चालू घडामोडी - ०४ फेब्रुवारी २०१८

Date : 4 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महामस्तकाभिषेक सोहळ्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन :
  • सांगली : श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाची तयारी जोराने सुरू आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत महोत्सवाला सुरुवात होत आहे.

  • श्रवणबेळगोळ येथे दर बारा वर्षांनी भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा होत असतो. यंदा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेअकरा वाजता राष्ट्रपती कोविंद श्रवणबेळगोळ येथे येणार आहेत. त्यानंतर तासभर ते महोत्सवात सहभागी होतील, असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.

  • सांगली, कोल्हापूर, बेळगाव, चिक्कोडी, बोरगाव, बेडकीहाळ या परिसरातून शेकडो टन धान्य व इतर साहित्य आहारासाठी पाठविण्यात आले. सांगलीच्या मार्केट यार्डातून ८० टन धान्य रवाना झाले. यात बेदाणा, मिरची पावडर, खपली गहू, तांदूळ, डाळी, तेलाचा समावेश आहे. सन्मती संस्कार मंचानेही\ गावागावातून तीन टन धान्य जमा करुन पाठवले.

  • श्रवणबेळगोळ येथे आहार साहित्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वतिश्री चारुकीर्ती भट्टारक महास्वामी, महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील, भोजन विभागाचे प्रमुख विनोद बाकलीवाल उपस्थित होते. दोन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. श्रवणबेळगोळ येथील सर्व जैन मंदिरांमध्ये जैन तिर्थंकरांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आले. शनिवारी गुरूपूजा करण्यात आली. रविवारी भगवान आदिनाथ पंचकल्याण महोत्सवांतर्गत यक्ष-यक्षी, षोडशोपचार पूजा होणार आहे.(source : Lokmat)

पंतप्रधान मोदींचे विद्यार्थ्यांना धडे, 'एक्झाम वॉरियर्स' पुस्तक प्रकाशित :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विद्यार्थ्यांना धडे देणार आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं आज प्रकाशन करण्यात आलं. एक्झाम वॉरियर्स असं या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये परीक्षेच्या काळात तणावाला कसं दूर ठेवता येईल याबाबत त्यात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

  • इंग्रजीव्यतिरिक्त भारतातील विविध भाषेत पुस्तक उपलब्ध होणार आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना जास्त मार्गदर्शन करणारं ठरणार आहे. पेंग्विन ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.

  • पेंग्विनद्वारे या पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात आलं आहे. यात लहान मुलांच्या चित्रासोबत नरेंद्र मोदींचंही चित्र दाखवण्यात आलं आहे. (source :abpmajha)

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ने विकासाला गती,  कोट्यवधींचे गुंतवणूक करार होणार :
  • मुंबई : तीन दिवसांच्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८’ या परिषदेत राज्यात कोट्यवधी रुपयांच्या औद्योगिक गुंतवणुकीचे करार होणार आहेत. १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान होणा-या या परिषदेत राज्याच्या चौफेर प्रगतीच्या दृष्टीने चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जवळपास दररोजच आढावा घेत आहेत. या परिषदेच्या निमित्ताने नामवंत कंपन्या गुंतवणुकीसाठीचे करार करणार आहेत. काही प्रकल्पांसाठी जमीन देण्यासंदर्भात करार होतील. काही प्रकल्पांच्या प्रत्यक्ष उभारणीची घोषणा होणार आहे.

  • त्यात रत्नागिरी रिफायनरी, रिलायन्स जिओचा प्रकल्प, प्रवासी रेल्वे डब्यांचा लातूरमधील प्रकल्प, रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेड, अ‍ॅमेझॉन, जेएनपीटीमधील कृषी निर्यात हब, ब्रिटानिया कंपनी, जिनस पेपर, लॉयड स्टील, महिंद्र इलेक्ट्रिकल व्हईकल, होरिबा कंपनी आदींचा समावेश आहे.(source :Lokmat)

वय वर्षे 18, पृथ्वी शॉ विश्वचषक जिंकणारा सर्वात युवा कर्णधार :
  • माऊंट मॉन्गानुई/ न्यूझीलंड : अंडर-19 विश्वचषकावर भारताने चौथ्यांदा नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाच्या 217 धावांचं आव्हान टीम इंडियाने अवघ्या 38.5 षटकातच पूर्ण केलं. मनजोत कालरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात कांगारुंवर तब्बल 8 गडी राखून मात केली.

  • मनजोतन 101 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. भारताने याआधी 2000, 2008 आणि 2012 साली अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोतने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र पृथ्वी शॉ 29 धावांवर बाद झाला. अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी पृथ्वी शॉने एक मोठा विक्रम नावावर केला.

  • अंडर-19 विश्वचषक जिंकणारा पृथ्वी शॉ सर्वात कमी वयाचा कर्णधार बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शच्या नावावर होता.

  • पृथ्वीने हा विक्रम 18 वर्षे, 2 महिने आणि 27 दिवस या वयात केला. मार्शने 2010 साली विश्वचषक जिंकला होता. तेव्हा त्याचं वय 18 वर्षे, 2 महिने आणि 12 दिवस एवढं होतं. यानुसार पृथ्वी आता जगातील सर्वात कमी वयाचा कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्त्वात अंडर-19 विश्वचषक जिंकता आला.

