन प्रकरणात निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींना क्लीन चीट दिली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार टोलमाफी :
  • नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू झाले असले तरी बऱ्याच शहरांमध्ये त्यांच्या चार्जिंगची व्यवस्था नाही. पण ती सुरू होईल आणि विक्री वाढेल, असे अपेक्षित आहे. मात्र या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना आणली आहे. त्यानुसार ई-वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे.

  • ई-वाहने ओळखता यावी, यासाठी त्यावर हिरव्या रंगाची नंबर प्लेट आणि क्रमांक पांढºया रंगात असेल. त्यामुळे टोल नाक्यांवर ही वाहने पटकन ओळखता येतील. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पत्रे लिहून, या ई-वाहनांची नंबर प्लेट हिरव्या रंगाची असावी, असे कळविले आहे. जी ई-वाहने टॅक्सी म्हणून वापरण्यात येतील, त्याच्या हिरव्या नंबरप्लेटवर वाहनांचा क्रमांक पिवळ्या रंगात असेल.

युवराज नारुहितो यांचा जागतिक शांततेचा संकल्प :
  • टोकियो : जपानचे युवराज नारुहितो हे बुधवारी औपचारिकरीत्या जपानचे नवे सम्राट बनले आहेत. वयोवृद्ध पिता आकिहितो यांनी मंगळवारी पदत्याग केल्यानंतर नारुहितो विधिवत राजसिंहासनावर विराजमान झाले. दरम्यान, देशाला संबोधित करताना केलेल्या पहिल्या भाषणात नारुहितो यांनी जागतिक शांततेसाठी संकल्प करतानाच देशवासीयांच्या पाठीशी सदैव उभा ठाकणार असल्याची ग्वाही दिली. मी संविधानाला अनुसरून काम करेल.

  • माझे विचार नेहमी माझ्या नागरिकांसाठीच असतील. मी त्यांच्या बाजूने उभा ठाकेन. माझ्या कार्यात वडील आकिहितो यांची झलक दिसेल, असे ते म्हणाले. जपानचे अतिप्राचीन साम्राज्य आकिहितो यांनी जनतेच्या निकट आणल्याचे मानले जाते. मावळते सम्राट ८५ वर्षीय आकिहितो यांनी अंतिम भाषणात देशवासीयांचे मनापासून आभार मानले. मी जपान आणि संपूर्ण जगातील नागरिकांच्या शांती आणि खुशीसाठी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.

  • मंगळवारी मध्यरात्रीनंतर नव्या सम्राटाची घोषणा करण्यात आली. जपानच्या इतिहासात २०० वर्षांपेक्षा जास्त काळानंतर एखाद्या सम्राटाने हयात असताना पदत्याग केला आहे. ५९ वर्षीय नारुहितो यांनी बुधवारी सकाळी १० मिनिटे चाललेल्या औपचारिक समारंभात ‘क्रिसेंथमम थ्रोन’ (राजसिंहासन) ग्रहण केले. त्यावेळी त्यांच्या पत्नी मसाको यांच्यासह राजघराण्यातील महिलांना प्रवेश नव्हता. नारुहितो यांच्या पदग्रहणासोबतच जपानमध्ये राजेशाहीच्या नव्या युगाचा ‘रेईवा’(सुंदर सौहार्द) प्रारंभ झाला.

  • इम्पेरियल पॅलेसमधील पाईन रुममध्ये नारुहितो यांना शाही तलवार, शाही आभूषणे, राज्याची मोहोर आणि वैयक्तिक मोहोर सोपविण्यात आली. या संपूर्ण विधीच्या वेळी पंतप्रधान शिजो आबे यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला सदस्य उपस्थित होती. 

दक्षिण भारतावर ‘फॅनी’चे सावट :
  • नवी दिल्ली : सर्वाधिक घातक असल्याचे भाकित वर्तविण्यात आलेले ‘फॅनी’ हे चक्रीवादळ  शुक्रवारी रौद्र रूप धारण करण्याची शक्यता असून त्याचे सावट संपूर्ण दक्षिण भारत आणि पूर्व किनाऱ्यावर आहे.

  • हे चक्रीवादळ ओदिशामध्ये धडकणार असून पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांनाही त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याबाबत यापूर्वीच ‘हाय अलर्ट’ जारी केला असून या वादळाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे.

  • ‘फॅनी’ प्रभावित राज्यांमधील रेल्वे आणि हवाई वाहतूक नियंत्रित करण्यात आली असून अनेक रेल्वे गाडय़ा आणि विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

  • नऊशेहून अधिक निवारे उभारण्यात आले असून नौदल, सागरी सुरक्षा दल आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल यांच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

विश्वचषकात धोनीचे योगदान सर्वात मोठे असेल -गावस्कर :
  • नवी मुंबई : सामन्यातील स्थितीचे झटकन आकलन होण्यात तरबेज असलेला महेंद्रसिंह धोनी हा आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघासाठी मोठे योगदान देऊ शकेल, असा विश्वास माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला.

  • सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जसाठी पूर्ण बहरात खेळत आहे. ११ सामन्यांतून त्याने ३५८ धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडमधील विश्वचषकात भारतासाठी तो अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असेल, असे गावस्कर यांनी सांगितले.

  • खारघर येथे श्री सत्य साई संजीवनी आंतरराष्ट्रीय केंद्र या बालकांच्या रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर गावस्कर म्हणाले, ‘‘भारतीय संघातील अव्वल तीन फलंदाज अत्यंत चांगल्या लयीत आहेत. मात्र दुर्दैवाने त्यातील कुणीही चालले नाही, तर धोनी त्यानंतरची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळू शकतो. ’’

  • ‘‘धोनी हा यष्टिरक्षक म्हणूनदेखील अत्यंत प्रभावीपणे आणि चतुराईने त्याच्या कौशल्यांचा वापर करतो. त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे तो फिरकीपटू तसेच अन्य गोलंदाजांना कुठे गोलंदाजी कर, क्षेत्ररक्षणाबाबत अचूक मार्गदर्शन करतो. त्याचा फायदा होऊ शकेल,’’ असेही गावस्कर यांनी नमूद केले.आर्थिकदृष्टय़ा हलाखीतील कुटुंबीयांच्या ३४ बालकांच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी संपूर्ण आर्थिक मदत करणार असल्याचे गावस्कर यांनी जाहीर केले.

दिनविशेष :
  • जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन

महत्वाच्या घटना 

  • १७१५: संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये दिसले.

  • १८०२: वॉशिंग्टन (डीसी) या शहराची स्थापना झाली.

  • १९१३: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.

  • १९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

  • १९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.

  • १९७३: शिकागो येथील १४५१ फूट उंच आणि १०८ माजले असलेली सिअर्स टॉवर ही (त्या काळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.

  • १९९४: सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.

  • १९९९: एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला.

जन्म 

  • १८१८: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म.

  • १८९६: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७४)

  • १८९८ : शिक्षिका आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म. (मृत्यू: ८ डिसेंबर १९७८)

  • १९५१: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा जन्म.

  • १९५९: भाजपाच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९१२: उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी यांचे निधन.

  • १९६९: भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७)

  • १९७१: प्रसिध्द अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १९०१)

  • १९७७: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)

  • १९७८: लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे पुणे येथे निधन. (जन्म: १७ जानेवारी १८९५ – घोसपुरी, अहमदनगर)

  • १९९६: व्यंगचित्रकार वसंत गवाणकर यांचे निधन.

  • २०००: जेष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९०६)

  • २००६: भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९४९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.