चालू घडामोडी - ०५ ऑगस्ट २०१८

Date : 5 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताच्या चंद्र मोहिमेला ग्रहण, चंद्रयान-२ मिशन लांबणीवर :
  • नवी दिल्ली - भारताच्या अंतराळ संशोधनातील सर्वात महत्त्वाकांक्षी अशा चंद्रयान-2 मोहिमेला ग्रहण लागले आहे. चंद्रयान-2 चे प्रक्षेपण पुन्हा एकदा काही काळ लांबणीवर टाकण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे. इस्रोमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्राचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून चंद्रयान-2 चे प्रक्षेपण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार होते. मात्र आता ही मोहीम डिसेंबर 2018 पर्यंत टाळण्यात आली आहे. 

  • याआधी चंद्रयान-2चे प्रक्षेपण गतवर्षी एप्रिल महिन्यात करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे भारताची ही मोहीम लांबणीवर पडत आहे. दरम्यान, चंद्रयान मोहीम लांबणीवर पडल्याने चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांनाही धक्का बसला आहे.

  •  चंद्रयान-2 मोहिमेला होत असलेल्या उशिरासाठी काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी याआधीच चंद्रावर आपले उपस्थिती निर्माण केली आहे. दरम्यान, चंद्गावर पोहोचणारा चौथा देश बनण्यासाठी भारत आणि इस्राइल या देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, भारताची चंद्रयान मोहीन लांबणीवर पडल्यामुळे इस्राइलकडे चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनण्याची चालून आली आहे. 

  •  भारताची ही दुसरी चंद्र मोहीम आहे. दरम्यान, चंद्रयान-2 हे पूर्णपणे स्वदेशी विकसित आहे. चंद्रयान-2 या अंतराळ यानाचे वजन 3 हजार 290 किलोग्रॅम आहे. तसेच हे यान चंद्राच्या चारी बाजूनी भ्रमण करून त्याची आकडेवारी एकत्र करेल.  

डिजिटल पेमेंटवर मिळणार कॅशबॅक :
  • नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटवर ग्राहकांना जीएसटीतून राज्य सरकारांमार्फत रोख कॅशबॅक देण्याच्या प्रस्तावास जीएसटी परिषदेने शनिवारी मान्यता दिली. रुपे कार्ड, भीम अ‍ॅप आणि यूपीआय सीस्टिमवरून केलेल्या पेमेंटवर ही सवलत असेल.

  • जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर वित्तमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, इच्छुक राज्य सरकारे पथदर्शी पातळीवर डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन लाभाची ही योजना लवकरच जाहीर करतील. त्यासाठी आवश्यक तांत्रिक व्यवस्था जीएसटीएन आणि नॅशनल नेटवर्क कॉर्पोरेशन आॅफ इंडियाकडून लवकरच उभी केली जाईल.

  • या योजनेची अंमलबजावणी सुरू होताच रुपे कार्ड आणि भीम अ‍ॅपवरून केलेल्या पेमेंटवर ग्राहकांना एकूण जीएसटीच्या २0 टक्के पैसे परत मिळतील. तथापि, या परताव्यास १00 रुपयांची कमाल मर्यादा असेल. त्याहून अधिक परतावा मिळणार नाही. मंत्रिसमूहाच्या अंदाजानुसार, यामुळे सरकारला वर्षाला १ हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागेल.

लाईव्ह भाषणात ड्रोन हल्ला, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती बचावले :
  • कराकस : भाषण चालू असताना व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. शनिवारी झालेल्या या घटनेत निकोलस मादुरो थोडक्यात बचावले. लाईव्ह भाषणात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आणि सर्वांची पळापळ सुरु झाली.

  • व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे आपल्या लष्कराच्या शेकडो शिपायांसमोर भाषण करत असताना राष्ट्रपतींवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र, निकोलस मादुरो हे या हल्ल्यातून बचावले असून ते सुरक्षित आहेत, पण सात सुरक्षारक्षक या घटनेत जखमी झाले.

  • ड्रोनमध्ये स्फोटकं भरुन राष्ट्रपतींना लक्ष्य करण्याच्या दृष्टीनेच हा हल्ला करण्यात आला होता, पण फायर फायटर्सने हा प्रयत्न हाणून पाडला. पण या हल्ल्यामुळे कार्यक्रमाच्या आसपास असलेल्या नागरिकांच्या घराच्या काचाही फुटल्या. हा हल्ला नेमका कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही, मात्र राष्ट्रपतींवर हल्ल्यासाठी विरोधी पक्षांच्या आंदोलकांवर सरकारकडून आरोप केले जात आहेत.

