चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ एप्रिल २०१९

Date : 6 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज :
  • मुंबई : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. विराट हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ठरला आहे. विराटच्या नावे पाच हजार 110 (5110) धावा जमा आहेत.

  • बंगळुरुत शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरोधात झालेल्या सामन्यात कोहलीने हा विक्रम आपल्या नावे केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान आतापर्यंत सुरेश रैनाच्या नावे होता. रैनाने आयपीएलमध्ये पाच हजार 86 (5086) धावा केल्या आहेत.

  • कोहलीने कालच्या सामन्यात 49 चेंडूंमध्ये 84 धावा केल्या. या मोसमातील कोहलीचं हे पहिलंच अर्धशतक ठरलं. 31 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतकापर्यंत मजल मारली होती. आयपीएलच्या संपूर्ण इतिहासात हे कोहलीचं 35 वं अर्धशतक आहे.

  • कोहलीची झुंजार खेळी त्याला वैयक्तिक विक्रमासाठी फायदेशीर ठरली, तरी बंगळुरु संघाला हा सामना जिंकता आला नाही. बंगळुरुने दिलेले 206 धावांचे आव्हान कोलकाता नाईट राईडर्सने सहज पार करत तिसरा विजय साजरा केला. तर बंगळुरुची पराभवाची मालिका कायम राहिली.

मोदींचा कार्यक्रम लाईव्ह दाखवल्याने डीडी न्यूजला निवडणूक आयोगाची नोटीस :
  • लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला डीडी न्यूज आणि डीडीच्या इतर क्षेत्रीय वाहन्यांवरुन सर्वाधिक कव्हरेज देण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कव्हरेज देण्यात आलेला पक्ष काँग्रेस आहे. शुक्रवारी राष्ट्रीय न्यूज ब्रॉडकास्टर्सने निवडणूक आयोगाला या गोष्टीची माहिती दिली. मात्र, सरकारी सुत्रांनी इंडिअन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, डीडी न्यूजने भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना जास्त फायदा मिळावा असे कव्हरेज दिलेले नाही.

  • प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या एअर टाइमवर डीडी न्यूजकडून अहवाल मागवला आहे. काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, डीडी न्यूज सत्ताधारी भाजपाला जास्त कव्हरेज देत आहे.

  • यापूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पोल पॅनलकडे अशीच सूचना केली होती. येचुरींनी म्हटले होते की, पोल पॅनलने दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओला (एआयआर) राजकीय नोत्यांच्या भाषणांना आणि विधानांना प्रामुख्याने प्रसारित करण्यासाठी सांगण्यात यावे. कारण, त्यांनी अॅन्टी सॅटेलाइट क्षेपणास्राच्या यशस्वी परीक्षणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्राला उद्देशून संदेश प्राधान्याने प्रसारित केला होता.

खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीत ९८ टक्के घट :
  • मुंबई : भाजप खासदार पूनम महाजन यांची २०१४ मध्ये १०८ कोटी रुपयांची असलेली मालमत्ता २०१९ मध्ये दोन कोटी २० लाखांवर आली आहे. त्यांच्याकडे स्वतच्या मालकीचे घर, जमीनजुमला, सोने काहीही नसल्याचे महाजन यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

  • महाजन यांच्याविरुद्ध धनादेश न वटल्याचे प्रकरण न्यायालयात आहे. गेल्या निवडणुकीत मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेल्या महाजन यांना भाजप राजवटीत खासदारकीच्या काळात ‘बुरे दिन’ आल्याची चर्चा आहे.

  • महाजन यांनी उत्तरमध्य मुंबईतून भाजपतर्फे शुक्रवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी सिद्धिविनायक, माऊंटमेरी, माहीम दर्गा येथे जाऊन आशीर्वाद घेतले. महाजन यांनी २००९ मध्ये घाटकोपरमधून विधानसभा निवडणूक लढविताना २० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, तर २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी १०८ कोटी रुपयांची स्वत व पतीची मालमत्ता असल्याचे आणि ४१ कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज किंवा देणी असल्याचे जाहीर केले होते. तर २००९ मध्ये विधानसभा निवडणूक लढविताना सुमारे २० कोटी रुपयांची कुटुंबाची मालमत्ता जाहीर केली होती.

  • मात्र खासदारकीच्या कारकीर्दीत त्यांची मालमत्ता व उत्पन्न कमी झाले असून २०१९ मध्ये महाजन यांनी स्वतकडे एक कोटी सहा लाख तर पती वजेंडला राव यांच्याकडे एक कोटी १४ लाख रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. रोख रक्कम, मुदतठेवी, कंपन्यांचे समभाग आदी सर्व जंगम मालमत्ता यात गृहीत धरण्यात आली आहे. सध्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘सिग्नेचर आर्यलड’ इमारतीत राहत असलेल्या महाजन यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावे घर, शेतजमीन, सोने काहीही नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर आता कोणतेही कर्ज किंवा दायित्व नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

लघुग्रहाच्या अंगरंगाचा शोध घेण्यासाठी यंत्र पाठवण्यात यश : 
  • टोकियो : जपानच्या हायाबुसा या शोधक यानाने एका लघुग्रहावर शंकूच्या आकाराचे स्फोटक यंत्र यशस्वीरीत्या पाठवले असून त्याच्या पृष्ठभागावर विवर तयार करून अंतर्गत रचनेचा शोध घेतला जाणार आहे. सौरमाला कशी तयार झाली असावी यावरही त्यामुळे प्रकाश पडणार आहे.

