चालू घडामोडी - ०४ डिसेंबर २०१७

Date : 4 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना मिळणार तांत्रिक अर्हतेत सूट :
  • गडचिरोली : नवनिर्मित नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये मंजूर आकृतीबंधातील राज्यस्तरीय संवर्गातील पदे वगळता उर्वरित पदांवर जुन्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात तांत्रिक अर्हतेची अडचण येत आहेत. ती दूर करण्यासाठी ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना तांत्रिक अर्हतेत पूर्णपणे सूट तर ५० वर्षाखालील कर्मचाऱ्यांना समावेशनानंतर ३ वर्षेपर्यंत तांत्रिक अर्हता प्राप्त करण्याची सूट देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

  • राज्यात तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत असलेल्या प्रत्येक तालुका मुख्यालयांचे नगर पंचायतीत रुपांतर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. याबाबतच्या प्रथम उद्घोषणेपूर्वी रितसर प्रक्रियेने ग्रामपंचायतमध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नगर पंचायतीत समायोजित करायचे होते. परंतु तांत्रिक अर्हतेमुळे (एमएस-सीआयटी, टंकलेखन) त्यांचे समावेशन होऊ शकले नाही.

  • याबाबत कर्मचारी संघटनांची निवेदने आणि विभागीय स्तरावरून प्राप्त अहवालानुसार तांत्रिक अर्हतेत सूट देण्याचा निर्णय ३० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला.

  • त्यानुसार ५० वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक अर्हतेतून सूट तर ५० पेक्षा कमी वय असणाऱ्यांना समावेशनानंतर ३ वर्षाच्या आत तांत्रिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ते सादर न केल्यास त्यांचे समावेशन रद्द होणार आहे.

दिल्ली परिसराची ‘युवा भूषण’ स्पर्धा संपन्न :
  • नवी दिल्ली : युवक बिरादरीची नॉयडा शाखा व मराठवाड्यातील महात्मा गांधी मिशनचे नॉयडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या विद्यमाने दिल्ली परिसरात युवा भूषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार पियुष सिंग, दुसरा पुरस्कार संजीवनी सिंग व तृतिय पुरस्कार अवनी चंद यांना मिळाला.

  • दिल्ली आकाशवाणीचे माजी वक्ते व ख्यातनाम लेखक उमाकांत खुबाळकर यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी या ३ विजेत्यांना मुंबईत पाठवले जाणार आहे.

  • पद्मश्री क्रांती शाह यांनी ४५ वर्षांपूर्वी युवक बिरादरीची स्थापना केली. विविध राज्यात रचनात्मक समाजसेवेची चळवळ म्हणून बिरादरी ओळखली जाते. मुंबईत युवक बिरादरीच्या उपक्रमात सक्रिय असलेल्या सुचित्रा गायकवाड यांनी दिल्लीत वास्तव्याला आल्यानंतर ५ वर्षांपूर्वी येथे युवक बिरादरीच्या शाखेची स्थापना केली.

  • इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून आयोजित केलेली युवा भूषण ही राष्ट्रीय स्पर्धा हा या उपक्रमाचाच एक भाग होता. लोकमतचे दिल्लीचे संपादक सुरेश भटेवरा यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

मुंबईच्या ईटीसीला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार :
  • अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महापालिकेच्या अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राला (ईटीसी) 3 डिसेंबर रोजी 'सर्वोत्कृष्ट संस्था' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

  • नवी दिल्लीतील विज्ञान भवनातील शानदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त डॉ. एन.रामास्वामी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

  • पुरस्कार प्रदान केल्यावर राष्ट्रपती कोविंद यांनी नवी मुंबई महापालिकेच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी विशेषता असते. ती ओळखून आपण त्यावर भर दिला पाहिजे, असे सांगतानाच कोविंद यांनी दिव्यांगांमधील विशेषतांचा सन्मान होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पुरस्कारप्राप्त संस्थांचे कौतुक करत त्यांचे कार्य इतरांसाठी प्रोत्साहन देणारे ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

  • केंद्रीय मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्था, दिव्यांग कर्मचारी, दिव्यांगांसाठी आदर्श व्यक्ती, संशोधन करणाऱ्या संस्था अशा विविध 52 श्रेणींमध्ये व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देण्यात आले.

