चालू घडामोडी ०४ जून २०१८

Date : 4 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
संपूर्ण स्वदेशी बनावटीचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि ५ चे यशस्वी प्रक्षेपण :
  • ओदिशातील बालासोर येथून स्वदेशी क्षेपणास्त्र अग्नि ५ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. लांब पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रावरून अणवस्त्रे वाहून नेता येऊ शकतात. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५ हजार किमी इतकी असून ते डॉ. अब्दुल कलाम बेटावरून लाँच करण्यात आले. हे आतापर्यंतचे सर्वाधिक आधुनिक क्षेपणास्त्र आहे.

  • हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवरून मारा करू शकते. संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत असलेल्या कलाम बेटाच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या पॅड ४ वरून आज सकाळी ९.४८ वाजता हे क्षेपणास्त्र लाँच करण्यात आले. अग्नि ५ ची ही सहावी चाचणी ठरली. चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राने अपेक्षित अंतर गाठले.

  • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अातापर्यंतच्या अग्नि ५ च्या तुलनेत सर्वाधिक आधुनिक आहे. हे नेव्हिगेशन आणि दिशा दर्शक, वॉरहेड आणि इंजिनसंबंधी नवीन तंत्रज्ञानांनी युक्त आहे. हायस्पीड कॉम्प्युटर आणि कोणतीही कमतरता सहन करण्याची क्षमता असलेले सॉफ्टवेअरबरोबर रोबस्टच्या साहाय्याने क्षेपणास्त्राचे यशस्वी लाँचिंग होण्यास मदत झाली.

  • पृथ्वी वायुमंडळात येताना क्षेपणास्त्राला भिडणाऱ्याला हवेमुळे याचे तापमान ४००० डिग्री सेल्सियसपर्यंत वाढते. यासाठी यात कार्बन कंपोजिट शील्ड लावण्यात आली आहे. त्यामुळे आतील तापमान ५० डिग्रीपेक्षा कमी राहते. अग्नि ५ ची पहिली चाचणी १९ एप्रिल २०१२, दुसरी १५ सप्टेंबर २०१३, तिसरी ३१ जानेवारी २०१५ आणि चौथी चाचणी २६ डिसेंबर २०१६ रोजी झाले. पाचवे परीक्षण १८ जानेवारी २०१८ला झाले होते. या सर्व पाच चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या.

अबुधाबीत भारतीयाला १८ कोटींची लॉटरी :
  • दुबई : अबुधाबीमध्ये एका भारतीयाला चक्क १८ कोटी रुपयांची (१ कोटी दि-हाम) लॉटरी लागली आहे. या भाग्यवान भारतीयाचे नाव डिक्सन कट्टितरा अब्राहम असे असून तो नायजेरियामध्ये राहातो व तो नोकरीधंद्यासाठी अबुधाबीत आला आहे. संयुक्त अरब अमिरातीतील देशांमध्ये गेल्या काही महिन्यांत काही भारतीयांना मोठमोठ्या रकमांच्या लॉटरी लागल्या आहेत.

  • बिग लॉटरी असे या लॉटरीचे नाव असून तिच्या सोडतीचा निकाल अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आगमन कक्षात रविवारी सकाळी झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. या लॉटरीच्या सोडतीत एकुण नऊ बक्षिसे देण्यात आली. त्या भाग्यवंतांमध्ये पाच भारतीय , तीन पाकिस्तानी व संयुक्त अरब अमिरतीमधील एका नागरिकाचा समावेश आहे. अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून बिग लॉटरी चालविली जाते व ती विलक्षण लोकप्रिय देखील आहे.

  • एप्रिल महिन्यामध्ये दुबईमधील एका भारतीय वाहनचालकाला १.२. कोटी दिºहामची लॉटरी अबुधाबीमध्ये लागली होती. जानेवारी महिन्यात संयुक्त अरब अमिरातीतील एका भारतीयालाही १.२ कोटी दिºहामची लॉटरी लागली होती. संयुक्त अरब अमिरातीतील देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश अशा अनेक देशांतून असंख्य माणसे नोकरीधंद्यासाठी आलेली आहेत. यापैकी काही जणांना इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी लागल्यामुळे त्यांचे नशिब फळफळले आहे.

