चालू घडामोडी - ०५ ऑक्टोबर २०१८

Date : 5 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एकाच वेळी दोन व्हीसा बाळगता येतात का :
  • प्रश्न- माझ्याकडे सध्या अमेरिकेचा वैध टुरिस्ट (बी1/बी2) व्हीसा आहे. पुढील महिन्यापासून माझा अमेरिकेत पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सुरु होणार आहे आणि मी स्टुंडट (एफ1) व्हीसासाठी अर्ज करणार आहे. मला एकाचवेळेस दोन व्हीसा बाळगता येतील का? जर माझ्याकडे एकापेक्षा अधिक व्हीसा असतील तर कोणत्या व्हीसावर मी अमेरिकेला जावे?

  • उत्तर- हो. एकाचवेळी दोन व्हीसा (जसे की टुरिस्ट, स्टुडंट व्हीसा) तुमच्याकडे असूशकतात. प्रत्येक व्हीसा संबंधित हेतू दर्शवतो आणि तुम्ही योग्य त्या कामासाठीच तो व्हीसा वापरला पाहिजे. जर तुम्ही अमेरिकेत एखादा अभ्यासक्रम किंवा ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला स्टुडंट व्हीसा लागेल. असे अभ्यासक्रम किंवा ट्रेनिंग तुम्ही टुरिस्ट व्हीसावर पूर्ण करु शकत नाही.

  • अमेरिकेत जेथे प्रवेश कराल तेथे तुम्हाला स्टुडंट व्हीसा आणि फॉर्म आय-20 (तुमच्या शैक्षणिक संस्थेने दिलेले कागदपत्र) इमिग्रेशन ऑफिसरला सादर करावे लागते. शिक्षण किंवा ट्रेनिंगसाठी तुम्ही जात नसाल आणि पर्यटनासाठी अमेरिकेत जात असाल तर तुम्हाला टुरिस्ट व्हीसा घेणे आवश्यक आहे.

  • तुम्ही प्रथमच स्टुडंट व्हीसावर अमेरिकेत जात असाल तर तुमचा अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वी 30 दिवसांपेक्षा जास्त काळ आधी अमेरिकेत जाण्याची परवानगी मिळत नाही. तुमच्या अभ्यासक्रम सुरु होण्याची अदिकृत तारिख आय-20 फॉर्मवर लिहिलेली असते. काही विद्यार्थी तेथे राहाण्यासाठी जागा शोधणे किंवा मित्र-आप्तांना भेटण्यासाठी 30 दिवसांहून आधी तेथे जाऊ शकतात.

ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा :
  • मुंबई : ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेने कोचर यांचा राजीनामा मंजूर केला आहे. तसेच कोचर यांना ICICI बँकेच्या सर्व जबाबदारीतून मुक्त केलं जात आहे, असं बँकेने स्पष्ट केलं आहे.

  • चंदा कोचर यांच्याविरोधात व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोचर सध्या सक्तीच्या रजेवर होत्या. चंदा कोचर यांच्या राजीनामाच्या बातमीनंतर ICICI बँकेच्या शेअरमध्ये तेजी आली. बँकेचे शेअर तीन टक्क्यांनी वाढून 313 रुपयांवर पोहोचले.

  • याआधीच संदीप बक्शी यांच्यावर ICICI बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी बक्शी यांना पदासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. चंदा कोचर यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असं ICICI बँकेने स्पष्ट केलं आहे.

भारत- पाकच्या बोलण्यांसाठी अमेरिकेने मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची इच्छा :
  • वॉशिंग्टन : भारत व पाकिस्तान हे देश एकमेकांशी द्विपक्षीय बोलणी करत नसल्यामुळे अमेरिकेने त्यासाठी मध्यस्थी करावी अशी पाकिस्तानची इच्छा असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले. संवादाच्या अभावी दोन देशांतील तणाव वाढू शकेल, असा इशाराही त्यांनी दिला.

  • मात्र, बोलणी व्हावीत यासाठी मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची विनंती अमेरिकेने नाकारली असल्याचेही कुरेशी यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात सांगितले. आदल्याच दिवशी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र ट्रम्प प्रशासनाने तो उडवून लावला.

  • पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये कुठल्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीला भारताचा विरोध आहे. असे असतानाही काश्मीरसह इतर मुद्यावरील मतभेद सोडवण्यासाठी पाकिस्तान नेहमीच मध्यस्थीची मागणी करत आला आहे.

  • आम्ही अमेरिकेला मध्यस्थाची भूमिका वठवायला सांगितले, कारण आम्ही एकमेकांशी बोलत नाही. अशाप्रकारे द्विपक्षीय चर्चा न होणे ही निकोप बाब नाही, असे अमेरिकी विचारवंतांची संस्था असलेल्या यूएस इन्स्टिटय़ूट ऑफ पीस येथे आयोजित कार्यक्रमात कुरेशी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

व्लादिमीर पुतिन भारतात, मोदींशी गळाभेट आणि ‘डिनर’ही :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वार्षिक द्विपक्षीय शिखर बैठकीसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गुरूवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान एस-400 हवाई सुरक्षा प्रणालीसह अवकाश आणि ऊर्जा सारख्या महत्वाच्या क्षेत्रात अनेक करारांवर हस्ताक्षर होण्याची शक्यता आहे.

  • परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुतिन यांचे स्वागत केले. त्यानंतर पुतिन थेट लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासाकडे गेले. तिथे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. नंतर पंतप्रधानांनी पुतिन यांच्यासाठी रात्र भोजनाचे (डिनर) आयोजन केले होते.

  • १९ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर संमेलनात दोन्ही नेत्यांमध्ये विविध द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर व्यापक चर्चा होईल. यामध्ये मॉस्कोच्या विरोधात अमेरिकन निर्बंध आणि दहशतवाद विरोधी सहकार्याचाही समावेश आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांबरोबर एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ पण आले आहे. यामध्ये उपपंतप्रधान युरी बोरिसोव, परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि उद्योग मंत्री डेनिस मंतुरोव्ह यांचा समावेश आहे.

  • बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन, भारतात तुमचे स्वागत आहे. चर्चेसाठी उत्सुक आहे. यामुळे भारत-रशिया संबंध आणखी मजबूत होतील. त्यांनी रशियन भाषेतही हे ट्विट केले आहे. शुक्रवारी भारत-रशिया यांच्यात अनेक करार होणार असल्याचे वृत्त पुतिन भारतात आल्यानंतर रशियन वृत्त संस्था तासने दिले आहे.

JEE Mains २०१९ : जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नवे बदल :
  • आयआयटीमध्ये इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच JEE च्या महत्त्वाच्या तारखा उद्या ५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. मात्र परीक्षेच्या केंद्राविषयी २१ ऑक्टोबरला विस्तृत माहिती मिळेल असे सांगण्यात आले आहे. ही सर्व माहिती jeemain.nic.in, nta.ac.in या दोन वेबसाईटवर ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

  • ६ ते २० जानेवारीमध्ये येणाऱ्या शनिवार-रविवारमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र त्याची नेमकी तारीख उदया जाहीर करता येणार आहे. ही तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपले नेमके केंद्र आणि परीक्षेची वेळ समजू शकणार आहे. पहिला पेपर २ वेळांत असेल पहिली वेळ ९.३० ते १२.३० असेल तर दुसरी वेळ २.३० ते ५.३० अशी असेल. मात्र पेपर २ हा एकाच वेळेत ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • परीक्षेच्या अर्ज भरण्यात तुमच्याक़डून काही चूक झाली असेल तर ८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान तुम्हाला चुका सुधारण्याची संधी मिळणार आहे. ३० सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र त्यामध्ये चूक झाली असल्यास ती सुधारता येणार आहे.

  • याशिवाय २०१९ पासून होणाऱ्या परीक्षेच्या एकूण पद्धतीत बदल करण्यात आला आहे. आधी ही परीक्षा सीबीएसईतर्फे घेण्यात येत होती मात्र आता ती एनटीएतर्फे घेण्यात येणार आहे. तसेच ऑफलाईन घेतली जाणारी ही परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. आधी ही परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जात होती. मात्र आता ती जानेवारी आणि एप्रिल अशी वर्षातून २ वेळा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता एक जास्तीची संधी मिळणार आहे.

