चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ एप्रिल २०१९

Date : 5 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
निवडणूक यंत्रणेतील दीड हजार वाहनांवर ‘जीपीएस’ प्रणाली :
  • लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्या जात असलेल्या यंत्रणेत यंदापासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आता ‘जीपीएस’ प्रणालीचा वापर सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे यंत्रणा प्रभावीपणे राबवणे शक्य झाले आहे. केवळ यंत्रेच नाही,तर निवडणूक अधिकाऱ्यांना यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासही त्याचा उपयोग होऊ लागला आहे. आचारसंहिता कक्षाच्या भरारी पथकांनी आतापर्यंत पकडलेली पावणे तीन कोटींची रोकड हे ‘जीपीएस’ प्रणालीच्याच वापराचे यश असल्याचे मानले जात आहे.

  • निवडणूक यंत्रणेत यापूर्वी जीपीएस प्रणालीचा वापर केला जात नव्हता, तो यंदापासून केला जात आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आता थेट नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले आहे.

  • आचारसंहिता भंगाच्या तक्रारीबरोबरच निवडणुकीतील पैशाचा वापर, अवैध दारु, अवैध पदार्थाच्या वाहतुकीला प्रतिबंध बसावा यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण ३६ पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकात एक दंडाधिकारीय अधिकार असलेला अधिकारी व त्याच्या समवेत तीन पोलीस दिले गेले आहेत.

  • ही पथके जिल्हांतर्गत वाहतुकीचे महत्त्वाचे रस्ते, परजिल्ह्य़ातून नगरमध्ये प्रवेश करणारे महामार्ग, महत्त्वाचे चौफुले आदी ठिकाणी नाकाबंदीसाठी तैनात करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीतही अशा पद्धतीने नाकेबंदी केली जात होतीच, परंतु यंदा या ३६ तपासणी पथकांच्या (स्थिर निरीक्षण पथके, एसएसटी) वाहनांना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ‘जीपीएस’ प्रणाली बसवली गेली आहे. त्यामुळे ही पथके नेमून दिलेल्या ठिकाणी थांबतात की नाही, कोणत्या मार्गावर फिरत आहेत, याची माहिती मिळत आहे. 

अधिकाधिक महिलांना उमेदवारी द्यायला हवी :
  • मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत अधिकाधिक महिलांना उमेदवारी द्यायला हवी. महिलांना उमेदवारी देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, महिलांविषयी आदर आणि विश्वास हवा. केवळ घोषणा करून काहीही होत नाही, असा संदेश आपल्याच पक्षाला देत भाजपच्या प्रवक्त्या शायना एन सी यांनी नाराजी व्यक्त केली.

  • इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. टीएमसी आणि बीजेडी या पक्षांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याकडे लक्ष वेधत त्यांनी भाजपसह इतर पक्षांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले नसल्याचे सांगितले.

  • तुमच्या पक्षात राजकीय इच्छाशक्तीची कमतरता आहे, महिलांचा आदर आणि त्यांच्यावर विश्वास टाकला जात नाही, भाजपतर्फे आणखी महिलांना आरक्षण द्यायला हवे असे तुम्हाला वाटते का असे शायना यांना विचारले असता, तुम्ही मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहात, असे सांगत त्यांनी उत्तर देण टाळले.

  • महाराष्ट्रात लोकसभेच्या २५ जागांसाठी भारतीय जनता पक्षातर्फेच सर्वाधिक म्हणजे २८ टक्के जागा या महिलांना देण्यात आल्या आहेत. यावर शायना यांनी त्यातील अनेक जणी या पक्षातील नेत्यांच्या कन्या असल्याकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या २५ पैकी फक्त सात महिलांना उमेदवारी दिली आहे, ती पुरेशी आहे का? त्यातही पूनम महाजन, प्रीतम मुंडे आणि हीना गावित या पक्षातील नेत्यांच्याच मुली आहेत. तर स्मिता वाघ पक्षातील नेत्याच्या पत्नी आहेत. याला महिलांचे प्रतिनिधित्व म्हणायचे का? नेत्यांच्या कुटुंबातील नेतृत्व करणाऱ्या महिला या  पात्र असतील तर त्यात काही हरकत नाही मात्र इतरांनाही संधी द्यायला हवी, असे शायना म्हणाल्या.

‘नमो टीव्ही’ ही दूरचित्रवाहिनी नव्हे, तर भाजपचे प्रचाराचे व्यासपीठ :
  • ‘नमो टीव्ही’ ही परवानाप्राप्त दूरचित्रवाहिनी नसून भाजपचे प्रचाराचे व्यासपीठ असल्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हे चॅनेल माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक आणि वरिष्ठ राजकीय विश्लेषक पराग शाह यांच्या मालकीचे असल्याचे कळते. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना शाह यांनी त्यांच्यासोबत काम केले होते.

