चालू घडामोडी - ०४ फेब्रुवारी २०१९

Updated On : Feb 04, 2019 | Category : Current Affairsकोण आहेत 'ते' अधिकारी ज्यांच्यासाठी ममता बॅनर्जींनी पुकारलंय धरणे आंदोलन :
 • नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलीस, असा उघड-उघड संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकात धरणे आंदोलन सुरू केले. रविवारी संध्याकाळी (3 फेब्रुवारी) केंद्रीय अन्वेषण विभागानं कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापेमारी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरुन मोठा वादंग निर्माण झाला.

 • शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांच्या तपासात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या सीबीआय पथकाला स्थानिक पोलिसांनी आयुक्तांच्या सरकारी निवासस्थानाबाहेरच रोखले आणि  त्यांना शेजारच्या पोलीस ठाण्यात नेऊन अडकवून ठेवले. या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याच्या वृत्ताने परिसरात तणाव वाढला.  

 • या सर्व घडामोडींदरम्यान, खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरल्या. बॅनर्जी यांनी सुरुवातीस राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आणि त्यानंतर कोलकाता शहराच्या मध्यवर्ती मेट्रो सारणी भागात त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. याठिकाणी राजीव कुमारदेखील धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मालिका ४-१ ने जिंकली :
 • वेलिंग्टन : रोहित शर्माच्या टीम इंडियानं वेलिंग्टनच्या पाचव्या वन डेत न्यूझीलंडचा 35 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडला विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर न्यूझीलंडचा अख्खा डाव 217 धावांत आटोपला.

 • भारतीय संघानं या विजयासह पाच वन डे सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. भारताकडून यजुवेंद्र चहलनं तीन, तर मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी दोन तर भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवनं प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

 • टीम इंडियानं वेलिंग्टनच्या पाचव्या वन डेत न्यूझीलंडला विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यात भारतीय संघानं 50 षटकांत सर्वबाद 252 बाद धावांची मजल मारली होती. अंबाती रायुडूनं विजय शंकरच्या साथीनं 98 धावांची आणि केदार जाधवच्या साथीनं 74 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाची उभारणी केली होती. शेवटी हार्दिक पंड्याने केलेल्या जोरदार फटकेबाजीमुळे भारताच्या डावाला आकार मिळाला होता.

 • या सामन्यात न्यूझीलंडच्या हेन्री निकोलस आणि ट्रेण्ट बोल्टनं टीम इंडियाची चार बाद 18 अशी दाणादाण उडवली होती. त्या कठीण परिस्थितीत अंबाती रायुडू आणि विजय शंकरनं संयमानं खेळ करून भारतीय डावाला आकार दिला होता. विजय शंकरचं अर्धशतक पाच धावांनी, तर रायुडूचं शतक दहा धावांनी हुकलं. रायुडूनं नव्वद धावांच्या खेळीला आठ चौकार आणि चार षटकारांचा साज चढवला.  त्याला विजय शंकरने 45 तर केदार जाधवने 34 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. शेवटी हार्दिक पंड्याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह 45 धावांची खेळी केली होती.

जम्मू काश्मीरमध्ये पाच नवी वैद्यकीय महाविद्यालये :
 • जम्मू काश्मीरमध्ये नवीन पाच वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यासाठी केंद्र शासनाने ७५० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी येथील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यात ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन यांचा त्यात समावेश आहे.

 • जम्मू परिसरात सुसज्ज एम्स रुग्णालयाची सुविधा निर्माण व्हावी, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक रहिवासी आंदोलन करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या वतीनेही आंदोलने करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर रविवारच्या सोहळ्यात पंतप्रधानांनी सुसज्ज रुग्णालयामध्ये जम्मूवासीयांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतील, असे सांगितले. या प्रस्तावित रुग्णालयात ७०० खाटांची सुविधा असणार आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या उत्तर विभागीय केंद्राचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

 • काँग्रेसची कर्जमाफी निवडणूक जिंकण्यापुरतीच - काँग्रेसची शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच करते. २००८-०९ मध्ये शेतकऱ्यांचे ६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. प्रत्यक्षात मात्र सत्तेत आल्यावर फक्त ५२ हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात आले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे बोलताना केला.