  • तसेच यात दिव्यांगांचे भावनिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक पुनर्वसनाकरिता कार्य करणारी देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या ईटीसी केंद्राला गौरवण्यात आले.

राज्यात ३० हजार कोटींचे रस्ते पहिल्यांदाच; सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती :
  • अमरावती : सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

  • येथील मुख्य अभियंता कार्यालयाच्या सभागृहात रविवारी या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांची त्यांनी बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. यावेळी रस्त्यांचा १० हजार किमींचा होत असलेल्या रस्त्याचा आढावा व हायब्रीड तत्त्वावरील रस्त्यांचाही त्यांनी माहिती घेतली.

  • 'राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये मी आढावा घेत आहे. जेई टुु ईई यांच्या समस्या व त्यांना काम करताना येत असलेली अडचण मी जाणून घेत आहे', असे ना.पाटील म्हणाले. रस्त्यांची ईफिसिएन्सी व लॉयल्टी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा करण्यात येत आहे.

  • महाराष्ट्रात यापूर्वी ५ हजार किमीचे नॅशनल हायवे होते. गेल्या तीन वर्षांत दिल्लीत पाठपुरवा करून ते २२ हजार किमीचे नॅशनल हायवे मंजूर करवून घेतले. २२ हजार किमीच्या नॅशनल हायवेला १ लाख ६ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी २० हजार कोटी आतापर्यंत प्राप्त झाले असून ते पैसे रस्त्यांच्या भूसंपादनासाठी उपयोगात येणार आहेत.

सहा व्दिशतके करणारा विराट पहिला कर्णधार :
  • श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने 238 चेंडूत व्दिशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत 20 चौकारांचा समावेश होता. विराटने 2 डिसेंबर रोजी सामन्याच्या पहिल्या दिवशी कारकिर्दीत 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.

  • विक्रमामागून विक्रम रचणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने 3 डिसेंबर रोजी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये सहावे व्दिशतक झळकावून त्याने सर्वाधिक व्दिशतके करणारा कर्णधार म्हणून आपली ओळख निर्माण केली.

  • भारताकडून सर्वाधिक व्दिशतके करण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग (6 व्दिशतके) यांच्या नावावर होता. विराटने यांची बरोबरी केली आहे.

  • याबरोबरच एकपाठोपाठ एक व्दिशतके करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विनोद कांबळीने 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध 224 आणि झिंबाब्वेविरुद्ध 227 धावा केल्या होत्या.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • भारतीय नौसेना दिन

महत्वाच्या घटना

  • १७९१: द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.

  • १८२९: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.

  • १९२४:  गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.

  • १९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.

  • १९७१: भारत पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय आरमाराने कराची वर हल्ला केला.

  • १९९१: पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

  • १९९३: उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

  • १९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

जन्म

  • १८५२: रशियन भौतिकशास्त्रज्ञ ओरेस्ट ख्वोल्सन यांचा जन्म.

  • १८६१: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हंगेस हफस्टाइन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९२२)

  • १९१०: भारताचे माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००९)

  • १९१०: आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९६५)

  • १९१६: पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख बळवंत गार्गी यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २००३ – मुंबई)

  • १९१९: भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म.

  • १९३२: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह तै-वू यांचा जन्म.

  • १९३५: पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक शंकर काशिनाथ बोडस यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९९५)

  • १९४३: मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म.

मृत्य

  • १८५०: विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन. (जन्म: २२ मे १७८३)

  • १९०२: डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८५१)

  • १९७३: कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १८९३)

  • १९७५: जर्मन तत्त्वज्ञ आणि लेखक हाना आरेंट यांचे निधन.

  • १९८१: मराठी चित्रकार ज. ड. गोंधळेकर यांचे निधन.

  • २०००: सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान हेन्क अर्रोन यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १९३६)

  • २०१४: भारतीय वकील आणि न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर१९१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.