चालू घडामोडी - ०५ डिसेंबर २०१८

Date : 5 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतात ड्रोनचा वापर करण्याचे नियम शिथील :
  • नवी दिल्ली : भारतात ड्रोनचा वापर करण्यावर जे प्रतिबंध लावण्यात आले होते, ते शिथील करण्यात आले आहेत. मात्र त्यासाठी काही नियम आणि अटी डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हील एविएशनकडून आधीचे निर्बंध करतानाच काही नव्या अटीही लागू करण्यात आल्या आहेत.

  • या अटींची पूर्तता केल्यानंतरच ड्रोनच्या उड्डाणाची परवानगी मिळणार आहे. या नियम आणि अटी पुर्ण केल्यासच ड्रोन उडवता येणार आहे. भारत सरकारकडून सुरक्षेच्या कारणामुळे संवेदनशील परिसरात ड्रोन उडवण्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते.

  • ड्रोनची पाच भागात विभागणी - DGCA ने ड्रोनची पाच भागात विभागणी केली आहे. पहिला म्हणजे नॅनो ड्रोन ज्याचे वजन अडीचशे ग्रॅम असते. दुसरे आहे मायक्रो ड्रोन ज्याचे वजन अडीचशे ते 2 किलो पर्यंत असतं. तर बाकी 3 लहान,मध्यम, आणि मोठ्या साईजचे असतात. ज्यांचे वजन 2 किलो ते 150 किलो पर्यंत असतात.

नागपूरचे महाराजबाग प्राणीसंग्रहालय बंद होणार :
  • नागपूर : औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने रद्द केल्यानंतर आता नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयाची मान्यता देखील रद्द केली आहे. त्यामुळे देशातील सर्वात जुने प्राणीसंग्रहालय म्हणून नुकतेच 25 वर्ष पूर्ण करणाऱ्या ह्या प्राणीसंग्रहालयाचे भवितव्य काय? हा मोठा प्रश्न उभा झाला आहे.

  • नागपूरच्या अगदी मध्यभागी स्थित महाराजबाग प्राणीसंग्रहालय हे इतर प्राणी संग्रहालयांपेक्षा वेगळे आहे. कारण या संग्रहालयाची मालकी आहे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने ह्या प्राणीसंग्रहालयाचे मान्यता नियम न पाळल्यामुळे आणि व्यवस्थापनातील अनेक त्रुटीमुळे रद्द केली आहे.

मान्यता रद्द करण्याची काही ठळक कारणे

- बालोद्यान वेगळे केलेले नाही 

- कचरा व्यवस्थापन,संरक्षक भिंत नाही 

- मत्स्यालय अद्यावत नाही 

- प्राण्यांच्या नोंदी बरोबर नाहीत

- प्राण्यांचे स्थानांतरण विना परवानगीने

अनेक महत्वाच्या कामाची पदे रिक्तच

  • एकीकडे ही सत्य परिस्थिती असली तरीही दुसरीकडे हे देखील महत्वाचे आहे की, 2011 पासून महाराजबाग प्राणीसंग्रहालयाने जो विकास आराखडा केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवला तो मान्य झाला नाही. त्यानंतर लीट प्लॅन मागवला, मात्र त्याचेही पुढे काही झाले नाही. त्यामुळे विकास आराखडा एवढा रखडवून मग विकास झाला नाही म्हणून मान्यता रद्द करणे हे कोंडीत पकडल्यासारखे आहे ? असा सवाल केला जात आहे.

राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरु, ७२ हजार पदांची भरती :
  • मुंबई : राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 72 हजार पदांच्या भरतीसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांनी मंगळवारी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा होणार असून पुढच्या आठवड्यात जाहिराती निघणार आहेत.

  • प्रत्येक विभागनिहाय भरती होणार असून प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील सुमारे 72 हजार पदांच्या भरती कार्यवाहीचा मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आढावा घेतला. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

  • मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मेगाभरतीची प्रक्रिया आम्ही सुरु केलेली नाही आणि अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मराठा अशा सर्वांचे हित कायदेशीरपणे जपल्याशिवाय, मेगाभरती सुरु केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.

आता केवळ चार तासांत मिळणार पॅनकार्ड :
  • नवी दिल्ली - बहुतांश सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आता पॅनाकार्ड हे अनिवार्य करण्यात आले आहे. पण पॅनकार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया अनेकांना किचकट वाटत होती. मात्र आता पॅन कार्डसाठी फार दिवस वाट पाहावी लागणार नाही. आता अर्ज केल्यानंतर केवळ चार तासांमध्ये तुम्हाला पॅनकार्ड मिळू शकेल. 

  • सीबीडीटीचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली आहे. पॅनकार्डसाठी प्राप्तिकर विभागाकडे अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष पॅनकार्ड मिळण्यासाठी किमान 10 ते 15 दिवसांचा अवधी लागतो. मात्र नव्या प्रणालीमुळे केवळ चार तासांमध्ये पॅनकार्ड मिळणे शक्य होईल.

  • ''पॅन कार्ड काढणे सुलभ व्हावे यासाठी प्राप्तिकर विभाग एक प्रणाली घेऊन येत आहे. या प्रणालीमुळे वर्षभरानंतर आम्ही केवळ चार तासात पॅन कार्ड देण्यास सक्षम होऊ,'' असे सुशील चंद्रा यांनी सांगितले.  

भारताच्या सर्वात 'वजनदार' GSAT-11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये येणार क्रांती :
  • नवी दिल्ली - भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सी, फ्रेंच गुयाना येथून GSAT-11 ने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. 

  • या वर्षाच्या सुरुवातील जीसॅट-11 उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक त्रुटींच्या शंकेमुळे त्यावेळी या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रोने या उपग्रहाची तपासणी करण्यासाठी हा उपग्रह फ्रेंच गुयाना येथून माघारी बोलावला होता. हा निर्णय GSAT-6A या उपग्रहाचे प्रक्षेपण अपयशी ठरल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून घेण्यात आला होता. 29 मार्च रोजी प्रक्षेपण केल्यानंतर GSAT-6A हा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर काही काळाने अनियंत्रित झाला होता. तसेच त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे त्यावेळी GSAT-11 चे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते. अखेर आज या उपग्रहाने अवकाशकडे यशस्वी झेप घेतली. 

  • GSAT-11 हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह असून, त्याचे सोलर पॅनल सुमारे चार मीटर एवढे मोठे आहेत. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारताती इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. 

गुजरात सरकारच्या निर्णयामुळे पाच राज्यांत वीज होणार महाग :
  • नवी दिल्ली : अदाणी, टाटा आणि एस्सार यासारख्या खाजगी वीज उत्पादक कंपन्यांना गुजरात सरकारने कोळशा दरवाढीत दिलासा दिल्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्यांतील वीज महागणार आहे.

  • कोळसा महागल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थतीचा अभ्यास करण्यासाठी गुजरात सरकारने तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने वीज खरेदी करारात (पीपीए) सुधारणा करणे आणि कर्जदात्यांना फरक (हेअरकट) देण्याची शिफारस केली होती.

  • त्यानुसार गुजरात सरकारने गेल्या आठवड्यात अदाणी, टाटा आणि एस्सार समूहाच्या औष्णिक वीज केंद्रांना दिलासा दिला आहे. कोळशाचा वाढता खर्च वीज वितरण कंपन्यांकडून वसूल करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. अंतिमत: ही वसुली वीज ग्राहकांकडून होणार आहे.

  • महाराष्ट्रासह पाचही राज्य केंद्रीय आयोगाकडे भाववाढीस होकार देतील, त्यानंतरच केंद्रीय आयोग त्यासंबंधी निर्णय देऊ शकेल. अशी प्रतिक्रिया वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.

मुस्लिम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकावे - दलाई लामा :
  • बांगलादेश, पाकिस्तान आणि सीरिया यांच्यासारख्या मुस्लिम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकले पाहिजे तरच जगात शांतता नांदू शकते असे तिबेटीयन अध्यात्मिक गुरु दलाई लामा मंगळवारी म्हणाले. १२५ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असूनही आज भारतात विविध धर्म-परंपरा आहेत. मुस्लिम देशांनी भारताकडून शिकले पाहिजे तरच जगात शांतता नांदेल असे दलाई लामा म्हणाले.

  • भारतात सर्व धर्मांमध्ये एक समन्वय असून अहिंसेच्या तत्वामुळे आज आधुनिक भारताचा विकास होत आहे असे दलाई लामा यांनी पत्रकारांना सांगितले.

  • भारत आणि चीनमध्ये असलेल्या डोकलाम वादाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, दोन्ही देशांनी एकत्र बसून चर्चा करुन हा प्रश्न सोडवला पाहिजे. हिंदी-चिनी भाई भाई या घोषणेनुसार दोन्ही देशांमध्ये संवाद झाला पाहिजे असे दलाई लामा म्हणाले.

चार गुरुत्वीय लहरींची लायगो, व्हर्गो प्रकल्पात नोंद :
  • लायगो या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांतर्गत आणखी चार गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व शोधण्यात आले असून, कृष्णविवरांच्या एकमेकांवरील आघातानंतरच्या विलीनीकरणातून गुरुत्वीय लहरींची निर्मिती होत असते.

