चालू घडामोडी - ०५ जानेवारी २०१९

Updated On : Jan 05, 2019 | Category : Current Affairs‘यूपीएससी’ परीक्षेसाठी अर्ज करणे हाही प्रयत्नच :
 • नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेला केवळ अर्ज करणे हादेखील परीक्षेचा एक प्रयत्न मानला जावा, असा प्रस्ताव आयोगाने मांडला आहे. सामान्यपणे एका उमेदवाराला लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी सहा वेळा संधी मिळते. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ही मर्यादा नाही. दरवर्षी साधारण ९ लाख उमेदवार या परीक्षेचा अर्ज भरतात.

 • पण प्रत्यक्षात त्यातील निम्मेच उमेदवार परीक्षेला उपस्थित राहतात. त्यामुळे आयोगाचा प्रयत्न आणि संसाधने वाया जातात. जितके उमेदवार परीक्षेला अर्ज करतील तितक्या उमेदवारांच्या बैठकीची व्यवस्था आयोगाला करावी लागते. तितके अर्ज हाताळावे लागतात. यात वेळ, पैसा आदी संसाधने खर्च होतात.

 • मात्र उमेदवार परीक्षेला बसले नाहीत तर त्यांचा अपव्यय होतो. तो टाळण्यासाठी परीक्षेचा नुसता अर्ज भरणे याचीही प्रयत्नांत गणना करावी, असा प्रस्ताव आयोगाने केंद्रीय कार्मिक खात्याकडे केला आहे. तो मान्य झाल्यास पैसा आणि प्रयत्नांचा अपव्यय टाळता येईल.

ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अमेरिकेत कुटुंब असणं गरजेचं असतं का :
 • प्रश्न- एखाद्या व्यक्तीला ग्रीन कार्ड मिळवायचं असल्यास त्याचं कुटुंब अमेरिकेत असायला हवं, असं मी ऐकलं आहे. हे खरं आहे का?

 • उत्तर- नाही. इमिग्रंट विसासाठी पात्र ठरणारे बहुतांश जण त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळाल्यावर किंवा त्यांचं कुटुंब अमेरिकेत वास्तव्यात असल्यावर ग्रीन कार्डसाठी अर्ज करतात. मात्र यासाठी इतर इमिग्रंट विसा गटदेखील उपलब्ध आहेत. 

 • उदाहरणार्थ, रोजगारावर आधारित काही इमिग्रंट विसा गटातील व्यक्तींना थेट ग्रीन कार्डसाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी अमेरिकेचं नागरिक असणं किंवा कुटुंबातील कोणी अमेरिकेचं नागरिक असणं गरजेचं नसतं. विशिष्ट इमिग्रंट गटातील विसाधारकांना अमेरिकेत पोहोचल्यावर तिथलं कायमस्वरुपी नागरिकत्व मिळू शकतं. प्रत्येक आर्थिक वर्षात (1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर) साधारणपणे 1,40,000 कर्मचाऱ्यांना विशिष्ट इमिग्रंट गटाचा विसा दिला जातो. अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्यांतर्गत हा विसा देण्यात येतो. 

 • रोजगारावर आधारित इमिग्रंट विसामध्ये विविध प्रकारच्या व्यायसायिक क्षेत्रांचा समावेश होतो. विज्ञान, कला, शिक्षण, व्यवसाय या क्षेत्रांमध्ये विशेष नैपुण्य मिळवलेल्यांसाठी काही विशिष्ट विसा प्रकारचे विसा दिले जातात. याशिवाय कुशल कामगारांनाही इमिग्रंट विसा दिला जातो. ज्या क्षेत्रात काम करणारे कुशल कामगार अमेरिकेत नाहीत, त्या क्षेत्रातील कामगारांना विशेष प्राधान्य मिळतं. रोजगारावर आधारित इमिग्रंट विसासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती www.uscis.gov/greencard या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

 • इमिग्रंट विसासाठी अर्ज करणारे अनेकदा ग्रीन कार्ड लॉटरीबद्दल विचारणा करतात. ही प्रक्रिया 'डायवर्सिटी विसा प्रोग्राम' म्हणून ओळखली जाते. या लॉटरी प्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या व्यक्तीला काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात. यासाठी शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव लक्षात घेतला जातो. यासाठी किमान सेकण्डरी स्कूल डिप्लोमा आवश्यक असतो. मात्र या प्रक्रियेसाठी विशिष्ट देशांमधील व्यक्तींचाच विचार केला जातो. ज्या देशातून अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे, त्यांचे अर्ज या प्रक्रियेत विचारात घेतले जातात. (मागील 5 वर्षात ज्या देशातील 50 हजारहून कमी व्यक्ती अमेरिकेत स्थलांतरित झाल्या आहेत, त्या देशांमधील नागरिकांचा या प्रक्रियेसाठी विचार केला जातो.) सध्या भारत डायवर्सिटी विसा प्रोग्रामसाठी पात्र नाही. 

पाच वर्षात तब्बल २७ कर्ज बुडवे देश सोडून पळाले :
 • नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षात तब्बल 27 उद्योगपतींनी हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशातून पळ काढला आहे. या संदर्भातील माहिती शुक्रवारी संसदेत देण्यात आली.

 • अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. मागील पाच वर्षात देश सोडून पळालेल्या या 27 पैकी 8 जणांना 'रेड कॉर्नर नोटीस' बजावण्यात आली असून इतरांना नोटीस बजावण्यासाठी इंटरपोल सोबत बोलणी सुरु असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.

 • आतापर्यंत यापैकी सहा आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी सरकारतर्फे अर्ज करण्यात आला आहे. तसेच 27 पैकी 7 जणांवर 'आर्थिक नियमन अधिनियम 2018' नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे देखील शुक्ला यांनी सांगितले.

