चालू घडामोडी - ०४ जानेवारी २०१८

Date : 4 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लेह-श्रीनगर केवळ १५ मिनिटांत, आशियातील सर्वात मोठ्या बोगद्याला मंजुरी :
  • नवी दिल्ली-  आशियातील दोन्ही बाजूंनी कार्यरत राहू शकणारा सर्वात मोठा 'झोजी ला' खिंड बोगदा बांधण्यास केंद्र सरकारच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. या बोगद्याला ६,०८९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे श्रीनगर व लेह या प्रवासासाठी लागणारा वेळ साडेतीन तासांवरून १५ मिनिटांवर येणार आहे.

  • हा बोगदा १४.२ किमी लांबीचा असून त्याच्यामुळे श्रीनगर, कारगिल, लेह यांच्यातील वाहतूक वर्षभर अखंड राहणार आहे. अन्यथा हिवाळ्यात बर्फवृष्टीनंतर त्यांच्यामधील संपर्क तुटतो. या समस्येवर हा बोगदा उत्तम तोडगा होऊ शकतो. पंतप्रधान नेतृत्व करत असलेल्या आर्थिक विषयक कॅबिनेट समितीने या बोगद्याच्या कामाला आज हिरवा कंदील दाखवला.

  • यावर बोलताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, "हा बोगदा दोन्ही बाजूंनी कार्यरत राहू शकणारा आशियातील सर्वात मोठा बोगदा असेल. त्याच्या निर्मितीसाठी ७ वर्षांचा कालावधी लागेल. अत्यंत खडतर भूपृष्ठ रचना व जेथे पारा शून्याच्या खाली ४५ अंश घसरतो तेथे बांधण्यात येणारा हा बोगदा अभियांत्रिकी क्षेत्रातील आश्चर्यच असेल, त्याचे काम यावर्षीच सुरू करण्यात येईल.

  • या बोगद्यामुळे श्रीनगर आणि लेह यांच्यामधील प्रवासाचे अंतर १५ मिनिटांवर येईल.'' 'झोजी ला ' समुद्रसपाटीपासून ११,५८७ फूट उंचीवर आहे. तसेच ती श्रीनगर- कारगिल-लेह महामार्गावर असून, बर्फवृष्टी आणि दरड कोसळण्याने हिवाळ्यात येथील वाहतूक खंडित होते.(source : lokmat)

आयआरबीचे संस्थापक डी.पी.म्हैसकर अनंतात विलीन :
  • डोंबिवली- आयआरबीचे संस्थापक कै.डी.पी.म्हैसकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी येथिल पाथर्ली स्मशान भूमीमधील गॅसदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

  • त्यावेळी त्यांची वीरेंद्र, जयेंद्र ही मुले, पुण्याहून आलेल्या भाची, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार रमेश पाटील, जिमखान्याचे खजिनदार मधुकर चक्रदेव, बांधकाम व्यवसायिक दीपक मेजारी, सचिव डॉ.बाहेकर, म्हैसकर कुटुंबियांचे निकटवर्तीय सी डी प्रधान, भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे, डीएनएस बँकेचे संचालक/अध्यक्ष उदय कर्वे, गणेश मंदिर संस्थानाचे विश्वस्त अच्युत कऱ्हाडकर, हॊटेल बार असो.चे अध्यक्ष अजित शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • म्हैसकर कुटुंबियांच्यावतीने जिमखाना संचालक मंडळ 6 किंवा 7 जानेवारी रोजी शोकसभेचे आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.(source : lokmat)

पाच लाख भारतीयांना फटका :
  • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणाचा अमेरिकेतील भारतीय नागरिकांना फटका बसण्याचे स्पष्ट संकेत आहेत. अमेरिकेत ग्रीनकार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तींना एच १ बी व्हिसा मुदतवाढ न देण्याचा निर्णय अमेरिकी प्रशासन घेण्याची शक्यता आहे. हा निर्णय लागू झाल्यास किमान पाच लाख कुशल भारतीय कर्मचाऱ्यांना अमेरिकेतून मायदेशी परतावे लागेल. यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या या हालचालींविरोधात पडसाद उमटू लागले आहेत.

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीत एच १ बी व्हिसा धोरण कठोर करण्याची भूमिका मांडली होती. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी एच १ बी व्हिसा प्रक्रिया कडक करण्याचा आदेश जारी केला. आता एच १ बी व्हिसाला मुदतवाढ न देण्याची हालचाल सुरू आहे.

