चालू घडामोडी - ०६ डिसेंबर २०१८

Updated On : Dec 06, 2018 | Category : Current Affairsम. सु. पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर :
 • भारतीय साहित्यविश्वातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कार २०१८ ची बुधवारी घोषणा झाली. विविध २४ भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा मराठी भाषेतील साहित्यासाठी प्रसिद्ध लेखक म. सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ हा समीक्षा ग्रंथाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 • त्याचबरोबर कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत तर  ‘भाषा सन्मान’ पुरस्कारासाठी पुण्याच्या लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे. २९ जानेवारी २०१९ रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एक लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 • डॉ. शैलजा बापट या पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. त्यांनी ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ हा तीन खंडांतील संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे. तसेच, शुद्ध अद्वैत आणि केवल अद्वैत वेदांतावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची ‘प्रोफेसर एमिरेट्‌स’ म्हणून निवड करण्यात आली होती.

 • हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून चित्रा मुद्गल यांच्या ‘पोस्ट बॉक्स नं. २०३ – नाला सोपारा’ या कादंबरीची निवड झाली आहे. तर उर्दू साहित्यासाठी रहमान अब्बास यांच्या ‘रोहजीन’ या कांदबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

देशातील सर्वात लांब जोडपूल २५ डिसेंबरला खुला :
 • ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांना जोडणाऱ्या देशातील सगळ्यात लांब अशा रेल्वे- रस्ते पुलाचे (रेल- रोड ब्रिज) पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबरला उद्घाटन करणार आहेत. ४.९४ किलोमीटर लांबीचा हा बोगिबील पूल आसाम व अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात आहे. सुशासन दिन म्हणून साजऱ्या होणाऱ्या २५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुलाचे उद्घाटन करतील, अशी माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

 • माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी १९९७ साली या बोगिबील पुलाचे भूमिपूजन केले होते, मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर २००२ सालीच या पुलाचे काम सुरू झाले. गेल्या १६ वर्षांत या पुलाच्या बांधकामाची मुदत अनेकवेळा चुकल्यानंतर ३ डिसेंबरला या मार्गावर पहिली मालगाडी धावली. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत रसदपुरवठय़ात सुधारणा करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या पायभूत प्रकल्पांपैकी बोगिबील हा एक आहे.

 • यात ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किनाऱ्यावर ट्रान्स- अरुणाचल महामार्गाचे बांधकाम, तसेच या विशाल नदीवर व दिबांग, लोहित, सुबनसिरी व कामेंग या तिच्या उपनद्यांवर नवे रस्ते व रेल्वे मार्ग बांधण्याचा त्यात समावेश आहे. भारत व चीन यांच्यादरम्यान सुमारे ४ हजार किलोमीटरची सीमा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

करीमनगरचं नाव बदलून करीपुरम ठेवणार - योगी आदित्यनाथ :
 • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास भाजपा करीमनगरचं नामांतर करेल असं आश्वासन दिलं आहे. करीमनगरचं नाव बदलून करीपुरम करु असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. ‘तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास लोकांच्या भावनांचा आदर राखत करीमनगरचं नामांतर करीपुरम करण्याचा प्रयत्न करु’, असं आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे.

 • उत्तर प्रदेशातील अनेक शहरांची नामांतरं केल्याने आधीच योगी आदित्यनाथ यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे. ट्विटरवर योगी आदित्यनाथ यांची खिल्ली उडवली जात आहे. मात्र तरीही नावं बदलण्याचा सपाटा अद्याप सुरु आहे. नुकतंच एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात भाजपाला निवडून दिल्यास हैद्राबादचं नाव बदलून भाग्यनगर करु असं आश्वासन दिलं होतं.

 • ‘जर हैद्राबादचं भाग्यनगर करायचं असेल तर तुम्ही भाजपाला तेलंगणात सत्ता स्थापन करण्यासाठी मदत केली पाहिजे’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. तेलंगणामधील माजी भाजपा नेता टी राजा सिंह लोध यांनीदेखील अनेक कार्यक्रमांमध्ये आपला पक्ष तेलंगणामधील शहरांची नावे बदलणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

 • योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील अनेक शहरांची नावे बदलली आहेत. अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज करण्यात आलं तर फैजाबादचं अयोध्या आणि मुघलसराई जंक्शनचं नाव पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शन करण्यात आलं आहे. दुसरीकडे भाजपा नेता जगन प्रसाद यांनी आग्राचं नाव बदलून अग्रवन किंवा अग्रवाल करण्याची मागणी केली आहे.

जग्वारची पाच दशकांनी भारलेली XJ50 लाँच; किंमत फक्त ४० लाखांपासून :
 • गेली पाच दशके जगभरातील व्यावसायिक, सेलिब्रिटी, राजकारण्यांच्या पसंतीला उतरलेली जग्वार लँड रोव्हरची XJ ही आलिशान कार नव्या अवतारात भारतात नुकतीच लाँच करण्यात आली. जुन्या कारच्या नावात काहीसा बदल करून XJ 50 असे नामकरण करण्यात आले आहे.

