चालू घडामोडी - ०४ जुलै २०१८

Date : 4 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
परदेशी विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी देशात अव्वल :
  • केंद्र सरकारतर्फे दलित विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी आघाडीवर आहेत. केंद्र सरकारतर्फे दलित विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीवर महाराष्ट्राचेच वर्चस्व आहे. अलीकडच्या काहीवर्षातील आकडेवारीवरुन ही बाब समोर आली आहे.

  • फेब्रुवारी २०१८ पर्यंत अनुसूचित जातीसाठीच्या राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजनेतंर्गत एकूण ७२ शिष्यवृत्ती जाहीर झाल्या आहेत. त्यातील ४० शिष्यवृत्ती या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळाल्या. या यादीत कर्नाटक आणि उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर असून दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा शिष्यवृत्त्या मिळाल्या.

  • २०१६-१७ मध्ये एकूण १०८ शिष्यवृत्ती जाहीर झाल्या. त्यातील ५३ शिष्यवृत्ती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळाल्या. उत्तर प्रदेशात आठ तर मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी पाच जणांना शिष्यवृत्ती मिळाली. अन्य राज्यांमधील विद्यार्थ्यांना एक ते चार या प्रमाणात शिष्यवृत्ती मिळाली. त्याआधीची तीन वर्ष सुद्धा महाराष्ट्र ही शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये आघाडीवर होता.

  • सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजना चालवली जाते. आधी या योजनेतंर्गत ३० जागा होत्या. त्या वाढवून ६० झाल्या आणि २०१४ मध्ये या जागा १०० पर्यंत वाढवण्यात आल्या. महाराष्ट्रात राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजनेबद्दल मोठया प्रमाणावर जागरुकता आहे. हे सुद्धा अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातून शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असण्यामागे एक कारण आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये नवा विक्रम : 
  • मॅन्चेस्टर : भारतानं पहिला टी-20 सामना जिंकत इंग्लंड दौऱ्याचा विजयी श्रीगणेशा केला आहे. कुलदीप यादवच्या पाच विकेट आणि लोकेश राहुलचं तुफानी शतक सामन्यात निर्णायक ठरलं. मात्र चर्चा भारताचा कर्णधार विराट कोहलीची जास्त सुरु आहे. विराटनं या सामन्यात नव्या विक्रमाला गवसणी घातली. विराटनं या सामन्यात नाबाद 20 धावांची खेळी केली.

  • विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये जलद 2000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराटनं 8 धावा केल्या आणि हा विक्रम आपल्या नावे केला. आतंरराष्ट्रीय टी-20मध्ये 2000 धावांचा पल्ला गाठणारा विराट चौथा खेळाडू ठरला आहे.

  • विराटने अवघ्या 56 सामन्यात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रॅन्डन मॅक्क्युलमच्या नावे होता. टी-20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्तिल 2271 धावांसह आघाडीवर आहे. ब्रॅंडन मॅक्क्युलम 2140 धावांसह दुसऱ्या तर पाकिस्तानचा शोएब मलिक 2039 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

बालसंगोपनासाठीही आता सहा महिन्यांची पगारी रजा :
  • मुंबई : प्रसुती रजेननंतर आता मुलांच्या संगोपनासाठीही महिलांना 180 दिवसांच्या पगारी रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. तसंच बायकोचे निधन झालेल्या पुरुषांनाही मुलांच्या पालनपोषणासाठी 180 दिवसांची पगारी रजा मिळणार आहे.

  • 18 वर्षांच्या आतील मुलं असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. या निर्णयामुळे दहावी किंवा बारावीच्या परीक्षा काळात मुलांसाठी 180 दिवसांनी रजा महिला आणि पुरुष कर्मचारी घेऊ शकतील.

  • बालसंगोपनासाठी असलेली 180 दिवसांची रजा ही विभागूनही घेता येईल. एका वर्षातून जास्तीत जास्त तीन वेळा ही रजा घेता येईल.

  • राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू असणार असून, पुढील काही दिवसात शासन निर्णय प्रसिद्ध करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

अफवा बळींमध्ये वाढ, सरकार आणणार सोशल मीडिया धोरण :
  • नवी दिल्ली: सोशल मीडियातील अफवांमुळे होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच सोशल मीडिया धोरण आणणार आहे. सोशल मीडियात पसरणाऱ्या अफवांमुळे मागील चार महिन्यांपासून देशभरात  जमावाने 29 लोकांचे बळी घेतले आहेत.

  • आयटी मंत्रालयाकडे सोशल मीडिया धोरणाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.याबाबत गृहमंत्रालय सोशल मीडिया प्रतिनिधींसोबत एक बैठक घेणार आहे. या बैठकीत सोशल मीडियातून पसरवण्यात येणारे खोटे मेसेजेस कसे रोखायचे, यावर चर्चा होईल.

  • ‘आयटी मंत्रालय आणि ट्विटर,व्हॉट्सअप तसंच फेसबुकच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात येईल. या बैठकीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल,’ असं गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.

  • आयटी अॅक्टच्या कलम 69 चा वापर करत अशांतता पसरवणारे मेसेजेस, फोटोज, व्हिडीओज पसरण्याआधीच ब्लॉक केले जावेत, असं या बैठकीत सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना सांगण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • केवळ अफवांमुळे जमावाकडून होणाऱ्या हत्यांची  सरकारकडून उशिरा का होईना दखल घेण्यात येत असल्याचं दिसत आहे.

