चालू घडामोडी - ०५ जुलै २०१८

Date : 5 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पाकिस्तानात मिशन ‘ग्रीन गोल्ड’, तब्बल १०० कोटी झाडांची लागवड :
  • कराची : पाकिस्तानमध्ये मिशन ‘ग्रीन गोल्ड’ अंतर्गत तब्बल 100 कोटी झाडे लावण्यात आली आहेत. सतत वादांमुळे चर्चेत राहणाऱ्या पाकिस्तानची यानिमित्ताने दुसरी बाजू समोर आली आहे.

  • तापमानवाढीसारख्या गंभीर समस्येवर जगभर चर्चा होत असताना पाकिस्तानने मात्र आपल्या कृतीतून एक नवा आदर्श घालून दिला आहे. पाकिस्ताच्या उत्तर-पश्चिमेकडे असणाऱ्या ‘खैबर पख्तूनख्वा’ या प्रांतात विविध प्रजातींची कोट्यवधी झाडे लावण्यात आली.

  • पाकिस्तानच्या ‘खैबर पख्तूनख्वा’  प्रांतात माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या ‘तहरीक ए इन्साफ’ या पक्षाची सत्ता आहे. इम्रान यांच्याच पुढाकाराने 2014 साली या वृक्षलागवड मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती.

  • ‘खैबर पख्तूनख्वा’ या प्रदेशात भूस्खलनाच्या तसेच पुराच्या अनेक घटना घडल्या होत्या. यावरच उपाय म्हणून ही मोहीम राबवली गेली. या प्रकल्पाद्वारे 42 पेक्षा जास्त प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. वन्यजीव रक्षण आणि वाढ यांच्यासाठी ही वृक्षसंपदा महत्त्वाची ठरणार आहे.

  • संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानातील जंगलक्षेत्र 12 टक्के असावं, असं सुचवलं होतं. मात्र सध्याच्या घडीला ते केवळ 5.2 टक्के एवढंच आहे. यामुळेच तापमान नियंत्रणासाठी झाडे लावणे ही तेथील गरजच बनली आहे. या पार्श्वभूमीवर ‘खैबर पख्तूनख्वा’ प्रांतातील ही मोहीम महत्वाची आहे.

  • ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनेही’ या मोहीमची माहिती देणारा एक व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केला आहे.

वनसंपदा चोरल्यास तीन वर्षे कैद - जैवविविधता कायद्यात तरतूद :
  • पुणे : जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने जैवविविधता कायदा २००२ मध्ये मंजूर केला; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून जैविक विविधता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे या कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वनसंपदेची चोरी होत असेल, तर त्वरित मंडळाकडे तक्रार द्यावी. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्याला कारागृहाची शिक्षा होऊ शकणार आहे.

  • पुणे जिल्ह्यामध्ये जैवविविधता मंडळाकडून १४०२ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे वनसंपदा जोपण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वनसंपदा आहे. ती मोठ्या प्रमाणावर लुटली जात आहे. त्यामुळे आता जैवविविधता मंडळाकडून स्थानिक जैवविविधता समित्या अशा चोरीवर लक्ष ठेवणार आहेत. वनसंपदेवर स्थानिक ग्रामस्थांचा हक्क असतो.

  • भारत सरकारने जर्मन सरकारच्या (जीआयझेड) या संस्थेसोबत जैविक संसाधनाच्या वापरातून मिळणाऱ्या फायद्याचे समन्यायी वाटपाची रचना तयार व्हावी, यासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याला एबीएस म्हणजे ‘अ‍ॅक्सेस अ‍ॅण्ड बेनीफिट शेअरिंग मेकॅनिझम,’ असे संबोधले जाते. या रचनेत कोणत्याही व्यक्तीने जैविक संसाधनांचा व्यावसायिक वापर केला तर त्यातून मिळणाºया फायद्यातून ३ ते ५ टक्के रक्कमही ज्या गावातून संसाधने गोळा केली, त्या गावास मंडळाच्या माध्यमातून निधी संकलित केला जातो. हा प्रकल्प केवळ महाराष्ट्र आणि उत्तराखंड येथे राबविला जात आहे.

  • स्थानिक वनसंपदा असेल ती अशीच कोणाला घेऊन जाता येणार नाही. आज पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी औषधी वनसंपदा आहे. त्याच्या माध्यमातून स्थानिक गावाला निधी मिळणार आहे, अशी माहिती मंडळाचे माहिती तंत्रज्ञान अधिकारी विवेक डवरी यांनी ‘लोकमत’ला दिली.

निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा :
  • नवी दिल्ली : मोदी सरकारने निवडणुकांच्या तोंडावर देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. खरीप हंगामातील 14 पिकांचा हमीभाव दीडपट वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकार ग्रामीण भागातील बँकांमध्ये पैशांची गुंतवणूक करणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं किसान कार्ड टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • कोणत्या पिकांच्या हमीभावात किती वाढ - यंदा सर्वाधिक वाढ रागी म्हणजेच नाचणी पिकाच्या हमी दरात झाली आहे, कर्नाटकात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. गेल्या वर्षी रागीची एमएसपी होती 1900 रुपये क्विंटल यंदा 2897 रुपये, म्हणजे तब्बल 53 टक्क्यांची वाढ झाली आहे.

  •  ज्वारी आणि बाजरी ही आपल्या महाराष्ट्रातली महत्वाची अन्नधान्य पिकं, या दोन्ही पिकांना घसघशीत वाढ दिली आहे. ज्वारीची एमएसपी 1700 रुपये होती यंदा 2430 रुपये म्हणजेच ही वाढ 43 टक्के आहे, बाजरीचा हमी दर 1425 वरुन 1950 रुपयांवर गेला आहे, त्यामुळे ही वाढ 37 टक्के आहे.

