चालू घडामोडी - ०६ ऑगस्ट २०१८

Date : 6 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
व्यावसायिक यानाच्या पहिल्या उड्डाणासाठी सुनीता विल्यम्सची निवड :
  • ह्यूस्टन : व्यावसायिक अंतराळ यान व कॅप्सुलच्या माध्यमातून अंतराळात जाण्याच्या पहिल्या मोहिमेसाठी नासाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह नऊ जणांची निवड केली आहे. नव्या अंतराळ यानाची निर्मिती आणि संचलन बोइंग कंपनी आणि स्पेसएक्सने केले आहे.

  • नासाने टिष्ट्वट केले आहे की, भविष्यात अंतराळयात्री स्पेस एक्स आणि बोइंगस्पेसच्या सहकार्याने निर्मित यानाच्या माध्यमातून अंतराळ यात्रेसाठी जातील. नासाचे प्रशासक जिम ब्राइडन्स्टाइन यांनी सांगितले की, आम्ही अमेरिकी अंतराळवीरांना अमेरिकेतून रॉकेटच्या माध्यमातून पाठविण्याच्या तयारीत आहोत. नासाचे आठ सक्रिय अंतराळवीर आणि एक माजी अंतराळवीर व व्यावसायिक चालक दलाचे सदस्य वर्ष २०१९ च्या सुरुवातीला बोइंग सीएसटी -१०० स्टारलाइट व स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सुलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर जातील.

  • ब्राइडन्स्टाइन म्हणाले की, अंतराळ क्षेत्रात महान लक्ष्य साध्य करण्याचे आमचे स्वप्न आमच्या मुठीत आहे. अंतराळातील महारथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकी अंतराळवीरांचा हा समूह आमच्या व्यावसायिक सहयोगी बोइंग व स्पेसएक्सद्वारा निर्मित नव्या अंतराळ यानातून उड्डाण घेईल. मानव अंतराळ यानाची ही नवी सुरुवात असेल. यामुळे अंतराळ क्षेत्रात अमेरिकी नेतृत्वाला मजबुती मिळेल.

  • आणखी ८ जणांचा समावेश या नऊ अंतराळवीरांमध्ये सुनीता विल्यम्स (५२), जोस कसाडा (४५) यांचा समावेश आहे. सुनीता विल्यम्स यापूर्वी अंतराळ स्टेशनमध्ये ३२१ दिवस राहिलेल्या आहेत. नासाचे अंतराळवीर रॉबर्ट बेहकेन (४८) आणि डग्लस हर्ले (५१) हे ड्रॅगन क्रू म्हणून तर, एरिक बोए (५३) आणि निकोल मॅन (४१) कमांडर असतील.

  • माजी अंतराळवीर आणि बोइंगचे कार्यकारी क्रिस्टोफर फर्ग्युसन (५६) हे व्यावसायिक यानाचे सदस्य असतील. याशिवाय व्हिक्टर ग्लोवर (४२) आणि माइकल होपकिस (४९) हेही उड्डाण घेणार आहेत. फ्लोरिडातील केप कॅनावेरल तळावरून कॉम्प्लेक्स ४१ वरून युनायटेड लाँच अलायन्स अ‍ॅटलस व्ही रॉकेटच्या माध्यमातून पाठविण्यात येईल.

ओबामा दाम्पत्याने ‘या’ भारतीय फिल्ममेकरला दिली पसंती :
  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा हे दोघंही सध्या नेटफ्लिक्ससाठीच्या निर्मिती संस्थेच्या कामात व्यग्र आहेत. हॉलिवूडमधील सुत्रांचा हवाला देत ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सामाजिक कार्यकर्ती आणि फिल्ममेकर प्रिया स्वामीनाथन हिची ओबामा दाम्पत्याने निवड केली आहे.

  • एका मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टवर ती काम करणार असल्याचं कळत आहे. यापूर्वी तिने २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेरी यंग गर्ल्स’ची निर्मिती केली असून त्याच्या सहदिग्दर्शनाची धुराही सांभाळली होती. या लघुपटातून न्यूयॉर्कमधील अल्पवयीन देहविक्री करणाऱ्या वर्गावर भाष्य करण्यात आलं होतं. त्याशिवाय प्रियाने ‘अन्नपूर्णा पिक्चर्स’साठीही काही काळ काम पाहिलं होतं.

  • तळागाळातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांना वाव देण्यासाठी म्हणून राबवण्यात आलेल्या ‘सनडान्स इन्स्टिट्यूट’च्या ‘फिल्म टु’ या उपक्रमातही ती सहभागी होती. त्यासोबतच लैंगिक अत्याच्यारांविरोधात आवाज उठवणाऱ्या ‘टाइम्स अप’ या चळवळीचाही ती भाग होती.

  • त्यामुळे आता चित्रपट आणि काही अफलातून सीरिजसाठी ओळखल्या जाणाऱ्या नेटफ्लिक्सवर ओबामा दाम्पत्य आणि प्रियाची ही नवी इनिंग कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्य म्हणजे ओबामा दाम्पत्याचं सामाजिक कामांमध्ये असणारं योगदान आणि त्याच मार्गाने त्यांनी उचललेली काही पावलं याकडे पाहता, आता नेटफ्लिक्सवर त्यांच्या निर्मिती संस्थेकडून साकारण्यात येणाऱ्या कलाकृतीवरही त्याचं प्रतिबिंब पडणार ही बाब नाकारता येत नाही.

श्वेता नंदा बच्चनचे सासरे राजन नंदा यांचे निधन :
  • अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा बच्चन हिचे सासरे राजन नंदा यांचे निधन झाले. रविवारी रात्री गुडगावस्थित एका रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

  • अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली. ऋषी कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिने इन्स्टाग्रामवर राजन नंदा यांचा फोटो शेअर करत श्रद्धांजली दिली.

