चालू घडामोडी - ०४ एप्रिल २०१८

Date : 4 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सर्वात दूर असणाऱ्या ताऱ्याचा ‘नासा’कडून शोध :
  • नासाच्या अंतराळ दुर्बिणीने आतापर्यंतचा सर्वात लांबचा तारा शोधून काढला आहे. विश्वाच्या मध्यावर निळया रंगात असणाऱ्या या विशाल ताऱ्याचे नाव ‘इकारस’ असे ठेवण्यात आले आहे. हा तारा इतका दूर आहे की, या ताऱ्याचा सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी नऊ अब्ज वर्षे लागतील. जगातील सर्वात मोठय़ा दुर्बिणीनेही हा तारा धूसर दिसू शकतो.

  • गुरुत्वाकर्षण लेन्सिंग नावाच्या प्रक्रियेमुळे धूसर तारा चमकू शकतो. यामुळे खगोलशात्रज्ञ दूरवरील ताऱ्यांनाही पाहू शकतात. आम्ही आकाराने मोठा आणि आपल्यासारखा एकटा तारा पाहिल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बर्केले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या पेट्रिक केली यांनी म्हटले आहे.

  • आपण त्या ठिकाणी अनेक आकाशगंगांना पाहू शकता. मात्र हा तारा या ताऱ्यांच्या कमीत कमी १०० पट दूर आहे, ज्याचा आम्ही अभ्यास करीत आहोत, असे केली यांनी म्हटले.

अॅट्रॉसिटी कायदा : निर्णयावर स्थगितीस कोर्टाचा नकार, पुन्हा सुनावणी होणार :
  • नवी दिल्ली : अॅट्रॉसिटी कायद्याच्या निर्णयावरील पुनर्विचार याचिकेवरुन केंद्र सरकारला  मोठा दणका बसला आहे. या कायद्याबाबत आधी दिलेल्या निर्णयावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सर्व पक्षकारांनी तीन दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असून,10 दिवसांनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे.

  • सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, अॅट्रॉसिटी कायदा कमकुवत केला नसून, अटक आणि सीआरपीसीच्या तरतुदीमध्ये सुधारणा केली आहे. निर्दोष लोकांच्या मुलभूत अधिकारांचा संरक्षण व्हावं आणि त्यांना त्रास होऊ नये, हाच यामागचा उद्देश आहे.

  • तसेच, अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदीत कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

  • अॅट्रॉसिटी कायद्यान्वये पीडितांना नुकसान भरपाई मिळण्यास उशीर होणार नाही. त्यासाठी एफआयआरची सुद्धा वाट पाहावी लागणार नाही.

  • केंद्र सरकारने अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील 20 मार्चच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती सुप्रीम कोर्टाला केली होती. मात्र 20 मार्चच्या निर्णयावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

देसाईंची मराठीत, राणेंची हिंदीत, तर केतकरांची इंग्रजीत शपथ :
  • नवी दिल्ली: संसदेत आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.

  • 16 राज्यातून एकूण 58 नवे खासदार राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या 6 खासदारांचा समावेश आहे. या सर्वांचा शपथविधी पार पडला.

  • महाराष्ट्रात भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. या सर्वांचा शपथविधी आज पार पडला.

  • राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण, शिवसेनेचे अनिल देसाई यांनी मराठीत खासदारकीची शपथ घेतली. तर प्रकाश जावडेकर, नारायण राणे यांनी हिंदीतून तर कुमार केतकर यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली.

  • “राज्यसभेच्या खासदारकीने मी समाधानी आहे. विधीमंडळात 30 वर्षे काम केले. महाराष्ट्रातला माझा कोटा संपलेला होता, त्यामुळे दिल्लीत आलो. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं 2019 मध्ये काय करायचं यावर चर्चा करून निर्णय घेऊ. गडचिरोली आणि दिल्लीत फरक आहे, दिल्ली ही शिक्षेची जागा नाही”, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी एबीपी माझाकडे दिली.

भारतीय बँकांमध्ये दर तासाला एक गैरव्यवहार :
  • गेल्या काही दिवसांमध्ये बँकांमधील अनेक घोटाळे उघडकीस आले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विक्रम कोठारी यांनी केलेली बँकांची फसवणूक गेल्या काही दिवसांमध्ये उजेडात आले. त्यामुळे बँकांमध्ये होणारे गैरव्यवहार एकापाठोपाठ समोर आले. बँकांमध्ये होणाऱ्या याच गैरव्यवहारांबद्दलचा एक अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे.

  • 2016 ते 2017 या आर्थिक वर्षात भारतीय बँकांमध्ये तब्बल 12,533 गैरव्यवहार घडल्याची आकडेवारी या अहवालातून समोर आली आहे. याची सरासरी काढल्यास भारतीय बँकांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात दर तासाला एक घोटाळा झाला आहे.

  • इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर अॅडव्हायझरी सर्व्हिसेसच्या अहवालातील आकडेवारीनुसार एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत भारतीय बँकांमध्ये 12,533 गैरव्यवहार झाले. यामुळे बँकांचे 18 हजार 170 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अहवालातील आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक गैरव्यवहार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झाले. हा आकडा 3,893 इतका आहे. तर यानंतर आयसीआयसीआय (3,359) आणि एचडीएफसी (2,319) यांचा क्रमांक लागतो.  

  • एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत झालेल्या गैरव्यवहारांमुळे सर्वाधिक नुकसान पंजाब नॅशनल बँकेचे झाले आहे. पंजाब नॅशनल बँकेला गेल्या आर्थिक वर्षात गैरव्यवहारांमुळे 2,810 कोटींचा फटका बसला आहे. पंजाब नॅशनल बँकेपाठोपाठ बँक ऑफ इंडिया (2,770 कोटी रुपये) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (2,420 कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो.

