चालू घडामोडी - ०३ ऑक्टोबर २०१८

Date : 3 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
१२४ देशांच्या गायकांनी गायले महात्मा गांधीजींचे आवडते भजन :
  • अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नाने जगभरातील १२४ देशातील प्रसिद्ध गायकांनी महात्मा गांधी यांना अनोखी श्रद्धांजली दिली आहे.

  • महात्मा गांधी यांच्या आवडत्या भजनापेकी एक असलेले ‘वैष्णव जन तो तेने कहिए..’ ला १२४ देशांच्या गायकांनी मिळून गायले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनमध्ये सुरू असलेल्या अंतरराष्ट्रीय स्वच्छता कार्यक्रमांमध्ये हा व्हिडिओ लाँच केला आहे.

  • या व्हिडिओमध्ये १२४ देशातील प्रसिद्ध गायकांनी आपापल्या देशातील बॅकग्राऊंडसोबत भजन गायले आहे. यात पाकिस्तानच्या गायकाचाही समावेश आहे. पाकिस्तानकडून शफकत अमानत अली यांनी आपला आवाज दिला आहे. पाकिस्तानशिवाय चीन, अफगाणिस्तान, नेपाळ आणि श्रीलंकासारख्या शेजारील देशांच्या गायकांचाही समावेश आहे.

  • सोशल मीडियावर या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतरराष्ट्रीय स्वच्छता कार्यक्रमांमध्ये या व्हिडीओचा उल्लेख केला आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘ १२४ देशांतील सर्व कलाकार गांधीमय झाले आहेत’

बरहम सालेह इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष :
  • इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी बरहम सालेह हे विजयी झाले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पेट्रिऑटिक यूनियन ऑफ कुर्दिस्तानचे (पीयूके) उमेदवार असलेल्या सालेह यांनी कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पक्षाचे (केडीपी) उमेदवार फुआद हुसेन यांचा पराभव केला. ५८ वर्षीय बरहम सालेह यांना २१९ तर फुआद यांना २२ मते मिळाली. बरहम सालेह हे इराकचे आठवे राष्ट्राध्यक्ष असतील.

  • दोन्ही पक्षांमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच होती. परंतु, निकाल एकतर्फी लागला. तसेच निकाल लागण्यासही उशीर झाला. २००३ नंतर इराकमध्ये राष्ट्राध्यक्षपदी कुर्द निवडून येत आहेत.

  • पंतप्रधान शिया मुसलमान आणि संसदेचे सभापती सुन्नी समाजाचे आहेत. इराकची अखंडता आणि सुरक्षेसाठी काम करणार असल्याचे सालेह यांनी शपथग्रहणावेळी म्हटले. सरकार स्थापन करण्यासाठी नव्या राष्ट्राध्यक्षांकडे १५ दिवसांची कालावधी असेल.

न्या. रंजन गोगोई यांचा आज शपथविधी, देशाचे ४६वे सरन्यायाधीश बनणार :
  • नवी दिल्ली : न्यायमूर्ती रंजन गोगोई हे आज सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद सरन्यायधीश गोगोई यांना शपथ देतील. राष्ट्रपती भवन येथे या शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. गोगोई भारताचे 46वे सरन्यायाधीश असणार आहेत, तर  ईशान्य भारतातून नियुक्त झालेले पहिले सरन्यायाधीश आहेत.

  • सरन्यायाधीय दीपक मिश्रा यांचा कार्यकाळ काल (2 ऑक्टोबर) समाप्त झाला आहे. न्या. रंजन गोगोई यांचा कार्यकाळ 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत म्हणजे 13 महिने असणार आहे.

  • माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सरन्यायाधीश पदासाठी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारच्या विधी मंत्रालयाकडे केली होती. ज्येष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्याची परंपरा आहे. मात्र औपचारीकरित्या नाव पाठवण्याचा अधिकार सरन्यायाधीशांना असतो. त्यामुळे विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी ही पंरपरा कायम ठेवली होती.

