चालू घडामोडी - ०५ एप्रिल २०१८

Date : 5 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गावर चालतोय- नरेंद्र मोदी :
  • नवी दिल्ली: दलित व आदिवासी अत्याचारविरोधी (अॅट्रॉसिटी) कायद्यात बदल करण्याच्या मुद्द्यावरून देशातील वातावरण तापले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सरकारची भूमिका मांडली. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरूनच चालत आहोत.

  • शांती आणि ऐक्य हा बाबासाहेबांच्या विचारांचा गाभा होता. याबरोबरच आम्ही समाजातील गरीबात गरीब व्यक्तींच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहोत, असे मोदी यांनी सांगितले. यावेळी मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. भारतीय राज्यघटनेचे जनक असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आमच्या सरकारशिवाय इतर कोणीही यथोचित सन्मान केला नाही, असेही त्यांनी म्हटले.

  • अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा कायदा सौम्य झाल्याचे सांगत, देशभरातील अनेक दलित संघटना सोमवारी रस्त्यावर उतरल्या. त्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले.

  • आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केली. काही ठिकाणी पोलिसांना गोळीबारही करावा लागला. या हिंसाचारात 10 जण ठार झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अॅट्रॉसिटीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर झालेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने येत्या 10 दिवसांत याबाबत निर्णय घेऊ असे स्पष्ट केले होते. 

भारताचं खातं उघडलं, वेटलिफ्टिंगमध्ये गुरूराजाला रौप्य पदक :
  • नवी दिल्ली- कॉमनवेल्थ गेममध्ये भारताचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टिंग प्रकारात भारताच्या गुरू राजा यांनी 56 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. 28 वर्षीय गुरू राजा यांनी 249 किलोचं वजन उचलत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. सुरूवातीला गुरूराजा यांनी 111 किलो वजन उचललं नंतर तिसऱ्या फेरीत 138 किलो वजन उचलण्याची कामगिरी गुरू राजा यांनी केली. शेवटच्या फेरीत 249 किलो वजन उचलत गुरू राजा यांना रौप्य पदक मिळालं. 

  • मलेशियाच्या मुहम्मद अझहर अहमद यांनी 261 किलो वजन उचलत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. कास्य पदक श्रीलंकेकडे गेलं अशून चतुरंगा लकमल यांनी 248 किलो वजन उचलत कास्य पदक कमावलं आहे. 

  • गुरू राजा यांनी 2010मध्ये वेटलिफ्टिंगला सुरूवात केली. वॉमनवेल्थ सिनिअर वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या गुरूराज यांनी 2016मध्ये पेनंग स्पर्धेत 249 किलो वजन उचललं होतं. 2016च्या शेवटी झालेल्या साऊन एशियन गेम्समध्ये गुरू राजा यांनी सुवर्ण पदक मिळवलं होतं. 

  • दरम्यान, ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे २१ व्या कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात झालेली आहे. कालच्या दिवशी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. 

नागपुरात ‘एलईडी’ पथदिव्यांचा कधी पडणार उजेड :
  • नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याचा विचार करता महापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात १८ महिन्यात २७ हजारांचे उद्दिष्ट असताना जेमतेम ५३७ पथदिवे बदलविले. त्यामुळे जे.के. सोल्युशन इंक कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले.

  • गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात नव्याने या कामाला सुरुवात करण्यात आली. मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मार्च २०१८ पर्यत २३ हजार एलईडी दिवे लावण्यात आले. त्यामुळे १ लाख २५ हजार एलईडी पथदिव्यांची शहरातील नागरिकांना आणखी काही वर्षे प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

  • महापालिकेला दरवर्षी पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती तसेच वीज बिलावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. या खर्चासोबतच ऊर्जा बचत व्हावी, या हेतूने सोडियम दिव्याऐवजी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या प्रकल्पांवर ४७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात नादुरुस्त केबल बदलणे, तुटलेल्या खांबाच्या ठिकाणी नवीन खांब बसविणे, फिडबॅक देणारे नवीन फिडर बसविणे आदी कामांचा समावेश आहे. यावर ५९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र आर्थिक टंचाईमुळे प्रकल्पाचे काम संथ आहे.

  • पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या भागात एलईडी दिवे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर शहरातील रस्त्यांवरील विद्यमान पथदिवे बदलवून त्याठिकाणी एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांत प्रकल्पावरील खर्च निघून ३५० कोटींची बचत होईल असा दावा पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

हवाई दलाचं सामर्थ्य वाढणार - १०० लढाऊ विमानांची खरेदी होणार :
  • भारतीय हवाई दलासाठी 100 विमानांची खरेदी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासाठी 1.25 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. चेन्नईत होणाऱ्या डेफएक्स्पोच्या आधी ही प्रक्रिया सुरु करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. लढाऊ विमानांच्या कमतरतेमुळे हवाई दलाच्या सामर्थ्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळेच हवाई दलाची ताकद वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. 

  • लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून निविदा मागवण्यात येणार आहेत. यामध्ये अमेरिका, स्वीडन, फ्रान्स आणि युरोपीयन कंपन्यांचा समावेश असेल. डेफएक्स्पो सुरु होण्याआधी विमान कंपन्यांकडून याबद्दलची माहिती मागवण्याचा हवाई दलाचा प्रयत्न आहे. 11 एप्रिलपासून चेन्नईत डेफएक्स्पो सुरु होईल. या एस्क्पोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. 

