चालू घडामोडी - ०४ जानेवारी २०१९

Date : 4 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कारांचे आज वितरण :
  • तामिळनाडूतील समुद्र किनाऱ्यावरील वाळूउपशाचा प्रश्न, पंजाबमधील महिला क्रिकेटपटुंच्या मनात रुजत असलेली महत्त्वाकांक्षेची बीजं, आपल्या शहरांच्या स्वच्छतेचा वसा घेतलेल्या कामगारांचं जिणं आणि त्यांच्या जीवनाची अखेर.. या आणि अशाच काही मुद्दय़ांना निर्भीड स्पर्श करणाऱ्या बातम्या आणि छायाचित्रं यांचा १३व्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ या पत्रकारितेतील प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने नवी दिल्लीत आज, शुक्रवारी गौरव केला जाणार आहे.

  • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्याहस्ते देशभरातील वर्तमानपत्रे, नियतकालिके, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांतील १८ विविध गटांत २०१७मध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या २९ पत्रकारांचा गौरव केला जाईल.

  • यावर्षी ‘मी टू’ ही लैंगिक शोषणाविरोधातील चळवळ भारतीय माध्यमांतील बातम्या आणि लेखांच्या केंद्रस्थानी आली होती. वृत्तसृष्टीतील महिलांनीही प्रथमच व्यक्त होत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली होती आणि त्यामुळे एका केंद्रीय मंत्र्यावर पदत्यागाची वेळ आली. त्यामुळे ही चळवळ समजून घेण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी संपादकांची काय जबाबदारी आहे, याबाबत दिशादर्शन करण्यासाठी या समारंभात पुरस्कार वितरणानंतर खास परिसंवाद होणार आहे.

  • ‘मीटू इन द न्यूजरूम : व्हॉट एडिटर्स कॅन अ‍ॅण्ड शुड डू’ या शीर्षकाच्या या परिसंवादात चार महिला संपादकांचा सहभाग लक्षणीय ठरणारा आहे. त्यात ‘द न्यूज मिनट’ या डिजिटल ब्लॉगच्या सहसंस्थापक आणि मुख्य संपादिका धन्या राजेंद्रन, मुंबई मिरर वृत्तपत्राच्या संपादिका मिनल बाघेल, ‘द क्विन्ट’च्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितू कपूर आणि ‘बीबीसी वर्ल्ड सव्‍‌र्हिस’च्या भारतीय भाषक आवृत्तीच्या प्रमुख रुपा झा यांचा समावेश आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या सहायक संपादिका सीमा चिश्ती सूत्रसंचालन करतील. परिसंवादाच्या अखेरीस प्रश्नोत्तराचाही कार्यक्रम होईल.

माल वाहतुकीसह गोदामांच्या व्यवसायातही उतरणार एसटी महामंडळ :
  • मुंबई : एसटी महामंडळ आता माल वाहतूक सेवा सुरु करणार असून गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढविणे आणि त्याचबरोबर लोकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कल्पक उपाय योजना सध्या राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र वाहनांद्वारे माल वाहतूक करणे, विनावापर पडून असलेल्या जागांवर 301 गोदामांची निर्मिती करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार एसटीची माल वाहतूक आणि गोदामांची सेवा लवकरच सुरु करण्यात येईल, असे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.

  • महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. आतापर्यंत दुर्लक्षीत असलेल्या माल वाहतुकीच्या तरतुदीचा आता वापर करण्याचा निर्णय मंत्री  रावते यांनी घेतला आहे.  त्याआधारे रेल्वे माल वाहतुकीच्या धर्तीवर आता एसटीचीही माल वाहतूक सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. माल वाहतुकीमुळे रेल्वे मोठ्या प्रमाणात फायद्यात आहे.

  • माल वाहतूक सेवेसाठी स्वतंत्र वाहने वापरण्यात येणार आहेत. सध्याच्या वापरातील प्रवासी वाहनांचे 9 वर्षानंतर सर्व तांत्रिक बाबी पडताळून माल वाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येईल. त्यास परिवहन विभागाची रितसर मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर ही वाहने माल वाहतुकीसाठी वापरण्यात येतील. कृषी माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी आदी सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक करण्यात येईल. विशेष करुन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल शहरी बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याच्या कामी या सेवेचा वापर करण्यात येईल, असे मंत्री  रावते यांनी सांगितले.

  • याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीने आज सादरीकरण केले. त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात काही सुधारणा सूचविण्यात आल्या असून हा प्रस्ताव लवकरच अंतिम करण्यात येईल. या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी यांना व्यापारी लूट थांबून किफायतशीर दरात हक्काचे मालवाहतूक साधन मिळेल, असे मंत्री रावते म्हणाले.

  • महामंडळाच्या माल वाहतूक सेवेत रेशन धान्य, पोषण आहाराचे धान्य आदींची वाहतूक करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी महामंडळाच्या साधारण 3 हजार जुन्या प्रवासी बसेसचे माल वाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येईल. काही नवीन माल वाहतूक वाहने खरेदी करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.

चंद्रशेखर आझाद यांच्या अमरावतीतील सभेला परवानगी :
  • अमरावती : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या अमरावतीतील सभेला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. मुंबई-पुण्यातील सभेला परवानगी नाकारल्यानंतर 'रावण' यांची ही महाराष्ट्रातील पहिलीच सभा असेल.

  • अमरावतीत उद्या विदर्भस्तरीय सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला परवानगी मिळणार की नाही, याकडे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर अमरावती पोलिसांनी या सभेला परवानगी दिली.

  • या सभेला फक्त विदर्भच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने सहभागी होतील, असा अंदाज आयोजकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

  • चंद्रशेखर आझाद यांची राज्यातील ही पहिलीच सभा आहे. पोलिसांनी दिलेल्या अटींचं पालन करताना आझाद काय बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. चंद्रशेखर आझाद आदल्या दिवशीपासूनच अमरावतीत डेरेदाखल झाले आहेत.

  • बडनेरा ते अमरावतीपर्यंत भीम आर्मीच्या वतीने भव्य मोटार सायकल रॅली काढणार आहे. दिवसभर त्यांचे ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होतील. दुपारी अडीच वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.

श्रीलंकन महिलेचा शबरीमला मंदिरात प्रवेश :
  • थिरुवनंतपुरम :  शबरीमला मंदिरात नुकतेच दोन महिलांच्या प्रवेशाची घटना ताजी असताना गुरुवारी श्रीलंकेतून आलेल्या एका महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश करत अयप्पाचे दर्शन घेतले आहे. शशीकला (वय ४६) असे या महिलेचे नाव आहे. रात्री ९ वाजता त्यांनी मंदिरात प्रवेश केला आणि त्या सुखरुप परत आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. बुधवारी शबरीमला मंदिरात प्रवेशबंदीची शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढत अयप्पाचे दर्शन घेतल्याची ऐतिहासिक घटना घडल्यानंतर केरळमध्ये हिंसाचार उसळला होता. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता.

  • १० आणि ५० वर्षांच्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी दिला होता. मात्र या आदेशानंतरही आतापर्यंत कोणत्याही 'प्रतिबंधित' वयाच्या महिलांनी अयप्पाचं दर्शन घेतलेलं नाही. अनेक महिला कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु मोठ्या विरोधामुळे त्यांना प्रवेश करता आला नाही.

  • बुधवारी दोन महिलांनी अयप्पा दर्शनाचा अधिकार बजावला. या ऐतिहासिक घटनेनंतर गुरुवारी केरळमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. शबरीमला कर्म समिती व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागले होते.  बंदमुळे तणाव निर्माण झाला असतानाच दुसरीकडे गुरुवारी रात्री श्रीलंकेतून आलेल्या शशीकला कुमारन या महिलेने देखील शबरीमला मंदिरात जाऊन अयप्पाचे दर्शन घेतले. रात्री साडे नऊच्या सुमारास महिलेने अयप्पाचे दर्शन घेतले आणि ११ वाजता महिलेला सुरक्षित बाहेर नेण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी :
  • नवी दिल्ली - अयोध्याप्रकरणीसर्वोच्च न्यायालयात आज (4 जानेवारी) सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये सुनावणी होणार आहे. 

  • सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणात जानेवारीपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाकडे सध्य अन्य प्रकरणेही असल्याचे सांगितले होते. 

  • अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ३० सप्टेंबर २०१७ मध्ये २.७७ एकर जमीन तीन पक्षकारांमध्ये म्हणजेच सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यामध्ये समान वाटण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात १४ पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ मध्ये या निर्णयाला स्थिगिती दिली होती. 

चंद्राच्या अंधाऱ्या भागावर चीनचे यान टाकणार प्रकाश :
  • बीजिंग - अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात चीनने मोठे यश मिळवले आहे. चीनचे चांग ई -4 हे अंतराळ यान चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागात यशस्वीपणे उतरले आहे. सकाळी 10 वाजून 26 मिनिटांनी  चांग ई 4 या यानाने चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्यात यश मिळवले, असे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितले. चीनच्या या मोहिमेमुळे चंद्राच्या अंधाऱ्या भागाची माहिती प्रकाशात येणार आहे. 

  • चंद्राचा एकच भाग नेहमी पृथ्वीवरून दिसतो. तर दुसरा भाग कधीही पृथ्वीसमोर येत नाही. हा भाग पृथ्वीपासून दूर असून, त्याबाबतची फारशी माहिती समोर आलेली नाही. चंद्राच्या या भागाला डार्क साइड म्हणून ओळखले जाते. याआधी चीनचे चांग ई 3 हे यान 2013 साली चंद्रावर उतरले होते. सोव्हिएट युनियनच्या 1976 साली चंद्रावर उतरलेल्या लुना 24 या यानानंतर चंद्रावर गेलेले हे पहिलेच यान होते. 

  •  चांग ई 4 हे यान आपल्यासोबत एक रोव्हर घेऊन गेले आहे. हे रोव्हर लो फ्रिक्वेंसी रेडिओ एस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्वेशनच्या मदतीने चंद्राच्या या भागातील पृष्टभागाची रचना आणि त्यात असलेल्या खनिजांची माहिती घेणार आहे. चीनने 8 डिसेंबर रोजी शियांग सॅटेलाइल लाँच सेंटर येथून मार्च 3बी रॉकेटच्या मदतीने चांग ई 4 ये यान चंद्राच्या दिशेने सोडले होते. 

दिनविशेष :
  • जागतिक ब्रेल दिन

महत्वाच्या घटना 

  • १६४१: कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये शिरले. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्स यांचा पराभव होऊन मग त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

  • १८४७: सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्हॉल्व्हर पिस्तुल विकले.

  • १८८५: आंत्रपुच्छ (appendix) काढुन टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रांट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर केली.

  • १८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.

  • १९३२: सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरू यांन दोन वर्षांची शिक्षा झाली.

  • १९५४: मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९५८: १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.

  • १९५८: स्पुटनिक-१ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर परत उतरला.

  • १९५९: रशियाचे लुना-१ हे अंतराळयान चंद्राजवळ पोहोचले.

  • १९९६: साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.

  • २००४: नासाची मानवरहित स्पिरीट ही गाडी मंगळ ग्रहावर उतरली.

  • २०१०: बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्‍घाटन झाले.

जन्म 

  • १८१३: लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँड तयार करणारे आयझॅक पिट्समन यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १८९७)

  • १९०९: मराठी नवसाहित्यिकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म.

  • १९२४: खासदार, नाटककार, लेखक, उर्दू शायर आणि संपादक विद्याधर गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६)

  • १९४०: मराठी कादंबरीकार श्रीकांत सिनकर यांचा जन्म.

  • १९४१: केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९)

मृत्यू 

  • १८५१: दुसरे बाजीराव पेशवे यांचे निधन.

  • १९०७: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचे निधन, सरस्वतीचंद्र हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० ऑक्टोबर १८५५)

  • १९०८: विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत राजारामशास्त्री भागवत यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१)

  • १९६१: नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ आयर्विन श्रॉडिंगर यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८८७)

  • १९६५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन साहित्यिक टी. एस. इलियट यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८८८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.