चालू घडामोडी - ०५ फेब्रुवारी २०१९

Updated On : Feb 05, 2019 | Category : Current Affairsआयपीएल २०१९ च्या वेळापत्रकासाठी बीसीसीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका :
 • मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 2019 च्या हंगामाच्या वेळापत्रकाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. हे वेळापत्रक सोमवारी जाहीर होणे अपेक्षित होते, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम 23 मार्चपासून सुरू होणार आहे, परंतु निवडणुकांमुळे स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. याआधी मिळालेल्या माहितीनुसार हे वेळापत्रक 4 फेब्रुवारीला जाहीर होणार होते.

 • ''निवडणूक आयोगाशी आमची चर्चा सुरू आहे आणि अधिकाऱ्यांनीही या स्पर्धेबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात वेळापत्रक जाहीर करण्यात येईल,'' अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली.  

 • निवडणूक असल्यामुळे आयपीएल भारतात खेळणे अवघड असल्याचे म्हटले जात आहे. कारण सुरक्षा यंत्रणा आयपीएलपेक्षा निवडणुकीलाच प्राधान्य देणार आहे. दुसरीकडे आयपीएलच्या तारखा बदलता येऊ शकत नाहीत. कारण एखाद्या स्पर्धेनंतर दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळताना 15 दिवसांचा किमान अवधी असणे आयसीसीच्या नियमानुसार गरजेचे आहे. त्यामुळे आयपीएलची तारीख बदलता येणे शक्य नाही.

खुल्या वर्गातील १० टक्के आर्थिक आरक्षण महाराष्ट्रात लागू करणार :
 • मुंबई : केंद्र सरकारने जाहीर केलेलं खुल्या प्रवर्गातील दहा टक्के आर्थिक आरक्षण महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात केंद्राचं आरक्षण राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर 12 जानेवारीला हा कायदा अस्तित्त्वात आला.

 • आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती सरकारने केली.

 • या आरक्षणासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या 49 टक्के आरक्षणाच्या कोट्यात वाढ करण्यात आली आहे. परिणामी आरक्षणाचा कोटा 49 टक्क्यांवरुन 59 टक्क्यांवर पोहोचला आहे. आता या कायद्याअंतर्गत सरकारी नोकरी, सरकारी शिक्षणसंस्थांसह खासगी महाविद्यालयांमध्येही आरक्षण मिळू शकेल.

राज्यात गेल्या वर्षी रस्ते अपघातांचे १३ हजार बळी :
 • मुंबई : महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात जवळपास 13 हजार नागरिकांना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले. गेल्या तीन वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली.

 • रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनावेळी रावतेंनी रस्ते अपघातांची आकडेवारी सांगितली. 2018 मध्ये 13,059 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. 2016 मध्ये 12 हजार 935, तर 2017 मध्ये 12 हजार 511 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता.

 • विशेष म्हणजे 13 हजार जणांपैकी 80 टक्के म्हणजेच अंदाजे 11 हजार जण मानवी चुकांमुळे मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये मुख्यत्वे रॅश ड्रायव्हिंग हे कारण आहे. मृतांपैकी 600 टक्के नागरिक हे पादचारी, दुचाकीस्वार किंवा सायकलस्वार होते.

 • महाराष्ट्रात एक हजार 324 अपघतप्रवण क्षेत्रांची नोंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने या भागांतील दोष सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 • 2017 मध्ये रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी 41 हजार केसेस नोंदवण्यात आल्या होत्या. 2018 मध्ये आकडा थेट सात लाख 70 हजारांवर पोहचला. सीसीटीव्ही कॅमेरांमुळे ई-चलान वाढल्याचं सांगण्यात आलं. राज्यात 3.41 कोटी वाहनचालक परवानाधारक आहेत.

अमेरिकेतून परतल्या प्रियंका, राहुल गांधींबरोबर गुरूवारी होणार पहिली बैठक :
 • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भगिनी आणि पक्षाच्या सरचिटणीस व पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या आपल्या विदेश दौऱ्यावरुन परतल्या आहेत. अमेरिकेहून परतल्यावर प्रियंका या राहुल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या. त्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेट घेतली.