  • अमेरिकेतील लायगो व युरोपच्या व्हर्गो या गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रांनी १० कृष्णविवरांच्या व एका न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींची नोंद केली आहे. यात गुरुत्वीय लहरी घटनांची नोंद GW170729, GW170809, GW170818, and GW170823 या नावांनी झाली असून, त्यातील जीडब्ल्यू १७०७२९ या गुरुत्वीय लहरी २९ जुलै २०१७ रोजी नोंदल्या गेल्या. त्या जास्त वस्तुमान असलेल्या दूरस्थ स्रोतापासून आलेल्या होत्या. त्यातील विलीनीकरणाची घटना ही पाच अब्ज वर्षांपूर्वीची असून, त्यात निर्माण झालेली ऊर्जा ही पाच सौर वस्तुमानाइतकी आहे.

  • तिचे रूपांतर शेवटी गुरुत्वीय लहरीत झाले. १२ सप्टेंबर २०१५ ते १९ जानेवारी २०१६ या काळात पहिल्यांदा गुरुत्वीय लहरींच्या निरीक्षणाला लायगो प्रकल्पात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रगत लायगो प्रकल्पात तीन द्वैती कृष्णविवरांच्या विलीनीकरणातून आलेल्या गुरुत्वीय लहरी नोंदल्या गेल्या. ३० नोव्हेंबर २०१६ ते २५ ऑगस्ट २०१७ या काळात एका द्वैती न्यूट्रॉन ताऱ्याच्या विलीनीकरणातून व सात कृष्णविवरांच्या विलीनीकरण घटनातील गुरुत्वीय लहरी नोंदल्या गेल्या.

  • जीडब्ल्यू १७०८१४ ही नोंद पहिल्या द्वैती कृष्णविवर मिलनातील असून ती तीन यंत्रांनी घेतली होती. त्यानंतर जीडब्ल्यू १७०८१७ या लहरींची नोंद जीडब्ल्यू १७०८१४ या लहरींच्या नोंदीनंतर झाली होती. यातील बहुतेक आघाती मिलन हे गुरुत्वीय लहरी व प्रकाश निर्माण करणारी होती.

  • जीडब्ल्यू १७०८१८ या गुरुत्वीय लहरी लिगो व व्हिर्गो वेधशाळांनी अधिक अचूकतेने नोंदल्या होत्या. त्यात द्वैती कृष्णविवरे ही अडीच अब्ज प्रकाशवर्षे दूर एकमेकांवर आदळली. त्यातून या गुरुत्वीय लहरी निर्माण झाल्या. त्यानंतर जीडब्ल्यू १७०८१७ या न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरीही जास्त अचूकतेने नोंदल्या गेल्या होत्या.

दिनविशेष :
  • जागतिक माती दिन

महत्वाच्या घटना 

  • १८४८: अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.

  • १९०६: नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना.

  • १९३२: जर्मनीत जन्माला व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असणाऱ्या आल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकेचा व्हिसा.

  • १९४५: फ्लाईट १९, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाची ५ टी.बी. एम. ऍव्हेंजर विमाने स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोणात गायब झाली.

  • १९८९: फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ किमी गती गाठून विश्वविक्रम केला.

  • २०१६: गौरव गिल यांनी २०१६ आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.

जन्म 

  • १८६३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९३३)

  • १८९४: ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)

  • १८९६: नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ कार्ल कोरी यांचा जन्म.

  • १९०१: अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायन डिस्‍ने यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर१९६६)

  • १९०५: शेर-ए-कश्मीर शेख अब्दुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८२)

  • १९२७: थायलँडचा राजा भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) यांचा जन्म.

  • १९४३: वर्‍हाड निघालंय लंडनला साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९)

  • १९६५: भारतीय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा जन्म.

  • १९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक रविश कुमार यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७९१: ऑस्ट्रियन शास्त्रीय संगीतकार वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १७५६)

  • १९५०: योगी अरविद घोष यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १८७२ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

  • १९५१: चित्रकार अवनींद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ७ ऑगस्ट १८७१)

  • १९५९: इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचे निधन. यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (जन्म: १३ जून १९०५ – नवानगर, काठियावाड, गुजराथ)

  • १९७३: हिन्दी नाटककार राकेश मोहन यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९२५)

  • १९७३: रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १८९२)

  • १९९१: संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे निधन.

  • १९९९: स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये यांचे निधन.

  • २००४: ब्राझिलियन फुटबॉलपटू ख्रिश्चन जुनियर यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.

  • २००७: टीकाकार म. वा. धोंड यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९१४)

  • २०१३: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.