सुषमा स्वराज यांचं विमान १४ मिनिटे संपर्काबाहेर :
  • नवी दिल्ली : मॉरिशिअसला जाताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं विमान सलग 14 मिनिटे संपर्काबाहेर गेल्याने एकच खळबळ उडाली. मॉरिशिअसमधील यंत्रणेने तातडीने अलर्ट जारी करत विमानासोबत संपर्क होत नसल्याचं जाहीर केलं.

  • पायलटच्या चुकीमुळे विमानाशी संपर्क होऊ शकला नाही, असं नंतर समोर आलं. विमान सुखरुपपणे मॉरिशिअसला पोहोचलं आणि भारत आणि मॉरिशिअसमधील यंत्रणांचा जीव भांड्यात पडला.

  • भारतीय विमान प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विमान समुद्र कक्षेतून प्रवास करत असताना 30 मिनिटे संपर्क न झाल्यास अलर्ट जारी केला जातो. मात्र व्हीव्हीआयपी विमान असल्यामुळेच 14 मिनिटातच अलर्ट जारी करण्यात आला.

  • मॉरिशिअसच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतरही पायलटने एटीसीला (एअर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्क साधला नसल्यामुळे हा प्रकार घडला. सुषमा स्वराज भारतीय वायू सेनेच्या विमानाने प्रवास करत होत्या.

  • दक्षिण आफ्रिकेला जाताना सुषमा स्वराज मॉरिशिअसचाही दौरा करणार आहेत, जिथे त्या BRICS देशांच्या (Brazil, Russia, India, China and South Africa) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहतील.

पेट्रोल १५ पैशांनी, डिझेल १४ पैशांनी स्वस्त, आजचा दर :
  • मुंबई: पेट्रोल-डिझेलच्या किमती आज काही पैशांनी उतरल्या आहेत. आज सकाळी पेट्रोलची किंमत 15 पैशांनी कमी झाली. तर डिझेलच्या किमतीत 14 पैशांची कपात करण्यात आली आहे.

  • मुंबईत आजचा पेट्रोलचा दर 85 रुपये 77  पैसे आहे , तर डिझेल 73 रुपये 43 पैसे  मिळतं आहे.

  • कर्नाटक निवडणुकीनंतर सलग 16 दिवस दररोज पेट्रोल पै-पैने वाढत होते. त्यानंतर 17 व्या दिवशी पेट्रोल 1 पैशांनी स्वस्त झालं. अवघ्या 1 पैशांनी पेट्रोल स्वस्त झाल्याने, सरकारवर चहूबाजूंनी टीका झाली होती.

  • सलग 16 दिवस इंधनाच्या दरात घसघशीत वाढ झाल्यानंतर, सतराव्या दिवशी इंधन दर 60 पैशांनी कमी झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निश्वासही टाकला होता, मात्र दुपारी तेल कंपन्यांनी कोलांटउडी मारली. इंधन दरात केवळ एक पैशांची कपात झाल्याचं सांगितलं. 60 पैसे म्हणजे टायपिंग मिस्टेक होती, असं कारण त्यावेळी सांगण्यात आलं होतं.

  • सलग 16 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने नागरिक त्रस्त होते रोज पै-पै ने वाढ होत असली, तरी एकूण 16 दिवसांच्या कालावधीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.8 रुपये तर डिझेलच्या दरात 3.37 रुपयांनी वाढ झाली होती. मात्र आता आज पेट्रोल 15 पैशांनी आणि डिझेल 14 पैशांनी स्वस्त झालं आहे.

मुंबई विमानतळावर ध्वनिरोधक बसवण्याबाबत अभ्यास सुरू :
  • मुंबई : देशातील व्यस्त विमानतळांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी ध्वनिरोधक बसवण्याबाबत विमानतळ प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. विमानतळ परिसरात ध्वनिरोधक बसवणे कितपत व्यवहार्य आहे, याचा अभ्यास सध्या स्पेनच्या कंपनीद्वारे केला जात आहे.

  • ध्वनिरोधक बसवणे शक्य आहे का व त्याचा कितपत लाभ होईल याबाबत कंपनी आपला अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल सकारात्मक आल्यास ध्वनिरोधक बसवण्याबाबत पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.