बोर्डिंग पासची कटकट संपली, आता केवळ चेहरा दाखवा आणि विमानात प्रवेश मिळवा :
  • विमान प्रवास करणाऱ्यांसाठी बोर्डिंग पास मिळवणं एखाद्या कटकटीपेक्षा कमी नसतं, गर्दी असल्यामुळे बोर्डिंग पास मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता तुमची बोर्डिंग पासच्या कटकटीतून सुटका होणार आहे. कारण, आता देशांतर्गत प्रवासादरम्यान बोर्डिंग पासची गरज लागणार नाही. तुमचा चेहराच तुमच्या बोर्डिंग पासचं काम करणार आहे. मात्र, ही सुविधा फक्त डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी लागू असणार आहे.

  • प्रवाशांना विमानतळावर बोर्डिंग पासशिवाय प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकार चेह-याच्याद्वारे ओळख पटवण्याची व्यवस्था लागू करणार आहे. विमानतळ प्राधिकरण प्रवाशांसाठी कागदरहित प्रवेश देण्याच्या विचारात आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून चेह-याद्वारे ओळख पटवून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशाचा चेहराच त्याचा बोर्डिंग पास होणार आहे.

  • ही सुविधा दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू या चार प्रमुख विमानतळांवर बसवण्यात येणार असून हळूहळू या सुविधेचा विस्तार केला जाणार आहे. हा नियम जगभरात लागू असून, चेहरा हे स्कॅनिंगच्या माध्यमातून ओळख पटवण्याचं प्रभावी माध्यम आहे. माणसाचा चेहरा हा एक सर्वात वेगळा असा बायोमेट्रिक इंडिकेटर आहे. चेहरा स्कॅन करतेवेळी चेहऱ्याच्या विविध भागांनुसार त्याच्या प्रतिमा घेतल्या जातील.

  • त्यानुसार चेहरा व्यवस्थित स्कॅन करून मगच प्रवेश दिला जाईल. जर एखाद्याचं कपाळ झाकलेलं असेल किंवा अपघातामुळे चेहऱ्यावर काही जखम झाली असेल तरीही ही प्रणाली चेहरा व्यवस्थित ओळखू शकते. फक्त त्यासाठी प्रत्येक प्रवाशाला दर पाच वर्षांनी आपलं ताजं छायाचित्रं अपडेट करावं लागेल. देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी हे नक्कीच आनंदाचं वृत्त आहे.

शरद पवार यावेळी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता :
  • मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शरद पवार पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे.

  • 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी यांनी पुण्याचा गड राखला होता. पण कॉमनवेल्थ खेळातील भ्रष्टाचार आरोपानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून विश्वजित कदम यांनी निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. विश्वजित कदम हे आता कडेगाव-पलूसचे आमदार आहेत. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसकडे मागितल्याची माहिती आहे.

  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर भाजप सोडून इतर सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार हे नेतृत्व करू शकतात. अशा वेळी राज्यसभेऐवजी निवडणूक लढवून लोकसभेत असणं पवारांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ही रणनिती असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दिनविशेष :
  • जागतिक शिक्षक दिन / आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोधी दिन

महत्वाच्या घटना 

  • १९५५: पंडित नेहरुंच्या हस्ते हिन्दूस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

  • १९६२: डॉ. नो हा पहिला जेम्सबाँड चित्रपट प्रदर्शित झाला.

  • १९८९: मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.

  • १९९५: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.

  • १९९८: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १८९०: तत्त्वज्ञ व हरिजन चे संपादक किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला यांचा जन्म.

  • १९२२: लेखक, संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्म. (मृत्यू: १० मे १९९८)

  • १९२२: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९८७)

  • १९२३: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१२)

  • १९३६: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वक्लाव हेवल यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २०११)

  • १९३९: वॉल्टर वुल्फ रेसिंग चे संस्थापक वॉल्टर वुल्फ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९२९: भारतीय पुजारि वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १८७६)

  • १९८१: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हिन्दी लेखक भगवतीचरण वर्मा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०३)

  • १९९०: नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण राजकुमार वर्मा यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०५)

  • १९९१: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९०४)

  • २०११: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९५५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.