 • काँग्रेस सरचिटणीसपदी प्रियंका यांच्या नियुक्तीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मुलीच्या उपचारासाठी अमेरिकेला गेलेल्या प्रियंका गांधी यांच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते.

 • आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी यांनी पक्षाच्या सरचिटणीसांसह राज्यांमधील प्रभारींची ७ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित केली आहे. सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी या बैठकीत सहभागी होतील. सरचिटणीसांच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांबरोबर ९ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावली आहे. यात प्रदेश काँग्रेसच्या तयारीबाबत चर्चा होईल.

 • यापूर्वी राहुल गांधी हे बहीण प्रियंका यांच्यासह प्रयागराज येथे सुरू असलेल्या अर्धकुंभ मेळ्यात सहभागी होणार असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथील कुंभ क्षेत्रात प्रियंका यांना गंगाची मुलगी म्हणणारे पोस्टर्स लावण्यात आले होते.

‘खेलो इंडिया’मधील प्रयोग महिला कबड्डीसाठी दिशादर्शक :
 • नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा महोत्सवात मुलांचे आणि मुलींचे सामने एकाच मैदानावर मॅटच्या आवश्यक आकारमानाच्या बदलानुसार झाले. हा प्रयोग महिला कबड्डीसाठी दिशादर्शक आहे, असे मत पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या माजी प्रशिक्षक सुनील डबास यांनी व्यक्त केले.

 • ‘‘दोन्ही बाजूंच्या लॉबीचे मॅट उलटे करून ही आकारमान बदलाची संकल्पना ‘खेलो इंडिया’मध्ये राबवण्यात आली होती. याशिवाय दिल्लीत झालेल्या एका क्रीडाविषयक प्रदर्शनात मी रोलिंग मॅटसुद्धा पाहिले आहे. ही मॅट बनवणाऱ्या कंपनीत जाऊन या आकारमानाच्या अडचणीवर लवकरच तोडगा काढण्यासाठी मी इच्छुक आहे,’’ असे डबास यांनी सांगितले.

 • रोह्यत झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेला भारतीय हौशी कबड्डी महासंघाने नेमलेल्या निरीक्षक डबास म्हणाल्या, ‘‘कबड्डीच्या विकासाला आता प्रो-कबड्डी लीगमधील प्रयोगांमुळेच दिशा मिळत आहे. मात्र मैदानाच्या आकारमानामुळे महिलांची लीगसुद्धा होऊ शकलेली नाही. काही वर्षांपूर्वी प्रायोगिक स्तरावर महिलांची तिरंगी लीग झाली होती. पण पुरुषांच्या मैदानावर महिलांना खेळावे लागल्यामुळे ती अपयशी ठरली होती. त्यानंतर लीगच्या दृष्टीने पुरुष आणि महिलांच्या मैदानाचे आकारमान समान करण्याबाबतही चर्चा झाली. पण याबाबत अनुकूलता आढळली नाही.’’

 • प्रो-कबड्डीचा महिला कबड्डीवर होणारा परिणाम मांडताना डबास म्हणाल्या, ‘‘प्रो-कबड्डी लीग हा एकच फरक पुरुषांच्या आणि महिलांच्या कबड्डीमध्ये आहे. अन्यथा, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कबड्डीमध्ये महिला कबड्डीला पुरुषांइतक्याच सोयीसुविधा मिळतात. त्यामुळे महिला कबड्डीपटू हे सामने पाहून स्वत:ला विकसित करतात.’’

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १६७०: सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.

 • १७६६: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.

 • १९१९: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.

 • १९४८: गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.

 • १९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.

 • १९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.

 • २००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.

 • २००४: पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.

जन्म 

 • १८४०: डनलप रबर चे सहसंस्थापक जॉन बॉईड डनलप यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९२१)

 • १९०५: स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)

 • १९१४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४)

 • १९३३: लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांचा जन्म.

 • १९३६: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९२०: आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली. (जन्म: १४ सप्टेंबर १८६७)

 • १९२७: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १८८२)

 • २०००: गायिका कालिंदी केसकर यांचे निधन.

 • २००३: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे यांचे निधन.

 • २००८: योग गुरू महर्षी महेश योगी यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९१७)

 • २०१०: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १९३४)

टिप्पणी करा (Comment Below)