चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ मे २०१९

Date : 4 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘इस्रो’च्या माजी प्रमुखांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान :
  • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात झाला आहे. फ्रान्समधील ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार किरण कुमार यांना गुरुवारी प्रदान करण्यात आला. भारत आणि फ्रान्समधील अवकाशसंशोधनाच्या कार्यामध्ये प्रमुख भूमिका पार पाडल्याबद्दल किरण कुमार यांचा सन्मान करण्यात आल्याचे फ्रान्समार्फत सांगण्यात आले आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने भारतातील फ्रान्सचे राजदूत अॅलेकझॅण्डर जीगलर यांनी दिल्लीमधील फ्रान्सच्या दुतावासात हा पुरस्कार किरण कुमार यांना प्रदान केला.

  • ‘दोन्ही देशातील अवकाश संशोधन तंत्रज्ञानाला किरण कुमार यांनी आपल्या कार्याने एक नवीन उंचीवर नेले. याचसाठी फ्रान्स सरकारने त्यांचा हा सन्मान केला आहे’, असे मत फ्रान्सची अवकाश संशोधन संस्था असणाऱ्या ‘सीएनइएस’चे अध्यक्ष जीन येव्स ले गाल यांनी व्यक्त केले. ‘इस्रोमध्ये किरण यांनी दिलेले योगदान मौल्यवान आहे. येथे काम करुन त्यांनी केलेले कार्यकरणे सोपे नव्हते तरी त्यांनी ते अगदी सहजपणे यशस्वीरित्या पूर्ण केले.

  • २०१५ ते २०१८ दरम्यान इस्रोचे अध्यक्षपद भूषवताना किरण यांनी केवळ भारत आणि फ्रान्समधील अवकाश संशोधनाला चालना तर दिलीच मात्र दोन्ही देश एकत्र काम करतील याकडे विशेष लक्ष दिले’, अशा शब्दांमध्ये गाल यांनी किरण यांचे कौतूक केले.

  • ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार देण्याची सुरुवात १८०२ मध्ये नेपोलियन बोनापार्टने केली होती. हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून फ्रान्सच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. भारतामधील ‘भारतरत्न’ पुरस्काराप्रमाणेच हा पुरस्कार इतर देशांच्या व्यक्तींनाही त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानासाठी प्रदान केला जातो.

‘आयआयटी-जेईई’वर ‘फिटजी’ संस्थेच्या विद्यार्थ्यांचा झेंडा :
  • पुणे : आयआयटी-जेईई आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेतील आघाडीची संस्था ‘फिटजी’ने (एफआयआयटीजेईई) जेईई (मेन्स) परीक्षेत पुन्हा एकदा बाजी मारली आहे. फिटजीचा विद्यार्थी मास्टर शुभम श्रीवास्तव याने अखिल भारतीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

  • फिटजी पीसीएमसी केंद्राच्या १४0 पैकी ८३ विद्यार्थ्यांनी २०१९ च्या जेईई (मेन्स) परीक्षेत जबरदस्त यश संपादित केले आहे. हे संस्थेच्या क्लासरूम प्रोग्रामचे विद्यार्थी आहेत. ३५ विद्यार्थ्यांनी ३० हजारांच्या आत रँक मिळविला आहे. फिटजी पीसीएमसी सेंटरचे प्रमुख आर.के. कर्ण यांनी सांगितले की, आमच्या विद्यार्थ्यांचे यश हे संस्थेच्या प्रेरणेचे फलित आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या विचार पद्धतीतच बदल घडवून आणतो, विद्यार्थ्यांचा आयक्यू वाढवतो, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे विशेष लक्ष देतो.

  • मानसन्मान याचे फिटजीच्या शिक्षकांना कोणतेही कौतुक नाही. विद्यार्थ्यांचे उत्तम प्रयत्न हीच शिक्षकांसाठी खरी गुरुदक्षिणा आहे. स्पर्धा परीक्षेत जागा मर्यादित असतात. यशाची हमी नसते. प्रत्येक विद्यार्थ्यास त्याची सर्वोत्तम कामगिरी करता यावी, यासाठी शिक्षकाचे योगदान मोठे असते. अशा स्थितीत फिटजीच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना यशाप्रत नेण्याचा निर्धार केला आहे.

  • ‘फिटजी’कडून नवनवीन प्रयोग फिटजी म्हणजे नावीन्य आणि विविध शिक्षण पद्धती आणि प्रक्रियांचे उगमस्थान होय. स्कूल इंटिग्रेटेड प्रोग्राम ही त्यातीलच एक संकल्पना आहे. आपल्या वर्ल्ड अ‍ॅण्ड ग्लोबल स्कूलच्या माध्यमातून फिटजी शैक्षणिक परिदृश्य बदलण्यासाठी वचनबद्ध आहे. जेईई (मेन्स) २०१९ मध्ये घवघवीत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे आम्ही मन:पूर्वक अभिनंदन करीत आहोत.