सरकारकडून भय्यूजी महाराजांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा :
  • भोपाळ: मध्य प्रदेश सरकारकने भय्यू महाराज यांच्यासह पाच संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. सरकारकडून सोमवारी परिपत्रक जारी करून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. मात्र, यावरून टीका होण्याची शक्यता लक्षात घेता मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या निर्णयाला प्रशासकीय रूप दिले आहे.

  • या माध्यमातून त्यांनी वेगळीच राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आहे. राज्याच्या स्थापनेपासून संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, भय्यूजी महाराजांसह इतर संतांनी हा प्रस्ताव मान्य स्वीकारला आहे का, याबाबत अजूनपर्यंत पुष्टी झालेली नाही. परंतु, हा प्रस्ताव स्वीकारून त्यांना राज्यमंत्रीपद मिळाल्यास त्यांना सरकारी सुविधांचा लाभ मिळेल.

  • यामध्ये महिन्याला 7500 रूपये वेतन, सरकारी गाडी व 1000 रूपयांचे डिझेल, 15,000 रूपयांचा घर भत्ता, 3,000 रूपये सत्कार भत्ता आणि सरकारी मदतनीस अशा सुविधांचा समावेश असेल. 

  • महाराष्ट्राच्या राजकारणात भय्यूजी महाराजांचा बराच बोलबाला आहे. राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जातात. गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आलं. तर अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करतात. मराठा आरक्षणसाठीच्या मोर्चामागे भय्यूजी महाराज असल्याच्याही चर्चा होत्या.

जिओ पेमेंट बँक सुरू, एअरटेल-पेटीएमला देणार टक्कर :
  • मोबाइल क्षेत्रात खळबळ उडवून देणारी रिलायन्स जिओ कंपनी आता पेमेंट बँकिंग क्षेत्रातही उतरली आहे. जिओने आजपासून (दि.०३) बँकिंगचे काम सुरू केल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली. ऑगस्ट २०१५ मध्ये पेमेंट बँक सुरू करण्यासाठी ११ जणांना परवानगी देण्यात आली होती. रिलायन्स उद्योगसमूह त्यापैकी एक आहे. जिओच्या आगमनाने आधीपासूनच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

  • रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, जिओ पेमेंट बँकेने ३ एप्रिल २०१८ पासून पेमेंट बँकेच्या स्वरूपात व्यवहारास सुरूवात केली आहे. मोबाइल क्षेत्रातील भारती एअरटेलने नोव्हेंबर २०१६ मध्ये सर्वांत पहिल्यांदा पेमेंट बँक सुरू केली होती. पेटीएमचे संस्थापक विजय शेख शर्मा संचलित पेटीएम बँकेने मे २०१७ आणि फिनो पेमेंट बँकेने मागील वर्षी जूनमध्ये व्यवयासास सुरूवात केली होती.

  • जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने प्रवेश केला होता. मोफत कॉल आणि डेटा यामुळे त्यांच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच कंपनी बँकिंग क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. जिओचा आतापर्यंतचा प्रवास पाहता पेमेंट बँकिंगमध्ये आता तगडी स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

लष्कराच्या वर्दीमध्ये धोनीने का स्वीकारला पद्मभूषण पुरस्कार, जाणून घ्या :
  • नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सोमवारी पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. राष्ट्रपती भवनात पद्म भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात धोनी जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आला तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला. कारण धोनी यावेळी लष्कराच्या वर्दीमध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी आला होता. तेव्हा बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केले की, लष्कराच्या वर्दीमध्ये धोनी कसा काय हा पुरस्कार स्वीकारू शकतो.

  • धोनीने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवर पद्म भूषण पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये धोनीने लिहीले आहे की, " पद्म भूषण पुरस्कार मिळणे, हा माझा बहुमान आहे आणि हा पुरस्कार लष्कराच्या वर्दीमध्ये स्वीकारताना माझा आनंद दहा पटीने वाढला आहे. या वर्दीमध्ये राहून देशाची सेवा करणाऱ्या जवानांचे धन्यवाद. तुमच्यामुळेच देशातील जनता सुरक्षित राहू शकते. "

  • पद्म भूषण हा देशातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. यापूर्वी धोनीला 2007 साली राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर 2009 साली धोनीला पद्मश्री पुरस्काने गौरवण्यात आले होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८८२: ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या .

  • १९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.

  • १९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.

  • १९६८: जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.

  • १९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.

  • १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

जन्म

  • १८२३: जर्मन-ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सीमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १९ नोव्हेंबर १८८३)

  • १८४२: फ्रेंच गणिती एडवर्ड लुकास यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८९१)

  • १८९३: पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै१९८५)

  • १९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४)

  • १९०२: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं नारायणराव व्यास यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल १९८४)

  • १९२६: अॅमवे कंपनी चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.

  • १९३३: डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी यांचा जन्म.

  • १९७३: भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.

मृत्यू

  • १६१७: स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक जॉन नेपिअर यांचे निधन.

  • १९२३: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८३४)

  • १९२९: मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक कार्ल बेन्झ यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८४४)

  • १९३१: मिचेलिन टायर कंपनीचे संस्थापक आंद्रे मिचेलिन यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी १८५३)

  • १९६८: नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांची हत्या झाली. (जन्म: १५ जानेवारी १९२९)

  • १९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भत्तो यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९२८)

  • १९८७: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १९११- खुशीनगर, देवरिया, उत्तर प्रदेश)

  • १९९६: संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२०)

  • २०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर यांचे निधन.

  • २०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९४७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.