चालू घडामोडी - ०५ फेब्रुवारी २०१८

Date : 5 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट बोर्डावर नामुष्की, बीसीसीआयची वेबसाईट निघाली विक्रीला :
  • नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ बीसीसीआय आपली अधिकृत वेबसाईट डब्ल्यू़ डब्ल्यू़ डब्ल्यू़ बीसीसीआय़ टीव्ही डोमेनचे नूतनीकरण न केल्याने आॅफलाईन झाली़. वेबसाईटची नोंदणी करणारी register.com आणि namejet.com ने या डोमेन नावाला सार्वजनिक बोलीसाठी ठेवले आहे़.  त्याला आतापर्यंत सात बोली मिळाल्या आहेत़. यामध्ये सर्वात मोठी बोली २७० डॉलरची आहे़. ही डोमेन २ फेबु्रवारी २००६ पासून २ फेबु्रवारी २०१९ पर्यंत वैध आहे़. याची अपडेट करण्याची तारीख ३ फेब्रुवारी २०१८ होती़. 

  • बीसीसीआयची वेबसाईट ही भारताच्या आणि देशांतर्गत सामन्यांचे स्कॉरबोर्ड बघण्यासाठी आणि बीसीसीआय बोर्डाच्या कामकाज आणि काही महत्वाच्या बातम्यांसाठी महत्वाची ठरत आहे. पण आता वेबसाईट बंद असल्याने बीसीसीआयसाठी समस्या उद्भवली आहे. त्यातच आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना होता आणि याच दिवशी वेबसाईट बंद आहे.

  • बीसीसीआयला आयसीसीकडून ४०५ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतका महसूल मिळतो. तसेच सप्टेंबरमध्ये बीसीसीआयने २.५५ बिलियन अमेरिकन डॉलर्सला स्टार स्पोर्ट्सला आयपीएलचे मीडिया हक्क दिले आहेत असे असतानाही वेबसाईटचे नूतनीकरण करण्यात बीसीसीआय अपयशी ठरली आहे. विशेष म्हणजे हे डोमेन २०१०मध्ये आयपीएलचे अध्यक्ष ललित मोदी यांनी विकत घेतले होते. 

१०० देशांमध्ये २४ तास ‘डीडी न्यूज’ :
  • नवी दिल्ली : विदेशांतील भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर भारताची भूमिका मांडण्यासाठी दूरदर्शनची २४ तास वृत्तसेवा १०० देशांत उपलब्ध करून देण्याचा विचार माहिती आणि प्रसारण मंत्रालय करीत आहे.

  • सध्या दूरदर्शन इंडिया प्रामुख्याने विदेशांत वेगवेगळे सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम प्रक्षेपित करीत आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, चीन आणि संयुक्त अरब अमिरात याच देशांत २४ तास वृत्त आणि चालू घडामोडींवरील कार्यक्रम सादर केले जातात. अनेक देशांत २४ तास वृत्तसेवा विस्तारण्याचा मंत्रालय विचार करीत आहे. विशिष्ट देशात वृत्तसेवा सुरू करण्याचा निर्णय खर्चिकही असेल. त्यात दूरदर्शनच्या वाहिनीचे प्रक्षेपण करण्यासाठी स्थानिक केबलची सेवा घेणे तसेच त्या देशांत बातमीदाराच्या वास्तव्याची सोय करणे हा खर्च मोठा आहे.

  • वाहिनी सुरू करताना देशाच्या एकूण लोकसंख्येतील भारतीयांचे प्रमाण, तेथून भारतात होत असलेली थेट गुंतवणूक व भारतातून तिकडे जाणारा पैसा, त्या देशातून येणारे पर्यटक या बाबींचा विचार होईल.

  • हे असतील निकष संबंधित देशाला पंतप्रधानांनी दिलेल्या भेटी, परराष्ट्र मंत्रालयाचा संयुक्त सचिव दर्जाचा अधिकारी तेथे आहे का आणि त्या देशाची जवळीक अनेकस्तरीय संस्थांशी आहे का याचा विचार होईल. चीन व इंग्लड यांचे सार्वजनिक प्रक्षेपण अनेक देशांत उपलब्ध असून भारताचा हा पुढाकार या दोन देशांच्या गटात त्याचा समावेश करील.(source :Lokmat)

आफ्रिका खंडातील नायजेरियाच्या किनाऱ्यावरुन भारतीय जहाज गायब :
  • नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतील पश्चिम किनारपट्टीवरचं तेलाचं टँकर असणारं जहाज गायब झाल्याची माहिती मिळत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही यावृत्ताला पुष्टी दिली आहे.