‘व्हीव्हीपॅट’ मोजणीबाबत पुढील आठवडय़ात सुनावणी :
  • नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट व इव्हीएम यांची यादृच्छिक फेरजुळणी करण्याचे प्रमाण वाढवावे या मागणीसाठी विरोधकांनी दाखल केलेल्या  फेरविचार याचिकेवर पुढील आठवडय़ात सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.

  • इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात अलीकडे व्हीव्हीपॅट यंत्राची जोड देण्यात आली असून त्यात मतदाराने कुणाला मतदान केले याची प्रत्यक्ष नोंद असते. २१ विरोधी पक्षांनी याबाबत व्हीव्हीपॅट चिठ्ठय़ा व प्रत्यक्ष मतदान यंत्रातील नोंदीनुसार पडलेली मते यांची जुळणी करण्याची मागणी केली असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पन्नास टक्के व्हीव्हीपॅट चिठ्ठय़ांची फेरजुळणी करण्यात यावी असा त्यांचा आग्रह आहे.

  • आंध्रचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल केली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट चिठ्ठय़ा व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील मते यांची जुळणी करावी असा आदेश न्यायालयाने दिला होता. आधी एकाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट चिठ्ठय़ा व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील मते यांची जुळणी करावी असे सांगण्यात आले होते पण न्यायालयाने हे प्रमाण पाच मतदान केंद्रांपर्यंत वाढवण्याचा आदेश ८ एप्रिल रोजी दिला होता.

  • ही वाढ समाधानकारक नसून त्यातून काही साध्य होणार नाही असे विरोधकांचे म्हणणे आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान पन्नास टक्के व्हीव्हीपॅटची जुळणी व मोजणी करावी असे त्यांनी फेरविचार याचिकेत म्हटले आहे.  सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांनी फेरविचार याचिकेवर पुढील आठवडय़ात सुनावणी करण्याचे मान्य केले आहे.

जीएसपी योजना रद्द केल्यास अमेरिकी कंपन्यांनाही फटका :
  • वॉशिंग्टन : भारताबरोबर निर्यात वाढवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना फटका बसण्याची भीती असल्याने अमेरिकेने सार्वत्रिक अग्रक्रम योजना रद्द (जीएसपी) करू नये, असे आवाहन २५ काँग्रेस सदस्यांनी अमेरिकी व्यापार प्रतिनिधींना केले आहे. भारताबरोबरची ही योजना रद्द करण्यासाठी दिलेल्या नोटिशीची ६० दिवसांची मुदत शुक्रवारी संपली आहे.

  • सार्वत्रिक अग्रक्रम योजना हा अमेरिकेचा जुना कार्यक्रम असून त्यामुळे संबंधित देशांच्या हजारो वस्तू कुठलाही कर लागू न करता अमेरिकेत येत असतात. त्याचा लाभ भारतालाही होत आहे.

  • ४ मार्च रोजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे जाहीर केले,की भारताबरोबरची ही योजना आम्ही बंद करणार असून यापुढे भारताला त्याचा लाभ मिळू देणार नाही. त्यासाठी दिलेल्या नोटिशीची ६० दिवसांची मुदत शुक्रवारी संपली असून त्या पाश्र्वभूमीवर २५ अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी  ही योजना रद्द न करण्यासाठी  ट्रम्प प्रशासनाचे मन वळवण्याचे प्रयत्न केले आहेत.

  • भारतातून होणाऱ्या आयात निर्यातीवर अवलंबून असलेल्या अमेरिकी उद्योगांना व पर्यायाने त्यातील रोजगारांना याचा फटका बसण्याची शक्यता असून ही योजना रद्द करू नये, असे आवाहन २५ सदस्यांनी व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लायथिझर यांना केले आहे. या सदस्यांच्या मते जीएसपी योजना रद्द केली तर त्याचा फटका भारतात निर्यात वाढवू इच्छिणाऱ्या देशांना बसणार आहे.

  • अमेरिकेने जीएसपी योजनेत भारताला सवलती दिल्या, पण त्याच पद्धतीने अमेरिकी उत्पादनांना भारतात प्रवेश देण्याचे वचन पाळले गेले नाही. त्यामुळे जीएसपी कार्यक्रमातील लाभार्थी देशाचा भारताचा दर्जा काढून घेण्यात यावा, असे ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसला कळवले होते.

देशातील बेरोजगारीचा दर वाढला, सरकार पुन्हा विरोधकांच्या रडारवर :
  • नवी दिल्ली : देशात बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत आहे. मार्च 2019 मध्ये देशात बेरोजगारीचा दर 6.7 टक्के इतका होता. त्यामध्ये आता वाढ होऊन एप्रिल 2019 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 7.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने यासंबधीची आकडेवारी जाहीर केली आहे.