  • यापूर्वी भारताने विराट कोहली, मोहम्मद कैफ आणि उन्मुक्त चंद यांच्या नेतृत्त्वात विश्वचषक जिंकला होता. मात्र पृथ्वी शॉ त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे.(source :abpmajha)

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश भिल अखेर सापडला...
  • मुक्ताईनगर (जि.जळगाव) - राष्ट्रीय बालशौर्य पदक विजेता आणि गेल्या नऊ महिन्यापासून बेपत्ता असलेला निलेश रेवाराम भिल्ल हा गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे सापडला आहे.  सध्या तो ‘चाईल्ड लाईन’ या स्वयंसेवी संस्थेच्या वसतीगृहात आहे. शनिवारी दुपारी या संस्थेने  मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधून निलेशबाबत माहिती दिली.

  •  कोथळी ता. मुक्ताईनगर येथून  १६ मे २०१७ पासून निलेश बेपत्ता झाला होता. कोथळी येथे मुक्ताईच्या जलाशयात वफुली (ता. जि.   बुलढाणा)  येथील भाविक ओंकार उगले यांचा मुलगा भागवत हा अंघोळीसाठी गेला होता. त्याचवेळी घाटावरील पायºयांवरून पाय घसरून भागवत हा जलाशयात पडला. तो खोल पाण्यात बुडत असताना निलेशने पाण्यात उडी टाकून त्याचे प्राण वाचवले होते.  ३० ऑगस्ट २०१५ रोजी ही घटना  घडली होती. या शौर्याबाबत त्याला २६ जानेवारी २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बालशौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

  • बक-या चारल्या नाही व त्या उपाशी राहिल्या म्हणून बाबा  रागावतील या भीतीने निलेश भिल्ल व त्याचा लहान भाऊ गणपत याने १६ मे २०१७ रोजी घर सोडले होते. त्या दिवसापासून या दोघा भावंडांचा शोध सुरु झाला.

  • अल्पवयीन असल्याने पोलिसांनीही दक्षता बाळगत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश  भिल्ल बेपत्ता होणे हे प्रकरण प्रशासनासमोर आव्हान बनले होते. २१ मे २०१७ रोजी पंतप्रधान कार्यालयाकडूनसुद्धा याबाबत माहिती घेण्यात आली होती.(source :Lokmat)

‘ट्रिपल तलाक’विरोधात मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच सज्ज, विवाहाच्या वराकडून लिहून घेणार :
  • लखनौ : तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हणून पत्नीला घटस्फोट देणाºया मुस्लीम समाजातील प्रथेविरुद्ध कायदा करण्याची संपूर्ण तयारी केंद्र सरकारने केली असतानाच, आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने निकाहनाम्यात दुरुस्ती करणार असल्याचे जाहीर केले आहे. विवाहाच्या वेळीच वराकडून ‘तिहेरी तलाक’ देणार नसल्याचे वचन निकाहनाम्यात लेखी घेण्यात येईल, असे बोर्डाने म्हटले आहे.

  • तिहेरी तलाकची प्रथा सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी आॅगस्टमध्येच बेकायदा ठरविली. सरकारनेही तिहेरी तलाक देणे फौजदारी गुन्हा ठरविणारा कायदा करण्याची तयारी केली आहे. संसदेच्या या अधिवेशनात हा कायदा संमत होण्याची शक्यता आहे.

  • त्याआधीच पर्सनल बोर्डाचे प्रवक्ते मौलाना खलील उर रेहमान सज्जाद नोमानी यांनी सांगितले की, आम्ही निकाहनाम्यात तिहेरी तलाकविरोधी तरतूद करीत आहोत. निकाहनाम्यातील एका स्तंभात ‘मी पत्नीला तिहेरी तलाक देणार नाही’, असे लिहिलेले असेल. त्यावर वराने होयची खूण केल्यास त्याला पत्नीला तिहेरी तलाक देता येणार नाही.

  • ते म्हणाले की, बोर्डाच्या ९ फेब्रुवारी रोजी होणाºया बैठकीत या सुधारणेवर विचार केला जाईल. केंद्राच्या कायद्यास पर्सनल लॉ बोर्डाने विरोध केला आहे. आम्ही तिहेरी तलाकच्या विरोधात आहोत. मात्र कायद्याला आमचा विरोध आहे, कारण हा कायदा मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप करणारा आहे.(source :Lokmat)

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक कर्करोग दिन

महत्वाच्या घटना

  • १६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.

  • १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.

  • १९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.

  • १९४४: चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.

  • १९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान.

  • २००४: मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.

जन्म

  • १८९३: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६०)

  • १९०२: धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४)

  • १९२२: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी २०११)

  • १९३८: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज यांचा जन्म.

  • १९७४: चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा जन्म.

मृत्यू

  • १६७०: नरवीर तानाजी मालुसरे यांचे निधन.

  • १८९४: सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अ‍ॅडोल्फ सॅक्स यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४)

  • १९७४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९४)

  • २००१: क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंकज रॉय यांचे निधन. (जन्म: ३१ मे १९२८)

  • २००२: चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९१३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.