चालू घडामोडी - ०४ ऑक्टोबर २०१८

Date : 4 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगातील सर्वात उंच इमारतीवर महात्मा गांधींचे छायाचित्र, अनोखी आदरांजली :
  • दुबई - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर गांधीजींचे छायाचित्र आणि तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

  • संयुक्त अरब अमीराती (यूएई) ने महात्मा गांधींना अशा प्रकारे अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. भारत सरकारने यूएईचे याबद्दल आभार मानले आहेत. 

  • दुबईतील बुर्ज खलिफा ही उत्तुंग इमारत गांधीजींच्या छायाचित्रासह  तिरंग्यात न्हाऊन निघाली. या इमारतीच्या अधिकृत ट्विटरअकाऊंटवरून बुर्ज खलिफाचा फोटो ट्विट करून गांधी जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच दरवर्षी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दुबईमधल्या बुर्ज खलिफाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात येते.

ज्येष्ठ नागरिकांना लवकरच मिळणार ‘बेस्ट’ सवलत :
  • मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना बेस्टच्या बस भाड्यामध्ये यापुढे ५० टक्के सूट देण्याचे प्रशासकीय स्तरावरील काम पूर्ण झाले असून, लवकरच अंमलबजावणीस सुरुवात होणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

  • माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

  • त्या वेळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना विश्वनाथ महाडेश्वर बोलत होते. ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनातूच तरुण पिढीला भविष्याची दिशा मिळणार असल्याने त्यांचा सन्मान हा सातत्याने होण्यासोबतच तो प्रत्येक मुंबईकरांच्या कृतीतूनही दिसला पाहिजे.

जगातील सर्वात उंच बुद्ध पुतळ्याची शास्त्रीय पाहणी :
  • बीजिंग : गौतम बुद्धांचा जगातील सर्वात उंच पुतळा चीनमधील सिचुआन प्रांतातील लेशान येथे आहे. त्याच्या दुरुस्तीसाठीचे काम हाती घेण्याच्या दृष्टीने येत्या आठ आॅक्टोबरपासून पुढचे चार महिने या पुतळ्याची शास्त्रीय दृष्टीतून पाहणी करण्यात येणार आहे.
  • ७१ मीटर उंचीचा असलेल्या या पुतळ्याच्या छाती तसेच पोटाच्या भागावर तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. ३डी स्कॅनिंग, इन्फ्रारेड थर्मल इमेजिंग तसेच ड्रोन एरियल सर्व्हेचा वापर या पाहणीसाठी केला जाईल.

  • अनेक पुरातत्व शास्त्रज्ञ या कामात गुंतलेले आहेत. चीनमधील तांग राजवटीच्या काळात लेशान शहराजवळील एका डोंगरातील कातळ खोदून हा भव्य पुतळा साकारण्यास इसवी सन ७१३ मध्ये सुरुवात झाली. तो पूर्ण होण्यास तब्बल ९० वर्षे लागली.

  • जागतिक सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या या पुतळ्याची दुरुस्ती करणे आता आवश्यक झाले आहे. या पुतळ्याची साफसफाई करण्याचा एक प्रकल्प चीनने २००१ साली राबविला होता. त्यासाठी २५ कोटी युआन खर्च करण्यात आले होते. आम्लयुक्त पाऊस व अन्य कारणांनी या पुतळ्याचे नुकसान झाल्याने २००७ सालीही त्याची दुरुस्ती करण्यात आली होती.

मोदी सरकारच्या काळात खासदारांवर तब्बल १,९९७ कोटींचा खर्च :
  • नवी दिल्ली : मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून म्हणजेच 2014 सालापासून खासदारांच्या पगार आणि सुविधांवर मोठा खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. गेल्या चार वर्षात खासदारांच्या पगार आणि इतर भत्त्यांसाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 1 हजार 997 कोटी रुपये खर्च झालेत. आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारातून यासंदर्भात माहिती मिळवलीय.

  • लोकसभा सचिवलयाने चंद्रशेखर गौड यांच्या अर्जाला उत्तरात म्हटलंय की, लोकसभेच्या एका सदस्यांसाठी सरासरी 71.29 लाख रुपये खर्च केला गेला, तर राज्यसभेच्या एका सदस्यासाठी सरासरी 44.33 लाख रुपये खर्च केला गेला.

  • लोकसभेत एकूण 545 सदस्य (जनतेतून निवडून आलेले 543 सदस्य आणि राष्ट्रपतींद्वारे नामांकित अँग्लो-इंडियन दोन सदस्य) आणि राज्यसभेत 245 सदस्य आहेत.

  • 2014-15 सालापासून यावर्षीपर्यंत म्हणजेच चार आर्थिक वर्षात लोकसभा सदस्यांना पगार आणि भत्त्यांसाठी 1 हजार 554 कोटी रुपये देण्यात आले. म्हणजेच, प्रत्येक सदस्याला सरासरी 71 लाख 29 हजार 390 रुपये देण्यात आले. याच काळात राज्यसभा सदस्यांच्या पगार आणि भत्त्यांसाठी 443 कोटी रुपये खर्च करण्यात आले.  म्हणजेच, प्रत्येक सदस्याला 44 लाख 33 हजार 682 रुपये देण्यात आले.

