चालू घडामोडी - ०४ नोव्हेंबर २०१८

Date : 4 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मुंबईचे तापमान ३७.६ अंशावर :
  • मुंबई  - आॅक्टोबर सरला तरी मुंबईचे कमाल तापमान कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळा येथे अनुक्रमे ३७.६, ३६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. परिणामी, ऐन दिवाळीत मुंबईकरांना थंडीचे वेध लागले असतानाच मुंबईचे तापमान ३७ अंशावर नोंदविण्यात येत आहे.

  • त्यामुळे कडाक्याचे ऊन आणि उकाडा मुंबईकरांना घाम फोडत असून, रविवारसह सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

  • भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. उर्वरित भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

  • मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर, ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सप्टेंबरमध्ये ५९२ कोटी जीएसटी महसूल जमा, मुंबई मध्य क्षेत्रातील आकडेवारी :
  • मुंबई  - केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या मुंबई मध्य क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात ५९२ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदादेखील सुमारे २५ हजार करदात्यांनी कर भरला आहे. सीजीएसटी, एसजीएसटी व आयजीएसटीद्वारे जमा झालेल्या महसुलाचा यामध्ये समावेश आहे.

  • मलबार हिल, हाजी अली, धारावी, आॅपेरा हाउस, वरळी, लालबाग, माटुंगा, शीव, दादर, घोडपदेव या मुंबई मध्यमधील विभागातील करदात्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट सिस्टिमचा लाभ घेतल्याने त्यांना करात सवलत मिळाली.

  • गेल्या वर्षभरात सीजीएसटीमध्ये ७ हजार ५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. आॅगस्ट महिन्यातील महसुलात गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के वाढ झाली होती.

  • दरम्यान, ई वे बिल न भरताच व्यापार करण्याची ३ प्रकरणे विभागाने महिनाभरात उघडकीस आणली असून तीन प्रकरणांमध्ये ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

  • यातील एका कंपनीकडून ई वे बिलाची रक्कम दंडासह जमा करण्यात आली आहे. तर, अन्य दोन कंपन्यांबाबत पुढील कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती सीजीएसटीच्या करचोरी प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त प्रशांत कुमार यांनी दिली.

दूरदर्शनची प्रक्षेपण केंद्रे होणार बंद, महाराष्ट्रातील ५५ केंद्रांचा समावेश :
  • कोल्हापूर : डिजिटलच्या तुफानात दूरदर्शनचा काड्यांचा अ‍ॅँटेना इतिहासजमा होणार आहे. अ‍ॅनालॉग पद्धतीची देशभरातील सुमारे

  • १४०० प्रक्षेपण केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात २७२ केंद्रे बंद करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात २१४ केंद्रे १७ नोव्हेंबरला बंद होतील. राज्यातील साता-यासह १२ केंद्रांचा त्यात समावेश आहे.

  • सध्या डिजिटलचा जमाना आहे. त्यातच अ‍ॅनालॉग पद्धतीच्या प्रक्षेपकाची (ट्रान्समीटर) आयुमर्यादा सुमारे १५ वर्षे असते. सध्याच्या काळात नवे ट्रान्समीटर तुलनेने खर्चिक आहेत. शिवाय उपग्रह (डीटीएच ) सेवा स्वस्त आहे. यामुळे १५ वर्षांहून अधिक काळ झालेले ट्रान्समीटर बंद करण्याचा निर्णय २०१५ मध्ये केंद्र सरकारने घेतला. त्याची अंमलबजावणी २०१८ मध्ये सुरू झाली. पहिल्या टप्प्यात २७२ लघुप्रक्षेपण केंद्रे बंद करण्यात आली.

  • राज्यातील बंद झालेली व होणारी केंद्रे - पहिल्या टप्प्यात राज्यातील अकोट, अक्कलकोट, अंमळनेर, आर्वी, बार्शी, चांदूर, धर्माबाद, दिगलूर, इचलकरंजी, कराड,कारंजा (वाशिम), खानापूर, मालेगाव, मंगळवेढा, मनमाड , माणगाव, मेहेकर, नवापूर, पांढरकवडा, पाटण, फलटण, पुलगाव, रावेर, वणी, वर्धा, भंडारा (डीडी न्यूज), मालेगाव (डीडीन्यूज) ही केंद्रे बंद करण्यात आली आहेत. दुस-या टप्प्यात दर्यापूर, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, रिस्सोड, सातारा . याशिवाय डीडी न्यूजचे प्रक्षेपण सांगली. अकोला, धुळे व कोल्हापूर येथील डीडी न्यूजचे प्रक्षेपण केंद्र बंद होणार आहे.