 • भारतीय बँकाचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय माल्याला भारतात आणण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. याबाबत लंडनच्या कोर्टाने माल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिल्याचीही माहिती यावेळी संसदेत देण्यात आली.

 • भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी ५० कोटींहून अधिक कर्ज घेणाऱ्या कंपन्यांचे मालक/संचालक यांच्या पासपोर्टची प्रत घेण्याचे आदेश सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देण्यात आल्याचेही शुक्ला यांनी सांगितले.

भारताने संशोधनावरील गुंतवणूक वाढवावी :
 • फगवाडा : ‘भारतात संशोधन होत आहे. त्यासाठीची गुणवत्ताही येथे आहे. मात्र या देशात संशोधनासाठी अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत नोबेल पुरस्कार विजेते संशोधक डंकन हॅल्डेन यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

 • फगवाडा येथे सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसदरम्यान हॅल्डेन यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारतात उपयोजित संशोधनाऐवजी मूलभूत विज्ञानावरील संशोधनावर अधिक भर दिला जातो. यासाठी देशात अधिक गुंतवणूक होण्याची आवश्यक आहे. मात्र चीनमध्ये धातू विज्ञानासारख्या उपयोजित संशोधनावर गुंतवणूक केली जाते. आशिया खंडात चीन आणि भारत हे दोन देश वेगाने प्रगत करत आहेत.

 • विकसनशील देशांनी ‘ब्रेनगेन’ व्हावा यासाठी प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे. चीनने संशोधन क्षेत्रातील गुंतवणुकीवर भर दिल्यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणावर ‘ब्रेनगेन’ होत आहे, असे त्यांनी सांगितले. अमेरिका, युरोपमधून संशोधक भारतात परतणे कठीण आहे, असे सांगतानाच शासनाने केवळ योजना आखून उपयोग नाही तर उद्दिष्ट म्हणून कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. परदेशातील संशोधकांसाठी येथे ‘सेंटर्स ऑफ एक्सलन्स’ उभारावीत, असेही हॅल्डेन यांनी सांगितले.

बिल मिळालं नाही तर जेवण फुकट, रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय :
 • रेल्वेत प्रवास करताना जर तुम्हाला जेवणाचं बिल मिळालं नाही तर ते जेवण फुकट असणार आहे. रेल्वेनकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मार्च महिन्यापासून सर्व प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने जेवणाच्या किंमती दर्शवणारा तक्ता लावण्यात येणार आहे. यावेळी त्या तक्त्यावर एक महत्त्वाचा संदेश लिहिला असेल तो म्हणजे, ‘कृपया टीप देऊ नका, जर बिल मिळालं नाही तर तुमचं जेवण फुकट असणार आहे’. रेल्वेमधील कॅटरिंग सेवेत पारदर्शकता यावी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी हा निर्णय घेतला आहे.

 • रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी पियूष गोयल यांनी प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी एकच हेल्पलाइन क्रमांक सुरु करण्याचा आदेश दिला. यासाठी जानेवारी 2019 पर्यंत वेळ देण्यात आला आहे.

 • तसंच यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या वाय-फाय सुविधेचा विस्तार करण्यावर जोर दिला. सध्या 723 रेल्वे स्थानकांवर वाय-फायची सुविधा मिळत असून हा आकडा 2000 पर्यंत नेण्यात यावा असं पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. यासोबतच स्थानकांवर जलदगतीने वाय-फायचं काम पूर्ण करुन घेणाऱ्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना बक्षीस देण्याची शिफारस त्यांनी यावेळी केली.

 • पियूष गोयाल यांनी सर्व ट्रेनमधील कॅटरिंग स्टाफला आणि टीटीई यांना पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन वितरीत करण्याचा सल्ला दिला आहे. या मशीनमध्ये स्वाइप करण्याची तसंच बिल जनरेट करण्याची सुविधा असेल. यामुळे जेवणासाठी जास्त किंमत आकारणाऱ्या कॅटररविरोधात होणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासही मदत मिळेल.

 • ज्या ट्रेनमध्ये कॅटरिंग सुविधा आहे त्यांना जेवणाच्या किंमती दर्शवणारे तक्ते मार्च 2019 पर्यंत तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याचवेळी त्याच्यावर कृपया टीप देऊ नका, जर बिल मिळालं नाही तर तुमचं जेवण फुकट असणार आहे असंही लिहिलेलं असेल,

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १६६४: छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.

 • १८३२: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.

 • १९४८: वॉर्नर ब्रदर्स यांनी रोझ बाऊल फुटबॉल स्पर्धेच्या जगातील पहिल्या रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.

 • १९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.

 • १९५७: विक्रीकर कायदा सुरू झाला.

 • १९९७: रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.

 • १९९८: ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 • २००४: संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.

जन्म 

 • १८५५: अमेरिकन संशोधक व उद्योजक किंग कँप जिलेट यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९३२)

 • १८६८: मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.

 • १८९२: लेखक व मराठी भाषातज्ञ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९६४ – मुंबई)

 • १९१३: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च २००७)

 • १९२२: आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म. (मृत्यू: ४ सप्टेंबर २०००)

 • १९२५: मराठी साहित्यिक रमेश मंत्री यांचा जन्म.

 • १९४१: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)

 • १९५५: पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म.

मृत्यू 

 • १८४७: कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.

 • १९३३: अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कूलिज यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८७२)

 • १९४३: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८६४)

 • १९७१: भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन.

 • १९८२: भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९१८)

 • १९९०: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रमेश बहल यांचे निधन.

 • १९९२: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९१४)

टिप्पणी करा (Comment Below)