चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ एप्रिल २०१९

Date : 4 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्राच्या पर्यटकांना काश्मीरच्या पायघडय़ा :
  • समाजमाध्यमांवरील विद्वेषी प्रचाराने  पर्यटन व्यवसाय अडचणीत येऊ नये यासाठी काश्मीरमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधून येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल व्यावसायिकांनी तब्बल ५० टक्के तर शिकारा, हाऊसबोट चालकांनी पाच टक्क्य़ांपर्यंत सूट दिली आहे.

  • काश्मीरमध्ये येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी महाराष्ट्र, गुजरातसारख्या पर्यटकांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे.  मात्र पुलवामा हल्ला आणि त्यानंतरच्या तणावानंतर, समाजमाध्यमांवरून काश्मीर पर्यटनावर बहिष्काराचे आवाहन सुरू झाले. पर्यटनाचा हंगाम असलेल्या वर्षांच्या सुरुवातीच्या पहिल्या तीन महिन्यांतच देशांतर्गत पर्यटकांचा ओघ त्यामुळे रोडावला. विदेशी पर्यटकांचा ओघ वाढतच असला तरी रोडावणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांमध्ये या दोन राज्यांच्या पर्यटकांमधील घट चिंताजनक असल्याचे मानत काश्मीरमधील हॉटेल व्यावसायिक आणि शिकारा, हाऊसबोट चालकांनी हे अभिनव पाऊल उचलले आहे.

  • काश्मीरमधील नेमकी स्थिती काय आहे, येथील वातावरण प्रत्यक्षात कसे आहे याचा सकारात्मक प्रसारही समाजमाध्यमांवर व्हावा, यासाठी प्रशासनानेही तंत्रस्नेही योजना हाती घेतल्या आहेत. या योजनांद्वारे समाजमाध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या ‘अफवां’नी राज्यातील पर्यटक तसेच त्यांच्या सेवेतील स्थानिक व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये म्हणून त्या अफवा रोखणारे ‘व्हायरल सच’ही प्रसारित होणार आहे.

  • यासाठी फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या माध्यमांवरील वावर वाढवितानाच अनुचित घटनेची योग्य माहिती,  त्यानंतरचे दिशा-प्रवास मार्गदर्शन प्रवास प्रतिनिधी, प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्या (ट्रॅव्हल एजंट/टूर ऑपरेटर) तसेच स्थानिक पातळीवर निवास व्यवस्था पुरविणाऱ्या हाऊसबोट, हॉटेलचालकांपर्यंत पर्यटकांना पोहोचविण्यात येणार आहे.

महिलांविषयक विधानांवरील कारवाईसाठी पाठपुरावा आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे :
  • महिलांबाबत अवमानास्पद विधाने करून प्रचाराची दिशा भरकटवणे, त्यानंतर त्याबद्दल माफी मागणे आणि त्याबाबतच्या बातम्या पसरवून विषय सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवणे हा औचित्यभंग असून हे कोणत्याही पक्षांतील महिलांबाबत झाले तरी निषेधार्हच आहे. निवडणूक काळात घडणाऱ्या अशा घटनांचा निवडणुका संपल्यानंतर पाठपुरावा करण्यात आला तर अशा प्रकरणांना काही प्रमाणात खीळ बसेल, अशी शक्यता शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी व्यक्त केली.

  • पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे यांनी स्मृती इराणी यांच्याबाबत केलेल्या अवमानास्पद विधानावर, तसेच निवडणूक काळात महिलांबाबत होणाऱ्या अपशब्दांच्या वापराबाबत डॉ. गोऱ्हे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

  • डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,की ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कवाडे यांनी वादग्रस्त विधान केले त्या उमेदवाराला कायदेशीर नोटीस देणे, स्पष्टीकरण मागणे तसेच त्या उमेदवारावर आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे अशी कार्यवाही व्हायला हवी. जाहीरपणे अशी वक्तव्य करणे हे निवडणूक प्रचाराचा भाग असल्याने निवडणूक आयोगाने त्याची दखल घेणे आवश्यक आहे. निवडणुकांदरम्यान घडणाऱ्या अवैध गोष्टी, बेताल विधाने या गुन्ह्य़ांबाबत निवडणुकीनंतर देखील पाठपुरावा होणे गरजेचे आहे, अशी विधाने केल्यानंतर प्रसिद्धी मिळते हा समज होणे धोकादायक आहे.

युवकांचे पुण्यात ‘मोदी २.०’ अभियान :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विविध क्षेत्रांतील पाचशे युवकांनी एकत्र येत  ‘मोदी २.०’ हे अभियान सुरू केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक, प्राध्यापक, शिक्षक, गृहिणींचाही या अभियानात सहभाग आहे. या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

  • केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विविध योजना समाजमाध्यमातून (फेसबुक, ट्वीटर, यु-टय़ूब) प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविणे, शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी जनजागृती अभियान राबविणे, नवमतदारांनी मतदान करावे यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम घेणे, मॉल्स आणि चित्रपटगृहांमध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम करणे, ठिकठिकाणी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमांचे आयोजन करून ‘पुन्हा एकदा मोदी’ या प्रचार मोहिमेची व्याप्ती वाढविली जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

  • दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (६ एप्रिल) संध्याकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील शहर कार्यालयात स्नेहमेळावा आणि चहापानाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्रीमंत :
  • लोकसभा निवडणुकीतील दोन प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष मराठवाडय़ातील. दोघांची राजकारणाची पद्धत निराळी. लोकसंग्रह गोळा करण्याची हातोटीही वेगळी. पण सहकार आणि ग्रामीण भागातील माणसाची नस दोन्ही नेत्यांना माहीत. मतदारसंघ बांधलेले असले तरी तरी दोन्ही मतदारसंघात रोष कधी वाढेल हे गणित सांगता येत नाही. मात्र, दरवेळी या दोन्ही नेत्यांना मतदारांवर प्रभाव टाकण्यात यश येते.

  • भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाचव्यांदा निवडणूक लढवित असून त्यांच्या कुटुंबाची संपत्ती ११ कोटी ५२ लाख ८ हजार एवढी आहे. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कुटुंबाकडे २२ कोटी, ५३ लाख ६६ हजार ४४२ रुपयांची संपत्ती आहे. राजकारणाव्यतिरिक्त अशोक चव्हाण यांची गॅस एजन्सी आहे आणि रावसाहेब मात्र शेती आणि समाजकार्य करतात, असे त्यांच्या शपथपत्रावरुन दिसून येते.

  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची ही पाचवी निवडणूक. बोलण्यातील इरसालपणामुळे मतदारसंघात आतापर्यंत लोकप्रिय असणारे दानवे यांच्या बोलण्या आणि न बोलण्याच्या वृत्तीमुळेच मतदारसंघात नाराजी होती. त्याचा राजकीय फायदा अर्जून खोतकर यांनी घ्यावा, अशी कॉंग्रेसची इच्छा होती. मात्र, तसे घडले नाही.

  • रावसाहेबांविषयी अनेक किस्से मतदारसंघात आहेत. त्यांचे अनेक व्यावसाय असल्याचेही सांगण्यात येते. मात्र, शपथपत्रातून त्या चर्चेला पूर्ण विराम मिळत आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे निवडणुकीपूर्वी असणारी रोकड आहे तीन लाख दोन हजार ७६४ तर पत्नी निर्मला यांच्या नावावर रोख रक्कम अधिक आहे ती चार लाख २५ हजार २५७ एवढी. वेगवेगळय़ा बॅंकामध्ये खाते असणाऱ्या रावसाहेब दानवे यांची स्थावर मालमत्त आहे दोन कोटी आठ लाख ६५ हजार ५००  रुपयांची. त्यांच्या पत्नीच्या नावे ६१ लाख ६७ हजार ५०० एवढी आहे.

वैद्यकीय आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत १० टक्के सवर्ण आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका :
  • मुंबई : केंद्र सरकारने खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांना जाहीर केलेला 10 टक्के सवर्ण आरक्षणाचा कोटा वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेमध्ये लागू करु नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.

  • यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र उच्च न्यायालयात सुनावणी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्यात येईल, असे याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाला सांगितले. त्यामुळे गुरुवारी यावर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राआधी गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांनी हा 10 टक्के सवर्ण कोटा जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सध्या राज्यातील आरक्षण 78 टक्क्यांवर गेलं आहे.

  • वैद्यकीय क्षेत्रातील काही विद्यार्थ्यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत केलेल्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

फेक न्यूज थांबवण्यासाठी व्हॉट्सअॅपचं मोठं पाऊल, 'चेकपॉईंट टिपलाईन' लॉन्च :
  • नवी दिल्ली : फेक न्यूज, फोटो आणि फेक मेसेजेस आणि खोट्या माहितीच्या प्रसारामुळे सातत्यांने टीकेचे धनी झालेल्या व्हॉट्सअॅपने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने 'चेकपॉईंट टिपलाईन' (Checkpoint Tipline) लॉन्च केले आहे. 'चेकपॉईंट टिपलाईन'च्या मदतीने युजर्सना त्यांना मिळालेला मेसेज अथवा माहिती खरी आहे की खोटी याबाबत खात्री करुन घेता येईल.

  • आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी खोट्या बातम्या आणि खोट्या माहितीपासून युजर्सना दूर ठेवणे हे समाज माध्यमांपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. गेल्या काही दिवसांपासून फेसबुककडून त्यासाठी विशेष उपायजोजना राबवल्या जात असताना फेसबुकने स्वतःच्याच मालकीच्या व्हॉट्सअॅपसाठीदेखील महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत.

  • व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकने याबाबत म्हटले आहे की, भारतातल्या स्किलिंग स्टार्टअप PROTO ने टिपलाईन लॉन्च केले आहे. या टिपलाईनद्वारे एक डेटाबेस तयार केला जाईल. याद्वारे निवडणुकांदरम्यान फेक न्यूज आणि माहितीचा अभ्यास केला जाईल. त्यामुळे खोट्या माहितीचा प्रसार थांबवणे व्हॉट्स्अॅपसाठी सोपे जाईल.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८८२: ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या .

  • १९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.

  • १९६८: जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.

  • १९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.

  • १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

जन्म 

  • १८४२: फ्रेंच गणिती एडवर्ड लुकास यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८९१)

  • १८९३: पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९८५)

  • १९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४)

  • १९०२: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं नारायणराव व्यास यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल १९८४)

  • १९२६: अॅमवे कंपनी चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.

  • १९३३: डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी यांचा जन्म.

  • १९७३: भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६१७: स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक जॉन नेपिअर यांचे निधन.

  • १९२३: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८३४)

  • १९२९: मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक कार्ल बेन्झ यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८४४)

  • १९३१: फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी १८५३)

  • १९६८: नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांची हत्या झाली. (जन्म: १५ जानेवारी १९२९)

  • १९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भत्तो यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी१९२८)

  • १९८७: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १९११- खुशीनगर, देवरिया, उत्तर प्रदेश)

  • १९९६: संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२०)

  • २०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर यांचे निधन.

  • २०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९४७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.