  • - धान पिकाचा हमी दर 200 रुपयांनी वाढवून 1770 केला आहे. कापूस हे आपलं महत्त्वाचं नगदी पीक, कापूस हमी दरात 26 ते 28 टक्क्यांनी वाढ केली आहे मुगाची एमएसपी 1300 रुपयांनी म्हणजेच 25 टक्क्यांनी वाढवली आहे

  • या सर्व पिकांना उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा असा हमी दर दिल्याचा दावा सरकार करत आहे. बाजरीला तर उत्पादन खर्चाच्या 97 टक्के एमएसपी दिल्याचं कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितलंय आहे.

तयारीला लागा, ३६ हजार पदांसाठी या महिन्यातच जाहिरात :
  • सरकारी नोकरी- मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागाच्या नोकरभरतीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

  • सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी महापोर्टलमार्फत घेण्यात येणार आहेत. 31 जुलै अखेरपर्यंत कृषी आणि पदुम, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, मृदा व जलसंधारण विभाग या विभागातल्या रिक्त पदांसाठी जाहिरात निघणार आहे. त्यांच्या विभागाच्या विभागप्रमुखांनी 17 जुलैपर्यंत रिक्त पदांची माहिती राज्य सरकारला कळवायची आहे. त्यानंतर महिना अखेरपर्यंत सर्व पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

  • महत्त्वाचं जिल्हा परिषदेच्या सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी होणार आहेत.

  • कशी असेल परीक्षा - भरतीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि राज्य स्तरावर त्यांच्या विभागाचे प्रमुख यांची समिती असेल.

  • यासाठी परीक्षा पद्धती निश्चित झाली आहे. परीक्षेसाठी त्यांच्या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, स्थानिक बाबींवर 25 टक्के गुण असतील गट क आणि गट ब या संवर्गातील सर्व रिक्त पदांसाठी भरती होईल. सर्व परीक्षांसाठी राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा होणार.

  • दहा जुलैपर्यंत सर्व रिक्त जागांची माहिती राज्य सरकार संकलित करत आहे. यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 5 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे, गृह विभागातील 7 हजार 111 पदे, कृषी विभागातील 2 हजार 572 पदे, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे, जलसंपदा विभागातील 827 पदे, जलसंधारण विभागातील 423 पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 या पदांसह नगरविकास विभागातील 1 हजार 664 पदांचा समावेश आहे.

एस.टी. कामगारांचे नेते साथी बिराज साळुंखे यांचे निधन :
  • सांगली : एस.टी.कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष आणि राज्यातील असंघटीत कामगारांचे नेते साथी बिराज साळुंखे (वर्ष 80 वय) यांचे बुधवारी मध्यरात्री येथे निधन झाले. गेले काही दिवस ते मेंदू रोगावरील उपचारासाठी दवाखान्यात दाखल होते.

  • मुंबईत विद्यार्थी दशेत असताना कॉ. एस ए डांगे, एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गिरणी कामगार संघटनेत कार्य केले होते. पुढे ते सांगलीला परतले आणि इथले हमाल व इतर असंघटीत कामगारांसाठी झटू लागले.

  • मोलकरणी, काच पत्रा गोळा करणारे, अंगणवाडी सेवक अशा सामान्य असंघटीत वर्गासाठी ते आयुष्यभर झटले. एस. टी. कामगार संघटनेच्या कार्यासाठी ते या वयातही गेल्या महिन्यापर्यंत राज्यभर प्रवास करीत होते. सीमाप्रश्नाच्या मुद्यावर काँग्रेस पक्षाच्या सचिव पदाचा त्याग करुन ते सीमा आंदोलनात अग्रभागी राहिले.

  • सांगली जिल्ह्यात हा प्रश्न जागृत ठेवण्यात तसेच बेळगाव जिल्ह्यात अनेक आंदोलनात त्यांनी कारावासही सोसला होता. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच मध्यरात्री कामगारांनी दवाखान्याबाहेर गर्दी केली होती.  

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८११: व्हेनेझुएला देशाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १८४१: थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.

  • १८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.

  • १९४६: फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.

  • १९५०: जगातील ज्यू व्यक्तींना इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला देण्यात आला.

  • १९५४: आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.

  • १९५४: बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.

  • १९६२: अल्जीरीया देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले

  • १९७५: भारतातून देवी रोग पूर्णपणे बरा झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.

  • १९७५: केप व्हर्डे देशाला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९७५: विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारे आर्थर अ‍ॅश हे पहिले कृष्णवर्णीय खेळाडू बनले.

  • १९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव.

  • १९८०: स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.

  • १९९६: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.

  • १९९७: स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.

  • २००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.

जन्म 

  • १९१८: केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)

  • १९२०: साहित्यिक आनंद साधले यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९९६)

  • १९२५: केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०१२)

  • १९४६: केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म.

  • १९५२: चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट२००० – मुंबई)

  • १९५४: न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म.

  • १९६८: युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉजिकी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८२६: सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १७८१)

  • १८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च१७६५)

  • १९४५: ऑस्ट्रेलियाचे १४ वे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचे निधन.

  • १९५७: भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन. (जन्म: १८ जून १८८७)

  • १९८०: कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८९६)

  • १९९६: रहस्यकथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचे निधन. (जन्म: ९ जून १९०६)

  • १९९९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचे निधन. (जन्म: १४ मे १९०९)

  • २००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.