  • मरिन एक्स्प्रेस हे जहाज मुंबईच्या अँग्लो ईस्टर्न कंपनीचं  आहे. या जहाजावर 22 भारतीय नागरिक होते. गल्फ ऑफ गिनी या ठिकाणाहून हे जहाज गायब झाल्याचं सांगितलं जात आहे.

  • गुरुवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून या जहाजाशी कुठलाही संपर्क झालेला नाही. त्यामुळे जहाजाचं अपहरण झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. हे व्यापारी जहाज असून, जहाजाचा शोध सुरु आहे.

  • या जहाजाच्या गायब होण्याच्या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयानेही पुष्टी दिली असून, जहाजाच्या शोधासाठी नायजेरियन अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.(source :abpmajha)

2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल :
  • नवी दिल्ली -  महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा अत्यल्प खर्चामध्ये आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून नावलौकिक मिवणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) अजून एका महत्त्वाकांक्षी मोहितीमेची तयारी केली आहे.  इस्रो आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान - 2 योजनेच्या अखेरच्या टप्प्यात आहे. 2018 मध्ये हे चांद्रयान चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. चंद्राच्या दक्षिण गोलार्धावरील जागा या मिशनसाठी निवडण्यात आली आहे. 

  • तामिळनाडूतील महेंद्र गिरी येथील इस्रोच्या लिक्वीड प्रॉपल्शन सिस्टिम सेंटरवर सध्या या चांद्रमोहिम -2 च्या 'टच डाऊन' ची तयारी सुरू आहे. 70 ते 80 मीटर उंचीवरून चंद्रावर उतरताना किती वेग असावा याचा प्रोटोटाइपवर सराव करण्यात येत आहे.  

  • चांद्रयान -2  उतरवण्यासाठी दोन जागांचा विचार करण्यात आला. यापैकी एक जागा मोहिमेसाठी निवडण्यात येणार आहे. या भागात अन्य कोणतीही चांद्रमोहिम झालेली नाही, अशी माहिती इस्रोचे माजी प्रमुख ए. एस. किरण कुमार यांनी दिली. कुमार मागील महिन्यात इस्रोतून निवृत्त झाले. 

फेसबुकवर २० कोटी बनावट अकाऊंट :
  • फेसबुकवर जगभरात २० कोटी बनावट किंवा दुहेरी खाती (अकाऊंट) असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातील बहुतांश खाती भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स आदी विकसनशील देशांमधील आहेत. फेसबुकने केलेल्या ताज्या पाहणीत ही आकडेवारी उघड झाली. गेल्या काही वर्षांत फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.

  • ३१ डिसेंबर २०१६ अखेर फेसबुकचे १.८६ अब्ज वापरकर्ते (मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स -मासिक सक्रिय वापरकर्ते) होते. त्यापैकी सहा टक्के, म्हणजे ११४ दशलक्ष खाती बनावट होती. पुढील वर्षांत एकूण वापरकर्ते आणि बनावट खात्यांमध्येही मोठी वाढ झाली. ३१ डिसेंबर २०१७ अखेर जगात फेसबुकचे २.१३ अब्ज वापरकर्ते (मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स) होते.१० टक्के खाती बनावट असल्याचे दिसून आले.

  • मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्सबरोबरच डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्सही (दैनंदिन सक्रिय वापरकर्ते) गेल्या वर्षांत बरेच वाढले आहेत. जगात २०१६ साली फेसबुकचे १.२३ अब्ज डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्स होते. २०१७ साली त्यात १४ टक्क्यांनी वाढ होऊन ही संख्या १.४० अब्ज डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्सवर गेली. फेसबुकच्या या प्रसारामध्ये भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स अशा देशांतील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात हातभार लावला आहे.