एमिरेट्स एअरलाईन्समधील 'हिंदू मील' बंद होणार :
  • नवी दिल्ली : जगातील अग्रगण्य विमान कंपनी एमिरेट्सनं त्यांच्या विमानांमधून हिंदू मील हटवण्याचा निर्णय घेतला आहे. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या प्रवाशांना धार्मिक आस्थेनुसार खाद्यपदार्थ पुरवतात. या कंपन्यांच्या विमानांमधून प्रवास करण्याआधी प्रवासी जेवणात कोणते पदार्थ हवेत, याची निवड करु शकतात. मात्र एमिरेट्स एअरलाईन्सनं आता ही सेवा बंद केली आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या अभिप्रायांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 

  • 'एमिरेट्सनं हिंदू मीलचा पर्याय बंद केला आहे. आम्ही नेहमी विमानात दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल प्रवाशांचे अभिप्राय घेत असतो. याच आधारावर आमच्याकडून सुविधांबद्दलचे निर्णय घेतले जातात,' असं कंपनीनं प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे.

  • 'हिंदू प्रवासी शाकाहारी आऊटलेट्समधून त्यांचं जेवण बुक करु शकतात. या आऊटलेट्सकडून विमानातदेखील जेवण पुरवलं जातं. यामध्ये हिंदू मील, जैन मील, भारतीय शाकाहारी जेवण, बीफ नसलेलं मांसाहारी जेवण असे विविध पर्याय उपलब्ध असतात,' असंही एमिरेट्सनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 

  • हिंदू मील म्हणजे काय - हे जेवण हिंदू समुदायाच्या प्रवाशांसाठी असतं. शाकाहारी नसलेल्या आणि मांस, मासे, अंड खाणाऱ्या प्रवाशांसाठी हिंदू मील तयार केलं जातं. या जेवणात बीफचा समावेश नसतो. बहुतांश मोठ्या विमान कंपन्या प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा पर्याय देतात. एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाईन्समध्ये धार्मिक जेवणाचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे. 

शतकातील अस्मानी पर्वणी; २७ जुलैला सर्वांत प्रदीर्घ चंद्रग्रहण, एक तास ४३ मिनिटे चंद्र पूर्ण झाकोळणार :
  • कोलकाता : तब्बल एक तास ४३ मिनिटांचे या शतकातील सर्वात प्रदीर्घ खग्रास चंद्रग्रहण येत्या २७ जुलै रोजी होणार असून भारतात कुठूनही हे ग्रहण दिसेल. खग्रास ग्रहणाच्या काळात पृथ्वीच्या छायेने झाकोळलेल्या चंद्रबिंबावर काही ठिकाणी फिकट नारिंगी ते काही ठिकाणी गडद लाल-तपकिरी लालिमा दिसत असल्याने खगोलप्रेमींना या अस्मानी घटनेची ‘ब्लड मून’ म्हणूनही प्रतीक्षा असते.

  • येथील एम. पी. बिर्ला मूलभूत संशोधन संस्था व नक्षत्रालयाचे संशोधन संचालक देवीप्रसाद दुराई यांनी या ग्रहणाचा तपशील व वैशिष्ट्ये विशद केली.

  • या चंद्रग्रहणाचा स्पर्शकाळ ते मोक्ष या दरम्यानचा कालावधी सुमारे तीन तासांचा असेल. त्यापैकी ग्रहणाची खग्रास स्थिती एक तास ४३ मिनिटांची असेल. याशिवाय सुरुवातीस व नंतर ग्रहण सुटेपर्यंत मिळून आणखी तासभर चंद्रबिंब खंडग्रास अवस्थेत दिसेल.

  • २७ जुलै रोजी रा. ११.५४ वाजता ग्रहणाचा स्पर्शकाळ सुरू होईल. २८ जुलैच्या पहाटे १ ते २.४३ या वेळात खग्रास ग्रहण असेल. पहाटे १.५२ या क्षणी चंद्र सर्वाधिक काळवंडलेला असेल. त्यानंतर मोक्षकाळ सुरू होऊन २८ जुलैच्या पहाटे ३.४९ वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. म्हणजेच संपूर्ण ग्रहणकाळ जवळपास चार तासांचा असल्याने एरवी महिनाभरात दिसणाऱ्या चंद्राच्या सर्व कला अभ्यासकांना मनसोक्त पाहता येतील. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८२६: अमेरिकेच्या १५व्या स्वातंत्र्य दिनी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन झाले.

  • १९०३: मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.

  • १९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान निकोबार बेटावरून कारावासास प्रारंभ झाला.

  • १९३६: अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

  • १९४६: फिलिपाइन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९४७: भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.

  • १९९५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान केला.

  • १९९७: नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.

  • १९९९: लष्कराच्या १८व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.

जन्म 

  • १८०७: इटालियन सेनापती व राजकीय नेता जुसेप्पे गॅरीबाल्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १८८२)

  • १८७२: अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कुलिज यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९३३)

  • १८८२: अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे सह्संस्थापक लुईस बी. मेयर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९५७)

  • १८९८: भारताचे २रे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९९८)

  • १८९७: भारतीय कार्यकर्ते अलारी सीताराम राजू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९२४)

  • १९१२: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४)

  • १९१४: भावगीत लेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर१९९७)

  • १९७६: जपानी मोटरसायकल रेसर दाइजिरो कातो यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल २००३)

  • १९८३: भारतीय-इंग्लिश पत्रकार अमोल राजन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७२९: मराठा आरमारप्रमुख (सेना सरखेल) कान्होजी आंग्रे यांचे निधन.

  • १८२६: अमेरिकेचे २रे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १७३५)

  • १९०२: भारतीय तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८६३)

  • १९३४: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर१८६७)

  • १९६३: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८७६)

  • १९८२: भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार भरत व्यास यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.