चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ जून २०१९

Date : 5 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया; समुपदेशनाची प्रक्रिया १४ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश :
  • वैद्यकीय पदव्युत्तर आणि दंतवैद्यक प्रवेश प्रक्रियेवरुन वाद निर्माण झाला असतानाच यासंदर्भात मंगळवारी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहेत.  प्रवेश प्रक्रियेतील समुपदेशनाची प्रक्रिया १४ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

  • वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाची यंदापासून अंमलबजावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने समुपदेशनाची प्रक्रिया १४ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय यापुढे या प्रकरणात नवीन याचिकांची दखल घेतली जाणार नाही, असे कोर्टाने सुनावले आहे. वैद्यकीय पदव्युत्तर आणि दंतवैद्यक शाखेतील प्रवेशासंदर्भातील मार्गदर्शन या सत्रात केले जाणे, अपेक्षित आहे.

  • दरम्यान, आरक्षणामुळे खुल्या गटातील जागा घटल्या. त्यामुळे हव्या असलेल्या महाविद्यालयात, हव्या असलेल्या शाखेसाठी प्रवेश घेण्याची अनेक विद्यार्थ्यांची संधी हुकली. आता दहा टक्के जागांवरील प्रवेश रद्द झाल्यावर सर्व प्रवेश प्रक्रिया नव्याने राबवण्यात यावी, जेणेकरून गुणवत्ता यादीनुसार संधी मिळू शकेल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पर्यावरण दिनानिमित्त खास संदेश :
  • ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. हा हेतू लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी संदेश दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा संदेश दिला आहे.

  • ‘पर्यावरण आणि पृथ्वी यांचा आपल्याला नेहमी अभिमान असायला हवा. आज पर्यावरण दिनानिमित्त पृथ्वी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहायला हवे. उज्ज्वल भविष्यासाठी निसर्गाशी सुसंगत राहणे गरजेचे आहे.’ असे नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमध्ये मोदींनी पर्यावरणासंबंधी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

  • पर्यावरणाचे महत्व जाणून घेण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्यासाठी १९७२ सालापासून काही मोहिम सुरु करण्यात आल्या होत्या. या मोहिमेअंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन करण्यात यावे यावर जोर देण्यात आला आहे.

  • दरवर्षी हजारो निष्पाप नागरिक वायू प्रदूषणाला बळी पडत असल्याने यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांनी ‘वायू प्रदूषणा’वर प्रकाश टाकला आहे. आशिया-पॅसिफिकमध्ये जवळपास चार दशलक्ष लोक वायू प्रदूषणमुळे मृत्यूमुखी पडतात.

श्रीनगरमध्ये ईदनिमित्त आयोजित रॅलीमध्ये जैश आणि इसिसचे झेंडे :
  • श्रीनगर : आज जगभरात रमजान ईद साजरी केली जात आहे. ईदनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ईदनिमित्त सकाळच्या नमाज पठणानंतर काश्मीर प्रातांत विविध रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान काश्मीरमधल्या अनेक तरुणांनी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि इसिसचे झेंडे फडकवले आहेत. यादरम्यान सुरक्षाबल आणि दहशतवादी संघटनांचे झेंडे फडकवणाऱ्या तरुणांमध्ये झटापटदेखील झाली.

  • श्रीनगरमधील जामा मशीदीजवळ जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर आणि काही दिवासांपूर्वी ज्याला भारतीय जवानांनी कंठस्नान घातले त्या दहशतवादी जाकीर मुसा या दोघांची छायाचित्र लावण्यात आली होती.

  • दरम्यान, जम्मू काश्मीरच्या पुलवामा परिसरात दहशतवाद्यांनी रमजान ईदच्या एक दिवस आधी एका महिलेची तिच्या घरात घुसून हत्या केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पुलवामा जिल्ह्याच्या सिंगू-नरबालमध्ये दहशतवाद्यांनी एका महिलेवर आणि एका तरुणावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात स्थानिक महिला नगीना बानो हीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच एक तरुण जबर जखमी झाला आहे. त्या तरुणावर सध्या उपचार सुरु आहेत.

ईद मुबारक! देशभरात रमजान ईदचा उत्साह :
  • मुंबई : आज देशभरात ईद-उल-फित्र (रमजान ईंद) साजरी केली जात आहे. जामा मशीदेचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मंगळवारी चंद्र दिसल्याचे जाहीर केले. त्यासोबतच देशभरात ईदची घोषणा करण्यात आली. इस्लामी कॅलेंडरनुसार रमजानचा महिना संपल्यानंतर ईद साजरी केली जाते. सऊदी अरबमध्ये काल (मंगळवारी) ईद साजरी करण्यात आली.

  • कोलकाता, वाराणसी आणि आसामसहीत देशभरातील अनेक ठिकाणी ईदचा चंद्र पाहिला गेला. त्यामुळे रमजानचा महिना संपला आहे. रमजान काळातील रोजे (उपवास) ठेवल्यानंतर हा सण साजरा केला जातो. यावर्षी रमजानचा महिना 7 मे रोजी सुरु झाला असून 4 जून रोजी संपला. यादरम्यान मुस्लीम बांधवांनी एकूण 29 रोजे ठेवले.

  • रमजान हा इस्लामी कालगणनेनुसार 9 वा महिना आहे. चंद्र दर्शनानंतर दिवस व महिना बदलल्याने शव्वाल महिन्याच्या (10 व्या महिन्याच्या) पहिल्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. ईदगाहमध्ये तसेच मशीदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात येते. मुंबईत आझाद मैदानात ही नमाज अदा करण्यात येणार आहे.