  • ही मोहीम जोखमीची असून जपानच्या अवकाश संस्थेच्या हायाबुसा २ यानाने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या आरंभाचा शोध घेण्यासाठी चालवलेल्या अभ्यासाचा एक  भाग आहे. हायाबुसा २ वरून शंकूच्या आकाराचे एक स्फोटक यंत्र पाठवण्यात आले. त्यावेळी हायाबुसा यान रुगु या लघुग्रहापासून १६०० फूट म्हणजे ५०० मीटर उंचीवर होते. हे स्फोटक यंत्र तेथे पडल्यानंतर चाळीस मिनिटांनी त्याचा स्फोट होऊन तेथे विवर तयार होईल.

  • हा लघुग्रह पृथ्वीपासून ३० कोटी किलोमीटर अंतरावर असून हायाबुसा २ यानाने हे स्फोटक यंत्र अंतराळ कचऱ्याशी टक्कर चुकवून अचूकपणे लघुग्रहावर पाठवले आहे. त्यासोबतच एक कॅमेराही पाठवण्यात आला होता त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाची छायाचित्रेही टिपण्यात आली आहेत. शोधक यानाच्या तळाशी लावलेल्या कॅमेऱ्याने स्फोटक यंत्र योग्य प्रकारे सोडल्याचे दाखवले असून लघुग्रहावर स्फोट झाला की नाही याची अजून  खातरजमा झालेली नाही. पण हे स्फोटक यंत्र तेथे पोहोचले आहे यात शंका नाही असे जपानच्या अवकाश संस्थेचे अभियांत्रिकी संशोधक ताकाशी कुबोटा यांनी सांगितले.

  • स्फोटकांचा सर्व अडथळे पार करून अचूक वापर व इतर बाबी या अभूतपूर्व असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या मोहिमेत लघुग्रहाच्या अंतर्गत रासायनिक रचनेचा उलगडा होणार असून रूगू लघुग्रहावरील स्फोट कमी तीव्रतेचा राहणार असल्याने तो लघुग्रह कक्षाभ्रष्ट होणार नाही.

   

यूपीएससी परीक्षेत देशात महिलांमध्ये अव्वल मराठमोळ्या सृष्टी देशमुखचा कानमंत्र :
  • भोपाळ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018 परीक्षेत मराठमोळ्या सृष्टी देशमुखने महिलांमध्ये अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. भोपाळमध्ये राहणाऱ्या सृष्टीने देशात पाचवा क्रमांक पटकावला. लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न तिने पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केलं.

  • सिक्युअर करिअर म्हणून सृष्टीने सुरुवातीला इंजिनिअरिंग केलं. मात्र नागरी सेवा तिला खुणावत होत्या. लहानपणापासून कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहिलेल्या सृष्टी देशमुखने त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले. विशेष म्हणजेच पहिल्याच प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली आहे. टॉप दहामध्ये येण्याचं ठरवलं होतं, असंही सृष्टी म्हणते.

  • रोज अभ्यास सुरु असतानाच ऑनलाईन टेस्ट सीरिजच्या माध्यमातून ती स्वतःला तपासून पाहत होती. भोपाळसोबतच दिल्लीमधल्या चांगल्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभल्याचंही सृष्टी सांगते.

  • यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सृष्टीला दोन वैशिष्ट्यं जाणवली. एक तर तुम्ही यशस्वी होऊन नागरी सेवेची वाट चोखंदळता. पण दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला प्रेरणा देणं. लवकर उठायचं आणि अभ्यासाला बसायचं, कधी तुम्ही एकटेच अभ्यास करत असता, बराचसा वेळ घरातच जातो. लग्न सोहळ्यांना हजेरी लावता येत नाही, सोशल मीडियापासून दूर, मात्र हे मोटिवेशन तुम्हाला यशाच्या दिशेने नेतं, असं तिला वाटतं.

  •  

  •  

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६५६: शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.

  • १८९६: आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.

  • १९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९३०: प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.

  • १९६५: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला

  • १९६६: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.

  • १९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.

  • १९९८: भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्‍या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.

  • १९९८: स्तनांचा कर्करोग बरा करणार्‍या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्‍या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.

  • २०००: मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.

जन्म

  • १७७३: स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १८३६)

  • १८६४: ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९३४)

  • १८९०: फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते अँटनी फोक्कर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९३९)

  • १८९०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९६०)

  • १८९२: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माते डोनाल्ड विल्स डग्लस यांकॅह जन्म. (मृत्यू:  १ फेब्रुवारी १९८१)

  • १९०९: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९४)

  • १९१७: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर२००६)

  • १९१९: कोंकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित यांचा जन्म.

  • १९२७: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून २०००)

  • १९२८: फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचा जन्म.

  • १९३१: बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४ – कोलकता, पश्चिम बंगाल)

  • १९५६: क्रिकेटपटू व प्रबंधक दिलीप वेंगसरकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • ११९९: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर ११५७)

  • १९५५: धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन.

  • १९८१: मानवधर्माचे उपासक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर यांचे निधन.

  • १९८३: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतोनाथ चौधरी यांचे निधन. (जन्म: १० जून १९०८)

  • १९८९: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचे निधन. (जन्म: ७ मे १९१२ – मांडली, डुंगरपूर, राजस्थान)

  • १९९२: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९२०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.