भारतीय महिलांची आयर्लंडवर मात :
 • भारतीय महिलांच्या हॉकी संघाने स्पेन दौऱ्याची सांगता करताना विश्वचषक उपविजेत्या आयर्लंड संघाला ३-० असे नमवत दमदार कामगिरीची नोंद केली.

 • भारताने आयर्लंडशी शनिवारी झालेल्या सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली होती, तर रविवारी मोठय़ा फरकाने विजय मिळवण्यात भारताला यश मिळाले. भारताच्या आक्रमक फळीने आयर्लंडवर प्रारंभापासूनच धारदार आक्रमणे केली. त्या दबावामुळेच भारताच्या नवजोत कौरला १३व्या मिनिटाला पहिला गोल करता आला. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला. मग पहिल्या सत्रानंतरदेखील भारताने हल्ले-प्रतिहल्ले कायम राखत आयर्लंडवर दडपण आणले. दुसऱ्या सत्रात आयर्लंडच्या संघाला मिळालेला एक पेनल्टी कॉर्नरदेखील भारतीय बचावफळीने सफल होऊ दिला नाही.

 • दुसऱ्या सत्रात रिना खोकरने दीप ग्रेस एक्काच्या पासवर चपळाईने गोल करीत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. भारतीय संघ अत्यंत शिस्तबद्ध खेळासह आक्रमण आणि बचाव करीत होता. मात्र मध्यंतरानंतरच्या तिसऱ्या सत्रात आयर्लंडच्या महिलांना पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली; परंतु भारतीय बचावपटूंनी त्यांचा दुसरा प्रयत्नदेखील व्यर्थ ठरवला.

 • अखेरच्या सत्रात दोन्ही बाजूंनी धारदार आक्रमणे झाली. त्यात गुरजित कौरने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल साकारत भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. गुरजितने या दौऱ्यात सर्वाधिक गोल केले. यापूर्वी भारताने स्पेनविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली होती.

'या' राज्यांमध्ये सीबीआयला 'नो एंट्री'; सीएम-पीएम वादाची पार्श्वभूमी :
 • नवी दिल्ली/कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये सीबीआय आणि कोलकाता पोलीस आमनेसामने आले आहेत. शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. त्यामुळे मोठं रणकंदन माजलं.

 • भाजपा आणि तृणमूलच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे वैध कागदपत्रं नसल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला. त्यानंतर त्यांनी रात्रभर धरणं आंदोलन केलं. आज सकाळीही हे आंदोलन सुरूच आहे. त्यांच्या या आंदोलनाला काँग्रेससह अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. 

 • सीबीआयच्या कारवाईमुळे ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सीबीआयला प्रवेश बंदी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ममता यांनी हा निर्णय घेतला.

 • मोदी सरकार सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांचा वापर स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे सीबीआयला राज्यात येऊन चौकशी करायची असल्यास, त्यांनी त्यासाठी परवानगी घ्यावी, असा आदेश बॅनर्जी यांनी दिला. मात्र न्यायालयाची सूचना असल्यास राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १६७०: सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.

 • १७६६: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.

 • १९१९: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.

 • १९४८: गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.

 • १९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.

 • १९५८: ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.

 • १९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.

 • २००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.

 • २००४: पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.

जन्म 

 • १७८८: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट पील यांचा जन्म.

 • १८४०: डनलप रबर चे सहसंस्थापक जॉन बॉईड डनलप यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९२१)

 • १९०५: स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)

 • १९१४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४)

 • १९३३: लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९२०: आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली. (जन्म: १४ सप्टेंबर १८६७)

 • १९२७: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १८८२)

 • २०००: गायिका कालिंदी केसकर यांचे निधन.

 • २००३: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे यांचे निधन.

टिप्पणी करा (Comment Below)