  • ईद-उल-फित्र हा मुस्लीम धर्मातील एक पवित्र सण आहे. जगभरात ईदचा चंद्र दिसल्यानंतर मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. या दिवशी मुस्लीम बांधव ईदगाहजवळ (कोणतीही स्वच्छ जागा) एकत्र जमून नमाज अदा करतात. नमाजनंतर सर्व बांधव एकमेकांना मिठी मारुन ईदच्या शुभेच्छा देतात.

ईदच्या निमित्तानं ५ कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट :
  • नवी दिल्ली- नरेंद्र मोदी सरकारनं ईदच्या निमित्तानं मुस्लिम विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदी सरकारनं प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणार असल्याचं सांगितलं आहे.

  • केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली, त्यानंतर मुस्लिम समुदायातील 5 कोटी मुस्लिमांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत लाभ मिळण्याची प्रक्रिया आणखी सुलभ आणि पारदर्शी करण्यात आली आहे.

  • नक्वी म्हणाले, विकासाच्या गाडीला विश्वासाच्या महामार्गावर पळवणे हा येत्या पाच वर्षातील आमचा अजेंडा आहे. जेणेकरून प्रत्येक गरजवंताच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. विश्वासाच्या या हायवेवर कोणताही गतिरोधक किंवा अडथळा येऊ देणार नाही. यासाठी आपल्याला सतर्क राहावं लागणार आहे.

  • '3 ई' म्हणजे शिक्षण, रोजगार आणि सशक्तीकरण हे आमचं लक्ष्य आहे. ही लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पढो-बढो हे अभियान चालवलं जाणार आहे. शिक्षणासाठी मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून प्रसार करण्यात येणार असून, देशभर हे अभियान चालवलं जाणार आहे. 

श्रीलंकेत ९ मुस्लिम मंत्र्यांचा राजीनामा :
  • कोलंबो : गेल्या एप्रिल महिन्यात ईस्टर संडेच्या दिवशी चर्चेस् व हॉटेल्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर मुस्लिम समुदाय राक्षस असल्याचे जे चित्र निर्माण केले जात आहे, त्याच्या निषेधार्थ सामूहिक भूमिका म्हणून श्रीलंका सरकारमधील नऊ मुस्लिम मंत्र्यांनी सोमवारी राजीनामे दिले. त्यात चार कॅबिनेट दर्जाचे आहेत.

  • चौकशी कशी हाताळली जाते आणि द्वेषपूर्वक केलेले भाषण, वांशिक हिंसाचार आणि काहीही केले तरी काही होत नाही, असा निर्माण झालेला समज कसा दूर करणार, यावर सरकारचे अस्तित्व अवलंबून आहे, असे श्रीलंका मुस्लिम काँग्रेसचे नेते रौफ हकीम म्हणाले.

  • तत्पूर्वी, पूर्व आणि पश्चिम प्रांतांचे मुस्लिम राज्यपाल अनुक्रमे एम.एल.ए.एम. हिजबुल्लाह आणि अझाथ सॅल्ली यांनी प्रमुख बौद्ध भिक्खू अथुरालिये रथना थेरो यांनी या राज्यपालांनी २१ एप्रिल रोजी झालेल्या त्या हल्ल्यांसंबंधात राजीनामे द्यावेत या मागणीसाठी उपोषण सुरू केल्यानंतर राजीनामे दिले.

  • थेरो हे सत्ताधारी युनायटेड नॅशनल पार्टीचे संसद सदस्य आहेत. या पक्षाचे नेतृत्व पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांच्याकडे आहे. थेरो यांनी पाच मागण्यांसाठी शुक्रवारपासून उपोषणाला कँडीतील दलादा मलिगावा या बुद्ध मंदिरासमोर सुरुवात केली. या मागण्यांत मंत्री रिशाद बथिउद्दीन आणि राज्यपाल हजिबुल्लाह आणि सॅली यांच्या राजीनाम्याचाही समावेश आहे. या सगळ्यांचा संबंध हा ईस्टर संडेच्या संशयित हल्लेखोरांशी असल्याचा थेरो यांचा आरोप आहे. या सगळ्यांनी थेरो यांचे हे आरोप नाकारले आहेत.

दिनविशेष :
  • जागतिक पर्यावरण दिन.

महत्वाच्या घटना 

  • १९१५: डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

  • १९५९: सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.

  • १९६८: अमेरिकेच्या अध्यक्षपदचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांचा गोळी मारण्यात आली, पुढील दिवशी केनेडी मरण पावले.

  • १९७५: सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.

  • १९७७: सेशेल्समधे उठाव झाला.

  • १९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.

  • १९९४: वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

  • २००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.

जन्म 

  • १७२३: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडॅम स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १७९०)

  • १८७९: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९५५)

  • १८८१: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९५५)

  • १८८३: ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९४६)

  • १९०८: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९१)

  • १९४६: विल्यम्स एफ१ टीम चे सहसंस्थापक पॅट्रिक हेड यांचा जन्म.

  • १९६१: भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक रमेश कृष्णन यांचा जन्म.

  • १९७२: भारतीय पुजारी आणि राजकारणी योगी आदित्यनाथ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९५०: कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर २०११)

  • १९७३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०६)

  • १९९६: भारतीय कवि आणि विद्वान आचार्य कुबेर नाथ राय यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९३३)

  • १९९९: राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले यांचे निधन.

  • २००४: अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १९११)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.