  • चॅनल NTN24 TV ने या घटनेचा व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये भाषणादरम्यान राष्ट्रपती आणि त्यांची पत्नी अचानक आकाशाकडे पाहू लागतात, आणि त्यानंतर स्फोटांचा आवाज ऐकायला येतो. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

इमरान खान यांचा शपथविधी 14 ऑगस्टला ?
  • इस्लामाबाद : पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाचे (पीटीआई) प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इमरान  खान पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ 14 ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी घेऊ शकतात.  या बद्दलची माहिती एका वृत्तामधून समोर आली आहे.

  • यापूर्वी 30 जुलैला इमरान खान यांनी 11 ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच तहरीक-ए-इन्साफ पक्षाने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्षांशी वाटाघाटी पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.

  • पाकिस्तानचे अंतरिम कायदे मंत्री अली जफर यांनी “देशाचे नवीन पंतप्रधानांचा शपथविधी 14 ऑगस्टला व्हावा अशी माझी आणि अंतरिम पंतप्रधान निवृत्त न्यायाधीश नसीरुल यांची अशी इच्छा असल्याचे सांगितले आहे.”

  • पाकिस्तान निवडणुकीत काय झालं - पाकिस्तानात 25 जुलैला 270 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत इमरान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक 116 जागा मिळाल्या. इमरान यांनी स्वत: पाच जागांवर निवडणूक लढवली. या पाचही जागांवर त्यांचा विजय झाला.

रेल्वे भरतीत ३२ हजार जागांची वाढ, एकूण जागा १,३२,४६४ :
  • मुंबई : रेल्वे मंत्रालायाने गृप ‘G’ मधील भरती प्रक्रियेत 32 हजार जागांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गृप ‘G’मध्ये आता 90 हजार जागांऐवजी तब्बल  1 लाख 32 हजार 646  जागांसाठी भरती होणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात याबाबत माहिती दिली.

  • टेक्नेशियन्स आणि असिस्टंट लोको पायलटसह अन्य पदांसाठी रेल्वेमंत्रायलयाने देशव्यापी भरती अभियान सुरु केलं. यासाठीची परीक्षा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

  • रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत रेल्वेमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “या श्रेणीतील पदांसाठी सेवेच्या खडतर अटी ठेवण्यात आलेल्या असतात. त्यामुळे महिला या पदांसाठी कमी प्रमाणात अर्ज करतात.”

  • “रेल्वेच्या सुरक्षिततेचा स्तर उंचावण्यासाठी नव्या यंत्रांच्या खरेदीसाठी सात हजार कोटींचा अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. पुढील वर्षी या निधीत 13 हजार कोंटीची वाढही केली जाईल. यामुळे रेल्वे दुर्घटना रोखण्यास मदत होईल,” असा विश्वास पियुष गोयल यांनी व्यक्त केला.

राज्यात सातव्या वेतन आयोगासाठी आता जानेवारीचा मुहूर्त : 
  • मुंबई : राज्य सरकारी अधिकारी-कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा वेतनलाभ जानेवारी 2019 पासून मिळणार आहे. वेतन आयोगाच्या लाभासोबतच 2017 मधील थकित महागाई भत्त्याची रक्‍कमदेखील देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

  • शनिवारी ‘वर्षा’ निवासस्थानी अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

  • वेतन आयोगाचा लाभ जानेवारी 2016 या निर्धारित तारखेपासूनच देण्यात येणार आहे. मात्र सहाव्या वेतन आयोगात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनेक त्रुटी होत्या. त्यावर के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करत असून ते अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

  • वेतनवाढ आणि थकित महागाई भत्ते या सर्व बाबींसाठी अंदाजे 4 हजार 800 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबतही शक्य तितक्या लवकर निर्णय घेईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

  • चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रश्‍नांवर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. त्यापूर्वी मुख्य सचिवांनी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना आणि शिक्षक संघटनांसोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्‍न मार्गी लावावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९१४: ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.

  • १९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.

  • १९६२: कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.

  • १९६५: पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.

  • १९९४: इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.

  • १९९७: रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ-यू हे अंतराळयान मीर अंतराळस्थानकाकडे रवाना.

  • १९९७: फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्‍या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १८५८: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९२४)

  • १८९०: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७९)

  • १९३०: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२)

  • १९३३: लेखिका व समीक्षिका विजया राजाध्यक्ष यांचा जन्म.

  • १९५०: भारतीय वकील आणि राजकारणी महेंद्र कर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २०१३)

मृत्यू

  • १९९१: होंडा कंपनी चे स्थापक सुइचिरो होंडा यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९०६)

  • १९९२: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९०५)

  • १९९७: स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते के. पी. आर. गोपालन यांचे निधन.

  • २०००: भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ भारद्वाज यांचे निधन.

  • २००१: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे यांचे निधन. (जन्म: ११ मे १९१४)

  • २०१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९१४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.