  • राजन नंदा Escorts ग्रूपचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर होते. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ऋषी कपूर यांची मुलगी ऋतू नंदा या राजन नंदा यांच्या पत्नी होत. त्यांना निखील नंदा आणि नताशा नंदा अशी दोन मुले आहेत. राजन यांचा मुलगा निखील नंदा अमिताभ यांचा जावई आहे.

पोस्टाच्या पेमेंट बँकेचे मोदी करणार उद्घाटन :
  • नवी दिल्ली: भारतीय टपाल विभागाच्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँके’चे (आयपीपीबी) येत्या २१ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानीत होणाऱ्या एका कार्यक्रमात औपचारिक उद्घाटन होणार आहे.

  • दळणवळण खात्याच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, या बँकेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांनी २१ आॅगस्ट रोजी वेळ दिला आहे. या बँकेच्या दोन शाखा याआधीच सुरु झाल्या आहेत.

  • राहिलेल्या ६४८ शाखा देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे सुरु करण्यात येतील. देशाच्या कानाकोप-यात १.५५ टपाल कार्यालये आहेत. त्यांच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील लोकांना पोस्टाच्या पमेंट बँकेमार्फत बँकिंग व वित्तीय सेवा मिळू शकतील.

‘समर्थना’साठी अमित शाहांचा धोनीशी ‘संपर्क’ :
  • नवी दिल्ली भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानाअंतर्गत क्रिकेटर एम एस धोनी याची भेट घेतली. दिल्लीतील वसंत विहार येथे धोनी आणि शाह यांची भेट झाली.

  • केंद्रातील मोदी सरकारचे चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने 29 मे पासून ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना भेटून मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली जात आहे.

  • याआधी 22 जुलै रोजी अमित शाह यांनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची भेट घेतली होती. त्याहीआधी अभिनेत्री माधुरी दीक्षित, उद्योगपती रतन टाटा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

  • संपर्क फॉर समर्थन काय आहे - ‘संपर्क फॉर समर्थन’ हे अभियान भाजपने सुरु केले आहे. मोदी सरकारने गेल्या चार वर्षात केलेल्या कामांची माहिती या अभियानाअंतर्गत देशातील मान्यवरांना दिली जाते. त्यांच्याशी मोदींच्या कामांबद्दल चर्चा केली जाते. त्यांची मतं जाणून घेतली जातात. त्यानंतर पक्षाला समर्थन करण्यास विनंती केली जाते.

पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं उपविजेतेपद :
  • नानजिंग : भारताच्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. स्पेनच्या ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मरिनने अंतिम सामन्यात सिंधूचा 21-19, 21-10 असा पराभव केला.

  • रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्येही सिंधूला कॅरोलिना मरिनकडूनच हार स्वीकारावी लागली होती. पण आजच्या फायनलमध्ये सिंधूने 15-11 अशी आघाडी घेऊन पहिल्या गेमवर वर्चस्व राखलं होतं. त्यानंतर कॅरोलिना मरिनने आक्रमक खेळ करून सिंधूचं वर्चस्व मोडून काढलं.

  • मरिनने इतक्या वेगाने गुण वसूल केले की, सिंधू तिच्यासमोर हतबल झालेली दिसली. अखेर मरिनने 21-19, 21-10 असा विजय मिळवून विजेतेपदावर जागतिक विजेतेपदावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं.

  • 2017 च्या ग्लासगोमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधू आणि नोझोमी ओकुहारा ही जोडी अंतिम सामन्यात भिडली होती. पण त्यावेळी ओकुहाराने सिंधूचा संघर्ष तीन सेट्समध्ये मोडीत काढत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. तो पराभव बाजूला सारुन जागतिक अजिंक्यपदाच्या या स्पर्धेत भारताला पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी सिंधूसमोर पुन्हा एकदा चालून आली होती.

  • सिंधूने आजवरच्या कारकीर्दीत या स्पर्धेची तीन पदकं पटकावली आहेत. त्यात 2013 आणि 2014 साली कांस्य तर 2017 च्या रौप्यपदकाचा समावेश आहे. पण जागतिक अजिंक्यपदाच्या सोनेरी यशाने तिला वारंवार हुलकावणी दिली. त्यामुळे जिनपिंगच्या बॅडमिंटन कोर्टवर पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची तिला संधी होती.

दिनविशेष :
  • जागतिक अण्वस्त्रविरोधी दिन / अणुशस्त्र जागृती दिन.

महत्वाच्या घटना

  • १९४५: जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला.

  • १९६०: अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.

  • १९६२: जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९९०: कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.

  • १९९४: डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान.

  • २०१०: भारतातील जम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला.

जन्म

  • १८०९: इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८९२)

  • १८८१: पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा पाश्चिम स्कॉटलंड येथील लॉकफील्डफार्म येथे जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९५५)

  • १९००: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनी चे सहसंस्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २००३)

  • १९२५: लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर २००५)

  • १९५९: भारतीय पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांचा जन्म.

  • १९७०: भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक एम. नाईट श्यामलन यांचा जन्म.

मृत्यू

  • १९२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर१८४८)

  • १९६५: संगीतकार वसंत पवार यांचे निधन.

  • १९९१: ईराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचे निधन. (जन्म: २६ जून १९१४)

  • १९९७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर१९२४)

  • १९९९: केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९४१ – सेमरी जमालपूर, माऊ, उत्तर प्रदेश)

  • २००१: भारतीय नौदल प्रमुख आधार कुमार चॅटर्जी  यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.