अंबाती रायुडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती :
  • मुंबई : भारताचा मधल्या फळीतला फलंदाज अंबाती रायुडूनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टीसारख्या क्रिकेटच्या छोट्य़ा फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रायुडूनं हा निर्णय घेतला. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात रायुडूनं ही माहिती दिली.

  • रायुडूनं या पत्रात इतकी वर्ष खेळायला दिल्याबद्दल बीसीसीआय, हैदराबाद, बडोदा आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशचे आभार मानले आहेत. रायुडूनं भारताच्या वन डे संघात आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे भारतीय संघातली चौथ्या क्रमांकाची जागा आणखी मजबूत करण्यासाठी रायुडूनं प्रथम श्रेणी क्रिकेटला गुडबाय करण्याचा निर्णय घेतला.

  • रायुडूनं आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळालं. इंग्लंडमध्ये पार पडणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भारताकडून चौथ्या नंबरवर फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून रायुडूकडे पाहिलं जात आहे.

  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रायुडूनं एक शतक आणि एक अर्धशतकीय खेळी केली होती. या मालिकेत रायुडूनं एकूण 217 धावा कुटल्या होत्या.

  • रायुडूने 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये एकूण 150 सामने खेळला असून त्यात त्याने 4856 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतकं आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रायुडूने 156 डावांत 16 शतकं आणि 34 अर्धशतकांसह एकूण 6151 धावा केल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात रायुडूच्या 1447 धावा आहेत.

स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखाच रामाचा भव्य पुतळा अयोध्येत उभा राहणार :
  • लखनऊ : सरदार पटेलांच्या गुजरातमधील भव्य पुतळ्यानंतर देशात अजून एक भव्य पुतळा उभा राहण्याची शक्यता आहे. अयोध्येत श्रीरामाचा 151 मीटर उंचीचा पुतळा उभा रहाण्याची चर्चा रंगू लागली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यासंदर्भात आज घोषणा करु शकतात.

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार पटेल यांचा पुतळा निर्माण करणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनाच रामाच्या पुतळ्याचे काम देण्यात आले येईल अशीही माहिती समोर आली.

  • एवढंच नाही तर रामाच्या पुतळ्याची छोटी प्रतिकृती योगी आदित्यनाथ यांना राम सुतार यांनी दाखवली असून ती त्यांना पसंत पडल्याचंही प्राथमिक माहिती आहे. दिवाळीच्या तोंडावरच ही योजना योगी आदित्यनाथ यांनी आणली आहे.

गंगा जलमार्गावरील वाराणसी बंदराचे १२ नोव्हेंबरला उद्घाटन :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये गंगा नदीतून मालवाहू जहाजांची वाहतूक होणार असून, त्यासाठी रामनगरात तयार झालेल्या मल्टि-मोडल टर्मिनलचे १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल, अशी माहिती केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी ट्विटद्वारे दिली.

  • देशातील पहिला अंतर्गत जल महामार्ग (इनलँड वॉटर हायवे) वाराणशीहून पश्चिम बंगालमधील हल्दियापर्यंत जाणार असून, वर्षांतील ३६५ दिवस येथून मालवाहू जहाजांद्वारे मालवाहतूक होईल. कोलकात्याहून एक जहाज २८ ऑक्टोबरला निघाले असून, त्यावर पेप्सिकोचे १६ कंटेनर आहेत.

  • वाराणशी ते हल्दियादरम्यान जलमार्गाचे अंतर १३९० किलोमीटर आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी हे ‘एमव्ही आर. एन. टागोर’ चे नव्या टर्मिनसवर स्वागत करण्यास उपस्थित राहतील.

  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या योजनेची माहिती दिली होती. टर्मिनल सुरू झाल्यामुळे काशीहून हल्दियापर्यंत दरमहा एक लाख टन मालाची वाहतूक होऊ शकेल. यामुळे भाडे कमी लागून वस्तूंचे दर कमी होतील, असेही त्यांनी म्हटले होते. व्यापारी आणि शेतकरी यांना येथून कोलकाता मार्गाने त्यांचा माल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवणेही शक्य होणार आहे.