  • मात्र तेथील नागरिकांमध्ये विकसित देशांच्या नागरिकांच्या तुलनेने खोटी किंवा बनावट खाती चालवण्याची प्रवृत्तीही अधिक असल्याचे दिसून येते. फेसबुकवरील बनावट किंवा खोटय़ा खात्यांचे काही प्रकार आहेत. दुहेरी खाते किंवा डुप्लिकेट अकाऊंट म्हणजे एखाद्या वापरकर्त्यांने त्याच्या मुख्य अधिकृत खात्याशिवाय काढलेले आणि चालवलेले दुसरे खाते. दुसरा प्रकार आहे तो फॉल्स अकाऊंट्सचा. त्याचे दोन उपप्रकार पडतात. पहिला प्रकार आहे युजर-मिसक्लासिफाइड अकाऊंट. त्यात वापरकर्त्यांनी व्यवसाय, संस्था, आस्थापना आदी गोष्टींसाठी खाती उघडलेली असतात.(source :loksatta)

जिंदगी बडी होनी चाहिए, 23व्या वर्षी कॅप्टन कपिल कुंडू शहीद :
  • गुरुग्राम : वयाची 23 वर्ष पूर्ण होण्यास अवघे काही दिवस असताना हरियाणाचा सुपुत्र जम्मू काश्मिरमधील हल्ल्यात शहीद झाला. कॅप्टन कपिल कुंडू यांना पाकिस्तानने केलेल्या मिसाईल हल्ल्यात वीरमरण आलं.

  • कॅप्टन कपिल कुंडू येत्या 10 फेब्रुवारीला वयाची 23 वर्ष पूर्ण करणार होते. 'जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं' हा 'आनंद' चित्रपटातील संवाद त्यांच्यासाठी सार्थ ठरला.

  • कॅप्टन कपिल यांनी फेसबुकवर 'लाईफ शूड बी बिग, इंस्टेड ऑफ बीइंग लाँग' हे याच आशयाचं लिहिलेलं स्टेटस याची प्रचिती देतं. आयुष्य लहान असलं तरी चालेल, ते भव्य असाव, असं म्हणतच त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी निरोप घेतला.(source :abpmajha)

पहिल्या एकदिवसीय लढतीसाठी आम्ही सज्ज-मिताली राज :
  • किम्बरले (द. आफ्रिका) : विश्वचषक स्पर्धेत आपली छाप पाडल्यानंतर आता सात महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत उद्यापासून सुरू होणा-या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आयसीसीच्या महिल्या चॅम्पियनशिपच्या कार्यक्रमाअंतर्गत हा दौरा महत्त्वपूर्ण मानला आहे. कारण या मालिकेतील विजेत्या संघाचे २0२१ मध्ये होणाºया विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित होईल.

  • किम्बरले येथे ५ आणि ७ फेब्रुवारीला पहिले दोन एकदिवसीय सामने होतील. तिसरा आणि अखेरचा सामना १0 फेबु्रवारीला पोश्चफस्ट्रूम येथे होणार आहे. आयसीसीच्या ढिसाळ नियोजनामुळे विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय महिला संघ या सात महिन्यांत एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे आफ्रिकेसमोर त्यांचा कस लागणार आहे.

  • विश्वचषक स्पर्धेतील दमदार कामगिरीमुळे क्रिकेट रसिकांचा महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे मिताली राज आणि सहकाºयांवर अपेक्षांचे ओझे वाढलेले आहे. यासंदर्भात मिताली म्हणाली की, प्रत्येक सामन्यावर प्रशंसकांचे आणि टीकाकारांचे लक्ष असणार आहे; कारण आता क्रिकेट रसिकांना भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्तराची जाणीव झाली आहे.

  • आमची टीम आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी उत्सुक असून, प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे. मुंबईच्या १७ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्सवर सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण तिने स्थानिक पातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत उपविजेता असला तरी या साखळी फेरीत आमच्या संघाने आफ्रिकेच्या संघाला ११५ धावांनी धूळ चारली होती, असे ती म्हणाली.(source :Lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १२९४: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.

  • १६७०: सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.

  • १७६६: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.

  • १९१९: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.

  • १९२२: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.

  • १९४८: गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.

  • १९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.

  • १९५८: ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.

  • १९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.

  • २००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.

  • २००४: पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.

जन्म

  • १७८८: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट पील यांचा जन्म.

  • १८४०: डनलप रबर चे सहसंस्थापक जॉन बॉईड डनलप यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९२१)

  • १९०५: स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)

  • १९१४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४)

  • १९३३: लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांचा जन्म.

  • १९३६: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म.

  • १९७६: अभिनेता अभिषेक बच्‍चन यांचा जन्म.

मृत्यू

  • १९२०: आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली. (जन्म: १४ सप्टेंबर १८६७)

  • १९२७: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १८८२)

  • २०००: गायिका कालिंदी केसकर यांचे निधन.

  • २००३: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे यांचे निधन.

  • २००८: योग गुरू महर्षी महेश योगी यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९१७)

  • २०१०: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.