'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या ५१ शाखा बंद होणार :
  • मुंबई : 'बँक ऑफ महाराष्ट्र' (BoM) ने आपल्या 51 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बंद होणाऱ्या सर्व शाखा शहरी भागातील असल्याची माहिती पुणे मुख्यालयातून देण्यात आली.

  • 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या देशभरात एक हजार 900 शाखा आहेत. यापैकी शहरी भागात असलेल्या 51 शाखांमधून बँकेला कोणताही फायदा होत नाही, त्यामुळे या शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आल्याची माहिती.

  • बंद होणाऱ्या शाखांमधील ग्राहकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही, कारण तिथल्या खातेधारकांचं दुसऱ्या शाखेत विलीनीकरण करण्यात येणार आहे. संबंधित शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड 31 डिसेंबरपासून कायमस्वरुपी रद्द करण्यात येत आहेत.

  • बंद होणाऱ्या 51 शाखांमधील सर्व बँक ग्राहकांना दिलेले चेकबूक 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेत परत जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. नवीन मिळालेल्या आयएफसीएस आणि एमआयसीआर कोडने व्यवहार करण्याच्या सूचना ग्राहकांना देण्यात आल्या आहेत.

MPSC पास झालेल्या ८०० विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द :
  • पंढरपूर : राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे MPSC मध्ये पास झालेल्या 800 हून अधिक मुलांना सेवेत दाखल होण्यापूर्वीच नारळ मिळाला आहे.  राज्य स्पर्धा परीक्षा मंडळामार्फत गेल्यावर्षी घेतलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या निवडी नागपूर खंडपीठाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीचं स्वप्न सत्यात उतरण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 833 यशस्वी विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. या विद्यार्थ्यांवर सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वैफल्यात जायची वेळ आली असून, हातातील नोकऱ्या सोडून घरी बसलेल्या या तरुणांचं आता आभाळच फाटलं आहे.

  • राज्यातील परिवहन विभागात उच्चशिक्षित तरुणांनी यावे, यासाठी राज्य सरकारने 2016 मध्ये जीआर काढून परीक्षा पात्रतेच्या अटी शिथिल केल्या होत्या. त्याबाबतची माहिती राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना देण्यात आली होती. त्यानुसार 29 जानेवारी 2017 रोजी या परीक्षेची जाहिरात देखील आली. तब्बल चार वर्षांनी आरटीओ परीक्षेची जाहिरात आल्याने राज्यातील 70 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत यातील 10 हजार विद्यार्थ्यांची निवड झाली. यानंतर हे तरुण नोकऱ्या सोडून या अंतिम परीक्षेच्या अभ्यासाला लागली.

  • मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट 2017 रोजी घेण्यात आली आणि याचा निकाल 31 मार्च 2018 रोजी झाला. परीक्षा दिलेल्या 10 हजार विद्यार्थ्यातून 833 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या यशस्वी विद्यार्थ्यांना निवडीचं पत्रही देण्यात आलं. निवडीची पत्रं मिळाल्याने गावोगावी यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळे रंगले. तब्बल 70 हजार विद्यार्थ्यांतून निवड होत, आरटीओची सरकारी नोकरी पक्की झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुटुंबीयही अभिमानाने मुलांच्या यशाचं कौतुक करत होते.

  • याच काळात 14 जून 2018 रोजी या मुलांना कागदपत्रे तपासणीसाठी येण्याबाबत कळविण्यात आले. हे सर्व यशस्वी विद्यार्थी कागदपत्रे घेऊन जाणार, तेवढ्यात त्यांना या निवडीवर न्यायालयाकडून स्थगिती आल्याने, निवड प्रक्रिया थांबवण्यात आल्याचं पत्र आलं.

दिनविशेष :
  • राष्टीय एकता दिन / जागतिक प्राणी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.

  • १९५७: सोविएत रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.

  • १९५९: सोविएत रशियाच्या ल्युनिक-३ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.

  • १९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट - २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

  • २००६: ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.

जन्म 

  • १८२२: अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष रुदरफोर्ड हेस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८९३)

  • १९१३: हैती देशाचे पहिले पंतप्रधान मार्टिअल सेलेस्टीन यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २०११)

  • १९१६: अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म.

  • १९२८: अमेरिकन पत्रकार व लेखक ऑल्विन टॉफलर यांचा जन्म.

  • १९३५: मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक अरुण सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९८४)

  • १९३७: इंग्लिश लेखिका व अभिनेत्री जॅकी कॉलिन्स यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८४७: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १७९३)

  • १९०४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३४)

  • १९२१: गायक, नट केशवराव भोसले यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १८९०)

  • १९४७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)

  • १९६६: सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९११)

  • १९८२: मराठी कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९०७)

  • १९८९: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२४)

  • २०१५: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.