चालू घडामोडी - ०५ सप्टेंबर २०१८

Date : 5 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिका भारताला सर्वोच्च ड्रोन टेक्नोलॉजी देणार ? या आठवडयात होणार फैसला :
  • भारत आणि अमेरिकेत यांच्यात या आठवडयात उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत संभाव्य संरक्षण करारांना अंतिम स्वरुप देण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न असेल. दोन्ही देशांचे लष्करी संबंध दृढ करणे आणि आशियातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याचा या करारांमागे उद्देश आहे. अमेरिकेकडून संरक्षण मंत्री जीम मॅटिस, माईक पॉमपियो तर भारताकडून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या बैठकीत सहभागी होणार आहेत.

  • यापूर्वी दोनवेळा ही बैठक रद्द झाली आहे. मागच्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये टू प्लस टू बैठकीचा निर्णय झाला होता. भारत आणि अमेरिकेमध्ये होणारी ही सर्वोच्च स्तरावरची चर्चा आहे. जगातील दोन मोठया लोकशाही देशांना मतभेद बाजूला ठेऊन परस्परसंबंध अधिक भक्कम करण्याची ही संधी आहे असे अधिकारी आणि तज्ञांनी सांगितले.

  • रशिया आणि इराण या देशांबरोबरच्या भारताच्या व्यापारिक संबंधांवर अमेरिकेला आक्षेप आहे. भारत रशियाकडून एस-४०० मिसाइल सिस्टिम विकत घेणार आहे त्यावर अमेरिकेला आक्षेप आहे. टू प्लस टू बैठकीत हा कळीचा मुद्दा ठरु शकतो. अमेरिकेला त्यासाठी राजी करण्याचे भारतीय कुटनितीतज्ञांसमोर आव्हान आहे.

  • मागच्या दशकभरात भारत-अमेरिकेत अनेक संरक्षण करार झाले आहेत. सध्याच्या घडीला दोन्ही देशांसमोर चीन आणि पाकिस्तानचे आव्हान आहे. उपग्रहाकडून मिळणाऱ्या माहितीचे आदान-प्रदान आणि ड्रोन विक्री संदर्भातील महत्वाच्या करारावर शिक्कामोर्तब होऊ शकते. अमेरिकेने त्यांचे ड्रोन तंत्रज्ञान आतापर्यंत निवडक देशांना दिले आहे.

शिक्षक दिनानिमित्त गुगलचं आकर्षक 'अॅनिमेटेड' डूडल :
  • मुंबई : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आणि सन्मानार्थ देशभरात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. याचनिमित्ताने गुगलनंही 'अॅनिमेटेड' डूडल बनवून जगभरातल्या शिक्षकांना अनोखं गिफ्ट दिलं आहे.

  • गुगलने या डूडलमध्ये 'G'या अक्षराला पृथ्वी दाखवण्यात आली आहे. या पृथ्वीवर एक चष्मासुद्धा लावण्यात आला आहे ज्याने आपल्याला एखाद्या शिक्षकाचा भास होतो. ही पृथ्वी काही काळ फिरते आणि नंतर थांबते. पृथ्वी फिरायची थांबताच त्यातून गणित, विज्ञान, अंतराळ, संगीत, खेळाशी संबंधित चिन्हं बाहेर येतात.

  • अत्यंत सुंदर असं हे अॅनिमेटेड डूडल आहे. जगभरातील शाळा आणि महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकांसाठी गुगलने हे खास डुडल तयार केले आहे.

  • दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे दुसरे राष्ट्रपती होते. 1962 मध्ये जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा लोकांनी 5 सप्टेंबर हा दिवस राधाकृष्णन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र राधाकृष्णन यांनी या निर्णयाला विरोध केला आणि याऐवजी आपण देशातील सगळ्या शिक्षकांचा सन्मान म्हणून शिक्षक दिवस साजरा करू असा प्रस्ताव मांडला. तेव्हापासून शिक्षक दिन दरवर्षी 5 सप्टेंबरला साजरा केला जातो.

प्रशांत किशोर यांचा सर्व्हे, राहुल गांधींपेक्षा मोदी खूप पुढे :
  • नवी दिल्ली: प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC या संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्व्हेचा निकाल जाहीर झाला आहे. इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अन्य नेत्यांच्या तुलनेत खूप पुढे आहेत. या सर्व्हेचा निष्कर्ष राजकीय असला, तरी या सर्व्हेत महात्मा गांधीजींच्या 18 सूत्री कार्यक्रमातून देशाला विकासाच्या वाटेवर कोण नेऊ केल, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

  • यामध्ये 48 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दुसऱ्या नंबरवर असले, तरी दोघांमधील अंतर हे खूपच आहे. अवघ्या 11 टक्के लोकांना वाटतं की राहुल गांधी हे महात्मा गांधींच्या 18 सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करु शकतील.

  • महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी गांधीजींच्या 18 सूत्री कार्यक्रमातून ही मोहीम सुरु केली. ज्यामध्ये सार्वजनिक सद्भावना, स्वच्छता, दारुबंदी, आरोग्य, शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन यांसारख्या गोष्टींचा समावेश होता.

  • ‘नॅशनल अजेंडा फोरम’ असं या मोहिमेला नाव देण्यात आलं होतं. देशातील सुमारे 57 लाख नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

फ्रान्सचे तीन राफेल लढाऊ विमान भारतात :
  • नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानाच्या राजकीय वादानंतर फ्रान्सचे तीन राफेल लढाऊ विमाने भारतीय वायूसेनेच्या ग्वाल्हेरमधील एअरबेसवर दाखल झाली आहेत. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या ‘पिच ब्लॅक’ युद्ध सरावातील ही विमानं आहेत, ज्यात भारतीय वायूसेनेनेही सहभाग घेतला होता.

  • मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या तीन लढाऊ विमानांसह एक अॅटलास-400 एम मिलिट्री ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, एक सी-135 रिफ्यूलर विमान आणि एक एअरबस कार्गो विमानाने ऑस्ट्रेलियाहून ग्वाल्हेरच्या हवाई दलाच्या तळावर दाखल झाली.

  • यावेळी दोन्ही देशाची हवाई सेना एकत्र उड्डाण घेणार असल्याचीही शक्यता आहे. ग्वाल्हेर एअरबेसवर भारताच्या मिराज-2000 एच लढाऊ विमानांची स्क्वाड्रन तैनात आहे.

... त्यामुळे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा होतो 'शिक्षक दिन' :
  • मुंबई - देशभरात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र, 5 सप्टेंबर या दिनीच शिक्षक दिन का साजरा केला जातो, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर, देशाची माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असल्यामुळे हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी विद्यार्थ्यांकडून गुरुंचे वंदन करुन, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जातो.

  • आई आणि वडिलांनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे स्थान असते ते गुरुंना म्हणजेच शिक्षकांना. अगदी बालवाडीच्या शाळेपासून ते कॉलेज आणि त्यानंतरच्या जीवनातही प्रत्येक पावलावर आपणास शिक्षक भेटतो. माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो, त्यामुळे जीवनात प्रत्येक वळणावर आपणास नवीन शिक्षक भेटतात.

  • आपल्या आयुष्यातील अडचणी सोडविण्यात आणि यशाचा मार्ग दाखविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा राहतो. त्यामुळेच शिक्षकांप्रती या दिनी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

  • भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कारण, 'हे  विश्वच माझी शाळा' असे राधाकृष्णन म्हणत असत. एकदा राधा कृष्णन यांचे काही शिष्य त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे गेले.

  • त्यावेळी, माझा जन्मदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याऐवजी तो शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास मला अभिमान वाटेल, असे राधाकृष्णन यांनी म्हटले. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला. 5 सप्टेंबर 1962 मध्ये सर्वप्रथम शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी राधाकृष्णन हे देशाचे राष्ट्रपती होते. 

भारत-वेस्ट इंडिज मालिकेची घोषणा, मुंबई, पुण्यातही सामना :
  • मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची घोषणा झाली. पहिला सामना राजकोट, तर दुसरा सामना हैदराबादमध्ये खेळवण्यात येईल. कसोटीशिवाय पाच वन डे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली.

  • दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चार ते आठ ऑक्टोबर दरम्यान राजकोटमध्ये, तर दुसरा सामना 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.

  • कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये 21 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होईल. पहिला सामना 21 ऑक्टोबरला गुवाहटी, दुसरा 24 ला इंदूर, तिसरा 27 ला पुणे, 29 ला मुंबई आणि पाचवा वन डे सामना एक नोव्हेंबरला तिरुवअनंतपुरममध्ये होईल.

  • यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरु होईल. या मालिकेतील पहिला सामना चार नोव्हेंबरला कोलकात्यात, दुसरा सहा नोव्हेंबरला लखनौमध्ये आणि तिसरा सामना 11 नोव्हेंबरला चेन्नईत खेळवला जाईल.

  • वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अगोदरच 15 सदस्यीय संघाची घोषणा केलेली आहे. 36 वर्षीय फलंदाज ड्वेन स्मिथला वगळण्यात आलं आहे, तर 21 वर्षीय अल्जारी जोसेफचं एक वर्षानंतर पुनरागमन होत आहे.

  • युवा गोलंदाज कीमो पॉललाही संघात स्थान मिळालं आहे. गोलंदाजीची मदार सुनील अम्बरीस आणि कहलर हेमिल्टन यांच्यावरही असेल. वेस्ट इंडिज संघाचं नेतृत्त्व जेसन होल्डर करणार आहे.

दिनविशेष :
  • राष्ट्रीय शिक्षक दिन / आंतरराष्ट्रीय दान दिन

महत्वाच्या घटना

  • १९३२: बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.

  • १९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.

  • १९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.

  • १९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.

  • १९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.

  • १९७०: इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.

  • १९७२: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.

  • १९७५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.

  • १९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

  • १९८४: एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.

  • २०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  • २००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.

जन्म

  • ११८७: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १२२६)

  • १६३८: फ्रान्सचा राजा लुई (चौदावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १७१५)

  • १८७२: भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९३६)

  • १८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)

  • १८९५: भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)

  • १९०७: शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१)

  • १९१०: भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोझ पालिया यांचा जन्म.

  • १९२०: बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३)

  • १९२८: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४)

  • १९४०: अमेरिकन अभिनेत्री रॅक्वेल वेल्श यांचा जन्म.

  • १९४६: मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्म.

  • १९५४: वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू रिचर्ड ऑस्टिन यांचा जन्म.

  • १९८६: भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा यांचा जन्म.

मृत्यू

  • १८७७: अमेरिकेतील सू जमातीचा नेता क्रेझी हॉर्स यांचे निधन.

  • १९०६: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १८४४)

  • १९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८७१)

  • १८७६: चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १७९०)

  • १९७८: कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार रॉय किणीकर यांचे निधन.

  • १९९१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचे निधन. (जन्म: २१ मे १९३१)

  • १९९२: उद्योगपती अतूर संगतानी यांचे निधन.

  • १९९५: हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२२ – चिंगरीपोथा, २४ परगणा, पश्चिम बंगाल)

  • १९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)

  • १९९७: नोबेल पुरस्कार विजेत्या ऑग्नीस गाँकशा वाजक्शियू उर्फ मदर तेरेसा यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट१९१०)

  • २०००: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)

  • २०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर २०१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.