  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या काही आठवडे आधीच एक दूरचित्रवाहिनी सुरू होणे हे आदर्श आचारसंहितेच्या कक्षेत बसते काय, असा प्रश्न राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला विचारत आहेत. मात्र, परवाना नसलेली एखादी वाहिनी डीटीएच प्लॅटफॉर्म व केबल नेटवर्क कसे दाखवू शकतात, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारकडे नोंदणी न झालेली कुठलीही वाहिनी कुठलेही डीटीएच प्लॅटफॉर्म दाखवू शकत नाही, असे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे नमूद केले आहे.

  • सत्ताधारी पक्ष असल्याचा दुरुपयोग करून भाजपने डीटीएच कंपन्या व केबल नेटवर्कना आपली नमो टीव्ही वाहिनी दाखवण्यास भाग पाडले आहे काय? भाजपने वस्तुत: नियमांमधील संदिग्धतेचा फायदा घेतला आहे, असे माध्यम क्षेत्रातील एका व्यावसायिकाने सांगितले. दरम्यान, या वाहिनीचे संचालन करण्यात आपला किंवा आपल्या कंपनीचा आता काहीही संबंध नसल्याचे ही वाहिनी सर्वप्रथम दाखवणाऱ्या कंपनीच्या मूळ प्रवर्तकांपैकी एक असलेल्या सुजय मेहता यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांचे पुण्यात आगमन; आज विद्यार्थ्यांशी संवाद :
  • काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे गुरुवारी रात्री पुण्यात आगमन झाले. पुणे दौऱ्याच्या निमित्ताने राहुल गांधी शुक्रवारी (५ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार असून पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष, मंडल अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.

  • अखिल भारतीय युवक काँग्रेस आणि युवा स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांबरोबर संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हडपसर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त राहुल गांधी यांचे गुरुवारी रात्री लोहगाव विमानतळावर आगमन झाले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याच्या सहप्रभारी सोनल पटेल, शहराध्यक्ष रमेश बागवे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन काटे, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, लोकसभेचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

  • राहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राहुल गांधी पुण्यात येणार असले तरी तो राजकीय स्वरूपाचा कार्यक्रम नाही, असे काँग्रेसकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. किमान पाच हजार विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना ते उत्तरे देणार आहेत.

ऑगस्ट वेस्टलँड : मिशेलकडून काँग्रेसच्या टॉप नेत्याचा उल्लेख; ईडीचा दावा :
  • ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारात भ्रष्टाचारप्रकरणी मुख्य आरोपी ख्रिश्चिअन मिशेलने भ्रष्टाचाराच्या व्यवहाराच्या फाईलमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये लिहीण्यात आलेल्या नावांचा खुलासा केला आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्रात याचा उल्लेख केला आहे.

  • ईडीने व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी गुरुवारी कोर्टात चौथे आरोपपत्र दाखल केले. यामध्ये ईडीने म्हटले की, चौकशी दरम्यान या व्यवहाराच्या फाईलमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या शब्दांच्या संक्षिप्त रुपांचा उलगडा मिशेलने केला आहे. त्याने सांगितले आहे की, fam या इंग्रजी शब्दाचा अर्थ फॅमिली असा होतो. तसेच AP म्हणजे काँग्रेसच्या एका टॉपच्या नेत्याचे नाव आहे. त्याचबरोबर इतरही काही संक्षिप्त शब्दांचे अर्थ म्हणजे हवाई दलातील अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि तत्कालीन सत्ताधारी पक्षाचे टॉप नेते यांची नावे आहेत. हा व्यवहारात ३ कोटी युरोचा भ्रष्टाचार झाला आहे.

  • आरोपपत्रात ईडीने दावा केला की, या लोकांना भ्रष्टाचाराच्या पैशाच्या देण्यांसाठी गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा अवलंब केला तसेच हवालाच्या मार्गे हे पैसे काढण्यात आले. या प्रकरणाची चौकशी ईडी आणि सीबीआयकडे आहे. यामध्ये माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांच्याही नावाचा समावेश आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६३: दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला.

  • १६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.

  • १९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.

  • २०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.

  • २०००: जळगाव नगरपालिकेच्या १७ माजली इमारतीचे उद्घाटन.

जन्म 

  • १८२७: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२)

  • १८५६: अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५)

  • १९०८: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९८६)

  • १९०९: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १९९६)

  • १९१६: हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २००३)

  • १९२०: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै२००५)

  • १९२०: इंग्लिश कादंबरीकार आर्थर हॅले यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४)

  • १९६६: भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९१७: स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचे निधन.

  • १९२२: आर्य महिला समाजच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)

  • १९४०: इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)

  • १९६४: नकलाकार गोपाळ विनायक भोंडे यांचे निधन.

  • १९९३: हिंदी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४)

  • १९९६: बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन यांचे निधन.

  • १९९८: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रुही बेर्डे यांचे निधन.

  • २००२: दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.