चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ जून २०१९

Date : 4 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कॅबिनेटचा दर्जा :
  • नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सल्लागार पदी असलेल्या अजित डोभाल यांना कॅबिनेटचा दर्जा दिला आहे.

  • पुढील पाच वर्षांसाठी अजित डोवाल यांना हा दर्जा मिळाला आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आले त्यावेळी त्यांनी अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्त केलं होतं. आजवर राष्ट्रीय सल्लागार पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त होता.

  • अजित डोवाल यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानमुळे मोदी सरकारने त्यांना पुढील पाच वर्षांसाठी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचं श्रेय डोवाल यांना दिलं जातं.

  • लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने प्रचारादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यावर जास्त भर दिला होता. याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला आहे आणि 303 जागांवर भाजपने विजय मिळवला. राष्ट्रीय संरक्षण रणनीती चांगल्याप्रकारे आखल्याचा फायदा भाजपाला झाला आहे. यामुळे डोवाल यांना हे बक्षिस मिळालं आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामधून हिंदीची अनिवार्यता वगळली :
  • मुंबई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामध्ये हिंदी भाषा शिकविण्याचा प्रस्तावावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असता केंद्र सरकार एक पाऊल मागे आलं आहे. केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामधून हिंदी भाषेची अनिवार्यता वगळली आहे.

  • आता देशभरात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यास तीन भाषांपैकी एक भाषा अनिवार्य असणार आहे. इंग्रजी भाषा सोडून हिंदी भाषा शिकायची की नाही हे आपल्याला ठरवता येणार आहे.

  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सुधारीत मसुदा मानव संसाधन विकास मंत्रालयाने जारी केला आहे. कलम 4.5.9 अंतर्गत हिंदीची अनिवार्यता काढून टाकली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता इंग्रजी भाषा वगळता उरलेल्या दोन भाषा आपल्या आवडीनुसार निवडता येणार आहे.

एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर :
  • मुंबई : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल सोमवारी मध्यरात्रीपासून संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंगळवारी विद्यार्थ्यांना दिवसभर हा निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल mhtcet2019.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

  • राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने राज्यभरातील 36 जिल्ह्याच्या ठिकाणी 166 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने 10 दिवस 19 सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 92 हजार 354 विद्यार्थी बसले होते. तर 20 हजार 930 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले होते.

  • पीएसएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) हे विषय घेवून 2 लाख 76 हजार 166 विद्यार्थी बसले होते. तर पीसीबी(फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) हे विषय घेवून 28 हजार 154 विद्यार्थी बसले आहेत.

  • निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार आहे.त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाऊनलोड करून घेतला,याबाबतची माहितीही दिली जाईल,असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

बापरे! देशातल्या ‘या’ शहरातील तापमानाने केली पन्नाशी पार :
  • यंदा देशात उष्णतेचा कहर सुरु असून राजस्थानातील चुरू येथे आज (दि.३) तब्बल ५०.३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या तापमानाने जगातील सर्वाधिक तापमानाचा विक्रमच प्रस्थापित केला आहे. सलग दोन दिवस येथे तापमानाने पन्नाशी ओलांडली आहे.

  • हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर भारतात उष्णतेची भीषण लाट आली असून देशातील इतर भागांमध्येही पुढील काही दिवस सूर्य अक्षरशः आग ओकणार आहे. राजस्थानासह पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, बिहार, झारखंड, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

  • दरम्यान, राज्यातील नागूपर शहरात काही दिवसांपूर्वी जगातील सर्वाधिक ४७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती त्यानंतर त्यात आणखी वाढ होऊन चंद्रपूरमध्ये तब्बल ४८ डिग्री तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर उष्णतेचा हा विक्रमही मोडीत काढत आज राजस्थानातील चुरु येथे तब्बल ५०.३ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे.

एस. जयशंकर गुजरातमधून राज्यसभेवर जाणार :
  • परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना भाजपा आता गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठवण्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु एआयडीएमके सोबत चर्चा फिस्कटल्यानंतर त्यांना गुजरातमधून लोकसभेवर पाठवण्यावर सध्या विचार सुरू असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी स्मृती इराणी आणि अमित शाह यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. परंतु लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यानंतर आता भाजपाच्या कोट्यातील त्या दोन जागा रिक्त होणार आहेत.

  • लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर एआयडीएमकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. तामिळनाडूतील केवळ एकाच जागेवर या पक्षाला विजय मिळवता आला होता. दरम्यान, एआयडीएमकेच्या कोट्यातील राज्यसभेच्या चार जागाही 24 जुलै रोजी रिक्त होणार आहेत. परंतु निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेनुसार त्यांना त्यापैकी एक जागा पीएमकेसाठी सोडावी लागणार आहे. त्यातच विधानसभेच्या 22 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना 13 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता डीएमकेचेही एआयडीएमकेसमोर आव्हान असणार आहे.

  • यापूर्वी भाजपाने जयशंकर यांना तामिळनाडूतूनच राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गुजरातमधून भाजपाच्या कोट्यातील दोन जागा रिक्त होणार असल्याने जयशंकर यांना तेथून राज्यसभेची संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. भाजपाने एआयडीएमकेकडे राज्यसभेच्या एका जागेची मागणी केली होती. परंतु त्यांच्या या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. तसेच एआयडीएमके वेल्लोर लोकसभेच्या आणि नानगुनेरी विधानसभेच्या जागेसाठी निवडणूक होत नाही तोपर्यंत भाजपाला राज्यसभेची जागा देऊ इच्छित नसल्याचे एका नेत्याने सांगितले. 24 जुलै रोजी तामिळनाडूतून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होणार आहेत. तर एप्रिल महिन्यात आणखी सहा जागा रिक्त होणार आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६७४: राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.

  • १८७६: ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.

  • १८७८: ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.

  • १८९६: हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.

  • १९७०: टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

  • १९९३: आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.

  • १९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  • १९९७: इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.

जन्म 

  • १७३८: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १८२०)

  • १९०४: भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)

  • १९१०: होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९९९)

  • १९१५: माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९७७)

  • १९४६: दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म.

  • १९४७: विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म.

  • १९७४: भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर २०१२)

  • १९९०: भूतानची राणी जेत्सुनपेमा वांग्चुक यांचा जन्म.

मृत्यू  

  • १९४७: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६)

  • १९६२: अमेरिकन निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब यांचे निधन.

  • १९९८: इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.