  • देशभरात असंख्य तरुणांकडे रोजगार नसल्यामुळे विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. तर सरकार मात्र ही बाब मान्य करत नाही. परंतु सीएमआयईने बेरोजगारीच्या दरासंदर्भात जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनंतर विरोधकांना सरकारवर टीका करण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे, तर ही आकडेवारी केंद्र सरकारची डोकेदुखी वाढवणारी असल्याची चर्चा सुरु आहे.

  • ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात बेरोजगारीचा दर वाढल्यामुळे सध्या देशभरात सुरु असलेल्या निवडणुकीवर त्याचे परिणाम होतील असे बोलले जात आहे. 19 मेपर्यंत लोकसभा निवडणूकीसाठी मतदान सुरु असणार आहे. अद्याप तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे. या तीन टप्प्यातील मतदानावर या नव्या आकडेवारीचा परिणाम होऊ शकतो, असेदेखील बोलले जात आहे.

  • डिसेंबर 2018 मध्ये बेरोजगारीच्या दरासंदर्भातील आकडेवारी लिक झाली होती. त्यामध्ये म्हटले होते की, वर्ष 2017-18 मध्ये देशात गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारीची नोंद झाली आहे. तसेच त्यामध्ये म्हटले होते की, नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी लागू केल्यानंतर देशभरात बेरोजगारी वाढू लागली. 2017-18 मध्ये तब्बल 1 कोटी 10 लाख लोकांनी त्यांचा रोजगार गमावला आहे.

प्रेस स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो :
  • मुंबई : संपूर्ण जगभर आजचा दिवस 'प्रेस फ्रिडम डे' (प्रेस स्वातंत्र्य दिन/वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन)म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्व देशांमधील सरकारे, सत्ताधारी आणि राजे या सर्वांना वृत्तपत्र स्वातंत्र्याचे महत्व कायम लक्षात राहावे यासाठी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. युनेस्कोने 1993 मध्ये 3 मे हा जागतिक वृत्तपत्र दिन साजरा करण्यास मंजुरी दिली.

  • 1991 मध्ये आफ्रिकेतील पत्रकारांनी पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेऊन एका विशेष मोहीमेला सुरुवात केली. 3 मे 1991 रोजी नामेबियाची राजधानी विंडहोक येथे पत्रकारांची परिषद भरली होती. या परिषदेत पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्यांचा जाहीरनामा (Declaration of Windhoek) प्रसिद्ध झाला. त्याच्या पुढील वर्षापासून (1992 सालापासून) 3 हा दिवस प्रेस फ्रिडम डे (प्रेस स्वातंत्र्य दिन) म्हणून साजरा केला जाऊ लागला. 1993 मध्ये युनेस्कोने जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास मंजुरी दिली.

  • जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी एक विशेष थीम ठेवलेली असते. माध्यमांनी निवडणुकांमध्ये आणि लोकशाही टिकवण्यासाठी मोठी आणि महत्त्वाची भूमिका निभवावी, असा संदेश आजच्या दिवसाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

  • युनेस्कोने यावर्षी इथोपियाची राजधानी अदिस अबाबा येथे वर्ल्ड प्रेस फ्रिडम डे निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच युनेस्कोचे महासंचालक आज जगभरातील माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पत्रकारांना युनेस्कोचा मानाचा गुलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रिडम प्राईज या पुरस्काराने गौरवणार आहेत.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन / कोळसा खाण कामगार दिन

महत्वाच्या घटना 

  • १७९९: श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.

  • १८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.

  • १९०४: अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.

  • १९५९:  पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.

  • १९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.

  • १९७९: मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.

  • १९९२: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  • १९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.

  • १९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.

जन्म 

  • १००८: फ्रान्सचा राजा हेन्‍री (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १०६०)

  • १६४९: बुंदेलखंड चे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १७३१)

  • १६५५: पियानोचे निर्मिते बार्टोलोमीओ क्रिस्टोफोरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी  १७३१)

  • १७६७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८४७)

  • १८२५: ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक थॉमास हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून १८९५ - इस्ट्बोर्न, इंग्लंड)

  • १८४७: धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९१७)

  • १९२८: इजिप्तचे ४थे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म.

  • १९२९: ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी ऑड्रे हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९९३)

  • १९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर २००९)

  • १९३४: भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.

  • १९४२: विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा यांचा जन्म.

  • १९८४: बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च २००७)

मृत्यू 

  • १७९९: म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान यांचा श्रीरंगपट्टण येथे मृत्यू. (जन्म: २० नोव्हेंबर १७५०)

  • १९३८: ज्युदोचे संस्थापक कानो जिगोरो यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर  १८६०)

  • १९८०: आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम यांचे निधन.

  • १९६८: बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन.

  • १९८०: युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन. (जन्म: ७ मे १८९२)

  • १९८०: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर  यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १९०५)

  • २००८: तबलावादक किशन महाराज यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९२३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.