  • शंभरपेक्षा अधिक लढाऊ विमानांची खरेदी करण्याचा हवाई दलाचा मानस आहे. यासोबतच मेक इन इंडियाला गती देण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. परदेशी कंपन्यांच्या मदतीने भारतातच लढाऊ विमानांची उभारणी करण्याचा सरकारचा विचार आहे. हवाई दलाला लढाऊ विमानांची नितांत आवश्यकता असून याबद्दल तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे. त्यामुळेच विमानांची निर्मिती करणाऱ्या कंपनीशी लवकरात लवकर करार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 

  • विमानांच्या कमतरतेमुळे हवाई दलाच्या युद्धसज्जतेवर विपरित परिणाम होताना दिसतो. त्यातच येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये हवाई दलातील मिग-21 आणि मिग-27 विमाने निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी तातडीने लढाऊ विमाने खरेदी करण्याची गरज आहे. 

काळवीट शिकारप्रकरणाचा आज निकाल, आरोपी सिनेस्टार जोधपूरमध्ये :
  • जयपूर: सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून सुटका झालेला अभिनेता सलमान खान काळवीट शिकार प्रकरणी अडकणार का? याचं उत्तर आज राजस्थानातील जोधपूर सत्र न्यायालयात मिळणार आहे.

  • 20 वर्ष जुन्या काळवीट शिकारप्रकरणात आज जोधपूर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज या प्रकरणाचा अंतिम निर्णय येणार आहे.

  • या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत.

  • जोधपूर न्यायालयाचे पिठासीन अधिकारी देवकुमार खत्री यांनी 20 वर्ष जुन्या खटल्याच्या निर्णयासाठी आजची तारीख निश्चित केली आहे.

  • वीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाचं चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरु होतं. त्यावेळी सलमानने घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावात 27-28 डिसेंबरच्या रात्री हरणांची, तर कांकाणी गावात 1 ऑक्टोबरला काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.

मला अजून एक संधी द्या - मार्क झुकेरबर्ग :
  • फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने मला अजून एक संधी द्या असं म्हटलं आहे. युजर्सची माहिती त्यांची परवानगी न घेता तिस-या व्यक्तीशी शेअर करण्याची चूक माझ्या कंपनीने केली असली तरी फेसबुक चालवण्यासाठी सध्या मीच योग्य व्यक्ती असल्याचा विश्वासही झुकेरबर्गने व्यक्त केला आहे. डेटा लीक प्रकरणाची सर्व जबाबदारी आपण घेत असल्याचं मार्क झुकेरबर्गने कॉन्फरन्स कॉलदरम्यान रिपोर्टर्सना सांगितलं. यावेळी त्याला सध्याच्या घडीला फेसबुकचं नेतृत्व करण्यासाठी तू योग्य व्यक्ती आहेस का ? असं विचारलं असता त्याने हो असं उत्तर दिलं.

  • केम्ब्रिज अॅनालिटीका कंपनीने फेसबुकच्या तब्बल ८.७ कोटी युजर्सचा डेटा लीक केला आहे. यामध्ये अमेरिकन नागरिकांची संख्या जास्त आहे. २००४ साली फेसबुकची स्थापना करणा-या झुकेरबर्गने पुन्हा एकदा काही त्रुटी राहिल्याचं मान्य करत पुन्हा एकदा संधी देण्याचं आवाहन केलं आहे.

  • ‘मला अजून एक संधी द्या. ही खूप मोठी चूक होती. ही माझी चूक आहे’, असं मार्क झुकेरबर्ग कॉन्फरन्स कॉलदरम्यान बोलत होता.

  • ‘हो लोकांकडून चुका होतात आणि त्यातून ते शिकतात. चूक मान्य करणारा मी पहिला व्यक्ती आहे. आमच्या जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडल्या नाहीत. आम्ही आमच्या चुकांमधून शिकत आहोत हेदेखील लोकांनी पाहिलं पाहिजे’, असं मार्क झुकेरबर्ग बोलला आहे.

  • डेटा लीक प्रकरणानंतर आपल्याला पद सोडण्यास सांगितल जात आहे याबाबत माझ्याकडे काही माहिती नाही. पण अद्याप या प्रकरणी कोणालाही निलंबित करण्यात आलेली नाही अशी माहिती झुकेरबर्गने दिली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६६३: दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला.

  • १६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.

  • १९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.

  • २०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.

  • २०००: जळगाव नगरपालिकेच्या १७ माजली इमारतीचे उद्घाटन.

जन्म

  • १८२७: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२)

  • १८५६: अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५)

  • १९०८: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९८६)

  • १९०९: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १९९६)

  • १९१६: हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २००३)

  • १९२०: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २००५)

  • १९२०: इंग्लिश कादंबरीकार आर्थर हॅले यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४)

  • १९६६: भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.

मृत्यू

  • १९१७: स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचे निधन.

  • १९२२: आर्य महिला समाज च्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)

  • १९४०: इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)

  • १९६४: नकलाकार गोपाळ विनायक भोंडे यांचे निधन.

  • १९९३: हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी१९७४)

  • १९९६: बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन यांचे निधन.

  • १९९८: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रुही बेर्डे यांचे निधन.

  • २००२: दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.