  • पेट्रोल-डिझेल पुन्हा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर :

  • आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने कपात होत आहे.

  • आज मुंबईत पेट्रोलच्या दरात २१ पैशांनी कपात झाली आहे. तर, डिझेलचे दरही १८ पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी ८४.२८ रुपये मोजावे लागणार आहेत, आणि प्रति लिटर डिझेलसाठी ७६.८८ रुपये मोजावे लागतील.

  • राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर २१ पैसे आणि डिझेल प्रति लिटर १७ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता, दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ७८.७८ रुपये, तर डिझेलचा दर प्रति लिटर ७३.३६ रुपये झाला आहे. यामुळे नागरिकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

काश्मीरमध्ये मोसमातील पहिली हिमवृष्टी :
  • काश्मीर खोऱ्यात मोसमातील पहिली हिमवृष्टी झाली असून उर्वरित देशाशी काश्मीरचा संपर्क तुटला आहे. श्रीनगर येथे शनिवारी दुपारी हिमवृष्टी सुरू झाली. हिमाचे अनेक इंचाचे थर जमले होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार २००९ नंतर प्रथमच नोव्हेंबरमध्ये हिमवृष्टी झाली आहे.

  • गेल्या दोन दशकात चौथ्यांदा नोव्हेंबरमध्ये हिमवृष्टी झाली आहे. २००८ व २००४ मध्येही नोव्हेंबरमध्ये हिमवृष्टी झाली होती. काही जिल्ह्य़ांमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली असून अनेक शहरांतून हिमवृष्टीच्या बातम्या आल्या आहेत. काही ठिकाणी हिमकडे कोसळले आहेत. बांदीपोरा जिल्ह्य़ात गुरेझ येथे हिमकडे कोसळले असून तेथे हिमाचा निपटारा करण्यासाठी यंत्रसामुग्री पाठवण्यात आली आहे.  श्रीनगर- जम्मू मार्ग बंद झाला असून काश्मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला आहे कारण तेथील वाहतूक बंद झाली आहे.

  • हवाई वाहतूकही हिमवर्षांवाने दुपारपासून थांबली आहे. हिमवर्षांवाने थंडीची लाट आली असून अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून वीज पुरवठा खंडीत केला आहे. काही ठिकाणी पाणी उपसण्याचे पंप लावण्यात आले आहेत. सर्व हवामान केंद्रात तापमान दहा अंशापेक्षा कमी नोंदवले गेले असून  पुढील चोवीस तासांत हिमवृष्टी होईल पण नंतर दोन ते तीन आठवडे कोरडे हवामान राहील.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.

  • १९१८: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली.

  • १९२१: जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.

  • १९२२: तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश.

  • १९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

  • १९९६: कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर

  • २०००: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर.

  • २००१: हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.

  • २००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

जन्म 

  • १८७१: मानववंशशास्त्रज्ञ शरदचंद्र रॉय यांचा जन्म.

  • १८८४: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९४२)

  • १८८४: ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९६०)

  • १८९४: कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९७१)

  • १८९७: भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्माल यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९८४)

  • १९१६: बार्बी बाहुलीच्या निर्मात्या रुथ हँडलर यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००२)

  • १९२५: चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९७६)

  • १९२९: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९७१)

  • १९३०: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०१५)

  • १९३४: दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म.

  • १९५५: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.

  • १९८६: भारतीय उद्योजक सुहास गोपीनाथ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९७०: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक पं. शंभू महाराज यांचे निधन.

  • १९९१: प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट यांचे निधन. (जन्म: १२ जून १८९४)

  • १९९२: मोटर-व्हीलचेअरचे निर्माते जॉर्ज क्लाईन यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९०४)

  • १९९५: इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यित्झॅक राबिन यांचे निधन. (जन्म: १ मार्च १९२२)

  • २००५: इतिहासकार, वृत्तपत्रकार,कोशकार स. मा. गर्गे यांचे पुणे येथे निधन झाले.

  • २०११: नाटककार व साहित्यिक दिलीप परदेशी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.