  • न्यायमूर्ती रंजन गोगोई फेब्रुवारी 2001मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतले होते. फेब्रुवारी 2011मध्ये त्यांची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यानंतर एप्रिल 2012 पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण : साताऱ्याचा एक नंबर, पंतप्रधानांच्या हस्ते गौरव :
  • नवी दिल्ली : देशाच्या ग्रामीण भागांमध्ये सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला. आज पंतप्रधानांच्या हस्ते हा बहुमान दिला गेला. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्राचे मंत्री बबनराव लोणीकरही यावेळी उपस्थित होते.

  • स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरे आणि इतर संस्थांची स्पर्धा घेतल्या नंतर यावेळी केंद्र सरकारने प्रथमच ग्रामीण भागासाठी हे सर्वेक्षण घेतलं. यात विविध निकषांमध्ये सातारा जिल्हा हा देशात सर्वप्रथम ठरलाय.

  • हागणदारी मुक्त गाव या योजनेमध्ये साताऱ्याला अधिक चांगली कामगिरी करून दाखवली होती. याशिवाय ग्रामीण भागांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणा राबवलं गेलं, प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्यासाठी बचत गटांना प्रोत्साहन असे अनेक प्रयोग प्रशासनाच्या वतीने राबवले गेले त्याचाच परिणाम म्हणून आज संपूर्ण देशभरात प्रथम क्रमांक पटकाव त्याचा मान मिळाला अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी व्यक्त केली.

  • तर या उपक्रमांमध्ये लोकांची ही साथ महत्त्वाची होती, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात ही जिल्ह्यांना पहिल्यापासून सरस कामगिरी दाखवलेली आहे असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलं.

लेझर तंत्रज्ञानात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या संशोधकांना यंदाचं भौतिकशास्त्राचं नोबेल :
  • स्वीडन : लेझर तंत्रज्ञानात महत्त्वपूर्ण संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना विभागून भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेतील आर्थर अश्किन, फ्रान्सचे जेरार्ड मोउरो आणि कॅनडाच्या डोना स्टिरकलँड यांना विभागून यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर झाला आहे. या तिघांच्या संशोधनामुळे प्रकाशाची किरणे डोळ्यांच्या सर्जरीपासून मायक्रो-मशीनपर्यंत उपकरणासारखी वापरली जाऊ लागली.

  • या तिन्ही शास्त्रज्ञांमुळे लेझर फिजिक्समध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडलं, असे पुरस्कार समितीने नमूद केले आहे.

  • अमेरिकन शास्त्रज्ञ आर्थर अश्किन यांना पुरस्काराची निम्मी रक्कम मिळेल, तर उर्वरित निम्मी रक्कम मोउरो आणि स्टिरकलँड यांना समसमान विभागून दिली जाईल. विशेष म्हणजे, डोना स्टिरकलँड यांच्या रुपाने भौतिकशास्त्राचं नोबेल तब्बल 55 वर्षांनंतर महिलेला मिळालं आहे.

  • भौतिकशास्त्राचं नोबेल जाहीर झाल्यानंतर आणखी एका विशेष गोष्टीची नोंद झाली, ती म्हणजे के. आर्थर अश्किन हे सर्वात वयस्कर नोबेल विजेते ठरले आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६७०: शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली.

  • १९३२: इराकला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.

  • १९५२: युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.

  • १९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.

  • १९९५: ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्‍नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.

जन्म 

  • १९०३: हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७२)

  • १९०७: निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९०)

  • १९१९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी २०१३)

  • १९२१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९९६)

  • १९४७: सबवे रेस्टॉरंट चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर २०१५)

मृत्यू 

  • १८६७: शिवणयंत्राचे संशोधक एलियास होवे यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १८१९)

  • २००७: सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविणारे रवींद्र पाटील यांचे टी. बी. रोगामुळे निधन.

  • २००७: भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक एम. एन. विजयन यांचे निधन. (जन्म: ८ जून १९३०)

  • २०१२: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९२६)

  • २०१२: भारतीय धर्मशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.