  • सध्या तीन वर्षांसाठी वैध असलेल्या एच १ बी व्हिसाला आणखी तीन वर्षे मुदतवाढ दिली जात होती. जर त्यानंतर त्याचा ग्रीन कार्डसाठीचा म्हणजे कायम वास्तव्य करण्याचा अर्ज प्रलंबित असेल तर ग्रीन कार्ड मिळेपर्यंत एच १ बी व्हिसाला मुदतवाढ दिली जात होती. मात्र, ही मुदतवाढ नाकारण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या विचाराधीन असल्याचे वृत्त अमेरिकेतील एका वृत्तसंस्थेने दिले आहे.(source : loksatta)

पाकिस्तानप्रमाणेच पॅलेस्टाइनचीही आर्थिक मदत बंद करू - ट्रम्प यांचा इशारा :
  • वॉशिंग्टन - शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलण्याची इच्छा नसलेल्या पॅलेस्टाइनला अमेरिकेकडून मिळणारी मदत बंद करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

  • ट्रम्प यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, अमेरिका पॅलेस्टाइनला दरवर्षी ३०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक रकमेची मदत करते. मात्र त्याबद्दल पॅलेस्टाइनच्या मनात अमेरिकेविषयी कृतज्ञता वा आदराची भावना असल्याचे दिसत नाही. इस्राएलशी शांतता करार करण्याच्या दृष्टीने चर्चा करावी, अशी पॅलेस्टाइनची इच्छाच नसावी. प्रदीर्घ काळ अशी चर्चा करण्याची मागणी होऊनही पॅलेस्टाइन दुर्लक्ष करीत आहे.

  • जेरुसलेमला इस्राएलच्या राजधानी मानून अमेरिका तिथे आपला राजदूतावास सुरू करेल अशी घोषणा ट्रम्प यांनी गेल्या वर्षी केली होती. त्यामुळे मध्य पूर्वेच्या देशांत व पॅलेस्टिनींमध्ये खळबळ माजली होती. मात्र मदत बंद करण्याबाबत पॅलेस्टिनी नेते मोहम्मद अब्बास म्हणाले की, मध्यपूर्व देशांमध्ये शांतता नांदावी म्हणून ट्रम्प हे महत्त्वाची भूमिका बजावत

  • आहे. पण पॅलेस्टिनची मदत बंद करण्याचा इशारा देऊन ट्रम्प यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. (source : lokmat)

इथे मिळते महिलांनाही पुरुषांइतकेच वेतन :
  • महिला कर्मचा-यांच्या वेतनापेक्षा पुरुषांना जास्त वेतन देणे बेकायदा ठरवणारा जगातला पहिला देश आईसलँड बनला आहे. पुरूष आणि महिला यांना समान वेतन देणारा कायदा एक जानेवारी २०१८ पासून अमलात आला.

  • २५ पेक्षा जास्त कर्मचाºयांची नियुक्ती करणाºया कंपन्यांना त्या समान वेतनाचा कायदा पाळतात, असे सरकारकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. हा कायदा मोडल्यास कंपन्यांना जबर दंड भरावा लागेल. पुरूष आणि महिला यांच्या वेतनातील फरक २०२२ पर्यंत दूर करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनी (८ मार्च) या कायद्याची घोषणा केली गेली होती.

  • आईसलँडीक विमेन्स राईट्स असोसिएशनच्या डॅग्नी ओस्क अराडोट्टीर पिंड म्हणाल्या की, केल्या जाणाºया प्रत्येक कामाचे मूल्यमापन करण्यासाठी कंपन्या आणि संघटनांसाठी हा कायदा म्हणजे मुळात एक यंत्रणा आहे. पुरूष आणि महिला यांना मालक समान वेतन देतो की नाही हे निश्चित झाल्यावर त्यांना या यंत्रणेद्वारे प्रमाणपत्र मिळते.