 • XJ 50 ला लांब व्हीलबेस असून 3.0 लिटरचे डिझेल पॉवरट्रेनचे इंजिन देण्यात आले आहे. शिवाय आकर्षक रचना, दणकट बांधणी या कारला स्टायलिश स्पोर्टींग सलोनच्या श्रेणीतील एक उत्तम कार बनवितात. या कारला 19 इंचाचे टायर देण्याक आले आहेत. क्रोम सराऊंडसह क्रोम रेडिएटर ग्रील, मागच्या आणि बाजूच्या वेंट्सला खास बॅजिंग देण्यात आले आहे. 

 • XJ 50 ही आलिशान कार फुजी व्हाईट, सँटोरिनी ब्लॅक, लोअर ब्ल्यू आणि रोझेलो रेड अशा चार रंगात उपलब्ध आहे. XJ 50 च्या XE मॉडेलची 39.73 लाख,  XF 49.58 लाख,  F-PACE  63.17 लाख,  XJ 1 कोटी 2 लाख आणि F-TYPE ची सुरुवातीची किंमत 90.93 लाख रुपये एक्स-शोरुम ठेवण्यात आलेली आहे.

गौतम गंभीरवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव :
 • मुंबई : रिटायरमेंटनंतर भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याला कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान शुभेच्छा दिल्या. शिवाय भारतीय खेळाडूंनीही गंभीरवर सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव केला. गौतम गंभीरने सर्व फॉर्मेटमधून निवृती घेतली आहे. त्याने काल सोशल मीडियावर एक भावूक व्हीडिओ टाकून निवृतीची घोषणा केली होती. त्यानंतर सर्व स्तरातून त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 • धन्यवाद कर्णधार आयपीएलमध्ये शानदार कर्णधारपद भूषवल्याबद्दल धन्यवाद. तू एक खास व्यक्ती आहेस. तू नेहमी खुश राहावं हीच ईश्वराकडे प्रार्थना. तसेच तू नेहमी हसत रहा, अशा शब्दात बॉलिवूडच्या किंग खानने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गंभीरला शुभेच्छा दिल्या.

 • तूच खरा चॅम्पियन - "गौती तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. तू खरा चॅम्पियन आहेस, जो देशासाठा लढला. तुला खूप खूप प्रेम," अशी शुभेच्छा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंह याने दिली आहे.

 • तुझ्याकडून खूप शिकायला मिळाले - जलद गोलंदाज प्रविण कुमाने गंभीरच्या निवृतीच्या व्हीडिओचा उल्लेख करत तो म्हणाला, " हा खूपच प्रेरणा देणारा व्हीडीओ आहे. एक खेळाडू म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही गौती भाई तुझ्याकडून खूप शिकायला मिळाले. धन्यवाद."

GSAT 11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; भारतात इंटरनेटचा स्पीड वाढणार :
 • पॅरिस : देशातील सर्वात अवजड उपग्रहाचे म्हणजेच GSAT 11 चे मध्यरात्री 2 वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. GSAT 11 या उपग्रहामुळे भारतात इंटरनेट क्षेत्रात क्रांती होईल,असा दावा केला जात आहे.

 • या उपग्रहाच्या साहाय्याने भारतात प्रत्येक सेकंदाला 100 गीगाबाइटपेक्षा अधिक ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हिटी मिळेल असे म्हटले जात आहे.

 • युरोपियन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून मध्यरात्री 2 वाजता हे प्रक्षेपण करण्यात आले. याआधी मार्च 2018 मध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यामध्ये शास्त्रज्ञांना अपयश आले. त्यानंतर गेले सात महिने शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न करुन उपग्रहामधील त्रुटी दूर केल्या. उपग्रहातील तांत्रिक गोष्टींचा बराच अभ्यास करुन अखेर GSAT 11 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १७६८: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

 • १८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.

 • १९१७: फिनलँड रशियापासुन स्वतंत्र झाला.

 • १९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.

 • १९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.

 • १९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली.

 • १९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.

 • २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जन्म 

 • १४२१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १४७१)

 • १७३२: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)

 • १८२३: जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १९००)

 • १८५३: संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१)

 • १८६१: कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९१९)

 • १९१६: गंधर्व भूषण जयराम शिलेदार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२)

 • १९१७: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे २००८)

 • १९२३: लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर २००२)

 • १९३२: पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००७)

 • १९८५: भारतीय क्रिकेटपटू आर. पी. सिंग यांचा जन्म.

मृत्यू 

 • १८९२: सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेन्स यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८१६)

 • १९५६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८९१)

 • १९७१: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९०२)

 • १९७६: पत्री सरकार चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९००)

 • १९९०: मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान तुक़ू अब्दुल रहमान यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९०३)

टिप्पणी करा (Comment Below)