  • विमानतळ परिसरात विमानांच्या उड्डाणाने व लँडिंगने मोठा आवाज होत असतो. त्यामुळे अनेकदा ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी केल्या जातात. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात स्पेनच्या कंपनीने याबाबत अभ्यास केला असून त्याचा अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे. सध्या विमानतळावरील आवाजाची पातळी तपासण्यासाठी ६ स्थानके कार्यरत आहेत. त्यापैकी २ स्थानके कायमस्वरूपी आहेत.

  • धावपट्टी शेजारी घाटकोपर दिशेला व जुहू दिशेला अशी ही दोन स्थानके आहेत. विमानतळावरील आवाजाबाबतचा अहवाल वर्षात एकदा नागरी विमान वाहतूक महासंचालकांकडे (डीजीसीए) पाठवण्यात येतो. कोणत्या विमानाचा आवाज किती आहे, लँडिंगच्या वेळचा आवाज, उड्डाणाच्या वेळेचा आवाज याबाबत या स्थानकांद्वारे नोंदी घेतल्या जातात. अधिक आवाज असलेल्या विमानांबाबत संंबंधित विमान कंपन्यांना देखील कळवले जाते. सध्या दररोज सुमारे ९४५ विमानांचे परिचालन मुंबई विमानतळावरून केले जाते. 

आता ऑनलाइन वेटिंग तिकिटावरही करता येणार प्रवास :
  • नवी दिल्ली - रेल्वेचे ऑनलाइन बुक केलेले तिकीत कन्फर्म न झाल्याने ऐनवेळी प्रवास रद्द करण्याची वेळ तुमच्यावर आली असेल. मात्र आता तुम्हाला ऑनलाइन वेटिंग तिकिटावरही काउंटरवरून खरेदी केलेल्या तिकिटाप्रमाणेच प्रवास करता येणार आहे.  या संदर्भातील दिल्ली हायकोर्टाचा 2014 साली दिलेला आदेश पुन्हा एकदा लागू झाला आहे.  कारण या आदेशाविरोधात रेल्वेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 

  • काऊंटर तिकीट आणि ई तिकीट घेणाऱ्या प्रवाशांमध्ये भेदभाव होऊ नये यासाठी रेल्वेने सहा महिन्यांच्या आत पावले ऊचलावीत असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने 2014 साली दिले होते. मात्र या आदेशांविरोधात रेल्वेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  

  • फायनल चार्ट बनल्यानंतरही ज्या प्रवाशांचे ई तिकीट वेटिंगमध्ये राहते. त्यांचे तिकीट आपोआप रद्द होते. मात्र ज्यांनी तिकीट खिडकीवरून वेटिंगचे तिकीट घेतले आहे अशा प्रवाशांना प्रवास करता येतो. तसेच रिकामी सिट असेल तर त्यावरून प्रवासही करता येतो. याविरोधात  वकील विभाष झा यांनी आवाज उठवला होता. 

  • दरम्यान, या आदेशाबाबत प्रतिक्रिया देताना रेल्वे प्रशासनाने सांगितले की, न्यायालयाचा संपूर्ण आदेश वाचल्यानंतर आम्ही याबाबत पावले उचलणार आहोत. सध्या 75 टक्के प्रवासी ऑनलाइन तिकीट खरेदी करतात. दिल्ली हायकोर्टाने आपल्या निकालामध्ये सांगितले होते की, चार्ट बनल्यानंतरही वेटिंगवर असलेले ई तिकीट ऑटोमॅटिक रद्द होऊ नयेत. तर संबंधित प्रवाशाला ई तिकीट बुकिंगच्यावेळीच त्यासंदर्भातील पर्याय उपलब्ध व्हावा.  

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६७४: राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.

  • १९७०: टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

  • १९७९: घानामधे लष्करी उठाव.

  • १९९३: आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.

  • १९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  • १९९७: इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.

  • २००१: नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.

जन्म

  • १९०४: भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)

  • १९१०: होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९९९)

  • १९१५: माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९७७)

  • १९७४: भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर २०१२)

  • १९९०: भूतानची राणी जेत्सुनपेमा वांग्चुक यांचा जन्म.

मृत्यू

  • १९४७: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६)

  • १९६२: अमेरिकन निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब यांचे निधन.

  • १९९८: इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.