  • या नव्या कायद्याला संसदेत आईसलँडच्या युती सरकारने पाठिंबा दिला तसेच विरोधकांनीही. संसदेत निम्म्या सदस्य या महिला आहेत.(source : lokmat)

आंतरजोडणीचे नियम निश्चित, दूरसंचार कंपन्यांनी करार करावेत - ट्राय :
  • नवी दिल्ली - दूरसंचार नियामक ट्रायने दूरसंचार कंपन्यांसाठी आंतरजोडण्यासंबंधी (इंटरकनेक्टिव्हिटी) नियम निश्चित केले आहेत. एखाद्या दूरसंचार आॅपरेटरने विनंती केल्यानंतर, ३0 दिवसांच्या आत त्याच्यासोबत ‘नि:पक्षपातीपणाच्या आधारावर’ आंतरजोडणी करार करणे आॅपरेटरांना बंधनकारक करण्यात आले आहे.

  • ट्रायने ‘दूरसंचार आंतरजोडणी नियम २0१८’ नावाने या संबंधीची नियमावली जाहीर केली आहे. यात नेटवर्क जोडणी करार, प्राथमिक पातळीवर कंपन्यांत अशा जोडणींची अधिकृत तरतूद, आंतरजोडण्याचे बिंदू वाढविणे, त्यासाठी लागू असणारे शुल्क, पोर्ट्स जोडणी खंडित करणे आणि आंतरजोडण्यांच्या मुद्द्यावरील वित्तीय स्थिती याविषयी नियम गठीत केलेले आहेत.

  • हे नियम १ फेब्रुवारी २0१८ पासून लागू होणार आहेत. हे नियम भारतात दूरसंचार सेवा देणाºया सर्व आॅपरेटरांना लागू राहणारआहेत. ट्रायने म्हटले की, समोरच्या आॅपरेटरकडून विनंती प्राप्त झाल्यानंतर, ३0 दिवसांच्या आत आंतरजोडणी करार करणे विनंती मिळालेल्या आॅपरेटरसाठी बंधनकारक आहे. त्यात आॅपरेटरला कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा करता येणार नाही.

  • या व्यवस्थेची चौकट आणि आंतरजोडणी पोर्ट्सची संख्या वाढविण्यासाठीची संरचना यात निश्चित करण्यात आली आहे. हे नियम निश्चित करण्यासाठी ट्रायने आॅक्टोबर २0१६ मध्ये सल्लामसलतीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यात थेट चर्चा झाल्या, तसेच संबंधितांकडून लेखी सूचनाही मागविण्यात आल्या.(source : lokmat)

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन

महत्वाच्या घटना

  • १८४७: सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्हॉल्व्हर पिस्तुल विकले.

  • १८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.

  • १९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.

  • १९३२: सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरू यांन दोन वर्षांची शिक्षा झाली.

  • १९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.

  • १९५४: मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९५८: १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.

  • १९५८: स्पुटनिक-१ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर परत उतरला.

  • १९५९: रशियाचे लुना-१ हे अंतराळयान चंद्राजवळ पोहोचले.

  • १९६२: न्यूयॉर्क अमेरिका येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.

  • १९९६: साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.

  • २००४: नासाची मानवरहित स्पिरीट ही गाडी मंगळ ग्रहावर उतरली.

  • २०१०: बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्‍घाटन झाले.

जन्म 

  • १६४३: इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म.

  • १८०९: आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतयार करणारे लुई ब्रेल यांचा जन्म.(मृत्यू: ६ जानेवारी १८५२)

  • १९००: अमेरिकन पक्षीय जेम्स बाँड यांचा जन्म.

  • १९०९: मराठी नवसाहित्यिकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म.

  • १९२४: खासदार, नाटककार, लेखक, उर्दू शायर आणि संपादक विद्याधर गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६)

  • १९२५: हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेते प्रदीप कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २७ आक्टोबर२००१)

  • १९४०: मराठी कादंबरीकार श्रीकांत सिनकर यांचा जन्म.

  • १९४१: केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९)

मृत्य

  • १७५२: स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १७०४)

  • १८५१: दुसरे बाजीराव पेशवे यांचे निधन.

  • १९०७: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचे निधन, सरस्वतीचंद्र हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० ऑक्टोबर १८५५)

  • १९०८: विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत राजारामशास्त्री भागवत यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१)

  • १९६१: नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ आयर्विन श्रॉडिंगर यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८८७)

  • १९६५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन साहित्यिक टी. एस. इलियट यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८८८)

  • १९९४: सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार आर. डी. बर्मन तथा राहुल देव बर्मन तथा पंचमदा यांचे निधन. (जन्म: २७ जून १९३९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.